अनुभव - 121
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 3 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव१२१🌺)
माघ शुध्द सप्तमी दिनी शेगांवात प्रकटोनी
ते ऐकून सहज जयघोष झाला जय गजानन!
सोलापूरला कामाच्या प्रगती विषयी मधून मधून चौकशी होत होती. सव्वीस, सत्तावीस जानेवारीला मी मेसेज केला की मला जर तुम्ही निश्चित तारीख कळविली
तर मला शेगांवच्या कार्यक्रमाविषयी बोलता येईल. कारण संजय गोखले सोलापूरहून मुखवटा शेगांवला घेऊन येतील आणि तिथे अभिषेक होऊन ' महाराज ' नागपूरला येतील असं ठरलं होतं. रात्री उशिरा साडेअकराच्या सुमारास मुखवटा घडविणार्यांचा सोलापूरहून मेसेज आला ' तीस तारखेला मी मूर्ती नक्की तुम्हाला देतो ' मी मेसेज वाचून समोरच असलेल्या कॅलेंडरवर नजर टाकली. तो मुहूर्त होता, ' वसंत पंचमी गुरुवार ' मी लगेच तसा निरोप संजय गोखलेंना दिला.
दत्तजयंती गुरुवारला ऑर्डर. वसंत पंचमी गुरुवारला काम तयार. महाराजांनी उत्तम मुहूर्त निवडला होता. एक फेब्रुवारीला सकाळी गोखले सोलापूरहून शेगांवसाठी निघणार व संध्याकाळपर्यंत शेगांवला पोहोचणार आम्ही नागपूरहून एक तारखेला शेगांवला पोहोचणार. महाराजांनी शेगांवला येण्यासाठी मुहूर्त निवडला ' माघ शुध्द सप्तमी ' महाराज माघ वद्य सप्तमीला प्रथम अवतरले आताही त्यांनी माघ महिनाच निवडावा ,सप्तमीच तिथी असावी ही गोष्ट निश्चितच विशेष वाटली.
माघ शुध्द सप्तमी अर्थात रथ सप्तमी. या तिथीला नर्मदा जयंती म्हणून मान्यता आहे. आपण गजानन महाराज आणि नर्मदा या विषयी गजानन विजयच्या चौदाव्या अध्यायात वाचतो. आपणास एकशे सतरा नंबरच्या अनुभवात वाचल्याचं आठवत असेल, होशंगाबाद येथील अंजनी हर्णे यांना लगातार तीन वर्षे चातुर्मासात नामजप करणे काही काही कारणाने शक्य झाले नाही तेव्हा २०१९ मधे म्हणजे चौथ्या वर्षी त्यांनी नर्मदा मैया ला प्रार्थना केली की ' माझा जप यंदा मी नर्मदा मैया मी तुला अर्पण करीन, माझ्या कडून जप करवून घे.' नर्मदा मैयाने त्यांच्या कडून दोन लाख जप निर्विघ्नपणे करवून घेतला. जप समर्पणासाठी त्यांनी महाराजांच्या आशीर्वादाने रथ सप्तमी तिथी निवडली. त्यांचा एक फेब्रुवारी रथ सप्तमीला नेमावर येथून शेगांवला फोन आला. त्यांनी सांगितलं ,' सर मी नेमावर येथून बोलते आहे. समोर नर्मदा मैया आहे मी आताच मी केलेला जप आपल्या सर्व उपासकांच्या वतीने मैयाला अर्पण केला, प्रार्थना केली की आम्हा सर्व उपासकांवर कृपा दृष्टी ठेवून या विश्वाचं कल्याण कर!' ते ऐकून शेगांवला भक्त निवासाच्या प्रांगणात सहजपणे जयघोष झाला नर्मदे हर! नर्मदे हर! गजानन महाराज की जय! आणि समोरून सोलापूरहून येणारी प्रांगणात शिरती झाली.
महाराजांसाठी फेटा करून घ्यायचा होता. पुण्याहून सुहास कस्तुरे यांनी शेगांवला महाराजांसाठी कुणाकडून फेटा करविल्या जातो या विषयी माहिती दिली. त्या प्रमाणे गर्द गुलाबी रंगाचा करण्यासाठी शेगांवला सांगून ठेवलं होतं तो फेटा ताब्यात घेतला. त्या संध्याकाळी मंदिरात दर्शनाला गेलो तो राममंदिरात असलेल्या दोन्ही मुखवट्यांना तोच अगदी तसाच गर्द गुलाबी रंगाचा फेटा त्या दिवशी घातलेला पाहून मनाला त्या योगायोगाचा आनंद नसता झाला तरच नवल!
दि २ फेब्रुवारी २०२०, रविवार! पहाटे पाच वाजता आम्ही मंदिरात उपस्थित झालो. विठ्ठल रखुमाईचं दर्शन झालं, तिथे थोडावेळ मुखवटा विसावला. गादीचं दर्शन झालं. ' श्रीजिका विश्रांती स्थान ' असलेल्या त्या जागी मुखवट्याने प्रतिकात्मक विश्रांती घेतली. अभिषेकाचं कार्य अत्यंत प्रासादिक वातावरणात पार पडलं. त्या दिवशी जवळपास तीन तास 'मुखवटा ' विठ्ठल रखुमाई अर्थात श्रीजिका समाधी ग्रहण स्थल ' गादी, पारायण सभागृह, अभिषेक स्थान या परिसरात वास्तव्य करून होता. आनंदाचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा सकाळी सातच्या आरतीला मुखवट्याच्या रुपात महाराज गादीवर आहेत आणि शेकडो भक्त त्यांच्यासमोर आरती करताहेत.
नंतर समाधी मंदिराला प्रदक्षिणा होऊन, चौकशी कक्षात महाराज टेकते झाले. तिथे मंदिरातील पुजार्यानी पूजा करून नारळ उपरणं देऊ केलं. प्रसाद ग्रहण करून नागपूरच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
पूर्व कल्पना असल्यामुळे श्री गजानन महाराज उपासना केन्द्र माधवनगर येथे उपस्थित गजानन महाराज भक्तांनी गजाननमय वातावरणात महाराजांचं स्वागत केलं. ब्रम्हांड नायकाला या रुपात पाहून सर्व भक्तांची मनं अगदी भारावून गेलीत .
आता सर्वांचं लक्ष २०२० च्या चातुर्मासात , गजानन महाराज भक्तांकडून किती जप करवून घेणार? काय अनुभव देणार? याकडे लागलं आहे. महाराजांनी काही भव्य दिव्य करवून घ्यावं या प्रार्थनेसह मनातल्या मनात स्मरण सुरू आहे. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
अनुभव शब्दांकन-- जयंत वेलणकर, नागपूर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!! श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत.
फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत.
( ५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास
Commenti