अनुभव - 117
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव ११७🌺)
चातुर्मास नाम जप आणि नर्मदा मैया
हे सर्व मी तुम्हाला यासाठी सांगते आहे की अगदी नुकताच या गोष्टीचा आनंद मला घेता आला. मी सौ अंजनी हर्णे, मध्य प्रदेश ' हारदा ' येथे असते. नागपूर माझं माहेर! तर झालं असं की मागील चार वर्षे झाली दर चातुर्मासात ' समर्थ सद्गुरू गजानन महाराज उपासना केन्द्र नागपूर ' यांनी भक्तांकडून ' गण गण गणांत बोते ' हा जप करवून घ्यावा अशी योजना आखली. त्यासाठी प्रत्येकाला जप नोंदणी सुलभ व्हावी म्हणून एक फाॅर्म देण्यात आला. चातुर्मासाच्या शेवटी उपासकांनी आपला फाॅर्म माहितीसह परत करावा आणि आलेल्या फाॅर्म वरून केलेला जप नावासह रजिस्टर मधे नोंदवून शेवटी तो संपूर्ण जप शेगांवला महाराजांच्या चरणी समर्पित करावा अशी योजना आखण्यात आली. इ.स. २०१६ ला सुरुवात झालेला हा जप दरवर्षी विस्मयकारक गतीने वाढत गेला. २०१६ ला एक हजार फाॅर्म छापण्यात आले तेव्हा सव्वा सहा कोटी जप नोंदविण्यात आला. २०१७ ला दोन हजार फाॅर्मच्या माध्यमातून सव्वा तेरा कोटी जप झाला. २०१८, साडे चार हजार फाॅर्म आणि जप झाला तब्बल पंचावन्न कोटी अकरा लाख. यंदा म्हणजे २०१९ ला दहा हजार फाॅर्म छापले आहेत आणि शंभर कोटी पेक्षाही जास्त जप होणार असं सुरू असलेल्या जप मोजणीवरून लक्षात येतं आहे. असो!
माझ्या बाबतीत असं घडलं की पहिल्या तीनही वर्षी मी योगायोगाने आषाढी एकादशीच्या पूर्वी अर्थात चातुर्मास सुरू होण्याच्या सुमारास म्हणजेच फाॅर्म घेण्याच्या सुमारास नागपूरात हजर राहिले. मी नामजपासाठी फाॅर्म घेतला पण दरवेळी काही कारणाने माझा जप मात्र काही होऊ शकला नाही. काही ना काही अडचण समोर उभी ठाकली. यंदा चौथ्या वर्षीही पुन्हा आषाढीच्या आधी फाॅर्म घेण्यासाठी मी नागपूरला असण्याचा योग आला. मी फाॅर्म घेतला मात्र यावेळी उपासनेच्या वेळी मी मागील तीन वर्षातील अडथळ्यांचा योग सरांच्या कानावर घातला आणि काय करू? अशी शंका बोलून दाखवली, त्यावर ते म्हणाले आपण यंदा एक काम करू तू ' या चातुर्मासातील माझा जप मी नर्मदा मैयाला अर्पण करीन! ' असा संकल्प कर गजानन महाराज आणि आणि नर्मदेला या कामात आशिर्वाद माग आणि बघूया काय होतं ते. एवढं बोलून त्यांनी जय गजानन! असं म्हणून फाॅर्म माझ्या हाती दिला. मी नर्मदे हर! नर्मदे हर! असं म्हणून फाॅर्म जवळ ठेवून घेतला. मी हारदा येथे परतले. आषाढीला जप आरंभ होणार हे लक्षात होतं परंतु बाकी गोष्टी सुप्त मनात दडून गेल्या. आषाढी एकादशीला मी थोडाफार जप केला. दुसरे दिवशी द्वादशीला मिस्टरांचा तिथीने वाढदिवस असतो. सकाळी ते म्हणाले चला आपण हनुमान दर्शनासाठी जाऊ. बरेली जवळ एक ' छिंद ' नावाचं लहान गाव आहे तिथे हनुमानाचं एक जागृत मंदिर आहे. तिथे जाण्यास आम्ही सज्ज झालो. वाटेत ' सांडीया ' घाट आहे तिथे नर्मदेत स्नान करू असं ठरलं. त्या सकाळी नर्मदेचं पाणी ओंजळीत धरलं आणि नर्मदा मैयाने जणू मला जप समर्पणाची आठवण करून दिली. आपल्याला या चातुर्मासात जप करायचा आहे या कल्पनेने मन भरून आलं. पुढे छिंद येथे हनुमान मंदिरात ' सुंदर कांड ' वाचलं परतीच्या प्रवासात नेमावरला पुलावर यांनी गाडी थांबवली. मी खाली उतरून नर्मदेला हात जोडले. गुरूपौर्णिमा जवळ होती त्यामुळे चंद्राच्या त्या शीतल प्रकाशात नर्मदा प्रसन्न दिसत होती. मी हात जोडून म्हटलं
' मैया मागील तीन वर्ष माझ्याकडून जप होऊ शकला नाही. या चातुर्मासात गजानन महाराजांचा जप माझ्या कडून करवून घे. माझा जप तुला समर्पित आहे! '
चातुर्मासाचा पहिला महिना प्रसन्नतेत पार पडला. पहिल्यांदाच पूर्ण महिनाभर छान जप झाला होता. नंतर ११ ऑगस्ट २०१९ ची गोष्ट, भोपाळला माझा एक मामे भाऊ जरा मानसिक दृष्ट्या अडचणीत होता, आम्ही त्याला भेटायला जायचं ठरविलं. वाटेत नेमावरला पुलावर गाडी थांबवली. मी एक नारळ तिथे नर्मदेला अर्पण केला. साधारण महिन्याच्या अंतराने बरोबर हा योग येत होता. जणू मैयाने पुढील महिन्यासाठी माझ्याकडून संकल्पाची उजळणी करून घेतली.
