top of page

अनुभव - 110

Updated: Jun 1, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव ११०🌺)

तूच रक्षिता, तूच अन्नदाता जय गजानन!

रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील माझा जन्म! तेच माझं माहेर! आमची घरची आर्थिक स्थिती अत्यंत सामान्य! त्यामुळे मनात असूनही आणि योग्यता असूनही शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. घरच्या आर्थिक स्थितीत आपला हातभार लागावा व उद्या लग्नासाठी प्रयत्न करताना वडिलांच्या शब्दाला थोडी किंमत यावी म्हणून नोकरीचा शोध घेणे अपरिहार्य झाल्याने, अलिबाग येथील सेवायोजन कार्यालयात नाव नोंदविले आणि नोकरीसाठी माझी तडफड सुरू झाली. १९८४- ८५ चा काळ असेल मोठ्या मुश्किलीने एका सरकारी कार्यालयात नोकरीची संधी मिळाली, पण फक्त सहा महिन्यांसाठी. सहा महिने नोकरी, काही दिवस बेकार! सहा महिने नोकरी, काही दिवस बेकार! असा क्रम सुरू झाला. पण ती सरकारी नोकरी आहे. ही आशा फार मोठी होती. त्यामुळे त्या गोष्टीचा आधार मिळून १६ फेब्रुवारी १९८७ रोजी माझं लग्न झालं, 'कामत ' हे माझं आडनाव आता बदललं. आता मी झाले स्वाती सिनकर! मुक्काम महाड. लग्नाला काही वर्ष झालीत. सरकारी नोकरी आहे ही मोठी आशा होती. पण सरकारी नोकरी होती म्हणूनच ती माझी नोकरी सुटली. कारण महाराष्ट्रात सरकारने झिरो बजेटचा त्याकाळी स्वीकार केला. परिणामी तेव्हा खूप लोकांची नोकरी सुटली. माझीही नोकरी सुटली. आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आणि लग्न ठरण्यासाठी जो फार मोठा आधार होता तोच गेला त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सुरू झाला. अंतर्मनातील आंदोलन आणि सभोवतालच्या लोकांची दृष्टी यानं मनाला क्लेश होऊ लागलेत. पण त्या वाईटात चांगलं असं झालं की, नियतीनं तोच काळ माझ्या जीवनात गजानन महाराजांच्या प्रवेशासाठी निवडला. कार्यालयीन कामात परिचयाची झालेली मैत्रीण मीनाक्षी मनोहर हिनं माझ्या जीवाची घालमेल पाहून मला ' गजानन विजय ' वाचण्याचा सल्ला दिला. शेगांवच्या गजानन महाराजांविषयी माहिती दिली आणि मी गजानन महाराजांची भक्ती करू लागले. माझं गजानन विजय वाचन सुरू झालं, त्याला स्वाभाविकपणेच मनाच्या आर्ततेची जोड मिळाली. परिणामी महाराजांच्या कृपेने मला चार महिन्यांसाठी का होईना तहसीलदार कचेरी महाड, येथे कामावर रूजू करून घेण्यात आलं . निमित्त होतं निवडणूकांचं. चार महिन्यांनंतर पुढे काय? या प्रश्नाची टांगती तलवार डोक्यावर होती, त्यामुळे तळमळीनं गजानन विजय वाचन सुरूच होतं. मला त्या सर्व गोष्टींचं इतकं वेड लागलं की आॅफिसात रिकाम्या वेळी मी कागदावर विजय ग्रंथातील ओवी लिहायचे, महाराजांचे विचार लिहायचे. गजानन महाराज या विषयात गढून जायचे. त्याच सुमारास एके रात्री महाराज माझ्या स्वप्नात आले. मला म्हणाले, ' तू शेगांवला