अनुभव - 127
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 4 min read
Updated: Jun 8, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
जयजयाजी भक्तपाला
जय गजानन! गुजराथ मधील भरूच येथे वास्तव्यास असणारी मी सौ. देवयानी किशोर धांडे. वयाच्या बारा तेराव्या वर्षीच मला गजानन महाराजांविषयी ओढ निर्माण झाली हे मी माझे भाग्य समजते.
आपल्यावर काही संकट आलं की आपण गजानन महाराजांना प्रार्थना करतो. पण मला लहानपणापासून प्रामाणिकपणे असं वाटत आलं आहे की, माणसावर एखादं संकट आलं आणि ते देवाच्या कृपेने दूर झालं की आपल्याला स्वाभाविकपणेच आनंद होतो. म्हणजे आलेलं संकट दूर होणं ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे, परंतु जर संकट आलच नाही तर ती जास्त आनंदाची गोष्ट आहे, नाही का? मी काय म्हणते आहे हे इ.स.२०२० च्या मार्च, एप्रिल मे चा काळ जे जवळून पाहताहेत त्यांना लगेच पटेल. अर्थात संकट आल्याशिवाय माणसाला चांगल्या स्थितीची किंमत कळत नाही हे खरं आहेच पण ते माणसाच्या स्वभावाचं वैशिष्ट्यच आहे हे मान्य करून मी मात्र गजानन महाराजांना नेहमीच विनंती करीन की ' हे गजानन महाराजा आम्हा भक्तांचं सदैव रक्षण करा! संकटाला दूरच ठेवा!'
संकटाला दूरच ठेवा ! या माझ्या प्रार्थनेवरून मला एक गोष्ट आठवते. मला आठवतं ७ जुलै १९८९ ला माझं लग्न झालं आणि मी पहिल्याच दिवशी गजानन महाराजांना प्रार्थना केली ' महाराज हा संसार तुमच्या चरणी अर्पण. मला सांभाळून घ्या!' महाराजांनी खरोखरच मला वेळोवेळी सांभाळून घेतलं.
आजच्या या काळात, सद्य स्थितीत कदाचित आपल्याला कल्पना येणार नाही पण अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटाला तोंड देताहेत .या परिस्थितीचं दासगणूंनी चौदाव्या अध्यायात सुरेख वर्णन केले आहे.
ऐशा तापे तापला/ जीव द्याया तयार झाला / पैसा संपता प्रपंचाला/ काही नसे किंमत/ जे सुखाचे वाटे स्थान/ तेच दुःखाचे निकेतन/ संपुन गेल्यावरी धन/ सहज होते न्याय हा.
आम्ही तेव्हा ठाण्याला होतो. तेव्हा अशा काही घडामोडी घडून आल्यात की यांचा अंकलेश्वर येथील एका कंपनीत नोकरी धरण्याचा निर्धार झाला. यांना जुन्या कंपनीने जुलै महिन्यात येथून रिलीव्ह करू म्हणून सांगितलं. त्यामुळे हे जरी जुलै महिन्यात तिकडे आलेत तरीही मी मात्र मुलीच्या अॅडमिशनसाठी तीन आठवडे आधीच, त्या अनोळखी शहरात माझा मुक्काम ठेवला. तेव्हा काही काळ त्या एकाकी आयुष्यात वाटलं की, हे काय होतं आहे देवा? पण परमेश्वरी योजना आपल्याला कळत नसते हेच खरं. काहीच दिवस गेलेत हे नवीन कंपनीत रुजू झाले आणि पुढे यांची ठाण्यातील ती कंपनी बंद पडली. भविष्यात येणारं मोठं संकट महाराजांनी टाळलं होतं.
पुढे आम्ही महाराजांच्या कृपेने आमची ऑल्टो कार घेतली. स्वाभाविकपणेच नवीन कारने प्रथम कुठे जावं हा प्रश्न समोर आला. मी म्हटलं गजानन महाराजांच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशिर्वादाने आपली गाडी झाली आहे. तेव्हा आपण आई अण्णांना घेऊन प्रथम शेगांवला जाऊ. ठरल्याप्रमाणे आम्ही प्रथम जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून आमच्या घरून आई- अण्णांना सोबत घेऊन आम्ही शेगांव गाठलं ,बहुधा तो गुरुवारचा दिवस असावा शेगांवला भरपूर गर्दी होती. तेव्हा शेगांवला दर्शनासाठी स्त्री पुरुष वेगळी लाईन असायची. आम्ही सोबत जेवणाचं घेतलं होतं, पण माझ्या मनात होतं प्रत्येकाला निदान थोडा भोजनप्रसाद मिळावा. मिस्टरांचं दर्शन थोडं लवकर झालं मी त्यांना म्हटलं निदान एकाचा प्रसाद घेऊन या. त्या प्रमाणे ते गेलेत पण वेळ संपली आणि प्रसाद काही मिळाला नाही. त्यामुळे माझं मन चांगलच नाराज झालं. मी खिन्न झाले. मग आम्ही तिथेच बाजूच्या एका जागी गोल करून जेवण करायला बसलो. तो २००१ चा काळ
तेव्हा आजच्या पेक्षा सर्वच वेगळं होतं . मी जेवण सर्वाना दिलं. आश्चर्य म्हणजे त्या दिवशी आम्ही डबा भरपूर घेतला नसूनही सर्वाना पुरून दोन पोळ्या शिल्लक उरल्याच. इतक्यात एक उंच गृहस्थ आमच्या बाजूला आलेत. सेवेकरी घालतात तसा पांढरा ड्रेस होता. मी त्यांना विचारले काकाजी तुम्ही पोळी खाणार का?, ते हो म्हणाले म्हणून मी त्यांना वर्तमान पत्रात पोळी भाजी दिली. ते म्हणाले तुम्हाला शेगांवचा प्रसाद हवा आहे नं? असं म्हणून त्यांनी त्यांच्याजवळील पिशवीतून प्रसाद साखर फुटाणे आम्हाला दिला . आम्ही तर प्रसाद खाल्ला , माझी त्यांच्याकडे पाठ होती ,त्यांनी पोळी खाली की नाही हे पाहण्यासाठी मी मागे वळले तर जवळपास कुणीही नव्हतं. दोन चार सेकंदात ते गेले कुठे? मी बुचकळ्यात पडले आणि चौकशी केली तेव्हा तेथील लोक म्हणाले अहो तुम्ही भाग्यवान आहात. महाराज अशा प्रकारे भक्तांना भेट देत असतात.
