top of page

अनुभव - 120

Updated: Jun 1, 2020

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव १२०🌺)

अन्न दे बा खावयाला! पाणी दे बा प्यावयाला!

जय गजानन! खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. गप्पांच्या ओघात कुणीतरी प्रश्न उपस्थित केला. ' तुम्ही गजानन विजय पोथी नित्य नियमाने वाचता तर गजानन महाराजांची शिकवण, तत्त्वज्ञान, या विषयी तुम्ही विचार केला असेलच. मला सांगा, ज्यातून राष्ट्रहित साधल्या जाईल, ज्यात समाजहित आहे आणि ज्या गोष्टीचं पालन केलं तर व्यक्तिगत जीवनात समाधानही प्राप्त होईल अशी महाराजांची शिकवण सांगा, '

त्या दिवशी त्या प्रश्नानं माझ्या मनात घर केलं. पुढे गजानन विजय वाचतांना, या अनुषंगाने वाचन सुरू झालं आणि महाराजांनी या संदर्भात काही प्रेरणा द्यावी अशी स्वाभाविक प्रार्थना सुरू झाली. पोथीतील काही ओव्या खुणावू लागल्यात.

एक दिवस घरी गजानन विजय पारायणाचा कार्यक्रम झाला. संध्याकाळी महाप्रसाद होता. घराच्या पुढील अंगणात प्रसाद आणि मागील अंगणात स्वयंपाक होत होता. आमंत्रित लोक येत होते. इतक्यात एक व्यक्ती, जिला यापूर्वी पाहिलं नव्हतं, दत्त म्हणून समोर उभी ठाकली. शेगांवला सेवेकरी घालतात तसा पांढरा ड्रेस. उंच! चेहरा प्रसन्न. अशी ती व्यक्ती मला म्हणाली, ' प्रसाद घ्यावा म्हणतो!' मी स्वतःच्या हातानं एक डिश भरून त्यांना देऊ केली. अन्न हे पूर्ण ब्रह्म! असं काहीसं पुटपुटत त्यांनी डिश हाती घेतली , घास घेतला. मी त्यांना प्रसाद देऊन काही कामाची आठवण झाली म्हणून मागील अंगणात गेलो. अक्षरशः पाच मिनिटात मी परतलो, तो स्वच्छ डिश खाली ठेऊन ते निघून गेले होते. इतक्या कमी वेळात तेव्हढा प्रसाद ग्रहण करणं अशक्य वाटणारी गोष्ट होती.

मी त्या स्वच्छ डिशकडे पाहिलं. ती जणू मला म्हणत होती.. भुकेलेल्याला अन्न दे! पण अति आग्रह करू नकोस. भुकेल्या माणसानं अन्नाचा आदर करावा. अगदीच निरुपाय असेल तर समजू शकतो. अन्यथा, पानात टाकणं याला आपण वृत्तीचा माज म्हणू शकतो. अन्नाचा आदर, शेतकर्याचा आदर! लोकांना खायला मिळत नाही आणि तुम्ही पानात टाकता. याला भक्ती म्हणावी का? मी मनोमन महाराजांना हात जोडले. त्या दिवशी ती शिकवण माझ्या मनात कोरल्या गेली.

माझं लक्ष आता पुढील संदेशाकडे लागलं. त्या दिवशी माझ्यासमोर योगायोगाने पाचवा अध्याय होता. गजानन महाराजांना तहान लागली आहे. पाण्याचा शोध घेऊन त्यांना पाणी मिळाले नाही ते भास्कराला पाणी मागतात. तहान बहुत लागली मला, पाणी दे बा प्यावयाला. भास्कर महाराजांना पाणी देण्याचं नाकारतो. या भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे असं सांगतो तेव्हा महाराज अनेक वर्षांपासून कोरडी असलेल्या विहिरीला पाणी आणतात. समाज हितासाठी मी हे करतो आहे. पाणी पाजण्याचं पुण्य फार मोठं आहे हे ते समजावून सांगतात.

या पूर्वी अनेकदा मी पोथी वाचली होती. पण त्या दिवशी एक वेगळीच दृष्टी मला मिळाली .त्या कथेतून आजच्याही सामाजिक स्थितीत या संदेशाचं किती महत्व आहे, हा एक वेगळा आशय जाणवला. मी त्यावर गांभीर्याने विचार करू लागलो. मी विचार करतच होतो आणि महाराजांनी एका घटनेतून ही बाब अधिकच गंभीरपणे माझ्या समोर उलगडून दाखविली.

ते उन्हाळ्याचे दिवस होते. विदर्भ मराठवाड्यात उन्हाळा फार प्रखर असतो. उन्हाळ्यात पाण्याची समस्या काही भागात अतिशय गंभीर रूप धारण करते. काही गावांमध्ये तर पाणीपुरवठा सात दिवसांच्या अंतराने करण्यात येतो. पाणी आलं की लहान लहान भांड्यातूनही भरून ठेवावं लागतं. खूप खोल गेलेल्या विहीरी! कुठे काही किलोमीटर अंतरावरून पाण्याची घागर भरून आणावी लागते. टॅन्करनी पाणी पुरवठा होतो. दिवसेंदिवस ही समस्या अधिकच बिकट होते आहे.