ये, मी तुझी 'अर्धी' भाकरी 'पूर्ण ' करतोय!' मनात शेगांवला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पण चार महिन्याच्या त्या टेम्पररी नोकरीत चार दिवसांची रजा मिळणार कशी? पण प्रश्न शेवटी निष्ठेचाही होताच. एक दिवस नायब तहसीलदारांना हिमतीनं विचारलंच. ' सर शेगांवला जायचं होतं ' योग येवढा जबरदस्त होता की साहेब गजानन महाराजांचे भक्त होते. ते म्हणाले मध्यंतरी तुझ्या टेबलवर, कागदावर तू लिहिलेल्या ओव्या मला दिसल्या. ते पाहून आणि तुझ्या वागण्यातून तर मला बंकटाच्या अस्वस्थतेची आठवण झाली. वास्तविक या काळात सुटी देणे नियमात बसत नाही, पण मी माझ्या रिस्कवर तुला शेगांवला जाण्याची अनुमती देतो. जा जाऊन ये शेगांवला! १९९० चा नोव्हेंबर-डिसेंबर आणि १९९१ चा जानेवारी-फेब्रुवारी हे चार महिने मी त्या ऑफिसात होते. तेव्हा डिसेंबर महिन्यात मी शेगांवला जाऊन महाराजांना प्रार्थना करून परतले व 'अर्धी ' भाकर 'पूर्ण ' केव्हा होते याची वाट पाहू लागले. मला महाराष्ट्रात पाणी पुरवठा व जलनिःसारण मंडळ येथून काॅल आला. मला १० जानेवारी १९९१ ला कोकण भवन मधे सकाळी १० वाजता इंटरव्ह्यूसाठी बोलाविले होते. ८ तारखेला दशमी होती. मी दशमीला सात अध्याय, एकादशीला सात अध्याय व द्वादशी म्हणजे दहा तारखेला पहाटे चार वाजता उठून चार अध्याय व इंटरव्ह्यू नंतर शेवटचे तीन अध्याय असा बेत आखला. चार अध्याय वाचून सकाळी सात वाजता महाडहून कोकण भवनासाठी बस पकडली. पनवेल पर्यंत मला छान झोप लागली. पनवेलला मिस्टरांनी जागं केलं. आता अर्धा तास प्रवास होता. मी बाहेर बघितलं, पाईप लाईनवर मराठी इंग्रजीतून ऑफिसचं नाव आणि कार्यालयीन व आमच्या विषयाशी संबंधित माहिती लिहिली होती. मी ती मनापासून वाचली. जणू ते महाराजांनीच मला सुचविलं असावं कारण इंटरव्हयू मधे नेमके तेच प्रश्न विचारण्यात येऊन माझी उत्तरं अचूक ठरलीत. एकूण तीनशे मुलांमधून बारा जणांची निवड झाली त्यात मी एक होते..कुठलाही पैशाचा व्यवहार न होता महाराजांनी माझं काम केलं होतं. पण पुढे अकरा लोकांना काॅल लेटर आलं, पण मला मात्र आलं नाही. मी अस्वस्थ झाले, मला आठवतं त्या रात्री मी महाराजांना कळवळून प्रार्थना केली. म्हटलं, महाराज तुम्ही बोलावलं मी शेगांवला आले. दर्शन झाले, माझं काही चुकतंय का? माझी 'अर्धी ' भाकर ' पूर्ण ' कधी होणार? त्याच रात्री मला स्वप्न पडलं, मी स्वप्नात पाहिलं माणगावला आमच्या घराचं दार बंद आहे, तिथे कडीत पत्र अडकवून ठेवलं आहे. मी दुसरेच दिवशी माझ्या दीड वर्षाच्या स्वप्नीलला घेऊन माणगावला गेले, खरोखरच तिथे नोकरीवर रुजू होण्याचा आदेश माझी वाट पाहत होता. आपण गजानन विजय ग्रंथात वाचतो ना की महाराजांनी काशिनाथपंताला सांगितलं की जा, तारवाला तुझी वाट पाहतो आहे आणि काशिनाथपंताला नोकरी लागली अगदी तशीच गत माझी झाली. गजानन महाराज