अनुभव 82
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 82🌺)
*तुझी कृपा झालियावरी, अशुभ अवघे जाते दुरी*
जय गजानन! या आधी सांगितल्याप्रमाणे, माझं लग्न झालं आणि लगेच माझं संकटांना तोंड देणं सुरू झालं. परिस्थितीशी तब्बल सात आठ वर्ष झुंज देताना, त्रस्त झालेल्या माझ्या मनात, आत्महत्येचा विचार नक्की झाला तेव्हा श्री गजानन महाराजांनी, स्वप्नात येऊन, 'मुली आत्महत्येचा विचार मनातही आणू नकोस, यापुढे तुला अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनही बाबतीत काही कमी पडणार नाही. 'असं सांगितलं ,त्याची प्रचिती लगेचच येऊ लागली. प्रथम आमच्यावर केलेला खोटा आरोप बाजूला जाऊन आम्हाला रुपये अकरा हजार, कंपनीकडून नुकसान भरपाईचे मिळाले, पुढे लगेच सहाच महिन्यात, महानगरपालिकेची शिक्षका साठी जाहिरात येऊन, मी डी. एड. ला पहिली असल्यामुळे मला हमखास नोकरी मिळाली,त्या भरवशावर थोडं कर्ज घेता येऊन आधीची लहान जागा विकून, आम्हाला थोड्या मोठ्या नवीन जागेत स्थानांतरित होता आलं.
नवीन जागेत, आतून प्रेरणा होऊन, दर गुरुवारी 'श्री गजानन महाराज सत्संग 'सुरू झाला. सत्संगात पैशाच्या मागे न लागता पावित्र्य जपून भक्ती व्हावी हा दृष्टीकोन ठेवला. आज या गोष्टीला अनेक वर्ष झालीत,देशाच्या वेगवेगळ्या भागातून लोक येऊन गेलेत, येत असतात. अशी कोणतीही मिठाई नाही की जिचा नैवेद्य अर्पण झाला नाही आणि असा कोणता साडीचा प्रकार नाही की लोकांनी मला प्रेमाने भेट दिला नाही. दर वर्षी थाटात प्रकट दिन साजरा होतो, पुष्कळ लोक प्रसादाला असतात. अक्षरशः महाराजांनी सांगितल्या प्रमाणे ,अन्न, वस्त्र, निवारा या तीनही बाबतीत त्या दिवसापासून काहीही कमी पडलं नाही.
सत्संगांमध्ये पावित्र्य जपण्यावरून एक छोटी घटना आठवली, माझी एक मैत्रीण दर गुरुवारी फोटोसाठी हार आणायची, एकदा तिनं आणलेला हार फोटोवरून ओघळून खाली पडला. नीट बसला नसावा असं वाटून मी तो व्यवस्थित घातला, तो पुन्हा खाली आला, तिसरे वेळी अतिशय लक्षपूर्वक मी घातला तरी तेच झालं. मला आतून काही वेगळी भावना जाणवली, इतक्यात योगायोगाने काही कारणाने त्याच मैत्रीणीचा फोन आला, मी तिला प्रश्न केला की तू हार कुठून आणला?ती आश्चर्याने म्हणाली, थांब मी प्रत्यक्ष येऊन भेटते. प्रत्यक्ष भेटीत ती म्हणाली, अगं आज हार विकत घेताना मनात आलं, मी का हार घ्यावा?का दर गुरुवारी पंधरा रूपये खर्च करावेत?मला यातून काय मिळणार?ते सर्व ऐकल्यावर, श्री गजानन महाराजांनी बाळाभाऊंना उपदेश करीत असताना, मनात अंशतः जरी मलीनता शिल्लक राहिली तरी भक्तीमार्ग हाती येत नाही.'हे सांगितलं होतं, त्याचं मला स्मरण झाल्याशिवाय राहिलं नाही.. असो .
इ.स.2000 च्या आसपास मला दम्याचा त्रास सुरू झाला. पुढे तो वाढत गेला, माझ्या वडिलांना दम्याचा त्रास होता, त्यामुळे आनुवंशिक त्रास आहे, दूर होणं कठीण असंच मला वाटू लागलं. शिवाय विपरीत परिस्थितीतील मानसिक ताण तणाव हेही कारण होतंच. त्या त्रासामुळे मला वर्गात शिकविताना एक पानही धड वाचता येईना. घरी येणार्या काही उपासकांनी मला प्राणायाम करण्याचा उपाय सुचविला पण त्याला मुहूर्त लागत नव्हता. गजानन महाराज घेतील काळजी असं म्हणून मी स्वस्थ होते. अशातच इ.स.2003 साली मला 'श्री समर्थांच्या' सज्जनगडावर जाण्याचा योग आला. तेथील वातावरण पाहून मी खूप भारावून गेले आणि ज्याला त्याला 'समर्थ 'आणि 'सज्जनगड ' याविषयी सांगू लागले. त्यासाठी माझ्याकडून सहजपणे संबंधित साहित्याचं वाचन झालं. माझ्याकडून सज्जनगडाविषयी माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने, गोरेगाव येथील गजानन महाराज मंदिरात श्रीमती आपटे बाईंनी माझं भाषण ठेवून मला तशी आगाऊ सूचना दिली. माझ्या जवळ तीन चार महिने होते. मी महाराजांचा आदेश घेण्यासाठी त्यांच्या समोर प्रार्थनापूर्वक उभी झाले, महाराजांना विनंती केली की तुमची इच्छा असेल तर मी या विषयावर काही बोलू शकेन, प्रार्थना करतानाच मला महाराजांनी गजानन विजय मधील संबंधित ओव्यांची आठवण करून दिली.
