अनुभव - 125
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 8, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
भक्त वत्सल कृपासिंधू
जय गजानन! नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे माझं मूळ
गाव. तरूण वयात गजानन महाराजांविषयी कुठेतरी काही ऐकलं होतं इतकंच! पूर्वी पासून ' सौ ' गजानन विजय पोथी वाचते म्हणून लग्नानंतर मला अशी काही पोथी आहे हे समजले. लघु पाटबंधारे विभागात ज्युनियर क्लार्क म्हणून माझी नोकरी झाली. नोकरीच्या निमित्ताने पुण्यातील सांगवी भागात वास्तव्यास आलो. आमच्या कडील भागात,अंदाजे वीस पंचवीस वर्षांपूर्वी गजानन महाराजांचं सुंदर मंदिर बांधण्यात आलं. मी प्रकटदिनाच्या कार्यक्रमाला मंदिरात जाऊ लागलो आणि तेवढ्या मर्यादित अर्थाने म्हणता येईल की मी गजानन महाराजांचा भक्त झालो.
पुढे मात्र माझी मंदिरात जाण्याची वारंवारिता वाढली तशी वेगवेगळ्या भक्तांसोबत संपर्क वाढून माझ्या असं लक्षात आलं की असे अनेक भक्त आहेत की जे दिवसातील बहुतांश वेळ ' गजानन महाराज ' या विषयावरच बोलत असतात. त्यांच्या बोलण्यातून सतत ' गजानन विजय ग्रंथ ' ' शेगांव वारी ' शेगांवला जाण्याची ओढ, गजानन महाराज कसे भक्त वत्सल आहेत, कृपासिंधू आहेत, भक्तांच्या हाकेला धावणारे आहेत, भाव भक्ती नाण्यावर संतुष्ट राहणारे आहेत. अशा विविध गोष्टी माझ्या कानावर पडून मग माझ्याही मनात महाराजांविषयी एक अनामिक ओढ निर्माण झाली आणि त्या ओढी सोबतच आतल्या आत दोन मनांमधे संभाषणही सुरू झालं. ' हे लोक एवढं सांगतात पण जोपर्यंत आपण स्वतः अनुभव घेत नाही तोपर्यंत या गोष्टीला कसं मान्य करावं?'
अशात एक दिवस आमच्या ऑफिसातून माझ्यावर एक फार मोठी जबाबदारी टाकण्यात आली. महालेखाकार महाराष्ट्र राज्य यांच्या नागपूर येथील कार्यालयातून एक सर्टिफिकेट वजा पत्र आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. 'आमच्या ऑफिसच्या सर्व कामाचे ताळमेळ तक्ते अकाउन्ट ऑफिसर यांच्याकडून तपासले व ते बरोबर आहेत .' असे पत्र सहीशिक्कयासह आणायचे होते. त्या पत्राशिवाय आमची पुढील अनेक कामं ठप्प होणार होती.
हे काम किती महत्वाचे होते ते केवळ जाणकारच समजू शकतो. मी एक साधा ज्युनियर क्लार्क! संबंधित सेक्शनमधे जाऊन एका अधिकारी माणसाला भेटणं, नुसतं भेटणं नाही तर त्या महत्वाच्या विषयावर बोलून त्यांना सर्व समजावून सांगणं. माझ्यावर एका दिव्यातून पार पडण्याची जबाबदारी होती. सरकारी कार्यालयात जाऊन अशा प्रकारची कामं ज्यांना करावी लागतात त्यांना माझ्या त्यावेळच्या मनस्थितीची कल्पना येईल.
माझ्या पोटात काहीसं विचित्र झालं आणि मनात एकदम गजानन महाराजांची आठवण झाली.
