top of page

अनुभव - 115

Updated: Jun 1, 2020

" श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव ११५🌺)

आम्ही आहो येथे स्थित

' अरे माझ्या फोटोला हारही घालत नाहीस, आता फक्त पस्तीस दिवस उरलेत. ' त्या वाक्याने बाबा दचकून उठलेत. तिकडे माझी तब्येत खालावली होती .पस्तीस दिवसात माझं काही बरंवाईट होणार या शंकेने त्यांना ग्रासलं. मात्र लगेचच्या गुरुवारी त्यांनी फोटोला हार घातला. तिकडे मला निमोनिया झाला, म्हणजे

' टायफोनिमोनिया ' असा आजार. ' संतांची वाणी असत्य न होये. ' यावर बाबांचा विश्वास! पण त्यांनी हिंमत बांधून ठेवली. बॅन्केने चोवीस जूनला तुम्ही गोंदियाला रूजू व्हा असं पत्र बाबांना दिलं. मधल्या काळात महाराजांना केलेली प्रार्थना त्यांनी ऐकली अन् माझी तब्येत सुधारली. बाबांच्या डोक्यावरील ते टेन्शन कमी झालं. तेवीस जूनला बॅन्केच्या अधिकार्यांनी बाबांच्या हाताची चौकशी केली आणि ते म्हणाले ' देशपांडे तुम्ही चोवीस जूनला तिकडे गेलात तर सिक्स मंथली क्लोजिंगच्या कामाचा ताण तुमच्यावर पडेल. तुमच्या पत्रावर मी एक जुलै तारीख करून देतो. तुम्ही एक जुलैला गोंदियाला रुजू व्हा. बाबांना वाटलं चला तेवढंच फोटोचं सानिध्य वाढेल, कारण फोटो नागपूरलाच राहणार होता. बाबा एक जुलैला गोंदियाला रुजू झाले. तिथे काम सुरू करता करता त्यांनी सहज हिशेब केला, तो बरोबर पस्तीसावा दिवस होता.

बाबांची गोंदियाला बॅन्केत नोकरी सुरू झाली. काही वर्ष गेलेत. एकदा बाबांची तब्येत विचित्र पध्दतीने बिघडली. त्यांना अस्वस्थतेचा अटॅक येऊ लागला. धाप लागायची, श्वासोश्वास कठीण व्हायचा. जीवाचा कोंडमारा झाल्यासारखं व्हायचं. असा अटॅक मधेच केव्हाही यायचा. सुटी घेऊन बाबा नागपूरला आले, डाॅक्टर झाले. त्या वेळेस त्यांचं बीपी खूप वाढत असे. डाॅक्टरांना नीट निदान झालं नाही. पगारी रजा संपत आली. बाबांना नोकरीवर जाणे भाग होतं. त्या विचित्र व्याधीमुळे बाबा चिंताग्रस्त झाले आणि आता लवकरच आपण या जगाचा निरोप घेणार या कल्पनेने त्यांच्या मनात घर केलं. ते निर्वाणीची भाषा बोलू लागले. इतकं झालं की हवेची आवश्यकता म्हणून त्यांनी तेव्हा ओरिएंट कंपनीचा एक पंखा घेतला तर म्हणत होते फार गरज आहे म्हणून घेतला मी गेलो तर याचे पैसे तुम्हाला मिळू शकतील. त्यांना अन्न पाणी गोड लागेना, जीवन निरस झालं. केव्हा अटॅक येईल नेम नाही म्हणून त्यांनी तिथल्या विठ्ठल मंदिरात जाणं सुरू केलं म्हणजे वाटेत मरण आलं तर विठ्ठलाच्या वाटेवर मरण आलं हे समाधान मिळेल, अशी त्यांची भावना होती. पण म्हणतात नं ' असेल देवाजीच्या मनी ' तसं झालं. एका पहाटे चारसव्वाचारला बाबांना स्वप्न पडलं. ते विठ्ठलाच्या मंदिरात बसले आहेत. तिथे हातात चिलीम घेऊन, शरीराने थोडे कृश असलेले असे गजानन महाराज आलेत. बाबांना म्हणाले ' अरे कशाची चिंता करतोस? तू इतक्यात मरत नाहीस. निदान काही वर्ष तर तुझं मरण नाहीच! चिंता सोड कामाला लाग! ' ते स्वप्न संपलं, बाबा उठले आणि तिथून खरंच त्यांची तब्येत सुधारत गेली.

