अनुभव - 126
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 8, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
गजानन चरणी प्रेम धरा
जय गजानन! यवतमाळ येथील गणेश नगरात एक गजानन महाराजांचं मंदिर आहे. बाजूला अयोध्यानगर आहे तिथे माझं बालपण गेलं. लहानपणी आईला गजानन विजय वाचतांना पाहिलं त्यामुळे मी पण अगदी लहानपणापासूनच गजानन विजय पारायण करीत आले . जवळच मंदिर असल्यामुळे गजानन महाराजांविषयी भक्ती निर्माण होण्यात मदत झाली.
मी माहेरची रक्षिता काकडे. यवतमाळलाच गजानन महाराज मंदिराजवळच असलेल्या विकास काॅलनीत ' अलोडे ' हे माझं सासर.
लहानपणापासून मंदिरात जाता जाता आणि महाराजांवर स्वतःची जबाबदारी सोपविताना महाराजांनी केव्हा ती जबाबदारी स्वीकारली ते कळलंच नाही.
माझं लग्न इ.स. २०१० मधे झालं. पण मला जीवनाचा जोडीदार ' विकास ' महाराजांच्या कृपेने परिचयातीलच मिळाला. लग्न ठरतं तेव्हा 'तो ' कसा असेल? हा प्रश्न मनाला भेडसावणारा असतो पण विकास महाराजांचा भक्त आहे ही गोष्ट मनाला दिलासा देणारी होती.
लग्नानंतर मला गजानन महाराजांनी अगदी लहान लहान गोष्टींमधून भरपूर अनुभव दिलेत पण या अनुभवांच्या मागे माझ्या सासू सासर्यांची पुण्याई असावी असा मला पूर्ण विश्वास आहे. सासूबाईंचं नित्य नियमाने होणारं गजानन विजयचं पारायण, महाराजांची भक्ती आणि सासरे सातत्याने करीत असलेलं महाराजांचं चिंतन यामुळेच गजानन महाराजांची कृपादृष्टी आम्हाला प्राप्त झाली असावी.
सासरे सतत म्हणत असायचे, " जे घडतं ती महाराजांची इच्छा." ते सतत महाराजांच्या अनुसंधानात असायचे. असं म्हणतात की माणसाचा मृत्यु बरेच काही सांगून जातो. २०१९ मधे माझे सासरे लक्ष्मणराव अलोडे यांनी या जगाचा निरोप घेतला. चालता बोलता सर्वांशी वार्तालाप करताना गजानन महाराजांच्या फोटोकडे बघून सर्वांचा निरोप घेत ते गजानन महाराजांच्या चरणी लीन झाले.
विकासची नोकरी नागपूरला असल्याकारणाने, आम्हाला नागपूरला शिफ्ट व्हावं लागलं. तिथे आमचा एक फ्लॅट होता पण आम्हाला गजानन महाराज मंदिराजवळच फ्लॅट हवा होता म्हणून आमचा फ्लॅट भाड्याने देऊन आम्ही भाड्याचं घर शोधू लागलो.
आम्ही सासर्यांचा आशिर्वाद घेऊन निघालो तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, गजानन महाराजांवर सर्व सोपवून द्या ते काळजी घेतील. त्यांचा निरोप घेऊन निघालो तेव्हाच आम्ही ठरवून टाकलं की आपण आपल्या घरी यथाशक्ती प्रकट दिन करण्यास प्रारंभ करायचा.
आम्ही खूप ठिकाणी घराचा शोध घेतला. विकास तासन् तास घरासाठी फिरला पण मनाजोगतं घर काही मिळालं नाही. शेवटी हताश होऊन त्रिमूर्तीनगरातील मूर्ती समोर हात जोडून प्रार्थना केली.
महाराजांच्या मनात आमचा त्रिमूर्तीनगरातील मंदिराशी संबंध जोडून तिथे काही अनुभव देण्याची योजना असावी. मंदिरातील व्यवस्थापनाशी संबंधित एका गृहस्थांच्या माध्यमातून महाराजांनी आम्हाला घर मिळवून दिले.
तेथील गजानन महाराज मंदिरात महाराजांना रोज नियमाने नैवेद्य अर्पण व्हावा या हेतूने एक योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार महिन्यातील प्रत्येक तारीख दोन भक्तांना वाटून देण्यात आली आहे. त्या ठरलेल्या तारखेला नियोजित भक्तांनी सकाळी घरी केलेल्या स्वयंपाकाचा डबा मंदिरात आणायचा म्हणजे नैवेद्याचं ताट महाराजांसमोर ठेवता येईल. त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्ही यासाठी तयार आहात का? आम्ही म्हटलं अवश्य! तुम्ही द्याल त्या तारखेला आमच्याकडून नैवेद्य येईल. त्यांनी आम्हाला २० तारीख योजून दिली, त्या नुसार दर वीस तारखेला मंदिरात आमच्याकडून प्रसाद असतो.
