अनुभव - 107
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १०७🌺)
गजानन बाबाची पालखी जय गजानन!
शेगांव पासून शंभर किलोमीटर अंतरावर वाशिम जिल्ह्यात बिटोडा (तेली) नावाचं अगदी लहान गाव आहे. गावाची संख्या आजही जेमतेम सहाशेच्या घरात असावी. आता गावाचं स्वरूप हळू हळू बदलू लागेल अन्यथा गावात अगदी मोजकी घरं, घरं म्हणण्यापेक्षा झोपड्या. प्रत्येक झोपडीत दारिद्र्याचं वास्तव्य होतं आणि होतं तळहातावरील जिणं! त्या झोपड्यांपैकीच एका झोपडीत मी लहानाचा मोठा झालो. माझं नाव गजानन कुटे! माझे बाबा आणि आई दोघंही रोज मजुरी करायला बाहेर पडत. काम मिळेल त्या दिवशी पैसा येणार नाही मिळालं तर हरी हरी! घरी काही बकर्या होत्या. मी सकाळी शाळेत जायचो, शाळा झाली की दुपारी बकर्यांना चरण्यासाठी घेऊन फिरायचं. गावात एक महादेवाचं मंदिर पूर्वी होतं आजही आहे. साधारण माझ्याच सारखी गावातील अन्य मुलांचीही दिनचर्या असायची. एकदा महादेव मंदिरात गावातील लोकांनी एका सद्गृहस्थाला आलेलं पाहिलं. तो माणूस महदेवाजवळ बसून बराच वेळ प्रार्थना करीत होता. चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं, आपली अनुमती असेल तर मी या मंदिरातच आता राहणार आणि संध्याकाळी गावातील मुलांना हरीपाठ, भारूड, गवळण आदी शिकवून त्यांना मार्गदर्शन करणार. गावातील लोक ते ऐकून समाधान पावले. अर्थातच आम्हा मुलांचा संस्कार वर्ग सुरू झाला. त्यांचं नाव होतं ' रघुनाथ ' गाव त्यांना रघुनाथ महाराज म्हणू लागलं. रघुनाथ महाराज शेगांवच्या गजानन महाराजांचे भक्त होते. गावातील आम्ही सगळेच त्यांच्या मुळे ज्ञानदेवांचा हरीपाठ, एकनाथांचं भारूड आणि गवळणी छान म्हणू लागलो. रघुनाथ महाराज गावासाठी आदराचं स्थान झालं. रघुनाथ महाराजांनी प्रकट दिनाला बिटोडा- शेगांव पालखी आणि पायी वारी सुरू केली आणि आमचं गाव शेगांवच्या दिशेने चालू लागलं. आम्हाला शेगांवचे गजानन महाराज माहिती झाले. शेगांवच्या पायी वारीसाठी आम्हा लहान मुलांचा उत्साह तेव्हा ओसंडून वहायचा. मात्र पूर्ण पायी चालणं मुलांना शक्य नसायचं, मग थोडं अंतर चालून आम्ही थांबायचो किंवा कधी कुणी सोबत गाडी दिली असेल तर त्यातून शेगांव गाठायचं. कळत नकळत गजानन महाराजांची भक्ती मनात रुजू लागली. संपूर्ण गावालाच गजानन बाबाचं वेड लागलं. मला आठवतं मी ९ वर्षांचा होतो, एकदा आई व बाबा मजूरी साठी बाहेर होते. घरी मोठी बहीण होती, तिला सांगून मी शेतात हरभरा खावा या विचारानं बाहेर पडलो. माझ्या सोबत माझं एक आवडतं काळ्या रंगाचं बकरीचं पिल्लू घेतलं. त्या लहान बकरीला मी काळी म्हणायचो. जवळच ओळखीतील एकाचं शेत होतं. त्याच्या जवळ मी हरभरा खाण्याची गोष्ट बोललो. तो म्हणाला मी बाजूच्याच शेतात आहे, तिथे हरभरा भाजून ठेवला आहे, तिकडे ये. मी तिकडे जायला निघालो, तो वाटेत मला छान हिरवा कोवळा हरभरा दिसला. माझ्या मनात हिरवा हरभरा खाण्याचा मोह झाला. मात्र त्या हरभर्यावर 'आंबट ' पडलं होतं ( एक प्रकारची कीड) म्हणून ते धुण्याची बुद्धी होऊन मी बाजूलाच असलेल्या एका खचलेल्या विहीरीकडे वळलो. काळीला विहिरीजवळ बाजूला ठेवून मी हरभरा हाती धरून विहिरीत खाली उतरू लागलो. विहिरीला खाली भरपूर पाणी होतं. एका ठिकाणी अचानक माझा पाय निसटला, मी पाण्यात पडलो. धप्पकन आवाज आला. पडता पडता माझे डोळे विस्फारले. कदाचित सुप्त मनात गजानन बाबाची आठवण आली. मला पोहता येत नव्हतं, मी पाण्यात गटांगळ्या खाऊ लागलो. काही तरी विपरीत घडलं आहे हे चाणाक्ष काळीच्या लक्षात आलं असावं. तिनं डोकावून अंदाज घेतला, ती विचित्र आवाज काढीत बाजूच्या शेतात बैल घेऊनअसलेल्या माणसाकडे ओरडत गेली. पुन्हा विहिरीकडे आली. तिचं ते ओरडणं आणि ती कृती पाहून शेतकर्याला संशय आला, त्यानं धावत येऊन विहिरीत उडी मारली आणि मला वर काढलं. माझ्या नाकातोंडात पाणी जाऊन मी बेशुद्ध झालो होतो. त्यानं बाहेर मला चक्क उलटं धरून, माझे पाय हातात