top of page

अनुभव - 106

Updated: Jun 1, 2020

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव १०६🌺)

चालविसी हाती धरोनिया जय गजानन!


असं म्हणतात की पैसा आणि ज्ञान यामुळे माणसाचा आत्मविश्वास बळावतो ! हे खरं आहे! माझी अशी धारणा आहे की, माझ्या बाबतीत एका प्रसंगात गजानन महाराजांनी अशी काही योजना घडवून आणली की, माझ्या ज्ञानात भर घालून मला शेगांवच्या मार्गावर चालतं केलं. मला आत्मविश्वास प्रदान करून खटकणार्या काही गोष्टींपासून मला दूर केलं. मी विनोद क्षीरसागर. लहान गावात आयुष्याची बरीच वर्षे घालविली त्यानंतर नागपूरला पोलीस खात्यात काॅन्स्टेबल म्हणून नोकरी सुरू झाली. लग्न झालं मी नागपूरला स्थिरावलो. गजानन महाराजांविषयी म्हणाल तर मला फारशी माहिती अशी नव्हती. ' शेगांवचे गजानन बाबा ' हे ऐकलेलं. या पेक्षा फार जास्त काही नाही. नागपूर जवळ उमरेड तहसिलीत, बेला गावाजवळ, एक बोरगांव लांबट नावाचे गाव आहे. तिथे माझे मोठे बाबा राहतात. मोठे बाबा म्हणजे वडिलांचे मोठे भाऊ! मोठे काका! त्यांना मोठे बाबा म्हणण्याचा प्रघात बरेच ठिकाणी आहे. तर माझे मोठे बाबा आणि मोठी आई शेवंताबाई हे गजानन महाराजांचे भक्त! माझ्या मनात मोठ्या बाबांचं आदराचं स्थान! एकदा दिवाळीत ,मला वाटतं २००२ अथवा ०३ ची ही गोष्ट असावी. मोठे बाबा माझ्या घरी आले. मी आणि माझ्या पत्नीनं त्यांचा यथायोग्य आदर सत्कार केला. ते मला म्हणाले विनोद एकदा शेगांवला मला गजानन महाराजांचं दर्शन करवून दे. आपण शेगांवला जाऊ. मी त्यांना होकार भरला. जाताना त्यांनी माझ्या बायकोच्या हाती तीनशे रुपये देऊ केलेत. शेगांवला जाऊ तेव्हा कामात येतील असं बोलले. मोठे बाबा गावाकडे निघून गेले आणि आमच्या कडून त्यांनी दिलेले तीनशे रुपये घरात खर्च झाले. शेगांवला जाण्याचा विचार मागे पडला. अधून मधून त्या विचाराने डोकं वर काढलं पण मनात यायचं, रिक्षा करून स्टेशनवर जा, सर्वांच्या तिकिटाचा खर्च, शेगांवला राहिलो तर तो खर्च, जेवणाचा खर्च, सगळं कसं व्हायचं? त्यातून पगार फार जास्त नाही. या सर्व विचारानी मग मनावर दडपण येऊन, तो विचार मी टाळू लागलो. मोठ्या बाबांशी बोलणं टाळू लागलो. त्यांना माझं वागणं चमत्कारिक वाटू लागलं. यात बरेच महिने निघून गेलेत. इ.स.२००४ ची गोष्ट!माझी बदली ट्रॅफिक डिपार्टमेन्टला झाली. ट्रॅफिकमध्ये काम म्हणजे, वेगवेगळ्या चौकात वेगवेगळ्या वेळी ड्युटी लागणार. तो डिसेंबर महिना होता. कडाक्याची थंडी पडली होती. एका रात्री माझी व एका हवालदाराची, अशी आम्हा दोघांची ड्युटी छत्रपती चौकात लागली. कामाचं स्वरूप होतं, हेवी व्हेकल्स ट्रक वगैरे रात्री शहरात शिरण्यावर बंदी असल्याने त्यांना प्रतिबंध करणे. आम्ही रात्री दहाच्या सुमारास तिथे आलो. रात्री तशीच रस्त्यावर वर्दळ कमी असते,त्यातून थंडी खूप म्हणजे रस्त्यावर जणू कर्फ्यूच! तेव्हा चौकात फ्लायओव्हर होता .