अनुभव - 123
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 12, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव१२३🌺)
श्रीगजानन संत थोर
जय गजानन! गजानन महाराजांविषयीचं प्रेम तुमच्या मनात कुणामुळे निर्माण झालं? असा प्रश्न जर मला कुणी विचारला, तर मी म्हणेन ' माझ्या वडिलांमुळे!' आमचे वडील आम्हाला लहानपणी गजानन विजय मधील कथा रंगवून रंगवून सांगायचे त्यामुळे सोबत मला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचाही लळा लागला आणि आता असं दिसतं आहे की माझ्याकडून माझ्या मुलांकडेही ही भक्ती पुढे सुरू राहणार, कारण महाराज अनुभवच तसे देताहेत.
१९८३ साली माझं लग्न झालं, माहेरची मी ज्योती वावू सासरला ज्योती पंत झाले. १९८४ साली आमची मोठी कन्या ' प्राची ' चा जन्म झाला. १९८६ साली जुळी कन्या रत्न आम्हाला प्राप्त झालीत तर आमच्या आदित्यचा जन्म १९९१ ला झाला.
आज मी जे एक दोन अनुभव इथे सांगू इच्छिते त्या अनुभवांशी योगायोगाने माझ्या मुलामुलींचा संबंध आहे.
आत्ता काही वर्षांपूर्वी आमचा आदित्य जेव्हा एम. एस. करण्यासाठी अमेरिकेत जायला निघाला तेव्हा काळजीपोटी माझ्या मातृ ह्रदयात विचारांची कालवाकालव होऊन, इतक्या दूर माझ्या लेकाचं कसं होईल? या विचाराने मी गजानन महाराजांना प्रार्थना केली आणि त्याची पाठराखण म्हणून एक फोटो त्याला देऊ केला व महाराज तुझी काळजी घेतील मात्र मनापासून त्यांना नमस्कार करीत रहा असा सल्ला दिला. आदित्यही अगदी मनापासून महाराजांचं करीत असतो. त्यानं श्रध्देनं तो फोटो जवळ ठेवून घेतला. आदित्य तिथे पोहोचला, महाराजांच्या कृपेने त्याचं सुरळीत सुरु झालं. काही महिने गेले असतील, एक दिवस आदित्य फोनवर सांगू लागला "आई महाराजांचा फोटो दिसत नाही आहे " मी अगदी कानाकोपरा शोधला पण फोटो सापडला नाही. ते ऐकून इकडे मी अस्वस्थ झाले. महाराजांना म्हटलं महाराज तुम्ही पाठीशी रहा. तिकडे आदित्यची निर्गुण भक्ती सुरू होती. काही दिवसांनी आदित्यचा एक मित्र देशपांडे अमेरिकेतून भारतात येणार होता. आदित्यने त्याच्या बरोबर इकडे काही सामान पाठविलं. आम्ही ती पिशवी घ्यायला देशपांडेकडे पोहोचलो त्यांच्या घराचं नाव ' गजानन माऊली ' . ते पाहून महाराजांना म्हटलं ' महाराज तुमचा आशिर्वाद आहे असं मला वाटतं ' आम्ही पिशवी घेऊन घरी परतलो, सामान बाहेर काढलं, लॅपटॉपचं कव्हर वर केलं तर आत गजानन महाराजांचा तो फोटो, जो अमेरिकेत इतके दिवस सापडत नव्हता, तो मला दिसला. मी फोटो छातीशी धरला, महाराजांना नमस्कार केला.
आता आदित्य अमेरिकेत स्थिरावला होता. एक दिवस आदित्यचा फोन आला. तो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील एक मोठी काॅन्फरन्स होणार होती, जगभरातील वीस पंचवीस ठिकाणाहून अभ्यासक येऊन त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट मांडणार होते. आदित्य म्हणाला आई तुमचे आशिर्वाद हवेत मी त्या ठिकाणी आमच्या ऑफिस तर्फे जाणार. माझा प्रोजेक्ट सादर करणार आहे. मी म्हटलं बाळा आमचे आशिर्वाद तर आहेतच. गजानन महाराजांचे आशिर्वाद माग. फोटो रुपात महाराज इकडे आले आहेत ते कसे आले हे एक आपल्या दृष्टीने गूढ आहे .असू दे पण महाराजांचा सर्वत्र संचार आहे. ते ब्रम्हांड नायक आहेत. त्यांचा आशिर्वाद घे!
त्या रात्री मी महाराजांचा फोटो समोर धरून महाराजांना मनोभावे प्रार्थना केली. महाराज आदित्यच्या पाठीशी उभे रहा अशी विनवणी करता करता मला झोप लागली. त्या रात्री स्वप्नात प्रत्यक्ष महाराज समोर उभे ठाकले आणि त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला. पहाटेच्या त्या स्वप्नामुळे मला अत्यानंद झाला. मी लगेच आदित्यला फोन केला. त्याला म्हटलं आदित्य प्रत्यक्ष महाराज आलेत. काही विलक्षण घडणार, तुझा परफाॅर्मन्स एक नंबर होणार. ते ऐकून आदित्य बोलला अगं आई हळू बोल. तुझं बोलणं ऐकून लोक हसतील. मी या बाबतीत इतका ज्युनियर आहे की हे संभवतच नाही. मी म्हटलं अरे जिथे महाराज आहेत तिथे काय अशक्य आहे? आमचं बोलणं संपलं.