ते सर्व ऐकून माझ्या मनाची खिन्नता कुठल्याकुठे नाहीशी झाली. मनाला ' त्या ' प्रसादासह नवी उभारी मिळाली आणि मला आठवला पूर्वी महाराजांनी दिलेला एक अनुभव.
आम्ही तेव्हा ठाण्याला होतो. आम्ही आमच्यासाठी एक फ्लॅट बुक केला होता. फ्लॅटचं काम जवळपास पूर्ण झालं होतं. पण आमच्या जवळील पैसाही संपत आला होता. आता पझेशन घ्यायची वेळ आली. दहा हजार रुपये जमा करा व ताबा घ्या! बिल्डरने सांगितले. त्यानं दिलेली मुदत संपत आली. एक दिवस तो बोलला, उद्या शेवटचा दिवस.
जेव्हा संकट उभं राहतं आणि उपलब्ध मार्ग संपतात तेव्हा माणसाची बुध्दी कुंठीत होऊन काही सुचेनासे होते. त्याची चिडचिड व्हायला लागते. माझे मिस्टर वैतागून मला म्हणाले एका दिवसात दहा हजार रुपये तुझे गजानन महाराज आणून देणार आहेत कां? यावर मी काय बोलणार? मनातल्या मनात गजानन महाराजांना फक्त हात जोडले.
तेव्हा आमच्याकडे आई-अण्णा आले होते. त्यांची इच्छा टिटवाळ्याला गणपती दर्शन करण्याची होती. आम्ही दर्शनाला जाण्याचा निर्णय घेतला. म्हटलं, तसंही काही अन्य प्रयत्न तर होणार नाहीत त्यापेक्षा दर्शन तर घेऊन येऊ. पुढे महाराजांची इच्छा! त्यादिवशी गणपतीचं दर्शन झालं. माझ्या मनात गजानन विजय मधील ओव्या आल्यात. " गण गण हे त्यांचे भजन म्हणून गजानन हे अभिधान " आमचा तो दिवस तसाच गेला. पैसे देण्याची मुदत संपत होती. रात्री आमची निजण्याची तयारी सुरू झाली. चोवीस तासात गजानन महाराज दहा हजार रुपये उभे करणार का? हा प्रश्न तसाच राहिला. आता पैसे मिळण्याची शक्यताच संपली होती. मी महाराजांना मनोमन प्रार्थना करीत होते आणि दारावरची बेल वाजली. इतक्या उशिरा कोण आलं असावं असं वाटून आम्ही दार उघडलं. दारात एक जोडपं उभं होतं. ते म्हणाले आम्हाला फारच अर्जंट भाड्याचं घर हवं आहे. आम्ही तुमचा फ्लॅट पाहून आलोत. तिथून तुमचा पत्ता दिला म्हणून इथे पोहोचलो. कृपा करून नाही म्हणू नका. आम्ही अॅडव्हान्स म्हणून पैसे आणले आहेत. मी सहज विचारले किती आणले आहेत? त्या बाई नोटा माझ्यापुढे करीत म्हणाल्या, हे दहा हजार रुपये आहेत.
आम्ही तिथे उपस्थित सर्वच लोक त्या पैशाकडे आश्चर्याने पाहू लागलो. बाकीच्यांच्या मनात तेव्हा काय भाव होते मला ठाऊक नाही पण माझ्या पुरतं बोलायचं तर ' चोवीस तासांत गजानन महाराज दहा हजार रुपये उभे करणार आहेत कां? या प्रश्नाचं उत्तर मला तरी मिळालं होतं . ते पैसे सहर्ष स्वीकारताना मी महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ.देवयानी किशोर धांडे.
भरूच, गुजरात
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास .
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ते १०४) फक्त रुपये पन्नास
Comentarios