काही कामानिमित्त आम्ही दहा बारा लोक हे सर्व पाहत गाडीने त्या रुक्ष भागात फिरत होतो. मध्यान्हीचा सूर्य आग ओकत होता. आमच्या जवळील पिण्याचं पाणी संपलं होतं. सगळ्यांनाच खूप तहान लागली होती. एक दोन ठिकाणी चौकशी केली पण पाणी मिळू शकलं नाही. मूर्तिजापूरच्या जवळपासचा तो भाग असावा, तहान असह्य होऊन आम्ही त्या लहान वस्तीत एका घरासमोर गाडी उभी केली. दारावर टकटक केली, एका पोक्त स्त्रीने दार उघडलं. आम्ही अकरा लोक तहानलेला चेहरा घेऊन तिच्यासमोर उभे होतो. त्या बाई आतून पाण्याची एक बाटली घेऊन आल्या. म्हणाल्या, हे बघा, माझ्याकडे एकूण तीन बाटल्या पाणी आता शिल्लक आहे. घरात नातवंड आहेत, मोठी माणसंही आहेत. आता पाणी एकदम उद्या येणार. आम्हाला ते पाणी पुरवावं लागणार. अतिथी देवो भव! मी तुम्हाला नाही कसं म्हणणार? एकेक घोट पिऊन घसा ओला करून घ्या. कृपा करून माझी परिस्थिती समजावून घ्या!

आम्ही तिथून निघालो, परिस्थिती पाहून आणि ऐकून सर्वांचच मन सुन्न झालं होतं. आजूबाजूला पाहिलेली परिस्थिती आणि तो प्रसंग आम्हाला शिकवून गेला ,

' तहानलेल्याला पाणी दे. पण पाण्याची बचतही कर. पाणी वाया घालवू नको. ती राष्ट्रीय संपत्ती आहे. आज वास्तवाकडे दुर्लक्ष केलं तर येणारा काळ बिकट आहे. '

त्या प्रसंगानंतर मी अंतर्मुख झालो. शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी गजानन महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून विषद केलेला अन्न आणि पाणी या गोष्टीं विषयीचा संदेश किती महत्वाचा आहे?

भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी . पण त्याच वेळी अन्नाची नासाडी नको, पाण्याचा अपव्यय नको या दोन गोष्टींवर मी गांभीर्याने विचार केला. विचाराला कृतीची जोड नसेल तर विचालाला अर्थ उरणार नाही. मी

' पाणी ' या क्षेत्रात काही करण्याचा निर्धार करून महाराजांचा आशिर्वाद मागितला.

आज आपल्या देशात अनेक ठिकाणी जमिनीतील जलस्तर अत्यंत खाली गेला आहे. बंगलोर, दिल्ली सारख्या काही भागात ही परिस्थिती तर अतिशय गंभीर झाली आहे. गजानन महाराजांच्या प्रेरणेने मी ' रेन वाॅटर हार्वेस्टींग ' ( पावसाचं पाणी जमिनीत जिरवा) या क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. आमच्या बालाजी नगर येथील नागरिक मंडळ मला या कामात सक्रिय मदत करीत आहे. त्या साठी फ्लॅट स्कीम, ऑफिसेस, घर, रस्ता या ठिकाणी पावसाचं पाणी जमिनीत सोडून पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.आमच्या एका माॅडेलला मार्च २०१९ ला एका संबंधित प्रदर्शनात मेयर अवाॅर्डपण मिळालं.

महाराजांनी भास्करासाठी विहिरीला पाणी आणलं तेव्हा, ' समाजहितासाठी मी हे करतो आहे ' असं सांगितलं. याचाच अर्थ समाजहितासाठी त्यांच्या भक्तांनी काही करायला हवं ही त्यांची शिकवण आहे. त्यांनी जल निर्माण केलं ते तर आपण करू शकत नाही पण निदान मिळालेलं जल वाचविण्याचा प्रयत्न तर करू शकतो.

मी प्रमोद कृष्णराव कुलकर्णी ( 9370386447) नागपूर. मी माझ्या पातळीवर ठरविलं आहे की रेन वाॅटर हार्वेस्टींग करण्यात समाज कार्य करायचं. कुणी त्यासाठी सल्ला मागितला तर यथाशक्ती सहाय्य करायचं .

आपण महाराजांचे हजारो लाखो भक्त जर या क्षेत्रात अग्रेसर झालो तर ही संतांची भूमी पुन्हा सुजलाम सुफलाम होऊ शकते. आपण महाराजांना नेहमीच काही तरी मागत असतो, ते भरभरून देतही असतात. एखादी मिळालेली गोष्ट आपण अनुभव म्हणून सांगतो. माझ्यापुरतं बोलायचं तर, त्यांना प्रार्थना केल्यानंतर त्यांची शिकवण म्हणून, तत्त्वज्ञान म्हणून मला देऊ केलेली

' मानसिक प्रेरणा ' हाच माझा अनुभव आहे.

तेव्हा भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी योग्य पध्दतीने देणं यासाठी आपण सर्व गजानन महाराज भक्त कटीबध्द होऊ या कारण त्यात समाजहित आहे, राष्ट्राचं हित आहे. व्यक्तिगत समाधानही आहे.

व्यक्तिगत स्वार्थासाठी काही मागण्यापेक्षा समाजहितासाठी हातून काही घडत जातं तेव्हा मनात आनंदाच्या लहरी उठतात आणि आपलेच शब्द आपल्याला ऐकू येतात. श्री गजानन !जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺अनुभव-- प्रमोद कृष्णराव कुलकर्णी नागपूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069



आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे

🌸अवश्य वाचा!! श्रीगजानन अनुभव!!

भाग एक (यात एकूण बावन्न अनुभव आहेत)

फक्त रुपये पन्नास

भाग दोन (यात एकूण बावन्न अनुभव आहेत ५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास



Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page