अनुभव - 105
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 12, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव १०५🌺)
तू कल्पतरू वा चिंतामणी जय गजानन!
मी शिवाजी शिंदे, पुण्यात असतो. १९५६ चा माझा जन्म आणि १९८२ चं माझं लग्न! लग्न झालं, गिरीजाचा पत्नी म्हणून माझ्या आयुष्यात प्रवेश झाला.गिरीजाची आजी नियमानं गजानन विजय वाचायची म्हणून गिरीजाला तिच्या लहानपणापासूनच गजानन महाराज माहिती होते. अर्थातच लग्नानंतर तिचं पोथी वाचन सुरू राहीलं. ती मंदिरातही जायची. तिच्या कडून मला ती पोथी गजानन महाराजांची आहे एवढं कळलं होतं पण माझ्या जीवनात गजानन महाराजांची भक्ती सुरू होण्याचे कारण गजानन महाराजच आहेत असंच म्हणावं लागेल. मी असं म्हणतो याला कारण आहे! गिरीजा नियमानं मंदिरात जायची. कधी कधी मी तिला मंदिराच्या दारात सोडायचो. पण मी कधीही मंदिरात गेलो नाही. मला आत जावसं वाटलंही नाही. मी नास्तिक होतो अशातला भाग नाही, पण प्रामाणिकपणे जगा आणि माणसात देव पहा या विचारात माझा जीवन क्रम सुरू होता. अशात एकदा रात्री गाढ झोप लागली आणि मला स्वप्न पडलं. ' काही मित्रांसोबत मी कुठे तरी निघालो आहे, काही अंतर पुढे गेल्यावर मित्र पुढे निघून गेले अन् मी उजवीकडे एका टेकडीवर चढलो, तिथे एक मंदिर होतं. तिथे खूप पाला पाचोळा साचला होता. मी तो दोन्ही हातांनी बाजूला केला तेव्हा मला समोर चिलीम ओढीत असलेल्या बाबांची एक मूर्ती दिसली. मी कुतुहलाने पण नम्रपणे त्या मूर्तीला न्याहाळत राहिलो आणि तेवढ्यात माझं स्वप्न संपलं!' तेव्हा मी लगेच काही ते स्वप्न गिरीजाला सांगितलं नाही, मात्र लगेचच जेव्हा तिला मंदिरात नेण्याचा योग आला तेव्हा मी तिच्या सोबत मंदिरात प्रवेश केला. मंदिरात जेव्हा मी स्वप्नात पाहिलेली मूर्ती प्रत्यक्षात पाहिली, त्या क्षणी मी माझ्या ह्रदयात गजानन महाराजांना विराजमान केलं! गिरीजाच्या मते ते मला महाराजांनी दिलेलं दर्शन होतं. महाराजांनी मला दिलेला तो दृष्टांत होता. त्या रात्री मी स्वप्नात माझ्या समोरील पालापाचोळा दूर केला आणि मला दृष्टीसमोर भक्तीमार्ग स्पष्ट दिसू लागला. माझं गजानन विजयचं वाचन सुरू झालं. प्रत्येक पारायणागणिक माझा भक्तीभाव दृढ होऊ लागला. मला आठवतं १९९० ची ती गोष्ट. आईला गंभीर मधुमेह झाला होता. त्यातच तिला अर्धांगवायूचा झटका आला. माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणीच जगाचा निरोप घेतला होता. आई माझ्यासाठी श्रध्दास्थान होतं. आई अंथरुणाला खिळली आम्ही तिला जोग हाॅस्पिटलमधे अॅडमिट केलं, पण तिची तब्येत खालावतच गेली. तिला गॅग्रीन झालं, बेडसोअर्सचा त्रास होऊ लागला म्हणून आम्ही दवाखाना बदलून लाटकर हाॅस्पिटल सहकारनगर येथे तिला ठेवलं. तिथे डाॅक्टरांनी गॅग्रीन मुळे विष शरीरात पसरतं आहे त्यामुळे एक पाय पूर्ण काढून टाकावा लागेल असा सल्ला दिला. त्याप्रमाणे डाॅक्टरांनी तिचं ऑपरेशन केलं. आईला खूप वेदना होत होत्या. आईच्या वेदना कमी व्हाव्या म्हणून मी गजानन महाराजांना प्रार्थना करू लागलो. दवाखान्यात मी मोठ्या आवाजात पोथी वाचावी आणि आईनं ऐकून समाधानी व्हावं असा क्रम होता. ऑपरेशनला काही दिवस झालेत पण आईचं वय आणि दुखण्याचं स्वरूप यातून परिस्थितीचं गांभीर्य कदाचित माझ्या अंतर्मनाला जाणवलं. मी महाराजांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करून आईचं भलं व्हावं या इच्छेने पारायण सुरू केलं पण काही दिवसात आई कोमात गेली. मात्र तरीही मी तिच्या शेजारी बसून पारायण करीत राहिलो. महाराजांना म्हटलं तिचा पुढील प्रवास सुलभ होऊ द्या अन् पारायण पूर्ण होईपर्यंत तिचा सहवास लाभू द्या. १३ मार्च १९९० मंगळवार! तुकाराम बीजेचा तो दिवस! सकाळी १०.