अनुभव - 122
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 3 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १२२🌺)
असल्या सबळ निष्ठा आणि दृढतर विश्वास, महाराज प्रेरणा देतील खास!
जय गजानन! श्री गजानन विजय ग्रंथात शेवटी ' गजानन विजय ' वाचनाचं फलित सांगताना, ह.भ.प.संतकवि दासगणू महाराजांचे शब्द आहेत. " श्री गजानन चरित्र तारक असोनी परम पवित्र, अनुभव येण्या मात्र सबळ निष्ठा पाहिजे. " पुढे अजून ते म्हणतात " हा ग्रंथ केवळ चिंतामणी, चिंतिले फळ देईल जाणी, दृढतर विश्वास असल्या मनी. हे मात्र विसरू नका!"
यातील ' सबळ निष्ठा ' आणि ' दृढतर विश्वास ' या दोन गोष्टी मी माझ्या वडिलांच्या बाबतीत जवळून पाहिल्यात. वास्तविक आमचे वडील अतिशय कडक शिस्तीचे भोक्ते .
' लंडन रिटर्न ' देव देव करणं वगैरे त्यांच्या पठडीत बसणारं नव्हतं, पण ' गजानन विजय ' ग्रंथानं त्यांना वेड लावलं ' गजानन महाराजांचं!'
तसं पाहता माझे आई वडील दोघं मुंबईकडील! तो काळ १९७० चा. तेव्हा कुणाला फारसे गजानन महाराज माहिती नव्हते, ना शेगांव परिचयाचं होतं. त्या काळी माझी मावशी, प्रभा म्हसकर, जळगाव, अमरावती, अकोला, या भागात वास्तव्यास होती. तिचे मिस्टर पोलीसात डी. सी. पी. होते. ते गुरूदेव रानडे यांचे अनुग्रहीत होते. आमच्या त्या मावशीच्या माध्यमातून आमच्या घरात गजानन विजयचा आणि अर्थातच गजानन महाराजांचा प्रवेश झाला. मावशीच्या आग्रहाखातर वडिलांनी एकदा पोथी वाचली आणि ते सबळ निष्ठेने आणि दृढतर विश्वासाने पोथी वाचू लागले.
आमच्या वडिलांचा दिनक्रम अत्यंत व्यस्त असायचा. कंपन्यांसाठी अॅल्यूमिनीयम कंटेनर ' अॅनोडायझिंग ' करण्याची त्यांची फॅक्टरी होती. त्यामुळे अजिबात वेळ नसायचा. पण ' मला गजानन महाराजांचं करायचं आहे नं?' मग मी ते करीनच! हा त्यांचा निर्धार. ते पहाटे चार वाजता उठून निष्ठेने जशी जमेल तशी पोथी वाचायचे. निदान एक अध्याय तरी वाचायलाच हवा, असा त्यांचा आग्रह. वेळोवेळी त्यांच्या निष्ठेचं फळ त्यांना मिळत गेलं, अनुभव येत गेले, आणि श्रध्दा दृढ होत गेली. एकदा गजानन विजय वाचीत असताना पहाटे चारच्या सुमारास डोअर बेल वाजली. इतक्या पहाटे कोण आलं असावं असं वाटून त्यांनी महाराजांचं स्मरण करून ग्रंथ पाटावर ठेवला आणि दार उघडलं. त्यांना दिसलं, दारात एक दिगंबरावस्थेत विदेही पुरूष उभा आहे. काही सेकंद ते पहात राहिले. हळु हळु धूसर होत ती व्यक्ती दिसेनाशी झाली. आपल्याला झालेला हा भास? की हे सत्य? या विचारात न पडता वडिलांनी मनापासून नमस्कार केला, दार लावून घेतलं आणि अधिकच निष्ठेने पुढील अध्याय वाचण्यास प्रारंभ केला.
