अनुभव - 113
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 3 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव ११३🌺)
प्रभू तू दयाळू कृपावंत दाता
एक दिवस मी ऑफिसात एक माणूस त्याच्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह घेऊन फिरताना पाहिला. त्याच्या अंगावरील कपड्यातून त्याची गरीबी डोकावत होती, तर त्याचा भांबावलेला चेहरा त्याच्या मनातील गोंधळ स्पष्ट करीत होता. मी त्याची आस्थेने चौकशी केली तेव्हा समजलं की काही दिवसांपूर्वीच त्याचे वडील स्कूटर वरून जात असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला. घरात येणारी जी काही थोडी फार कमाई होती ती त्यांच्या मुळेच . त्यांच्या जाण्याने घरातील कर्ता माणूसच गेला. त्याची आई या आधीच या जगातून निघून गेली होती. त्याच्यावर आर्थिक मानसिक दुःखाचा डोंगर कोसळला होता. मला त्याच्या विषयी सहानुभूती वाटली. त्याचं काम लवकर व्हावं असं मनापासून वाटलं. पण कार्यालयीन कामात तुमच्या नुसत्या भावना काही कामाच्या नाहीत. तिथे कायदेशीर तरतूद महत्वाची ठरते. क्लेम मान्य व्हायला आवश्यक कागदपत्र जसे ,पोस्ट मार्टम रिपोर्ट, वारसदार, रेशन कार्डातील नाव, कुणाचा आक्षेप नसल्याचा पुरावा इत्यादी इत्यादी बरीच कागदपत्रे असावी लागतात. त्या दिवशी त्या सर्व कागदपत्रांची नोंद घेऊन तो घरी परतला आणि इकडे माझ्या मनाला हुरहूर लागून राहिली. त्या संध्याकाळी मी घरी गजानन महाराजांना हात जोडून प्रार्थना केली की त्याला सर्व कागदपत्रे मिळू देत. त्या दिवशी आयुष्यात कदाचित पहिल्यांदाच मला दुसर्यासाठी प्रार्थना करण्याचा आनंद काय असतो याचा थोडाफार बोध झाला. काही दिवसांनी तो ऑफिसला पुन्हा दिसला. मधल्या काळात त्याने आवश्यक ती कागदपत्रे ऑफिसला जमा केली होती. त्यानं माझ्याकडे चौकशी केली तेव्हा प्रथम तर मी त्याला
' तुमचा क्लेम प्रोसेस मध्ये आहे ' असं म्हटलं पण पुन्हा त्याच्याकडे पाहून माझ्या मनाची विचित्र अवस्था झाली. मी त्याला सांगितलं उद्याच तुमच्या क्लेमचे पैसे बॅन्केत पाठविते.
मी त्याच दिवशी त्याची क्लेम फाईल साहेबांकडे सही करायला दिली. सर्व पेपर्स व्यवस्थित व पूर्ण असल्याने साहेबांनी पण लगेच तो क्लेम सेटल करून दिला. मी पण इतर क्लेम सोबतच हा क्लेम पण लगेचच काॅम्प्यूटर मधे रजिस्टर करून अप्रुव्हड् करून ठेवला जेणेकरून दुसरे दिवशी बॅन्केत क्लेमचे पैसे एन ई एफ टी करता येतील.
