अनुभव - 119
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 3 min read
Updated: Jun 1, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव ११९🌺)
अनुभव येती आज मितीला
जय गजानन
इ.स.दोन हजारच्या सुमारास घडलेली घटना मला आठवते त्या घटनेने माझ्या श्रध्देची कसोटीही पाहिली आणि गजानन महाराजांविषयी एक विलक्षण अनुभवही माझ्या गाठीशी जमा झाला.
आमच्या संदेशची तब्येत एक दिवस बिघडली. डाॅक्टर निर्मला, आमच्या नेहमीच्या डाॅक्टर! वाटलं दोन चार दिवसात होईल बरा. पण पुढील दोन दिवसात त्याच्या तोंडाची चव गेली. अन्न पाणी गोड लागेना , भूक लागेना. मग लक्षात आलं की कावीळीची लक्षणं आहेत. मग त्या अनुषंगाने ट्रीटमेन्ट सुरू झाली. अॅलोपॅथी सोबत आयुर्वेद , काविळ उतरविणारे,ज्ञात असणारी पारंपारिक औषधं सर्व उपाय सुरू झालेत. पण संदेशची तब्येत बिघडतच गेली. त्याचं सर्वांग पिवळं पडलं. डोळे जर्द पिवळे झालेत. असं म्हणतात काविळ झालेल्यांना सर्व जग पिवळं दिसतं. पण इथे तर एक दिवस संदेशनी तक्रार केली ' आई मला काही दिसत नाही आहे!' ते ऐकून आम्हा उभयतांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आय स्पेशालिस्टकडे नेलं. ते म्हणाले काविळ विकोपाला गेल्याने असे झाले आहे. आम्ही सर्व संदेश भोवती जमा झालो. दुपारची वेळ होती. डाॅक्टर निर्मलाही आल्या औषध देण्यात कुठेच कमी नव्हते, पण तरीही दुखणं विकोपाला गेलं होतं. डाॅक्टरांनी तर संशय बोलून दाखविला,याला हाॅस्पिटलमधे घेतील की नाही शंका वाटते. पण ठीक आहे आपण प्रयत्न करू मी थोड्या वेळात तुम्हाला कळविते. त्या प्रयत्नाला लागल्या. मी देवघरातील गजानन महाराजांच्या फोटोसमोर उभी झाले.
महाराजांना कळवळून प्रार्थना केली, म्हटलं 'महाराज हवं तर मला न्या पण संदेशचा जीव वाचायला हवा !' मी संदेश जवळ आले. त्या दुपारी मला दहा वीस मिनिटं गाढ झोप लागली. भर दुपारीच मला त्या अल्पावधीत स्वप्न पडलं. माझ्या स्वप्नात गजानन महाराज आलेत, ते मला म्हणाले
' अगं चिंता करू नकोस, तो ठीक होईल. कांदिवलीला उषा राहते तिच्या कडून तू तीर्थ घेऊन ये आणि ते संदेशला दे!' एवढं बोलून महाराज निघून गेले अन् मला जाग आली.
जाग आली तो माझं मन प्रफुल्लित झालं होतं. मी मिस्टरांना ते स्वप्न सांगितलं, पण आता आमच्या समोर प्रश्न हा होता की एवढ्या मोठ्या कांदिवलीत ही नेमकी उषा कोण की जिच्याकडे महाराजांचं तीर्थ मिळावं? मग आम्ही त्या दिशेने विचार करू लागलो. आम्ही नेमाने
' गजानन आशिष ' मासिक वाचायचो, त्यातून आम्हाला
' ब्रम्हांडनायक ' मालिकेत गजानन महाराजांची भूमिका करणारे श्री वसंत गोगटे यांचं नाव माहीत झालं होतं. मिस्टरांनी वसंत गोगट्यांची भेट घेण्याचं ठरविलं. त्यांना सगळा प्रकार समजावून सांगितला. ते म्हणाले गजानन आशिष कांदिवलीत अनेकांकडे जातं त्यातून कुणी ' उषा ' आढळते का ते पहावं लागेल ,पण हे काम माझे बंधू जे विलेपार्ले येथे असतात ते पाहतात. त्यांना भेटावं लागेल. मग मिस्टर विलेपार्ले येथे त्या गोगटेंना भेटले. त्यांनी पूर्ण यादीच समोर घेतली. त्यात एक नाव कांदिवलीत आढळलं,ते होतं ' उषाताई आपटे ' त्यातून त्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळाला. पुढे आम्हाला अशीही माहिती मिळाली की, त्या एका शाळेत नोकरीला आहेत. त्या अनेक दिवसांपासून ' गीत गजानन ' या कार्यक्रमांतर्गत ठिकठिकाणी श्री गजानन महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम सादर करीत असतात. त्या गजानन महाराजांची अशा प्रकारे सेवा करतात हे ऐकून मनाला एकदम उभारी आली आणि आतून संकेत मिळाला की हीच ती ' उषा!'