त्यांचा गजानन विजय वाचनावर एवढा विश्वास होता की मला आठवतं, एकदा, मला वाटतं १९७९-८० च्या सुमारास घडलेली ही गोष्ट असावी. तेव्हा मी माझ्या काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. रात्री मुंबईहून परतलो. तेव्हा माझी मुंबई- पुणे हायवेवर नाशिक फाट्याजवळ फॅक्टरी होती. तिथे वडील आणि माझा लहान भाऊ ॠषीकेश असे दोघं आले होते. मी फॅक्टरीत पोहोचलो आणि तिथून आम्ही तिघं ऑटोरिक्षा करून आमच्या प्रभात रोड वरील घराकडे परतलो. तेव्हा रात्रीचे साडे दहा, अकरा वाजले होते. माझा जवळ माझी एक ऑफिस बॅग होती ज्यात अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र व इतर सामान होतं. ती बॅग मी ॠषीकेश जवळ दिली. रात्री अकरा वाजता आम्ही घरी परतलो. काही वेळ झाला अन् लक्षात आलं की बॅग दिसत नाही. मी ॠषीकेशला विचारलं, त्याच्याही जवळ ती नव्हती. याचाच अर्थ बॅग रिक्षा सोबत गेली .
बॅगसोबत अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे होती त्यामुळे माझ्या मनावर दडपण आलं, चिडचिड होऊन लहान भावासोबत थोडा वाद झाला. त्याच्याही मनात अपराधी भावना निर्माण होऊन तो नाराज झाला. ते सर्व पाहून वडील म्हणाले. हे बघा जे झालं ते झालं. आपण रिक्षावाल्याला ओळखत नाही. रिक्षा नंबर आपल्याला माहिती नाही. पंधरा वीस किलोमीटर अंतरावर असणारा कुणीतरी तो! आता रात्र खूप झाली आहे. उद्या पोलीसमधे तक्रार, रिक्षा स्टॅन्डवर चौकशी वगैरे सोपस्कार करू. पण त्याआधी आपण एक तर करू शकतो आहे. ॠषीकेश तू उद्या पहाटे उठून गजानन महाराजांना प्रार्थना कर आणि प्रार्थनापूर्वक गजानन विजयचं पारायण कर. बाकी पुढे पाहू.
आम्ही दोघं भाऊ काहीशा चिंतेनेच ,पण वडील मात्र पूर्णपणे निर्धास्त होऊन, झोपी गेलो. ॠषीकेश ठरल्याप्रमाणे पहाटे उठला आणि प्रार्थनापूर्वक पारायणाला बसला. सकाळी लवकरच त्याचं पारायण पूर्ण झालं. आता अन्य प्रयत्नांसाठी बाहेर पडावं, या विचारानं मी सकाळी नऊ वाजता स्कूटरवर बाहेर निघालो. थोडं अंतर समोर जात नाही तो समोरून संथपणे एक रिक्षा येताना दिसली. रिक्षाचालक कुठला पत्ता शोधतो आहे असं लक्षात आलं.मी त्याच्याच पुढ्यात थांबलो. तो म्हणाला, साहेब काल रात्री इथेच मी तीन व्यक्तींना सोडलं, त्यांची बॅग रिक्षात राहिली! मी ओळख देऊन बॅग ताब्यात घेतली. त्याला काही बक्षीस देऊ केलं. त्याने विनम्रपणे नकार दिला.
रिक्षावाला सांगू लागला, ' साहेब आपल्याला कुणाचं काही घेऊन काय करायचं आहे? पण मला वाटत होतं पुढे जेव्हा केव्हा या भागात येणं होईल तेव्हा बघू किंवा पोलीसात नेऊन देऊ. पण साहेब आज सकाळीच मनातून जबर प्रेरणा झाली की, आताच जा आणि ही बॅग मालकाच्या स्वाधीन कर!'
रिक्षावाला निघून गेला आणि मी त्याच्या मनात निर्माण झालेल्या जबर प्रेरणेच्या कारणाला अर्थात आमच्या वडिलांच्या मनातील सबळ निष्ठेला आणि दृढतर विश्वासाला मनोमन नमस्कार करून महाराजांचं स्मरण केलं.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- विवेक गजानन आपटे, शनिवारपेठ पुणे
शब्दांकन -- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे .
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत
फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत.
( ५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास.
Comments