मग म्हणाले गजानन/रामदासासी प्रेमे करून/नको गांगरू देऊ मन/तुझा समर्थ मीच असे/मागे बापा गडावरी/माझीच वस्ती होती खरी/आता शेगांवा भितरी/राहिलो येऊन मळ्यात. !
त्यानंतर प्रफुल्लित मनाने, मी दुसरेच दिवशी सकाळपासून प्राणायाम सुरू केला. आता महाराजांच्या आशीर्वादाने मी तास तास भाषण देऊ शकते. दम्याचा त्रास आता शिल्लक राहिलेला नाही हे तर झालेच पण पुढे शेगांवला अचानक सेवकाने मला समाधीवरील लालसर रंगाची कफनी देऊ केली. ती कफनी 'समर्थावरील माझ्या बोलण्याला गजानन महाराजांचा आशिर्वाद 'या रुपाने आता मी जवळ बाळगली आहे.
आता आयुष्याची साठी उलटून गेली. 1981 ला मी लग्नानंतर सौ. सुधा गरूड झाले तेव्हा आयुष्यातील तो आठ दहा वर्षांचा काळ प्रचंड अडचणीचा गेला, पण गजानन महाराजांनी दृष्टांत दिल्यानंतर आयुष्य समाधानाच्या वाटेवर आलं. त्या गोष्टीला दोन तपं उलटून गेल्यानंतर आणि मी स्वतःला एक सारखं 'महाराज माझ्या सोबत आहे 'महाराज माझ्या सोबत आहे 'हे समजावित असतानाच गजानन महाराजांनी पुन्हा एका घटनेतून मला आश्वस्त केलं. ते सोबत असण्याचा दाखला दिला. इ.स.2015 मधील गोष्ट, महाराजांची पूजा करायला बसले की माझ्या कानावर शब्द येऊ लागले, 'मी तुला आशिर्वाद देण्यासाठी येतो आहे आणि या शब्दांसह महाराजांची एक प्रतिमा वारंवार डोळ्यांपुढे येऊ लागली, ज्यात महाराज विदेही अवस्थेत बसले आहेत, पण उजव्या हातात चिलीम नसून तो हात आशिर्वादासाठी थोडा वर आहे. ते पाहून मी आतून महाराजांची प्रतिक्षा करू लागले. दिवाळी जवळ येऊ घातली होती, त्याच सुमारास ऑक्टोबर 2015 ला बोरिवलीत प्रबोधन नाट्य थिएटर येथे, चित्रकार, पेन्टर श्री.शेखर साने यांनी तयार केलेल्या फोटोंचं प्रदर्शन होतं,शेखर साने प्रामुख्याने श्री स्वामी समर्थांची चित्रं काढतात. मी ते प्रदर्शन पहण्यासाठी गेले, आश्चर्य म्हणजे तिथे एक गजानन महाराजांचं चित्र होतं आणि त्याहीपेक्षा आश्चर्य म्हणजे, ते तेच चित्र होतं की जे वारंवार माझ्या नजरेसमोर येत होतं, संपूर्ण प्रदर्शनात ते एकच गजानन महाराजांचं चित्र होतं. स्वाभाविकपणेच मी किंमतीविषयी चौकस झाले, पण त्यासाठी आवश्यक असणारे रूपये सहा हजार मी देऊ शकत नव्हते.चित्र मनात भरलं पण मी रिक्त हस्ताने घरी परतले. श्री गजानन महाराजांचं चित्र, गजानन महाराजांचाच निर्णय!असं मनाला समजावून महाराजांना हात जोडले. त्या गोष्टीला चार दिवसांचा काळ
लोटला, मला आठवतं तो भाऊबीजेचा दिवस होता. गेल्या अनेक वर्षांपासून मी भाऊबीजेला एक माझ्यासाठी सवय लावून घेतली होती, प्रथम मी गजानन महाराजांना ओवाळणार तेव्हाच माझा तो दिवस साजरा होणार. त्याप्रमाणे मी त्या दिवशी महाराजांना ओवाळलं, काही वेळ मधे गेला असेल, अचानक माझी मैत्रीण 'सरस्वती 'तिच्या भावासोबत, 'सुरेश' ज्याचं नाव माझ्या दारात उभी ठाकली. त्यांनी माझ्यासाठी स्नेहभेट म्हणून एक मोठी तसवीर कागदात झाकून आणली होती!हो!तुम्ही अगदी बरोब्बर ओळखलं, 'तो' तोच फोटो होता ,जो मी प्रदर्शनात पाहिला होता.
त्या फोटोच्या माध्यमातून महाराजांनी मला पुन्हा आश्वस्त केलं, 'मुली चिंता करू नकोस!' आता दर गुरुवारी सत्संगात आम्हा सर्व भक्त गणांसमोर तोच फोटो असतो. आमचं भजन आणि नामस्मरण सुरू असतं आणि समोर उपस्थित असलेले महाराज आम्हाला आशिर्वाद देत असतात. त्या आशिर्वादामुळे आमचा हुरूप अजून वाढीस लागतो, मग आम्ही सर्वच उपासक अजूनच आर्ततेने त्यांना म्हणतो 'महाराज आम्हा सर्व उपासकांवर तुमच्या कृपेची पाखरण होऊ द्या आणि आमचे बोल गोड मानून घ्या.. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ सुधा सुधीर गरूड
बोरीवली, मुंबई
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comments