(आता पाडण्यात आला आहे) आम्ही दोघांनी तिथे खाली शेकोटी पेटवली. रात्री विरंगुळा म्हणून आणि उत्साह यावा म्हणून एक भांडं आणि चहाचं सामान एकत्र करून ठेवलं. बाजूलाच एक मंगल कार्यालय आहे. आमचं असं ठरलं की रात्री दोन वाजेपर्यंत मी तिथे विश्रांती घेणार, पुढे दोन पासून मी ड्युटी बजावणार आणि हवालदार विश्रांती घेणार. ठरल्याप्रमाणे रात्री दोन वाजता हवालदारांनी मला उठवलं. मी माझ्या ड्युटीवर रूजू झालो. रात्री अडीच वाजताची वेळ. सुनसान रस्ता, धुकं पडलेलं. दुरून मला एक ट्रक येताना दिसला. बॅरिकेट्स असल्यानं ट्रक जवळ येऊन थांबला. मी ट्रक इकडे कसा?असा प्रश्न ड्राईव्हरला केला आणि ट्रक मधे काय सामान आहे याची चौकशी केली. ड्रायव्हरने मला विनंती केली की समोर 'मोक्षधाम ' घाटावर लाकडं द्यायची आहेत. माझ्या जवळ दुसरा पर्याय नाही, मला जाऊ द्या. उद्या लोकांची गैरसोय व्हायला नको. मी क्षणभर विचार केला, त्याला म्हटलं, ठीक आहे. दोन चार लाकडं इथे शेकोटी जवळ टाक आणि तू जाऊ शकतोस. त्याला बॅरिकेटस् बाजूला करून मार्ग करून दिला. ट्रक समोर निघाला, पुन्हा मी एकटा तिथे उरलो. एक लाकूड शेकोटीत सरकवलं, चांगला जाळ झाला, मी हात शेकत शेकोटी जवळ बसलो. रात्रीचे तीन सव्वातीन वाजले असावेत, अचानक तिथे एक सायकल रिक्षा आली. एक पोक्त माणूस ती रिक्षा चालवित होता. तो जवळ येऊन थांबला. त्यानं विचारलं 'मी हात शेकू शकतो का?' मी त्याला खुणेनेच या म्हटलं. आम्ही हात शेकू लागलो, त्याचं लक्ष चहाच्या सामानाकडे गेलं त्यानं मला विचारलं आपण चहा घ्यायचा का? मला काय? त्यामुळे माझा वेळ चांगला जाणार होता. म्हटलं, तुम्ही करणार असाल तर घेऊ!चहा घेत असताना शेकोटीच्या ज्वाळा खाली आल्यात म्हणून फुंकर घालण्यासाठी तो रिक्षावाला थोडा वाकला, तेव्हा त्याच्या शर्टाच्या खिशातून एक रेल्वे तिकीटासारखा कागद खाली पडला, मी हाती धरून पाहू लागलो. ते नागपूर-शेगांव रेल्वे पॅसेंजर तिकीट होतं, रूपये सव्वीस. तिकीट माझ्या हातात असतानाच तो म्हणाला ' मी शेगांवला असतो. तुम्ही कधी शेगांवला येता की नाही? काही फार जास्त खर्च येत नाही. पहाटे इथून पॅसेंजर सुटते तिनं निघायचं. आपला जेवणाचा डबा सोबत करून घ्यायचा, म्हणजे जेवणाचा खर्च नाही. संध्याकाळी पुन्हा पॅसेंजरनी परत आलं की राहण्याचाही खर्च नाही. बरं, मंदिरात काही पैसे द्या! असं काही गजानन बाबा म्हणत नाही. भाव महत्वाचा असतो आणि तिथे जाण्याची मनापासून इच्छा पाहिजे बस्स! बाकी सर्व गजानन बाबाच करते! एवढं बोलून तो उठला, मला म्हणाला, बरं मी आता निघतो .