अनुभव - 124
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 12, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव१२४ 🌺)
जे जे भाविक भक्त कोणी, दर्शन देती कैवल्यदानी
जय गजानन! मी नलिनी बर्वे, वय वर्षे ९१ ऐक्याणऊ! निवृत्त शिक्षिका! मला वाटतं, माझे जे काही गजानन महाराजांविषयीचे अनुभव आता मी इथे सांगणार आहे ते अनुभव वाचणार्या वाचकांमधे क्वचितच कुणी माझ्यापेक्षा वयाने मोठा असणार.
प्रत्येक भक्ताला येणारा अनुभव हा त्या त्या भक्ताच्या दृष्टीतून विचार केला तर मोठाच असतो, नाही कां? जेव्हा मध्यंतरी आमच्या 'कविता ' कडून असे अनुभव प्रसिद्ध होताहेत असं समजलं तेव्हा मला खूप आनंद झाला. ' श्रीगजानन अनुभव ' या पुस्तकातून मला तिने काही अनुभव वाचून दाखविले .खूपच छान अनुभव आले आहेत त्या पुस्तकातून. तेव्हा मला असं वाटलं की आपणही आपला अनुभव कुणाला सांगावा. माझा अनुभव चांगला साठ वर्ष जुना आहे. पण मला वाटतं अनुभव जुना असो वा नवीन, महाराजांविषयी प्रेम मनात असेल तर तो अनुभव तेवढाच गोड वाटतो.
आपली भारत भूमी, त्यातही आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी.आपल्या गुरूस्थानी वेगवेगळ्या संतांपैकी कुणीही असलं तरीही ते गुरूतत्व तुम्हाला एकच आनंद मिळवून देतं.
तुम्हाला सांगते, अहो तेव्हा मी शेगांवला फक्त ' सव्वा रुपया ' पोस्टाद्वारे पाठवित होते. एकदा मनात नकळत विचार आला ' "साईनाथ " की "गजानन महाराज"? अहो तुम्हाला सांगते मनिऑर्डर फाॅर्मवर तब्बल तीन वेळा पत्ता शेगांव संस्थानचा पण वर 'गजानन महाराज ' ऐवजी 'साईनाथ' असंच लिहील्या गेलं आणि गजानन महाराजांनी जणू ग्वाही दिली की आम्ही एकच आहोत.
तेव्हा पासून 'गजानन विजय' वाचीत असताना एक ओळ प्रकर्षाने मला लक्षात राहू लागली ' आम्ही ही भावंडे सारी येते झालो भूमीवरी, कैवल्याच्या वाटेवरी भाविक आणून सोडावया .'
मला आठवतं खूप वर्षांपूर्वीची गोष्ट, मला आता नेमकं साल आठवत नाही पण मी तेव्हा पुण्याला भाच्याच्या लग्नासाठी गेले होते. तेथून परतताना मला नांदगावला काही काम होतं. मनात विचार आला त्याच भागात जायचं तर शिर्डीला दर्शन घेऊन पुढे नागपूरला जाऊ. माझ्या आते बहिणीला माझी कल्पना आवडली, तिने मला व माझ्या दहा वर्षे वयाच्या 'शैलाला ' बस मधे बसवून दिलं. पुण्याहून बस सुटली .लग्नाला गेले असल्याने सोबत दागिने, भारी कपडे, पैसे असं भरपूर सामान होतं. काही वेळाने नारायणगांव आलं. ' शैला ' मला बोलली आई बाथरूमला जायचं आहे. म्हणून आम्ही दोघी खाली उतरलो. आम्ही परत येतच होतो तो एक मुलगा म्हणाला 'ताई ' तुमची बस तर निघून गेली. ते ऐकून मी म्हटलं अरे काही तरीच काय सांगतोस? पण पाहिलं तर बस खरोखरच निघून गेली होती. माझ्या पोटात धस्स् झालं! पायाखालची जमीन सरकली! भारी किंमतीचं सामान गेलं, ही एक चिंता, तर अनोळखी गावात लहान मुलीसह मी एकटी, ही दुसरी चिंता.
मनात ताबडतोब गजानन महाराजांचा धावा सुरू झाला.