मी तातडीने उषाताईंना फोन केला. स्वतःचा थोडक्यात परिचय देऊन डायरेक्ट प्रश्न केला ' तुमच्याकडे महाराजांचं तीर्थ आहे का?' त्यांन मला प्रतिप्रश्न केला 'हे तुम्हाला कसं कळलं?' मी म्हटलं गजानन महाराजांमुळे ! फोन ठेवताना त्या बोलल्या, ताबडतोब भेटायला या!
आम्ही उषाताईंकडे पोहोचलो. त्या आतुरतेने आमची वाट बघत होत्या. या 'बसा 'झाल्यावर मी त्यांना थोडक्यात सर्व हकीकत कथन केली. ती ऐकून त्या उठून उभ्या राहिल्या, मीही ऊभी झाले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. प्रथम त्यांनी माझे दोन्ही हात हातात घेतले नंतर मला मिठी मारली आम्ही दोघीही रडू लागलो. डोळ्यातून घळघळ पाणी झरू लागले. माझ्या मुलाला प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलेल्या ठिकाणाहून तीर्थ मिळणार, तो बरा होणार! या भावनेतून माझं रडणं होतं, तर उषाताई रडत रडत बोलत होत्या. अहो मी इतके दिवस महाराजांची सेवा त्यांच्या चरणी रूजू करते आहे. आज तुमच्या माध्यमातून प्रत्यक्ष महाराजांकडून मला कळतंय की माझी सेवा गजानन महाराज त्यांच्या चरणी अर्पण करून घेताहेत. या पेक्षा आनंद तो कोणता? काही वेळात आमच्या भावनांचा आवेग ओसरला आणि उषाताई सांगू लागल्या.
' काही दिवसांपूर्वी महाराजांनी सजल केलेल्या विहिरीतून मी तीर्थ आणलं होतं. मधल्या काळात अनेक भाविकांना मी ते दिलं आता ते शिल्लक आहे का ते बघते .' त्यांच्या त्या वाक्याने मी काही क्षण साशंक झाले पण लगेच सावरले. महाराजांनी अंतर्ज्ञानाने सांगितलेली गोष्ट खोटी कशी असणार? माझ्यासाठी आवश्यक तेव्हढे तीर्थ मला मिळाले. भगवंताधिष्ठित सर्व प्रयत्नांना यश येऊन संदेशची प्रकृती वेगाने सुधारली. तो पूर्ण बरा झाला.
या सर्वातून माझी उषाताईंशी छान ओळख झाली. मी त्यांचे कार्यक्रम आवर्जून ऐकलेत. दोन वर्षांपूर्वी मला कळलं की त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्या गजानन महाराजांच्या चरणी लीन झाल्यात.
ते ऐकून सहजपणे मी उद्गारले ' महाराज उषाताईंची सेवा तुम्ही तुमच्या चरणी रुजू करवून घेतली तशी आम्हा सर्व भक्तांची भक्ती तुमच्या चरणी रुजू करवून घ्या. त्या साठी नित्य नियमाने आमच्या मुखी नाम येऊ द्या. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- सौ शोभा कुलकर्णी
गोरेगाव पूर्व, मुंबई
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
🌸आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ ते १०४ ) फक्त रुपये पन्नास.
Comentarios