काॅन्फरन्सचा दिवस उजाडला. काॅन्फरन्स पार पडली. काॅन्फरन्स हाॅल मधूनच आदित्यने मला फोन लावला. आदित्य नंबर एक ठरला होता. माझ्या डोळ्यातून घळघळ अश्रू धारा बाहेर पडू लागल्या. ' गजानन महाराज की जय ' म्हणतच मी ' त्या ' फोटोला पुन्हा नमस्कार केला. अशा वेळी आपल्याला आयुष्यात पूर्वी घडून गेलेल्या घटनांचा, जिथे महाराजांनी अशीच कृपा केली होती, त्या घटनांचा आठव होतो. मलाही मागे घडून गेलेला एक प्रसंग आठवला.
१९८७ च्या एप्रिल महिन्यातील ही घटना. मला निश्चित तारीख आठवत नाही, पण तेव्हा माझी भोपाळची एक वहिनी आणि शाळकरी भाचा नागपूरला नागपूरलाआले होते. माझे मिस्टर कुठल्याशा ट्रेनिंगसाठी बाहेर गावी गेले होते. त्यामुळे घरी आमची प्राची जेमतेम अडीच तीन वर्षांची आणि लहान जुळ्या दिप्ती तृप्ती माझ्या सोबत होत्या. आदित्यचा जन्म तेव्हा व्हायचा होता. सहाजिकच वहिनीने मला भोपाळला चलण्याचा आग्रह केला, तेव्हा मिस्टरांची अनुमती घेऊन प्रथम परतवाडा येथे असलेल्या नणंदेला भेटून पुढे बैतूलमार्गे भोपाळ असा प्रवास आम्ही ठरविला. आम्ही परतवाड्याहून बैतूलसाठी निघालो. तिथून भोपाळची बस घेऊन पुढे जायचं होतं. संध्याकाळी सातच्या सुमारास आम्ही बैतूलला पोहोचलो. स्टॅन्डवर खूप गर्दी होती. तीन मुली आणि सामान सांभाळताना आमची तारांबळ उडाली आणि त्या गोंधळात लहान प्राची कुठेतरी दिसेनाशी झाली. प्रथम वाटलं, असेल कुठेतरी, दिसेल. पण शोधाशोध करूनही ती दिसेना. मग मात्र मी घाबरले. महाराजांचा धावा सुरू झाला. भाचा पूर्ण बसस्टॅन्ड हिंडून आला. तिथे असलेल्या प्रत्येक बसमधे पाहून आला. भोपाळची एक बस सुटली, दुसरी सुटली. १९८७ चा तो काळ ,आता सारखे फोन तेव्हा नव्हते.सहज संपर्क शक्य नव्हता. पंचवीस तीशीच्या घरातील आम्ही दोन स्त्रिया. शाळेत जाणारा लहान मुलगा. सोबत दोन तान्ह्या मुली. परकं गाव. आता आमचा धीर सुटत आला. तिथे एक सरदारजी होता, त्यानं खूप मदत केली. प्रत्येक नाक्यावर जाऊन सर्व सुटण्यार्या बस चेक केल्या. हाॅटेल्स, रिकामी बाकडे, चौकशी कक्ष,चहाच्या टपरीवर, काही काही सुटलं नाही. यात रात्रीचे अकरा वाजत आले. हळू हळू स्टेशनवर शुकशुकाट होऊ लागला. भोपाळची शेवटची बस सुटण्याची वेळ आली. आम्हाला त्या नवख्या गावात रात्री थांबता तरी कुठे येणार? या बसमधे चढायलाच हवं अशी समजूत सर्व घालू लागले. जबरदस्तीने मला दोन पायरी वर चढवलं आणि त्या बसच्या दारात मी जोरात टाहो फोडला. ' गजानन महाराजा, अरे अशी कशी जाऊ दिली माझी लेक? मला तुझाच आधार आहे. अशाने कोण करेल विश्वास तुझ्यावर? धाव गजानन महाराजा धाव. ' मी जोरात ओरडले. तो समोर एक माणूस होता तो मला म्हणाला, गजानन महाराजाचा धावा करते नं मग घाबरते काय? सापडेल तुझी मुलगी. पण एक काम करायचं इथून घरी परतण्या पूर्वी शेगांवची वारी करूनच घराकडे परतायचं. मी म्हटलं अरे बाबा का नाही जाणार मी शेगांवला?
यात काही मिनिटे गेलीत आणि अचानक एक माणूस आला तो हिंदीत बोलला ' ये लो आपकी बेटी .' इतका वेळ शोधाशोध करून न मिळालेली प्राची अचानक माझ्या समोर होती. तो माणूस निघून गेला होता.
रडत रडतच मी प्राचीचे पटापट मुके घेऊ लागले. नुकतेच बोलायला शिकत असणार्या प्राचीनं काही बोलावं हे शक्य नव्हतं. माझी मति गुंग झाली होती. मी अंतर्मुख होऊन विचारात मग्न झाले. बसने वेग पकडला,मनही वेगाने पुढे धावू लागलं. तेव्हाच मी निर्धार केला की भोपाळहून परतताना प्रथम शेगांव गाठायचं तोपर्यंत मनातल्या मनात स्मरण चालू ठेवायचं.. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ ज्योती पुरुषोत्तम पंत
सुंदरबन, नरेंद्रनगर नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास
Comentarios