की जय! आता या सर्व गोष्टींना बराच काळ लोटला. सध्या मी सी बी डी बेलापूर येथे स्थायिक झाले आहे. मधल्या काळात महाराजांनी बरेच विलक्षण अनुभव दिलेत. अगदी मुलाला मृत्यूच्या दारातून परत आणण्यापर्यंत! त्यावेळी बोललेला माझा नवसही त्यांनी पूर्ण करून घेतला ,म्हणूनच मी बेलापूरला त्यांचं मंदिरही उभारू शकले. हे अनुभव मी पूर्वी कथन केले आहेच. अगदी अलीकडे म्हणजे नोव्हेंबर २०१८ चा एक अनुभव सांगून तुमची रजा घेते. ५.११.२०१८ ची गोष्ट. धनत्रयोदशी होती. दिवाळीसाठी पुण्याला मुलाकडे जाण्याची माझी योजना होती. दुपारी साडेतीन चारच्या गाडीने मी निघू शकणार होते. ऑफिसातून साहेबांनी तशी अनुमतीही दिली होती. पण अंतर्मनातून सूचना येऊन आणि महाराजांनी प्रेरणा दिली की मंदिरातील पणत्यांची तयारी करून ठेवशील. त्याप्रमाणे मी दोन बायकांना व एका मुलीला संध्याकाळी घरी दिवाळी इनाम घेण्यासाठी बोलावले. त्यांना इनाम दिले व पणत्या दिल्या आणि अचानक त्यांच्या समोरच माझ्या दोन्ही कानातून जोरदार कळा आल्या. मानेच्या मागील भागापासून कपाळापर्यंत कळ आली. दरदरून घाम फुटला, मान वाकडी झाली, शरीरातून प्राण जावा असं होऊन मी कोसळले. नशीब मिस्टर घरी होते, त्या सर्वांनी मला लगेच एम.जी. एम. हाॅस्पिटल बेलापूर येथे नेले. डाॅक्टरांनी लगेच चेक केलं. माझं बी पी २४०/१२० होतं. डाॅक्टर म्हणाले दहा मिनिटं उशीर झाला असता तर सगळं संपलं होतं. मेंदूची नस तुटून रक्त स्त्राव झाला होता. ब्रेन हॅमरेज! सुरुवातीला काही काळ मी बेशुद्ध होते. दृष्टी स्थिरावत नव्हती. सि टी स्कॅन. एम आर आय सर्व झालं. मी पंधरा दिवस हाॅस्पिटल मधे अॅडमिट होते. त्याही अवस्थेत गजानन महाराजांचं नाव आणि गजानन बावन्नी जशी आठवेल जशी जमेल, मी म्हणत होते. अर्धांगवायूचा झटका, स्मृतीभ्रंश, वाणीदोष, एखादी विकृती. काहीही होऊ शकत होतं पण महाराजांच्या कृपेने तसं काहीही झालं नाही. हाच अटॅक बसमधे आला असता तर? या विचाराने आजही थरकांप होतो. माझ्या प्रकृतीतील फास्ट रिकव्हरी पाहून डाॅक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. ज्यांनी मला तेव्हा प्रत्यक्ष पाहिलं होतं ते आजही झाल्या घटनेविषयी आश्चर्य व्यक्त करून मला प्रश्न विचारतात, तेव्हा मी त्यांना म्हणते, काय झालं?कसं झालं? ते माझ्या गजानन महाराजांनाच ठाऊक! बाकी मला विचाराल तर मी हेच म्हणेन. श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव-- सौ.स्वाती सिनकर सी बी डी बेलापूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!! भाग एक (यात १ते ५२) असे बावन्न अनुभव आहेत.

फक्त रुपये पन्नास. भाग दोन (यात ५३ते१०४)असे बावन्न अनुभव आहेत.

फक्त रुपये पन्नास .

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Commenti


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page