top of page

अनुभव - 114

Updated: Jun 1, 2020

" श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव ११४🌺)

भक्तीत अंतर करू नका

जय गजानन! मी दिलीप वासुदेवराव देशपांडे. माझे वडील वृत्तीने एकदम सात्विक आणि पिंडाने अध्यात्मिक. गजानन विजयच्या माध्यमातून गजानन महाराजांची भक्ती! महाराजांनी अनेक संस्मरणीय अनुभव त्यांच्या गाठीशी बांधून दिलेत. आज वडील हयात नाहीत पण त्यांनी सांगितलेले आणि काही लिहून ठेवलेले अनुभव स्मरणात आजही नुकतेच घडून गेल्यासारखे ताजे आहेत. जीवाचा थरकांप उठविणारा एक अनुभव तर माझ्या साक्षीनेच घडला.

वडिलांनी मध्यप्रदेशात कृषी विभागात सुरुवातीला अनेक वर्ष नोकरी केली. त्यांच्या नोकरीतील बदलीच्या निमित्ताने आम्ही अगदीच लहान लहान गावातून आमचं बालपण घालवलं.

गजानन विजय ग्रंथात गजानन महाराजांनी आम्हा भक्तांना धीर धरायला सांगून आणि भक्ती करायला सांगून आश्वस्त केलं आहे. मी गेलो ऐसे मानू नका/ भक्तीत अंतर करू नका/ कदा मजलागी विसरू नका/ आम्ही आहो येथे स्थीर. महाराजांच्या असणेपणाचा अनुभव गजानन महाराज भक्तांना समाधीनंतर आजही येतो आहे. या पूर्वीही आला आहे. मला आठवतं. खूप वर्ष झालीत त्या घटनेला. मी लहान होतो तेव्हा वडिलांची कृषी खात्यात सहसंचालक म्हणून ' अंबागड चौकी ' या अगदी लहान गावी, ज्याला खरं तर गावही म्हणता येणार नाही इतक्या लहान जागी बदली झाली. राजनंदगाव पासून पंचवीस मैलावर ' कुमर्धा ' या छोट्या गावात सडकेवर बसने उतरायचे आणि तिथून आठ मैल जंगलात आत पायी चालत ' अंबागड चौकीला ' जायचे. म्हणजे आपण जर कधी जंगलात आत शिरलो तर जाताना आपल्याला कधी मधेच दहा वीस झोपड्या दिसतात. त्याच्या आगेमागे काहीच नसतं. हे लोक इथे राहूच कसे शकतात? असा संशय मनात उभा राहतो. अगदी तशी स्थिती अंबागड चौकीची होती. आजही मध्यप्रदेशात घनदाट जंगलं आहेत त्याकाळी तर विचारायलाच नको . वाघ, अस्वल, बिबटे वगैरे प्राणी रात्री घराबाहेर हजेरी लावून जायचे. म्हणजे थोडक्यात तेथील लोक जंगलात होणारी शेती करीत होते. त्या जंगलाला लागूनच बस्तरचे जंगल होते. बालोद तालुक्यातील या ठिकाणी ' शिवनाथ ' नावाची नदी शेतीला आणि पिण्याला पाणी पुरवायची. तिथे एक परदेशी, कलार श्री रामधुरी म्हणून गृहस्थ होते. त्यांच घर दगडामातीत बांधलेलं, त्यातल्या त्यात व्यवस्थित होतं. त्यांच्या घरात आम्हाला नाममात्र दोन रुपयात रहायला जागा मिळाली होती. त्या भागात अर्धवट हिंदी अथवा प्रामुख्याने छत्तीसगढी बोली बोलल्या जायची.

आमच्या देवात गजानन महाराजांचा फोटो होता तो पाहून व त्यात अंगावर वस्त्र नाही असं पाहून रामधुरी बाबांजवळ चौकशी करायचे, मग बाबा त्यांना महाराजांविषयी गोष्टी सांगायचे. रामधूरी महाराजांना नंगरा बाबा ' म्हणून संबोधायचे. रामधुरीपण बाबांसारखेच सात्विक होते. श्रध्दाळू होते.

आम्ही रहायचो त्या चौकीपासून पाच एक किलोमीटर अंतरावर एक ' बांधाबझार ' नावाचं लहान खेडं होतं. तिथे दर बुधवारी भाजी बाजार भरायचा. बाबा दर बुधवारी बाजारहाट करण्यासाठी तिथे जायचे. एकदा मी त्यांना म्हटलं ' मी पण तुमच्या सोबत येणार. ' त्यांनी त्यादिवशी माझा बालहट्ट पुरविला. सायकलवर मी व बाबा बाजाराला गेलो. आम्ही भाजी घेतली. बाबांनी मला मुरमुर्याचा लाडू घेऊन दिला. त्यादिवशी बाजारातून निघता निघता थोडा उशीर झाला अन् आमची वाट चुकली. आम्ही चुकून जंगलाच्या दिशेने निघालो. आता अंधार होऊ लागला होता आणि आम्ही घनदाट जंगलात शिरलो. जंगलात दिशांचा बोध होत नाही. आता थोड्या वेळानं पूर्ण अंधार! या कल्पनेनं मला भिती वाटायला लागली. मी हॅन्डलवर दोन हात धरून त्यावर कपाळ टेकवून डोळे मिटून घेतले. जंगलात एक वेगळाच वास येतो. तसंही बाबा नेहमी म्हणायचे की वाघ, बिबट्या, अस्वल यांच्या शरीराला एक घाण वास असतो. एक उग्र दर्प आमच्या नाकात शिरू लागला. एव्हाना बाबांच्याही मनावर भितीने कब्जा केला होता. कुठं जावं हे त्यांनाही कळत नव्हतं, पण कुठेतरी जाणं भाग होतं म्हणून आम्ही समोर सरकत होतो. गर्द झाडी त्यावर रानटी वेलांच्या जाळ्याच जाळ्या पाऊल वाट उजवीकडे वळल्यासारखी वाटत होती. आम्ही तिकडे वळणार तोच त्या गर्द जाळीतून एक उंचापुरा निमगोरा रंगाचा ,केवळ कमरेला एक मळका पंचा गुंडाळलेला माणूस अचानक आमच्या समोर उभा राहिला. त्याच्या हातात काहीही नव्हतं. पायात चप्पलही नव्हती. टपोर लाल डोळे! डोळे मोठे करून आणि हात उंचावून त्यानं छत्तीसगढी भाषेत विचारलं ' ए इधर कहाॅ जाथो? '