मग बाजूला पडलेली लाकडं पाहून म्हणाला अरे ही लाकडं मी घेऊन जातो .तुमचं काम तसं बी झालंच आहे. अन् मानसानं जादा मोह ठेवूबी नाए! त्यानं लाकडं रिक्षात ठेवली, रिक्षा चालवित तो पुढे निघाला ,चाळीस एक फूट रिक्षा समोर गेली असेल अन् अचानक रात्रीच्या त्या धुक्यात रिक्षा दिसेनाशी झाली. ते पाहून रात्रीच्या त्या थंडीतही माझी थंडी पार नाहीशी झाली. आपण शेगांवला जाऊ शकतो हे ज्ञान मिळाल्यामुळे आतमधे निर्माण झालेल्या आत्मविश्वासाची ती उब होती! माझ्या मनाने निर्णय घेतला की मोठ्या बाबांना व आईला गावाहून बोलावून घ्यायचं आणि उद्या पहाटे चार वाजता शेगांवसाठी स्टेशन गाठायचं . पहाट होत आलीच होती मी हवालदारांना जागं केलं, त्यांना सांगितलं, उद्या मी ड्युटीवर येणार नाही, माझी सुटी! मी शेगांवला जाणार! मी घराकडे निघालो, वाटेत एक ऑटो रिक्षा दिसली, योगायोगाने ती रिक्षा मी आधी केव्हातरी चालान केली होती. त्याला उद्या पहाटे चार वाजता घरी येणार का? म्हणून विचारलं. पैसेही विचारले. म्हणाला पन्नास रुपये घेईन. खिशात पैश्यासाठी हात घातला. फक्त नेमकी पन्नास रुपयांची नोट होती. महाराजांच्या आशिर्वादामुळे आमची शेगांव यात्रा उत्तम प्रकारे पार पडली. मी मोठ्या बाबांच्या ऋणातून थोडा बाहेर पडलो. पण या सगळ्या प्रकरणात मधल्या काळात नेमकं इन्स्पेक्शन होऊन मी काल नव्हतो ही कुणकुण साहेबांच्या कानावर गेली. साहेबांसमोर माझी पेशी झाली. त्यांना माझा प्रामाणिक हेतू पटला. त्यांनी विचारलं तू शेगांवला जाऊन आला याला पुरावा काय? म्हटलं सोबत दोन प्रसादाचे लाडू आहेत. एक घरच्यांसाठी, एक मित्रांसाठी. म्हणाले, जा माझ्यासाठी प्रसाद घेऊन ये. मी ठीक आहे म्हणून वळलो तो तिथे मला गजानन महाराजांचा मोठा फोटो दिसला. तो पाहून अत्यानंदाने बाहेर येऊन, स्कूटरच्या डिकीतून लाडू घेतला. साहेबांच्या हातावर शेगांवचा प्रसाद ठेवला. प्रसाद घेता घेता त्यांनी थोडी मौखिक समज दिली, म्हणाले या पुढे शेगांवला जायचं तर सांगून आणि अनुमती घेऊन जायचं. मी विनम्रपणे उद्गारलो ठीक आहे. नंतर लगेच उजवा हात छातीशी नेत मान झुकवून म्हटलं श्री गजानन!! जय गजानन! श्रीगजानन!जय गजानन!

🌺अनुभव--विनोद क्षीरसागर , नागपूर

शब्दांकन- जयंत वेलणकर 9422108069


आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा-!!श्रीगजानन अनुभव!!

भाग एक (यात १ते५२) असे बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास

भाग दोन (यात ५३ ते१०४) असे बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page