अनुभव - 102
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 4 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १०२ 🌺)
*मी तुझे अजाण लेकरू, नको माया पातळ करू*
जय गजानन! दिवसाच्या चोवीस तासांपैकी अशी कुठलीच वेळ नसेल की ज्या वेळात मी गजानन विजयचं पारायण केलं नाही. मी फक्त आठव्या वर्गात असतानाच माझे वडील वारले. माझ्या मनाला आधार मिळावा म्हणून माझ्या मावशीनं ' गजानन विजय ग्रंथ ' माझ्या हाती दिला. माझं वाचन सुरू झालं आणि तेव्हा पासून मी गजानन महाराजांनाच ' बाबा ' म्हणून स्वीकारलं! गजानन बाबा पण या लेकीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहिले. अर्थात त्यांनी परीक्षेची वेळही आणली पण त्यातून तारूनही नेलं. माणूस पूर्ण कोलमडून पडावा, अशा काळात मला आधार दिला. जीवनात माझ्यावर आलेल्या शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही संकटातून मी केवळ बाबांच्या कृपेनेच समर्थपणे उभी राहू शकले.
वृषाली विलास जाधव हे माझं माहेरचं नाव, 'इंदापूर ' हे माझं माहेर!तर सासरची मी सौ वृषाली कल्याण पाटील! अकलूज जवळ 'मगराचं निमगांव ' हे माझं सासर.
इ.स.२०००-२००१ मधील ही घटना आहे. तेव्हा मी एका असाध्य आजाराने त्रस्त होते. माझ्या सांध्यावर गाठी उठत होत्या. त्या गाठी औषधाला दाद देत नव्हत्या. त्यामुळे डाॅक्टरांच्या मते ऑपरेशन करून गाठी काढणं हाच उपाय होता. वेगवेगळ्या ठिकाणी गाठींचा प्रादुर्भाव होऊन, दोन वेळा ऑपरेशन करून गाठी काढाव्या लागल्या. ऑपरेशन झालं तरी आतून प्रवृत्ती तशीच असल्याने, तिसरे वेळी पुन्हा गाठ आली. मात्र या वेळी गाठ माझ्या. स्वरयंत्रावरच आली. तेव्हा आम्ही इंदापूरला राहत होतो. डाॅक्टर पुण्याला होते, त्यामुळे तपासणी साठी पुण्याला जावं लागायचं. डाॅक्टरांनी मला तपासलं. डाॅक्टर म्हणाले आठ पंधरा दिवसांनी या म्हणजे तोपर्यंत गाठ जरा मोठी होईल व ऑपरेशन करून काढता येईल. परंतु या ऑपरेशन मधे यांचा आवाज जाईल.
आवाज जाईल हे वाक्य उच्चारायला सोपं असलं तरी, ऐकायला फार कठीण होतं! मुकेपणानं जीवन जगण्याची कल्पना मला अबोल करून गेली! मी बाबांना हात जोडले व ' माझा आवाज जाऊ देऊ नका ' अशी विनंती केली व ऑपरेशनपर्यंत दहा बारा दिवस अखंड पारायण, म्हणजे सकाळ ,दुपार,रात्र सतत पोथी वाचन सुरू ठेवलं. उदबत्ती लावून तो अंगारा सतत गाठीला लावत राहिले. दहा दिवसांनंतर रात्री गाठ अचानक सरकत मानेजवळ आली. डाॅक्टरांकडे पोहोचले ते उद्गगारले ' मिरॅकल! ' ऑपरेशन पुणे येथे संजीवन हाॅस्पिटल, नळस्टाॅप, पौंड रोड, कोथरुड येथे डाॅ. केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित पार पडलं. मी महाराजांच्या कृपेने त्या असाध्य आजारातून बाहेर आले. गजानन महाराजांचं नामस्मरण करण्यासाठी माझा आवाज अबाधित राहिला.
शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर माझी परीक्षा पाहणार्या वरील प्रसंगातून मला गजानन बाबांनी सुखरूप पार पाडल्यानंतर पुढे एकदा आयुष्यात माझ्यावर जबरदस्त मानसिक आघात करणार्या प्रसंगाला मला सामोरे जावे लागले. माझ्या वडिलांचं माझ्या लहानपणीच निधन झाल्यानंतर पुढे मला त्यांच्या जागेवर
अनुकंपा तत्वावर इ.स.१९९२ ला नोकरी लागली. जन्म मृत्यूची नोंद हे माझ्या टेबलवरील कामाचं स्वरूप होतं.
इ.स. २०१२ मधील ही घटना आहे. त्यावेळी इंदापूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली होती. सदर निवडणूकीत निवडून आलेल्या नगरसेवकाच्या अपत्याच्या जन्माच्या नोंदी संदर्भातील ही घटना आहे!
त्याचं असं झालं की इ.स.२००७ साली तहसीलदारांच्या आदेशानुसार एक जन्म नोंद करायची होती. अपत्याचं जन्मसाल इ.स.२००० होतं. त्या प्रमाणे नोंद करण्यासाठी प्रतिज्ञापत्र, अर्ज इत्यादी कागदपत्रे रजिस्टरमधे ठेवलीत मात्र संध्याकाळी ही सर्व नोंद घेत असताना, ऑफिस बंद होण्याची वेळ असल्याने घाई घाईत ते २००७ साल असल्याने रजिस्टर मधे नजरचुकीने २००७ अशी नोंद माझ्या हातून करण्यात आली. पुढे ते वर्ष संपलं, ती गोष्ट जुनी झाली. सरकारी ऑफिस मधून तेव्हा कागदपत्रं भरपूर असायची. अशा वेळी जुन्या कागदपत्रांचं गाठोडं बांधून ते अडगळीत टाकून देण्याची प्रथा सर्वत्र परिचयाची आहेच. जसा जसा काळ जाईल तसा तो काळ गाठोड्यांची संख्या वाढवित जातो. नंतर पुढे पुढे अस्ताव्यस्त पसरलेल्या ढीगांमधून जुना कागद शोधणं एक दिव्य कर्म होऊन बसतं. इकडे या घटनेला तब्बल पाच वर्षं पूर्ण झालीत इ.स.२०१२ उजाडलं.
इ.स.२०१२ साली सदर जन्म तारखेचा दाखला सादर करताना त्यावर २००७ असे जन्मसाल आल्या कारणाने सदर नगरसेवकाचं नगरसेवकपद धोक्यात आलं.
प्रकरणाचा संबंध राजकारणाशी असल्याने त्या घटनेला वेगळंच रंग चढला. प्रकरण पोलिसात गेले, प्रकरण कोर्टात गेले. जो तो त्याच्या नजरेतून घटनेकडे पाहून वेगळा रंग देऊ लागला. सहजपणे हातून घडलेल्या चुकीला वेगळाच अर्थ प्राप्त झाला. या बाईनं पैसे खाऊन गडबड केली आहे. तिला नोकरीतून काढण्यात यावे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. वगैरे धमक्या सुरू झाल्या. माझ्या ऑफिसातील लोक मला ओळखत होते. त्यांचा माझ्यावर विश्वास होता. पण निर्दोषत्व सिध्द होण्यासाठी मूळ कागदपत्र देणे गरजेचे होते आणि कार्यालयीन कागदपत्र इतस्ततः विखुरलेली होती. अशात ऑफिसात नवीन फर्नीचरचं काम झाल्याने कुठला गठ्ठा कुठेही ठेवण्यात आलेला! कुठला कागद कुठे?हे जाणण्यास कोण समर्थ? अशी स्थिती होती. अशात मला धमक्या देणं सुरू झालं. वातावरण कमालीचं तापून गेलं. मला कोण भेटतं? माझ्याशी कोण बोलतं? या गोष्टीवर विनाकारण लोक पाळत ठेवून होते. रात्री अपरात्री कुणीही घरासमोर ओरडायचे. मला आधार म्हणून एक पोलीस ऑफिसमधे ठेवणं पोलीसांना आवश्यक वाटलं. माझ्या मुलाला आणि मिस्टरांना मी जाणीवपूर्वक दूर रहायला सांगितलं. कारण स्त्री असल्यानं निदान माझ्या जीवाला धोका कमी होता. पण त्या सर्व काळात मी प्रचंड मानसिक तणावाखाली राहत होते. वृत्तपत्रात उलट सुलट बातम्या छापून येत होत्या. शेवटी कोर्टाकडून आदेश आला की पाच दिवसांच्या आत मूळ कागदपत्रं सादर करण्यात यावीत. पोलीस बंदोबस्तात शोध सुरू झाला.