महाराज, साईंच्या दर्शनाची इच्छा धरून तिकडे निघाले होते. आता माझं सामान मला प्राप्त होणं आणि माझं दर्शन होणं ही जबाबदारी तुमची. मला पुढील मार्ग सुचवा. इथे मला तुमच्याशिवाय कोण मदत करणार? असा प्रश्न महाराजांसाठी उपस्थित करून मधेच' गजानन महाराज की जय ' आणि मधेच' गण गण गणांत बोते ' असा धावा मनात सुरू केला. नंतर तेथील नियंत्रण कक्षात भेटून माहिती दिली. महाराजांच्या कृपेने तेथील माणूस मदतरूप ठरला. तो म्हणाला मी पुढील बस स्टेशनवर फोन करून तुमचं सामान उतरवून घेण्याची सोय करतो. आमचं बोलणं होतच होतं इतक्यात एक बस स्टेशनात शिरली. ती त्याच डायरेक्शनने जाणार होती. तेथील माणसाने आम्हाला त्या बसमधे जागा मिळवून पुढील प्रवासाची सोय करून दिली. महाराजांचा धावा करीत करीतच आमचा प्रवास पुढे सुरू झाला. काही वेळ झाला असेल, तो पुढे आमची पहिली बस वाटेत उभी दिसली. ती आमचीच वाट पाहत थांबली होती. कंडक्टर म्हणाला बस समोर निघाली आणि काही वेळाने मला हे सामान पाहून तुमची आठवण झाली म्हणून तुमच्यासाठीच बस थांबवली. आमचं पूर्ण सामान अगदी सुरक्षित होतं. पुढे दर्शनही छान झालं.
आता मी तुम्हाला जवळपास साठ वर्षांपूर्वीचा एक अनुभव सांगते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की महाराजांचे अनुभव भक्तांना कसे सातत्याने येत आहेत. दासगणूंनी पोथीत म्हटलं आहेच की 'जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना आजही दर्शन देती कैवल्यदानी. '
मी भुसावळला गेले होते. तिथून शेगांवला दर्शनासाठी गेले आणि कुठल्याशा गाडीने रात्री, माझ्या कडेवर दीड वर्षाच्या मुलीला घेऊन नागपूरला परतले .नागपूर मुख्य स्टेशनच्या आधी 'अजनी' स्टेशन येतं .आमचं घर तिथून जवळ होतं. रात्री साडेतीनलाच अजनी स्टेशनला पण प्लॅटफॉर्मच्या अलीकडे गाडी थांबली .आमच्या डब्यात एक मुस्लिम स्त्री बसली होती. ती म्हणाली 'बहेना ' यहां तो कोई भी नहीं है. आप मुख्य स्टेशनपर उतर जाना. मी म्हटलं नही यहांसे मकान नजदीक है. बाकी महाराज की मर्जी. मी मुलीसह खाली उतरले. हातात एक बॅग होती. आजूबाजूला कुणीही नव्हतं. मी महाराजांचं नाव घेऊन दोन पावलं स्टेशनकडे सरकले तोच अचानक भगवे कपडे परिधान केलेला एक उंच माणूस समोर उभा ठाकला. मला म्हणाला, बॅग मला द्या आणि माझ्या मागे या. त्याने प्लॅटफॉर्मवर बॅग ठेवून वेटींग रुम मधे बेंचवर मुलीला निजलेल्या स्थितीत ठेवलं. मला म्हणाला उजेड होईस्तो इथे थांबा. मी बॅग बाजूला ठेवून त्या माणसाला काही पैसे द्यावे म्हणून पैसे हाती घेतले तर तिथे कुणीही नव्हतं. मी विस्मयचकित होऊन दोन मिनिटं पाहतच राहिले. लगेच मुलीला घेऊन बाहेर डोकावले, समोर टी. सी. उभा होता, त्याच्याकडे विचारणा केली. तो म्हणाला एक भगवे कपडे घातलेला उंच माणूस आता माझ्याकडे आला त्यानं मला सांगितलं ' या बाईंना सकाळी रिक्षा करून द्या ' आणि बघता बघता दिसेनासा झाला. कुठून आला? कुठे गेला? मला काही उमजलं नाही.
ते ऐकून माझं मन मला विचारू लागलं, वेडे तुला तरी कळलं कां कोण होता तो? अगं तुझे महाराज तुझ्या मदतीसाठी धावले असं नाही वाटत तुला? मनातल्या मनात सुरू असलेल्या त्या संवादात वेळ कसा गेला ते कळलेच नाही. त्या दिवशी त्या प्लॅटफॉर्मवरून उगवत्या सूर्याचं मोहक रूप पाहिलं. रात्रीचा तो प्रसंग आठवून पोथीतील लक्ष्मण हरी जांजळाला महाराजांनी बोरीबंदर स्टेशनवर संन्याशाच्या वेषात दिलेल्या दर्शनाची आठवण झाली अन् नकळत हात जोडून शब्द निघालेत श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- नलिनी बर्वे नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!! भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत ( ५३ते१०४)फक्त रुपये पन्नास
Comments