धरून मला झोके दिले. त्यामुळे माझ्या पोटातील पाणी बाहेर पडून मी शुद्धीवर आलो. संध्याकाळी माझ्या भोवती सगळं गाव घरी जमा झालं होतं. गावातील बायका आईला म्हणत होत्या ' तुझा गजानन गजानन बाबाची भक्ती करते म्हणूनच गजानन बाबानंच त्याला वाचविलं ! ' खरोखरच ' काळीच्या रुपाने मदत मिळून, गंडांतर स्वरूपात आलेला ' काळ ' गजानन महाराजांच्या आशिर्वादाने दूर गेला होता. त्या संध्याकाळी घरीच गावकर्यांनी गजानन बाबाचे आभार मानले. पुढे एकदा गावातील एका परिचिताने, स्वतःची दोन एकर जमीन देऊ करण्याचं वचन देऊन, बाबांकडे काही पैसे मागितले व पुढे जमीन नावावर करून देईन, आता जमीनीचा ताबा घ्या! असा प्रस्ताव ठेवला. बाबांनी आमच्या जवळील बकर्या विकून त्याला पैसे दिले व आम्ही जमिनीचा ताबा घेतला आणि पैसे घेऊन तो माणूस बाहेर गावी निघून गेला. मात्र काही महिन्यांनी तो परत आला, तेव्हा त्याच्या जवळच्या लोकांनी त्याचा मनभेद केला, त्याला सल्ला दिला कोर्टात जाण्याचा, कारण पैसे दिल्याचा लिखित पुरावा नसल्यामुळे त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्यासाठी ते सज्ज झाले आणि कोर्टात केस टाकली. ते ऐकून आई-बाबांच्या तोंडचं पाणी पळालं! त्या दिवशी माझी माय गजानन बाबाशी खूप बोलली. म्हणजे ती बोलत होती आणि गजानन बाबा ऐकत होते. ' हे गजानन बाबा तू जाणते काय खरं अन् खोटं हाय थे, माहा गजानन तुही वारी करते म्हणून नाय बोलत, थे जिमीन म्हायी नाय थं तेथे राऊन कशी रायलो म्हनतो मी. मला समजते थं वरच्या सायबाला हे समजत नाय काय? गजानन बाबा तुला जे पटतं थे तू कर. माह्या बाजूनं निकाल लागला तरी मी तुह्यासाठी फकस्त माही सेवा देऊ शकतो! ' आईचं म्हणणं गजानन बाबापर्यंत पोहोचलं. कारण, कोर्टात ' पैसे दिले नाही तर जमिनीचा ताबा यांच्याकडे कसा? याच प्रमुख प्रश्नावर आमच्या बाजूने निकाल लागला. आता गजानन बाबाची सेवा करण्याची जबाबदारी आमची होती. आम्ही बाबाच्याच कृपेने ती यथाशक्ती निभवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भरपूर वेळा माझ्या कडून शेगांव वारी घडली. जेव्हा जेव्हा आम्ही शेगांवला पायी वारीत गेलो तेव्हा शेगांव संस्थानने वारीचं केलेलं स्वागत नेहमी करीताच लक्षात राहील. एकदा आम्हा वारीतील सर्व भक्तांना शेगांवला ' तुकारामाची गाथा ' प्राप्त झाली. एके वर्षी सर्वां ना ' भागवत ' प्राप्त झालं. एकदा भजन मंडळासाठी, टाळ,विणा, मृदुंग आदी साहित्य प्राप्त झालं. पायी वारी शेगांवला पोहोचल्यावर व्यवस्थापनाच्या अनुमतीने मंदिरा भोवती वारीची प्रदक्षिणा होते. संस्थानतर्फे अन्नदानाप्रमाणेच वस्त्र दानही केल्या जातं. असा आदर सत्कार रीतसर पध्दतीने येणार्या प्रत्येकच पायी वारीला अनुभवता येतो. अशा शेकडो वार्या चारही दिशांनी शेगांवला येतात आणि असाच अनुभव प्राप्त करतात. माझ्या स्वतःजवळ पायी वारीच्या निमित्ताने मला प्राप्त झालेले निदान चार ड्रेस असावेत. या सर्व गोष्टी आठवल्या की स्वाभाविकपणेच 'धन्य ते शेगांव संस्थान आणि धन्य तेथील व्यवस्थापन' असे शब्द मुखातून निघाल्या शिवाय राहत नाहीत. आता बरीच वर्षे झालीत, नोकरीच्या निमित्ताने मी आता गावापासून दूर आलो आहे .पण दूर आलो तरी मनाच्या तारा शेगांवशी छान जुळलेल्या आहेत. कारण महाराजांशी जुळून राहण्याचं साधन म्हणजे त्यांचं नामस्मरण! ते मनात नित्य होत आहे. मन आतून त्यांचं स्मरण करतं आणि सहज शब्द ओठी येतात. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- गजानन कुटे, बिटोडा ( तेली) वाशिम
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-!!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक (यात १ते५२) असे बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास भाग दोन (यात ५३ ते१०४) असे बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास. ...........................................
Comments