अनुभव - 116
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 3 min read
Updated: Jun 1, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव११६🌺)
विसर तुझा मज कधी न पडावा!
सर्व ग्रुपच्या आग्रहावरून मग १३ सप्टेंबर २०१९ रोजी आम्ही पुणे- काझीपेठ गाडीचं रिझर्व्हेशन केलं. आम्ही चौदा लोक होतो. त्यात एका मैत्रिणीची नात दहा वर्षांची आणि एकीचा नातू चार वर्षांचा. बाकी सर्व वय वर्षे साठीच्या आगेमागे. ती गाडी पुण्याहून रात्री साडे दहाला निघते आणि शेगांवला सकाळी साडे आठच्या सुमारास पोहोचते. एरवी पुण्याहून शेगांवसाठी अन्य गाड्याही आहेत, पण आम्ही विचार केला की रात्री जेवून प्रवासाला सुरुवात होणार आणि सकाळी लवकरच पोहोचणार तेव्हा ही गाडी बरी! जवळ डबा वगैरे काही भानगड नाही केवळ झोपण्यासाठी गाडीत बसायचे आहे. म्हणजे सुटसुटीत सामानासह हा प्रवास ठीक राहील. शेगांवचं सकाळचं जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद!
रिझर्व्हेशन झालं जाण्याचा दिवस उगवला. यावर्षी पुण्याला आणि एकूणच कोल्हापूर पासून त्या भागात अतोनात पाऊस झाला हे आपण सर्व जाणतोच. त्या अतिवृष्टीमुळे गाड्यांचं वेळापत्रकही बिघडलं. आम्ही स्टेशनला पोहोचलो तो गाडी दीड तास लेट. म्हणजे गाडी पुण्याहून निघाली तो रात्रीचे बारा वाजलेले. त्या क्षणी मनात विचार आला, आपण या लोकांना महाराजांविषयी सांगून शेगांवला नेतो आहे! गाडी लेट का व्हावी? वाटलं गाडी रात्रीतून टाईम मेक अप करेल. उशीर झालाच होता. रात्र बरीच झाली होती आम्ही सर्व निद्रेच्या आधीन झालो. सकाळ होता होता शेगांव आलं असेल या कल्पनेत रममाण होऊन सर्व निवांत झोपलो. सकाळी आठ वाजता जाग आली तेव्हा समजलं की गाडीने अजून दौंडही ओलांडलं नाही. गाडी केडगांवच्याच जवळपास आहे. याचा अर्थ आता गाडी किमान बारा तास लेट होणार. म्हणजे सकाळी आठच्या ऐवजी रात्री आठ वाजता शेगांवला पोहोचणार हे निश्चित होतं. परिस्थितीचा अंदाज घेऊन गाडीतील अनेक लोकांनी गाडी तिथेच सोडून पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. आमच्याही पैकी काही जणांनी तशी इच्छा व्यक्त केली. परंतू मी म्हटलं, एकदा दर्शन घेण्याचं ठरविलं आहे, मी पुढे जाणारच. माझा निर्धार पाहून मग आम्ही सगळेच पुढे निघालो. मात्र सोबत होते अनेक पोक्त. त्यांच्यासाठी औषध, जेवण, हा प्रश्न होता. जवळ काही खाण्याचं नाही अन् गाडीत तशी सोय नाही. पुन्हा मनात प्रश्न आला. म्हटलं, महाराज तुमच्या मनात काय आहे? पण स्वतःची समजूत घालून स्वस्थ बसले. आज दिवसभर उपासमार होणार हे दिसू लागलं. सोबतच्या लहान मुलांची कीव आली. गाडी पुढे निघाली होती. काही वेळ झाला, मनात महाराजांचा धावा सुरू होता. कारण संभाव्य उपासमारी करीता अप्रत्यक्ष मीच जबाबदार ठरणार होते. पण त्याहीपेक्षा, असा विचित्र अनुभव गाठीशी घेऊन आम्ही प्रवास केल्यावर या पुढे मी गजानन महाराजांविषयी कोणत्या तोंडाने बोलू शकणार होते? हा विचार मला अस्वस्थ करीत होता. आमच्या बाजूच्या कम्पार्टमेन्टमधे एक तीस पस्तीस लोकांचा ग्रुप होता. तो जळगावला जात होता. माझ्या कानावर आले की त्यांनी नगरला त्यांच्यासाठी काही जेवणाची ऑर्डर दिली आहे. तिथून त्यांच्यासाठी डबा येणार आहे. मी तातडीने त्यांच्या जवळ जाऊन, आम्हा चौदा लोकांसाठीही जेवण मागवा, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. सोबत लहान मुलं आहेत, साठीच्या पुढील स्त्रिया आहेत. असं सांगून डब्यासाठी आग्रह धरला, पण ते म्हणाले, आता नगर येण्यास फक्त जेमतेम अर्धा तास उरला आहे. इतक्या लोकांचा डबा तयार होईल केव्हा? ते स्टेशनवर पोहोचतील केव्हा? तेव्हा हे अश्यक्य आहे. असं म्हणून लहान मुलांसाठी दोन पोह्यांची पाकीटं दिलीत. मी खिन्नपणे माझ्या जागेवर येऊन बसले. सगळ्यांचेच चेहरे पडले होते. बोलत नसले तरी कदाचित सगळयांच्याच मनात एकच विचार होता. व्वा रे गजानन महाराज आणि व्वा रे शेगांव वारी! इतक्यात नगर आलं, गाडी थांबली. बाजूच्या ग्रुपसाठी डबा आला होता. डबा देणारे निघून गेले. गाडी सुटली. पंधरा-वीस मिनिटं मधे गेली असतील. काही वेळापूर्वी मी ज्यांच्या सोबत बोलले होते ते मला बोलवायला आले. म्हणू लागले, मॅडम आम्ही त्यांना तीस पस्तीस लोकांकरीता डबा सांगितला होता. पण काय झालं माहीत नाही असं लक्षात येतं आहे की आमचं पोटभर होऊनही चौदा पंधरा लोकाचा डबा शिल्लक उरतो आहे. कृपया स्वीकार करा.
आम्हा चौदा लोकांसमोर गाडीच्या त्या प्रवासात ताजं आणि रुचकर जेवण होतं. मला आजीचे शब्द आठवत होते. महाराज तुमची परीक्षा पाहतील पण धीर सोडू नका. सर्वांचे चेहरे त्या अनुभवाने आता खुलले होते. मघाशी मला शंका होती, पण यावेळी मात्र खात्री होती की खचितच सगळे म्हणत असणार, व्वा रे गजानन महाराज! गाडी लेट होणं हा भाग सोडला तर पुढे आमचं दर्शन छान झालं .दर्शनाने सर्वांना मनाची प्रसन्नता प्राप्त झाली.
आम्ही पुण्याला परतलो तेव्हा जो तो मला धन्यवाद देऊन अचानक चौदा लोकांसाठी डबा आला कसा या विषयी आश्चर्य व्यक्त करीत होता आणि मी मात्र मनातून महाराजांचे आभार मानून म्हणत होते. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ सुनिता धनेवार पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत
फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ ते १०४) फक्त पन्नास रुपये.
Comentários