आता मला एकच आधार होता, तो म्हणजे 'गजानन बाबा! ' मी अव्याहत ' गजानन विजय ' वाचन सुरू केलं. मला अन्न पाणी गोड लागेना. माझी झोप गेली. काही दिवसातच प्रकृती पार ढासळली. अशात चार दिवस पूर्ण झाले, मूळ कागदपत्रांचा पत्ता नाही. मुदत संपण्यापूर्वीची ती शेवटची रात्रहोती. बाबांना म्हटलं, तुम्ही जाणता, मी कपटानं काहीही केलेलं नाही. माझं जीवन तुमच्या चरणी समर्पित आहे. माझ्यावर बदनामीचा कलंक येऊ देऊ नका. मी रात्री गजानन विजय वाचन सुरू केलं. रात्री दोनचा सुमार असेल. मला वाचता वाचता ग्लानी आली, माझे डोळे मिटले .मला स्वप्नात दिसलं की ऑफिस मधील गोडाऊन वजा खोलीत मी उभी आहे. एक गोरापान हात माझ्या नजरेसमोर आला. त्यानं एक बोट दिशा दाखविण्यासाठी एका मोडक्या कपाटाकडे नेलं. तिथे कापडी गाठोडं होतं, माझ्या कानात स्पष्ट आवाज आला
' तिथे बघ!' मला खडबडून जाग आली.
सकाळी सात वाजता मी ऑफिस सुप्रिंटेंडन्टला फोन करून ऑफिसला या असं सांगितलं. सोबत दोन तीन सहकार्यांना घेऊन मी तिथे पोहोचले. ते बंद गोडाऊन उघडले. तिथे मोडक्या कपाटावर जसा मला दृष्टीसमोर गठ्ठा दिसला, तसाच गठ्ठा मी प्रत्यक्षात पाहिला. घाई घाईनं गठ्ठा उघडला. आत आवश्यक असलेली कागदपत्रे मला सापडलीत. सर्व कागद रीतसर ताब्यात घेण्यात आले.
माझ्या मनावरील ताण एकदम हलका झाला. शेवटच्या क्षणी दृश्य बदललं. गजानन बाबांनी लाज राखली. मला ऑफिसमधेच उर फूटून रडायला आलं.
वास्तविक माझ्या मनावरील मणभराचं ओझं दूर झालं होतं. मग मी रडत का होते? माझ्या मनात भावना दाटून आल्या होत्या. वाटत होतं ,गजानन बाबा वेळोवेळी आपलं संकट दूर करतात आणि त्याकरिता त्यांना आपल्याकडून काय हवं असतं? तर फक्त शुद्ध अंतःकरणानी घेतलेलं त्यांचं नाव! त्यांचं स्मरण! श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ वृषाली कल्याण पाटील
इंदापूर/ अकलूज
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या! १९० (यात एकूण बावन्न अनुभव आहेत)
फक्त रुपये पन्नास ( ५० /- )
!!श्रीगजानन अनुभव!! भाग दोन
यात एकण बावन्न अनुभव आहेत (५३ ते १०४) पृष्ठ संख्या २१६ फक्त पन्नास रुपये. ५०|--
Comments