मी मनातल्या मनात आयुष्यात पहिल्यांदाच गजानन महाराजांना प्रार्थना केली. म्हटलं महाराज तसं रूढार्थाने पाहता मी तुमचा भक्त आहे असं म्हणता येणार नाही. मी वारंवार दर्शनाला येत नाही. पोथी वाचत नाही. मला तुमच्या विषयी फारसं काही माहिती नाही. आज पर्यंत शेगांवला आलो नाही. पण मंदिरात भक्तांकडून जे काही ऐकलं त्यातून आज मला असं वाटतंय की या प्रसंगात मला तुमच्या कृपेची गरज आहे. मी प्रथमच तुम्हाला प्रार्थना करतो आहे. तुम्ही भक्तवत्सल आहात असं मंदिरात ऐकलं आहे मी मनोमन प्रार्थना करतो की मला आपला भक्त समजा .माझ्या पाठीशी उभे रहा. प्रार्थना करून मी मनाशी ठरवलं की इथून काम होईपर्यंत सतत त्यांचं नामस्मरण करीत रहायचं. त्या प्रमाणे अगदी सतत जरी नाही तरी बराच वेळ सातत्याने नामस्मरण करीत मी नागपूर पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. मी ऑफिसात संबंधित सेक्शनमधे पोहोचलो. गजानन महाराजांचं स्मरण करीतच मी चौकशी सुरू केली पण पहिल्याच टेबलवर मोठीच निराशा झाली. त्या मोठ्या विभागात अनेकांना विचारलं पण प्रत्येकानं एकच सांगितलं, तुमचं काम होण्यासाठी निदान दोन महिने लागतील. तुम्हाला निदान दोन चार वेळा यासाठी चकरा कराव्या लागतील. यात माझा जवळपास एक तास गेला. मी पूर्ण हताश झालो. अर्थात तरीही महाराजांचं नाम मात्र मनात सुरूच होतं.
मी उतरलेला चेहरा घेऊन उदास मनाने, जड अंतःकरणाने त्या विभागातून बाहेर पडणारच होतो, तो शेवटच्या टेबलावरील माणसाने शुक- शुक असा आवाज करीत मला खुणेनेच त्याच्या जवळ बोलावले. मी त्याच्या समोर खुर्चीवर बसलो तो म्हणाला मघापासून तुम्हाला न्याहाळतो आहे. काय काम आहे? मी त्याला सर्व समजावून सांगितलं आणि स्वगत बोललो " पाहू काय होणार ते जशी गजानन महाराजांची इच्छा ! " त्यावर तो माणूस बोलला ' हे बघा तुम्ही जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर तुमचं काम आजच होऊ शकेल. 'याचं कारण आमचे साहेब गजानन महाराजांचे भक्त आहेत. ते मनाने फार चांगले आहेत. बाहेर गावाहून आलेल्या माणसाला त्रास होऊ नये अशा विचारांचे आहेत. आज त्यांना यायला वेळ होणार होता कारण त्यांच्या पत्नीची तब्येत दाखवायला ते हाॅस्पिटल मधे जाऊन नंतर इकडे येणार आहेत. मी आनंदाने त्या माणसाला नमस्कार करून म्हटलं, ' हो हो मी आहे गजानन महाराजांचा भक्त !' पुढे आम्ही काही वेळ स्वाभाविकच गजानन महाराज या विषयावर बोलत होतो. इतक्यात एक गृहस्थ आत शिरले. त्या माणसाने माझी ओळख त्या गजानन महाराज भक्ताशी करून दिली. माझ्या चेहर्यावरील मरगळ पार नाहीशी झाली. संध्याकाळी पाच वाजता गजानन महाराजांच्या कृपेने आवश्यक ते पत्र माझ्या हातात आलं होतं. बारा ते पाच या पूर्ण वेळात सर्व स्टाफ कामाला लागला होता. स्टाफ काम करीत होता आणि मी आर्ततेने महाराजांचं नामस्मरण! मंदिरात लोक जे बोलतात त्यात तथ्य आहे याची जाणीव मला झाली होती.
पिंपळे गुरव पुणे येथे वास्तव्यास असणारा मी एक लहान माणूस. प्रभाकर ढासे. पण महाराजांमुळे त्यादिवशी एका अधिकारी व्यक्तीशी छान बोलू शकलो. माझं काम पूर्ण झाल्यावर, उठता उठता थोडं चाचरतच मी त्या साहेबांना विचारलं, माझ्यासाठी सर्व स्टाफने आज कष्ट घेतलेत. सगळ्यांना चहा पाण्यासाठी मी काही खर्च करू इच्छितो. त्यावर अत्यंत विनम्रपणे हात जोडून ते बोलू लागले. " अहो आपण गजानन महाराजांचे भक्त ना? मग आपण महाराजांच्या भक्तांनी दोन गोष्टी आयुष्यात सांभाळायला हव्यात. एकतर अन्न हे पूर्ण ब्रह्म! अन्नाचा अपमान करायला नको. वाया घालवायला नको, पानात टाकायला नको आणि दुसरे म्हणजे भ्रष्टाचारापासून, गैरव्यवहारापासून दोन हात दूर राहायला हवं. "
आम्ही आमचं कर्तव्य केलं अधिक काही नाही. तेव्हा तुम्ही गजानन महाराजांचं स्मरण करा अन्य काही नको. नमस्कार. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन! 🌺अनुभव-- प्रभाकर ढासे, पिंपळे गुरव. पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव !!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास.
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास
Comentarios