अनुभव -१०० 🌺
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 5 min read
Updated: Jun 1, 2020
श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १००🌺)
*अनुभव त्रिवेणी*
जय गजानन! मी रमेश यादव, इंदोर! लहानपणी आम्ही एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलो. घरात बरेच सदस्य होते. आमच्या देवघरात एक जुनाट फोटो होता. तो कुणाचा हे मला माहीत नव्हतं, ना कधी मी विचारण्याच्या फंदात पडलो. माझ्या लग्नानंतर माझ्या पत्नीला म्हणजे आशाला आमच्या सासू बाईंनी एक पोथी दिली, आशा ती नित्य नियमाने वाचित असे. पुढे नोकरीतील बदलामुळे मी गौतमपुरा येथे राहण्यास गेलो तेव्हा आशाने सोबत ती पोथी आणि देवघरातील तो फोटो घेतला. आम्ही गौतमपुरा येथे किरायाच्या खोलीत रहात होतो. ती वरच्या मजल्यावरील खोली होती. खोलीला लागून समोर टिनाचे पत्रे लावले होते. तिथे आम्ही दोघं, दोन मुली व लहान मुलगा असे चौघं राहू लागलो. एकदा आशाचं पोथी वाचन झालं, तेव्हा मी तिला विचारलं ही पोथी मराठीतून आहे का आणि कुणाविषयी आहे? तेव्हा तिने गजानन महाराजांविषयी व पोथी विषयी माहिती देऊन तो फोटो गजानन महाराजांचा असल्याचं सांगितलं. झालं! तेव्हा पासून माझं पोथी वाचन सुरू झालं ते अजूनही सुरू आहे. आज आम्ही जे आहोत ते गजानन महाराजांमुळे !
मला आठवतं आमचा मुलगा दीड पावणेदोन वर्षांचा असेल. तो एकदा खोलीतून समोरच्या पत्र्यावर व पत्र्यावरून खाली पडला. खाली जोरात आरडाओरडी झाली. आम्ही गजानन महाराजांचं नाव घेतच खाली धावलो. मुलगा निपचित पडला होता. ज्या फरशीवर पडला ती फुटली होती. आम्ही मुलाला छातीशी कवटाळून, महाराजांचा धावा करत डाॅक्टरांना गाठलं. डाॅक्टरांनी त्याला व्यवस्थित तपासलं. आश्चर्य म्हणजे आठ दहा फुटांवरुन खाली पडूनही मुलाला काहीही झालं नाही. डाॅक्टर म्हणाले तो बेशुद्ध झाला आहे, बाकी तो ठीक आहे! कुतुहलापोटी डाॅक्टर घरी येऊन ती जागा पाहून गेलेत. डाॅक्टर माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले,
' भगवान है! ' मी मनात जयघोष केला 'गजानन महाराज की जय '
पुढे माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नाचा योग जुळून आला आणि तिला गुजराथला बडोदा येथे स्थळ मिळालं. दोन वर्षांनी धाकटी मुलगी लग्नायोग्य झाली तेव्हा महाराजांना हात जोडून प्रार्थना केली की हिचाही योग बडोदा येथेच जुळवून आणा. महाराजांनी ती प्रार्थना ऐकली. आज गेले अनेक वर्ष आम्ही घरी महाराजांचा प्रकटदिन आणि समाधीदिन दोन्हीही कार्यक्रम मनोभावे करीत आहोत.
.🌺अनुभव-- रमेश यादव, इंदोर.
...........
जय गजानन! मी सौ रेश्मा ज्ञानेश्वर गवळी, पूर्वाश्रमीची रेश्मा ससाणे! माझ्या वडिलांची नोकरी मुंबईला होती. लहानपणी तिथून गावी मोठ्या आत्याकडे सुटीत येणं व्हायचं तेव्हा आत्याच्या तोंडून गजानन महाराजांविषयी खूप कानावर पडायचं, पण समानार्थी शब्द शिकताना गजानन म्हणजे गणपती हा अर्थ डोक्यात असल्याने गणपती बाप्पा असंच मी समजून होते. पुढे शिक्षण झालं, लग्न झालं. मी औरंगाबादला शाळेत शिक्षिका म्हणून काम करू लागले. एकदा शाळेतील सहशिक्षिकेने शेगांवच्या गजानन महाराजांचा प्रसाद आम्हा सर्व शिक्षिकांना दिला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी तिला आलेला अनुभव सर्वांना सांगितला, पुढे भावनावश होऊन रडत रडत म्हणाली, ' गजानन महाराज मनापासून केलेल्या प्रार्थनेला साद देतातच! 'ते ऐकून माझ्या मनात आत्याचे गजानन महाराज म्हणजे हेच ते शेगांवचे गजानन महाराज अशी जाणीव स्पष्ट होऊन, मी शेगांवला केव्हा जाईन? महाराज मला बोलावतील का? असा विचार आला. नंतर डिसेंबर महिन्यात शेगांवला ट्रीप नेण्याचा निर्णय घेतला आणि वर्ग तीनची वर्ग शिक्षिका म्हणून मुलांसोबत जाण्याची जबाबदारी माझ्यावर आली.