वीस तारीख मिळण्यामागेही महाराजांचीच योजना असावी कारण २०१३ च्या आक्टोबर महिन्यात वीस तारखेलाच आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालं. यावरून मला एक आठवलं, मला ज्यावेळी दिवस होते तेव्हा महाराजांनी अक्षरशः माझे डोहाळे पुरविले. मला कधी वाटायचं, मला 'शिरा ' खायला मिळावा तर दुसरे दिवशीच मंदिरात माझ्या वाट्याला 'शिरा ' असायचा .रात्री एखादा पदार्थ मनात यावा आणि महाराजांनी माझी इच्छा पूर्ण करावी या काळात मंदिरात दर्शनाला गेले, महाराजांसमोर समजा चार प्रकारची फळे आहेत मी हात जोडले की कधी मनात यायचं ' महाराज आज आंबा खायला हवा, नाही का?' डोळे उघडावे आणि पुजारी म्हणायचा ' ताई हे घ्या हा आंब्याचा प्रसाद तुमच्यासाठी. असं निदान दहा बारा वेळा झालं. नंतर अगदी दिवस भरत आलेत. मनात विचार आला महाराज वीस तारखेला घरून नैवेद्य स्वीकारा.महाराज जणू म्हणाले 'तथास्तु!' वीस तारखेला घरून नैवेद्य मंदिरात पोहोचला. संध्याकाळी मला दवाखान्यात जावं लागून त्याच दिवशी पुत्ररत्न पदरी पडलं.
मी बाळाला घेऊन यवतमाळला रवाना झाले. डोक्यात बारशाचे विचार घोंघावत होते. बारसं यवतमाळलाच करण्याचं आम्ही ठरविलं होतं. बाळ बाजूलाच असायचं अन् मनात महाराजांचे विचार. महाराज बारशाला याल? त्या विचारातच झोप लागायची आणि मला एक स्वप्न दिसायचं. निदान तीन चार वेळा मी पाहिलं, बाळाला घेऊन मी त्रिमूर्तीनगरातील मंदिरात गेले आहे. मी आंघोळ केलेली नाही, पारोशी आहे. माझ्या कडेवर बाळ आहे, मनात यायचं मी कशी येऊ दर्शनाला ? महाराज मला म्हणायचे, आण तुझ्या बाळाला, होईल त्याची आंघोळ तू थांब बाजूला आणि तिथेच स्वप्न थांबायचं. मनात यायचं मी यवतमाळला हे त्रिमूर्तीनगरातील मंदिर! काहीच अर्थबोध होत नव्हता. म्हणता म्हणता बारशाची तारीख जवळ आली. हाॅल बुक झालाच होता. आम्ही सर्व खरेदीसाठी नागपूरला जाणार असं ठरलं, त्याप्रमाणे आम्ही सकाळी निघून नागपूरला पोहोचलो. दिवसभर खरेदी झाली, त्यामुळे आता यवतमाळसाठी निघायला उशीर होणार होता, म्हणून दुसरे दिवशी सकाळी अगदी पहाटे निघण्याचा निर्णय झाला. आम्ही पहाटे साडेपाचलाच निघालो, थंडी असल्याने मी आणि बाळाने आंघोळ करण्याचा प्रश्नच नव्हता. आम्ही निघालो. अचानक विकासच्या मनात आलं, मंदिरात बाळाला दर्शन करवून पुढे जावं. त्यानं गाडी मंदिराकडे वळविली. आम्ही मंदिरात पोहोचलो. मी बाळाला घेऊन डोळे मिटून उभी होते अन् पुजारी म्हणाले, ताई बाळाला द्या महाराजांच्या पायावर ठेवतो. मी बघत होते बाळ महाराजांच्या पायाशी होतं. महाराजांकडे बघितलं आणि मला भास झाला जणू ते म्हणत होते तू पारोशी आहेस पण तुझ्या बाळाला मी कृपाशिर्वादाची आंघोळ घालतो आहे. माझ्या स्वप्नाचा उलगडा झाला होता.
५ जानेवारी २०१४, बारशाचा दिवस सहकार भवन हाॅलच्या वरील मजल्यावर सजावट, पाळणा आणि सगळे सोहळे सुरू होते. जेवणाचं आयोजन खाली होतं. पाळण्याच्या बाजूला मी उभी होते. मी पाहिलं, एक अनोळखी उंच गृहस्थ, धोतर, पांढरा शर्ट, हातात काठी, खांद्यावर पिशवी, माझ्या दिशेने चालत आले. मला विचारलं, बाई इथे काय आहे? मी म्हटलं माझ्या मुलाचं बारसं आहे. म्हणाले छान! ते पाळण्याजवळ गेले, एक नजर सजावटीकडे टाकली मग मुलाकडे पाहिलं, दोन्ही हात उंचावले आणि आशिर्वाद दिला. लगेच म्हणाले ठीक आहे बाई येतो! मी म्हटलं खाली जेवण कराल, तर म्हणाले ' बाई मी भाकर खाऊन आलो आहे. येतो मी. ' कुणालाही न भेटता ते निघून गेले.
या सगळ्या घडून गेलेल्या गोष्टींचा मी एकटी असताना विचार करते तेव्हा वाटतं , लहानपणापासून मंदिरात जाण्याची ओढ निर्माण होणं, सासर्यांनी महाराजांकडे पाहत शांतपणे जगाचा निरोप घेणं, महाराजांच्या माध्यमातून घर मिळणं ,प्रसादाची तारीख आणि मुलाची जन्म तारीख जुळणं. माझे डोहाळे पुरविणं, स्वप्नाचा उलगडा करणं, बारशाला अनपेक्षित व्यक्तीकडून आशिर्वाद मिळणं. हे सर्व योगायोग की महाराजांची कृपादृष्टी ? हा प्रश्न मला निरुत्तर करतो, मग मी अधिकच गंभीर होते आणि अंतर्मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करते तेव्हा फक्त एकच ऐकू येतं. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ रक्षिता विकास अलोडे
यवतमाळ/ नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा,!!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत (1 to 52)
फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत(५३ ते १०४) फक्त रुपये पन्नास.
Comments