दुसरे दिवशी सकाळी दहा वाजता ऑफिसला आल्याबरोबर मी ठरविले की सर्व प्रथम ह्या अॅक्सिडेंट क्लेमचे व्हाऊचर काढावे कारण आपण त्या व्यक्तीला शब्द दिला आहे. परंतू सकाळी मी जेव्हा काॅम्प्यूटर चालू केले तेव्हा आदल्या दिवशीचे सर्व क्लेम अप्रुव्हड् दिसत होते पण नेमका हाच क्लेम कुठेही दिसत नव्हता. मी सर्व यथोचित प्रयत्न करून पाहिले पण मला काही केल्या त्यात यश येईना. मी संगणक रीस्टार्ट करून पाहिले तरीही काहीच फरक नाही. मग माझे एक सहकारी जे या क्लेमच्या कामात मास्टर होते त्यांची मदत घेतली तरीही परिणाम शून्य! वास्तविक मी या बाबतीत पूर्ण काळजी घेतली होती. इतर सहकारी म्हणू लागले मॅडम तुम्हाला तर यात सगळं समजतं, मग असं का व्हावं? असं का व्हावं? हे मलाही समजेनासं झालं. मग स्वाभाविकपणेच मला गजानन महाराजांची आठवण झाली. त्यांना हात जोडले, म्हटलं. महाराज मी त्याच्या साठी तुम्हाला प्रार्थना करते आहे. एका गरीबाला मदत व्हावी ,यापेक्षा अन्य उद्देश माझा यात नाही हे तुम्ही जाणताच. आमच्यावर कृपा करा. एव्हाना साडेअकरा वाजले होते. मी काॅम्प्युटर बंद केला. दीड वाजता आमचा लंच टाईम होणार होता. मी साधारण एकच्या सुमारास काॅम्प्युटर समोर बसले. गजानन महाराजांचं स्मरण केलं, काॅम्प्युटर आॅन केला. माझ्याच डोळ्यावर माझा विश्वास बसेना. मी तो क्लेम नंबर सेटल झालेला पाहिला. मी महाराजांसमोर नतमस्तक झाले.
नंतर इ.स.२०१६ मधे मनाला चटका लावणारी एक घटना माझ्या आयुष्यात घडली. मला एक पाच वर्षांची नात होती. आजी आणि नातीचं नातं समजायला आजीच व्हावं लागेल. दुधावरची साय म्हणतात. मला तिचा खूप लळा लागला होता. पण इ.स. २०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात नियतीनं क्रूर खेळ खेळला आणि तिला आमच्या पासून अचानक दोन दिवसांच्या आजारात हिरावून नेलं. आम्हा कुटुंबियांवर खूप मोठा आघात झाला. दुःख सगळ्यांनाच झालं. पण तेव्हा माझं रडणं काही केल्या थांबेना. घरी दारी, रस्त्यात ऑफिसात केव्हाही डोळ्याला धारा लागायच्या. एखाद्या दुःखद प्रसंगात माणसानं अजिबात न रडणं तब्येतीला घातक ठरतं तसंच अती रडणंही घातकच. काही दिवस हे ठीक होतं, पण जेव्हा मी अंतर्मुख झाले तेव्हा तो अश्रूंचा पूर माझा मलाच सलायला लागला. मी गजानन महाराजांसमोर बसले, त्यांना कळवळून प्रार्थना केली, म्हटलं देवा, हे माझ्या दुःखाचं प्रदर्शन नाही, तो माझ्या भावनांचा उद्रेक आहे. पण माझ्यावरील कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, कार्यालयीन जबाबदारी, माझ्या वयाची जबाबदारी लक्षात घेता आता माझ्या डोळ्यातील अश्रूंना लगाम घाला. महाराज आता मी सावरायला नको का? माझ्या भावना माझ्यापाशी. पण डोळ्यातील पाण्याला बांध घाला.
त्या दिवसानंतर तुम्हाला सांगते, बर्याच प्रमाणात माझ्या डोळ्यातील पाणी कमी झालं. दुःख आजही आहे. वेदना आजही आहेत. पण डोळ्यातील पाणी तेव्हढे कमी आहे कारण त्या पाण्याला बांध घालणारे महाराजांच्या साक्षीने शब्द आहेत. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- सौ. मीना (कल्पना) गायटे, नाशिक
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत. फक्त रुपये पन्नास
भाग दोन (५३ ते १०४)यात एकूण बावन्न अनुभव आहेत.
फक्त रुपये पन्नास
Comments