गजानन महाराज हे नाव खूप वेळा कानावर आलं होतं पण प्रत्यक्षात वयाची तिशी ओलांडल्यानंतर शेगांवला जाण्याचा योग आला. गजानन महाराज कसे दिसतात, हे त्या दिवशी मी प्रथम पाहिलं .काय ॠणानुबंध असतात कुणास ठाऊक?महाराजांसमोर उभी झाले आणि डोळ्यातून घळघळ पाणी वाहू लागलं. भावना उचंबळून आल्या .तिथून परत येताना गजानन विजय ग्रंथ घेऊनच परतले आणि महाराजांची ओळख झाली. श्रध्देने पारायण आणि वर्षातून निदान एकदा शेगांव वारी सुरू झाली. अगदी निरपेक्ष पणे!
इ.स.२०१० ची गोष्ट, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव येथे आजोबा आणि वडिलांनी घर बांधलं. मात्र पुढे त्या दोघांच्या जाण्यानं आणि आम्हा तिघी बहिणींची लग्न झाल्यानं तिथे माझी आजी,आई आणि लहान भाऊ खुशवंत राहत होते.
एक दिवस मी शाळेत शिकवित असताना, गावाहून डाॅक्टर शशीन टापरे यांचा फोन आला. खुशवंतची मोठी बहीण म्हणून गावातून नंबर मिळवून त्यांनी फोन केला होता. तिकडे खुशवंत आजारी होता. त्याला कावीळ झाली होती. दुखणं विकोपाला गेलं होतं. त्याला नगर किंवा औरंगाबाद येथे दवाखान्यात दाखल करणं गरजेचं होतं ,पण तो कुणाचं ऐकत नव्हता. मात्र आता त्याला नगर येथील आनंद ॠषी हाॅस्पिटल मधे अॅडमिट केलं होतं. मी लगेच नगरच्या दिशेने निघाले. दवाखान्यात खुशवंतला पाहून धस्स् झालं. त्याचं पूर्ण शरीर पिवळं पडलं होतं. डाॅक्टर म्हणाले खूप उशीर झाला आहे. प्रयत्न करू पण वाचणं कठीण आहे. बघूया काय होईल ते. त्यांनी ब्लड बॅग्ज लावल्या आणि मी महाराजांचा जप सुरू केला. त्याच्या डोक्यावर हात ठेवून महाराजांना एकेक कबुली देत होते. लवकर बरं करा, भावाला घेऊन दर्शनाला येईन!याला बरं करा एक महिन्याचा पगार शेगांवला देणगी रुपात देईन! भावासोबत मंदिराला एकवीस प्रदक्षिणा घालीन. माझी प्रार्थना महाराजांनी ऐकली , सगळ्यांनी आशा सोडली होती पण अनपेक्षित बदल होत होत तब्येतीत सुधारणा झाली आठ दिवसात कावीळ जवळपास आटोक्यात आली.
नवस पूर्ण करण्यासाठी आम्ही बहीण भाऊ शेगांवला पोहोचलो . आज आपण महाराजांमुळे येथे आहोत ही भावना भावाच्या चेहर्यावर मला स्पष्ट जाणवत होती ते पाहून मी आतून सुखावले आणि दारी येणार्या सर्व भक्तांवर कृपादृष्टीनं पहा अशी त्यांना मनोमन प्रार्थना केली.
.🌺अनुभव-- सौ रेश्मा ज्ञानेश्वर गवळी , औरंगाबाद.
.....................