आपण एखाद्या तीर्थक्षेत्री राहत असलो तरी आपण तेथील मंदिरात नेमाने जातोच असे नाही. तसेच आम्ही मध्य प्रदेशात राहत असलो तरी वारंवार नर्मदा दर्शन होतंच असं नाही. पण या चातुर्मासात मैयाने माझ्या संकल्पाकडे छानच लक्ष पुरविलं. ११ सप्टेंबरची दुपार. जेवण होऊन मी सहज बसले होते तो अचानक माझ्या दिरांनी मला प्रश्न केला भाभी नर्मदेला पूर आला आहे. नेमावरला जाऊन ते अथांग पाणी पाहण्याचा योग आहे, चलणार का? त्या दुपारी ' नेमावर ' जे की नर्मदेचं नाभी स्थान समजण्यात येतं तिथे नर्मदा मैयाला हात जोडले तेव्हा अक्षरशः डोळे भरून आले. मैयाला म्हटलं, ' मैया, अगं, माझ्या नाम संकल्पाकडे माझ्या पेक्षा तूच जास्त आपुलकीने लक्ष देते आहेस.
६ आक्टोबरला अष्टमी होती. तेव्हा मी होशंगाबादला होते. सासूबाई म्हणाल्या नर्मदेची ओटी भरून या. 'सेठाणी' घाटावर नर्मदा मंदिरात मैयाला साडी अर्पण केली आणि खाली तिची खणा नारळाना ओटीही भरली. पण हा नित्याचाच भाग होता. नर्मदा मैयाने चातुर्मासातील गजानन महाराजांच्या या जपासाठी जसं काही मला बरोबर महिन्याच्या अंतराने बोलावून संकल्प स्मरण करून देण्याचं निश्चितच केलं होतं. कारण १० आक्टोबरला माझ्या जाऊच्या म्हणण्यानुसार पुन्हा आम्हाला ' सेठाणी ' घाटावर जाण्याचा योग आला. तिथे नर्मदा स्नान झाले. नंतर तिथेच मैयाच्या साक्षीने एक माळ ' गण गण गणांत बोते ' जप झाला. या चातुर्मासात माझ्या जप संकल्पाकडे तर माऊलीने लक्ष दिलेच पण मागील तीन वर्षे काही कारणाने घरातील नवरात्र उत्सवापासून वंचित राहिले होते तो नवरात्र उत्सवही घरी व्यवस्थित पार पडला.
अशा रितीने चातुर्मासाच्या सुरुवातीलाच जपासाठी नर्मदा मैयाला आशिर्वाद मागितला तर कधी नव्हे अशा पध्दतीने चारही महिन्यात सुरूवातीला दर्शनासाठी बोलावून यंदा माझ्याकडून दोन लाखाच्या घरात जप करवून घेतला आणि गजानन विजय ग्रंथात महाराजांनी माझी नर्मदा असा उल्लेख केला आहे तो किती सार्थ आहे या विषयीचा अध्यात्मिक अनुभव मला प्रदान केला. हे सर्व सांगण्यासाठी मी नागपूरला फोन केला तेव्हा बोलण्याच्या ओघात मला सर म्हणाले आताच आम्ही नर्मदेचाच चौदावा अध्याय पूर्ण केला तेव्हा मी माझ्या डोळ्यातील अश्रू रोखू शकले नाही.
आता चातुर्मास समाप्ती झाली . केवळ चार महिन्यात शंभर कोटीहूनही अधिक होणारा हा सर्व जप पुढे रीतसर शेगांवला महाराजांच्या चरणी समर्पित करण्यात येईल. मी केलेला किंबहुना माझ्या कडून करवून घेतलेला जप मात्र सर्व उपासकांच्या वतीने मी नर्मदा मैयाला अर्पण करून, दोघांचही एकत्र स्मरण करून म्हणणार आहे, नर्मदा मैया की जय!, श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ अंजनी हर्णे, हारदा ( मध्य प्रदेश)
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव !!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत
फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत
(५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास.
Comentarios