प्रथम बाबांना वाटलं डाकू वगैरे आहे की काय? हिंमत एकवटून बाबा म्हणाले, ' तोला काय करे भर हे गा कहांचो जाय ' त्यावर तो माणूस बोलला ' अरे नान चून लैकाला धरके कते कहां रेंगते हो? ' बाबा म्हणाले ' अपन गाव चौकील जाथो ' त्यावर तो म्हणाला ' अरे लेडगा ये रध्धा चौकील धोरे जाथे? ये तो बघवाके घर जाथे ' ' पलट जा देरी झन करहू ' असं म्हणून तो माणूस ' बांधाबझार ' च्या रस्त्याने वेगाने चालू लागला. बाबा त्याच्या मागे सायकल घेऊन झपाट्याने चालू लागले. हा प्रकार जवळपास अर्धा तास चालला. एका ठिकाणी अचानक तो माणूस थांबला. आमच्याकडे तोंड करून रागाने ओरडून म्हणाला ' मोर पाछू पाछू का बर आथो? अपन गावके रध्धाला धरले नाहक जा येही पारले नाहक जा. ' तिथून एक पाऊलवाट पुढे जात होती, त्या दिशेने आम्ही निघालो. प्रथम बाबांच्या डोक्यात गोंधळ होता. पण पाचच मिनिटात अंबाचौकीचा ओळखीचा रस्ता दिसू लागला. आम्ही रात्री दहाच्या सुमारास घरी परतलो.

आई आणि बहीण मीना वाट पाहून थकल्या होत्या. वाघा बिबट्याने आमचा निकाल लावला की काय? या कल्पनेने रामधुरी अस्वस्थ झाले होते. आम्हाला पाहून आनंदानं त्यांनी बाबांना हकीकत विचारली. आम्हाला कुणी मार्ग दाखविला हे कळल्यावर ,तो माणूस उघडा होता? त्याच्या हातात काहीच नव्हतं? हा प्रश्न त्यांनी दहावेळा विचारला. त्या जंगलाची भरपूर माहिती असणारे रामधुरी बोलू लागले. त्या जंगलात एकटा दुकटा माणूस कधीच जाऊ शकत नाही. जळाऊ लाकडासाठी सरकारी पास घेऊन, दहा बारा माणसं दोन चार बैलबंड्या घेऊन जातात. गेले तरी संध्याकाळी चार नंतर तिथे कुणीच राहू शकत नाही. फाॅरेस्ट गार्ड देखील तिथे एकटा फिरकत नाही. असं म्हणून गजानन महाराजांच्या फोटोसमोर बसून रामधूरी बाबांना म्हणाले ' साब आप जो नंगरा बाबा के फोटो की पूजा करते ना वोही नंगरा बाबा आपको रस्ता बताने के लिए आये. आपको खतरेसे बचाया ' असं म्हणून महाराजांच्या फोटोकडे पाहून ते म्हणू लागले ' धन्य है लीला तेरी, भगवान धन्य है! ' त्यावर बाबा त्यांना म्हणाले

पण ते तर छत्तीसगढी बोली बोलत होते. ते ऐकून रामधूरी उत्तरले ' अजी ये लोक सब भाषा जानते हैं. हिंदी, मराठी, अंग्रेजी, छत्तीसगढी, सब! और वैसे भी ये संत लोग बहोत होशियार होते है! इस इलाकेमे अगर वे मराठी बोली बोलते तो आप उन्हे पहचान नही लेते? उन्होने पहचान छुपाकर रखी !

आता मात्र झाल्या गोष्टीचं भान बाबांनाआलं. तेही नमस्कार करण्यासाठी रामधुरींच्या बाजूला खाली बसले. बाबांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्यांनी हात जोडले.रामधुरींनी बाबांकडे पाहून म्हटलं ' साब मै शेगांव देखना चाहता हूँ! नंगरा बाबा के समाधी स्थल का दर्शन मुझे होगा ना? बाबांनी रामधूरींचे दोन्ही हात त्यांच्या हाती घेतले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचे हात आपल्या कपाळाला टेकवून म्हटलं! श्रीगजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव-- दिलीप वासुदेवराव देशपांडे

नरेंद्रनगर नागपूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा.!!श्रीगजानन अनुभव!!

भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत

फक्त रुपये पन्नास

भाग दोन ( ५३ ते १०४) असे बावन्न अनुभव आहेत

फक्त रुपये पन्नास.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page