पुढे बाबांची बदली अमरावतीला झाली. तिथून गाडीने शेगांवला जायचं तर बडनेर्याहून गाडी पकडावी लागते. तेव्हा नागपूर- दादर एक्सप्रेस रात्री बडनेरा येथे येऊन तिथून रात्री तीनच्या सुमारास शेगांवला पोहोचायची. बरेच लोक तेव्हा नागपूर- दादरने शेगांवला जात असत. तो सप्टेंबर महिना होता. बाबा शेगांवला जायला निघाले. माझी बहीण मीना त्यांच्या सोबत जायला तयार झाली. रात्री दोघं बडनेरा येथून गाडीत चढले. वाटेत दोघांनी ठरविलं की शेगांव स्टेशनवर प्लॅटफॉर्मला उतरताना गर्दीचा त्रास टळावा म्हणून शेगांवला गाडी थांबली की आपण प्लॅटफॉर्मवर न उतरता विरूध्द बाजूला खाली उतरू. त्या काळी आजच्या सारखा दिव्यांचा झगमगाट तेव्हढा नव्हता. काही वेळाने शेगांव येण्याची वेळ झाली म्हणून हे उतरण्यासाठी सज्ज झाले. गाडी थांबली, विरूध्द दिशेला हे खाली उतरले. दोन मिनिटांत गाडी निघून गेली. पहातात तो सर्वत्र अंधार. ते शेगांव स्टेशन नव्हतंच. आऊटर सिग्नलच्याही अलिकडे गाडी थांबली होती अन् निघून गेली. रात्री अडीच वाजता, भयाण अंधार , पावसाळ्याचे दिवस, गर्द झाडी, पाण्याची डबकी, बेडकांचा आवाज, रात किड्यांची कीर कीर, दोन समांतर दूर जाणारे रूळ ,मधे गिट्टी. मीना खूप घाबरली. बाबांनी उसनं अवसान आणलं. एकच आधार होता ' गजानन महाराजांच्या नावाचा ' गजानन महाराज की जय! म्हणून बाबांनी मीनाचा हात धरला. म्हणाले, चला शेगांवच्या दिशेने समोर जाऊ. दुसरा मार्ग नाही. महाराजांचं नाव घेत ते चालू लागले. पाच दहा पावलं चालले असावेत, अचानक रुळाच्या एका बाजूने एक माणूस, गुडघ्या पर्यंत धोतर, अंगात बंडी, हातात छत्री, समोर आला. म्हणाला, कुठे? शेगांवला निघालात? अन् हे काय गाडीतून येथेच उतरला, चला! काळजी करू नका मलाही तिकडेच जायचं आहे. इतक्यात पाऊस सुरू झाला, त्यानं हातातली छत्री मीनाला दिली. मीना बाबांच्या कानात कुजबुजली ' बाबा याच्यावर कसा विश्वास ठेवायचा?' पण बाबा काही बोलले नाहीत. काही वेळाने समोर गेल्यावर तो माणूस म्हणाला, आता आपण इथून खाली उतरून तिरप्या दिशेने जाऊ. म्हणजे मंदिरात लवकर पोहोचू. ते मुकाट्याने डाव्या हाताला खाली उतरले. झाडा झुडपातून थोडं चालले आणि अचानक मंदिरातील दिवा समोर दिसू लागला. बाबांच्या डोक्यावरील ताण क्षणात उतरला. मग त्या माणसानं दिशा दर्शन केलं. सांगितलं, त्या खिडकी दरवाज्यातून आत जा आणि दर्शन घ्या! आता मी निघतो.

त्या शेगांव दर्शनानंतर बाबा घरी परतले. मात्र तीन प्रश्न नेहमी करीताच बाबांच्या सोबत राहिले... ' आता फक्त पस्तीस दिवस उरलेत! ' असं म्हणणारा कोण? ' काळजी करू नकोस तू इतक्यात मरत नाहीस !' हे सांगणारा कोण? रात्रीच्या अडीच वाजता त्या भयाण काळोखात अचानक मदतरूप ठरलेला कोण? या तीनही प्रश्नांचं उत्तर बाबांनी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या ओठांवर वारंवार एकच आले, श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव--दिलीप वासुदेवराव देशपांडे

नरेंद्र नगर नागपूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत

फक्त रुपये पन्नास

भाग दोन (५३ ते १०४) असे बावन्न अनुभव आहेत

फक्त रुपये पन्नास.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page