जय गजानन! मी सौ मीना शरद जोशी! लहानपणी आमची आर्थिक स्थिती हलाखीची होती. एकदा अकोल्याहून माझी मावशी हैद्राबादला आमच्याकडे आली तिने आईला दशमी,,एकादशी, द्वादशीला गजानन विजय ग्रंथ वाचल्यास परिस्थिती सुधारेल असं म्हटलं. आमची आई निरक्षर होती म्हणून मग मीच पाक्षिक पारायण करायचं ठरविलं.तेव्हा मी फक्त आठव्या वर्गात होते. मी पारायण सुरू केलं आणि क्रमशः आमची स्थिती सुधारत गेली व माझी गजानन महाराजांवरील श्रध्दा दृढ होत गेली. माझं लग्नही महाराजांनी चांगल्या ठिकाणी घडवून आणलं .मी पण निष्ठेने पारायण करीत राहिले. मी शाळेत नोकरीला होते. कित्येक वेळा गुरूपुष्यामृत योगाला मी पहाटे साडेतीन वाजता पारायणला बसत असे व सकाळी शाळेत पोहोचत असे. महाराजांनी वेळोवेळी त्याचं फळही माझ्या पदरात टाकलं.
मला आठवतं १९८५ साली मला 'घटसर्प ' झाला घटसर्प सहसा लहान मुलांना होतो मोठ्यांना तो होत नाही. पण मला तो वयाच्या पस्तीसाव्या वर्षी झाला .डाॅक्टरांनी हात टेकले ते म्हणाले या आजारातून या वाचणे अशक्य आहे. माझ्या मुखातून सतत महाराजांचं नामस्मरण सुरू होतं. माझं मन म्हणत होतं महाराज तुम्ही माझ्या जवळ आहात मला काहीही होणार नाही. मी अठरा दिवस दवाखान्यात होते. मला सुटी मिळाली तेव्हा डाॅक्टर म्हणाले, ' आम्ही असमर्थ होतो पण तुमची निष्ठा जिंकली ! तुमच्या देवाला प्रणाम. '
पुढे आयुष्यात एकदा मी पोटदुखीने सहा महिने आजारी होते. माझं मोठं ऑपरेशन होऊन पित्ताशय काढून टाकावं लागलं. मला तेव्हा सुटी मिळाली पण लगेच काही दिवसांनी पुन्हा पोटदुखी उमाळून आली. डाॅक्टर मिस्टरांना म्हणाले यांना आय सी यू मधे ठेवावं लागेल. मात्र या वाचणं अशक्य वाटतंय .मला ऑक्सिजन लावला होता. तशात मी महाराजांना म्हटलं. मृत्यू अटळ असेल तर प्रश्न नाही पण गंडांतर असेल तर रक्षण करा. मला सर्वानुमते दुसर्या दवाखान्यात हालविण्यात आलं. तिथे डाॅक्टरांनी तातडीने ऑपरेशन केलं. पुन्हा माझी निष्ठा जिंकली!
महाराजांनी असाच एक लक्षात राहण्यासारखा अनुभव एकदा आम्हाला दिला. माझ्या मुलाचं लग्न झालं त्यावर्षी महालक्ष्मीचे मुखवटे व अन्य सामान घेण्यासाठी आम्ही औरंगाबादला गेलो होतो. हैदराबादला परतताना गाडी पहाटे चारच्या सुमारास आम्हाला जवळ असणार्या मलकाजगिरी स्टेशनवर थांबली पण तिथे पहाटे रिक्षा कसा मिळेल म्हणून आम्ही सिकंदराबादला उतरण्याचा निर्णय घेतला पण गाडी बराच वेळ तिथेच खोळंबली. मला शाळेत पोहोचायचं होतं. तेव्हा शाळेला उशीर होऊ नये म्हणून मिस्टरांनी व मुलानी तिथेच उतरण्याचा निर्णय घेतला. आम्ही घरी जाण्याची काय सोय होईल या शंकेनं भीत भीत स्टेशनबाहेर पडलो आश्चर्य म्हणजे तिथे अन्य कुणी नव्हतं पण मराठी जाणणारा एक रिक्षावाला हजर होता .आम्ही रिक्षात बसलो मी त्याला कुतूहलाने विचारलं इथे सहसा यावेळी रिक्षा मिळत नाही? त्यावर तो म्हणाला आई मी शेगांवचा आहे. माझं नाव गजा आहे मी इथे जवळच असतो. तो गुरुवारचा दिवस होता. ह्यांनी त्याला पैसे दिले तो निघून गेला आणि मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला. महाराज भक्तांची काळजी घेतात!
अर्थात त्यासाठी भक्तांनी सतत महाराजांच्या अनुसंधानात राहणे गरजेचं आहे आणि गरजेचं आहे सातत्याने महाराजांचं नामस्मरण! तेव्हा महाराजांच्या आशिर्वादानेच त्यांचं नामस्मरण करू या आणि म्हणू या श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- सौ मीना शरद जोशी, हैदराबाद
शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!! श्रीगजानन अनुभव!!
'पृष्ठ संख्या १९० (यात एकूण ५२ अनुभव आहेत)
फक्त ५० (पन्नास रूपये)
Comments