३० वाजता माझा एकविसावा अध्याय पूर्ण झाला. चार दिवस आई कोमात होती. माझी पोथी पूर्ण झाली अन् आईने डोळे उघडले. माझ्याकडे आणि गिरीजाकडे डोळेभरून पाहिलं. घड्याळात १० वाजून ३५ मिनिटे झालीत आईने शांतपणे प्राण सोडला. आई गेली. मन विषण्ण झालं होतं. त्यातच भर म्हणून आमच्या वडिलांची दुकानाची जागा, जी हक्काने मला मिळायला हवी होती, ती देण्यास आप्त स्वकीयच नकार देत होते. मी शेगांवला जाऊन सर्व परिस्थिती महाराजांच्या कानावर घातली अन् पुण्याला माघारी परतलो. महाराजांनी काय किमया केली तेच जाणोत मला दुकान सुरू करण्याकरिता माझी हक्काची जागा मिळाली. माझा व्यवसाय सुरळीत सुरु झाला. जीवनाच्या त्या वाटचालीत मला वाटतं तो १९९२ अथवा ९३ चा नोव्हेंबर महिना होता. मला अचानक आतून वाटायला लागलं की आपण शेगांवची पायी वारी करावी. मी गिरीजाच्या कानावर ही गोष्ट घातली. एक दिवस मधे गेला, दुसरे दिवशी सकाळी खांद्यावर एक शबनम बॅग अडकविली. दोन ड्रेस, चादर आणि पाण्यासाठी एक बरणी घेऊन मी शेगांवची वाट धरली. एकटाच शेगांवच्या दिशेने चालू लागलो. मी मनात ठरविलं की वाटेत कुणालाही जेवण मागायचं नाही, कुणी दिलं तर ठीक अन्यथा महाराजांची इच्छा!दुसरं म्हणजे रात्रीचा मुक्काम एखाद्या मंदिरात करायचा. पहिल्या दिवशी दिवसभर पाय चालत होते आणि मनात विचारांचं द्वंद्व चालू झालं, वाटू लागलं, आपण अविचार तर करीत नाही ना? संध्याकाळी वाघोली गावापर्यंत पोहोचलो तिथे एक महाराजांचं मंदिर होतं, त्या मंदिरात प्रवेश केला. महाराजांना नमस्कार केला आणि संपूर्ण शरीरात एका अनामिक उर्जेने प्रवेश केला. नंतर उत्साह वाढतच राहिला. तिसरे दिवशी नगरजवळ पोहोचलो, थकवा जाणवू लागला. मनात विचार आला या थकव्यावर उत्तम उपाय म्हणजे दूध! पुन्हा विचार केला, आपण वारकरी! आपलं काम!देवाचं नाम! 'ओम नमः शिवाय ' म्हणत चालू लागलो. ते 'भिंगार ' नावाचं गाव होतं. तिथल्या मारूती मंदिरात घंटा नाद केला. उपस्थित मंडळींची अनुमती घेतली आणि भिंतीशी पथारी पसरली. तिथले गावकरी थोडा वेळ गप्पा करीत बसले, चौकशी केली आणि निघून गेले. तासाभरानंतर मला कुणीतरी आवाज दिला. माऊली निजलात कां? हे घ्या घरून गाईचं ताजं दूध काढून आणलय तुमच्यासाठी. गावातील 'बेन्द्रे ' नावाचे गृहस्थ माझ्यासाठी दूध घेऊन आले होते. माझी ही शेगांव वारी एकूण अकरा दिवस चालली! या काळात ' गजानन माऊली भक्त वत्सल खरोखरी ' याचा अनुभव माऊलींनी अनेकदा दिला. एके दिवशी जालन्याच्या जवळपास असतानाची गोष्ट, मला सकाळपासून काहीही खायला मिळालं नाही. दुपारचे दोन वाजले. एका शेतात विश्रांतीसाठी थोडा पहुडलो. वाटलं आज महाराज आपल्याला उपाशीच ठेवणार. थोडा वेळ डोळा लागला जाग आली तो दोन चार मुलं बाजूला उभी होती. त्यांनी माझ्या साठी बारा पंधरा मोठी संत्री आणली होती. देऊळगावराजा जवळ एका दत्त मंदिराचे शेजारी एक सरदारजी आणि त्यांची मुलगी. त्यांचा ढाबा होता. त्यादिवशी माझा गुडघा खूप दुखत होता. चालणं असह्य होतं. त्यांनी माझा पाय वीट आणि निर्गुडीचा पाला यानी शेकून दिला. तेव्हा पाय दुखायचा जो थांबला तो नेहमी करीताच! खामगाव जवळ एक 'उंडरी ' नावाचं गाव लागलं तिथे एका वयस्कर गृहस्थांनी आग्रहाने जेऊ घातलं. म्हणाले, माझं जीवन संपत आलं. मी तृप्त आहे. शेगांवच्या वाटेवर चालणार्यांना दोन घास प्रेमानं खाऊ घालावं, यातच आता जीवनाची धन्यता आहे! शेगांवला चारही दिशांनी येणार्या वारकर्यांच्या सेवेत असे शेकडो सेवेकरी आपली सेवा देत असतात. नामस्मरण करीत पायी वारी करणार्यांचं पुण्य फार मोठं असतं असं म्हणतात. पण या सेवेकर्यांचं पुण्यही मोठंच असतं, कारण वारकरी जेव्हा त्याला हात जोडून 'जय गजानन!' म्हणतो तेव्हा मूकपणे घडत असलेल्या सेवेला सेवेकरी नामस्मरणाची जोड देत म्हणतच असतो. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- शिवाजी शिंदे पुणे
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!
श्रीगजानन अनुभव!! भाग एक( यात एकूण बावन्न अनुभव आहेत १ते ५२) पन्नास रुपये फक्त
!!श्रीगजानन अनुभव!! भाग दोन ( यात एकूण बावन्न अनुभव आहेत ५३ ते १०४) पन्नास रूपये फक्त
Comments