top of page

अनुभव - 87

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 87🌺)

*आमुचा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे*


जय गजानन!मी सौ स्वाती मनोज मुळे, बडोदा येथे राहते. 2018च्या नोव्हेंबर महिन्यात मी आमच्या घरी श्री गजानन विजय ग्रंथाचं मुखोद्गत पारायण ठेवलं होतं. तळेगाव दाभाडे येथील पारायणकर्ते श्री प्रकाश पटवर्धन त्यासाठी येणार होते. आमचा मोठा मुलगा सुमेघ सिडनी येथे असतो. त्यानं पारायणाच्या कार्यक्रमाला येण्यासाठी विमानाचं तिकिट बुक केलं, मात्र ऐन वेळी काही अडचणीमुळे त्याला येता येणार नाही अशी स्थिती निर्माण झाली..त्याचा फोन आला, 'आई, तिकिटाचे पैसे वाया जाणार, मला तिकिट कॅन्सल करावे लागणार 'त्याला म्हटलं महाराजांना प्रार्थना कर, संबंधित अधिकार्याला जशी बुद्धी देतील तसं होईल.

सुमेघच्या नशिबात पारायण ऐकण्याचा योग होता! महाराजांच्या कृपेने तो भारतात आला, मुखोद्गत पारायण तर ऐकलंच, शिवाय शेगांव दर्शन, महाप्रसाद आणि गादी समोर पारायण पण त्याच्याकडून महाराजांनी करवून घेतलं. बरेच दिवस येथे राहून तो सिडनीला परतला.

जाण्याच्या आदल्या दिवशी रात्री नऊ वाजता सुमेघ मला म्हणाला 'आई इथल्या गजानन महाराज मंदिरात जाण्याची इच्छा आहे 'त्याला मी म्हटलं अरे इतके दिवस तू इथे होता, तेव्हा तुला हे सुचलं नाही, उद्या निघायचं आहे आणि आज आता, तेही मंदिर बंद होण्याच्या वेळात तुला हे सुचतंय?ठीक आहे, चल!असेल महाराजांची इच्छा तर होईल दर्शन.

आम्ही मंदिरात पोहोचलो तर मंदिर बंद, सर्व बाजूंनी पडदे ओढलेले, आतलं काही दिसत नव्हतं, पडदा सरकवताही येत नव्हता, त्यामुळे मन खिन्न झालं, थोडं मागील बाजूस गेलो तर दोघं तिघं तिथे बसलेले दिसले. त्यातील एक, जो पुजारी होता, म्हणाला दर्शन करायचं का?थांबा कुलूप उघडतो, आम्ही सर्वांनी आत जाऊन दर्शन घेतलं. सुमेघचं काम झालं म्हणून मी आईच्या भूमिकेतून भक्तीभावाने महाराजांना हात जोडले.

दुसरे दिवशी सुमेघ सिडनीसाठी रवाना झाला. पण माझ्या डोक्यात एक विचारचक्र सुरु झालं, ते असं की अगदीच अपरिहार्य कारणांमुळे, किंवा आटोक्याबाहेरील परिस्थितीमुळे अडचण निर्माण होऊन आपल्या सद्गुरूंना संकटसमयी साद घालणं समजू शकतं पण बरेच वेळाअसं होतं की आपण भक्त लोक, कधी आळसामुळे,कधी अज्ञानातून, कधी लोभापायी, कधी अर्धवट माहितीमुळे, कधी पुरेशी तांत्रिक माहिती नसल्यामुळे, तर कधी अनावधानाने, निर्णय घेण्यात गोंधळ करतो आणि मग सद्गुरूंना भरीस घालतो. अर्थात ते संत असल्यामुळे कृपाळू, कनवाळू असतात, धाव घेतातआणि हे नित्य चालत आलेलं आहे. अर्थात म्हणूनच ते संत आणि आपण पामर!

मला इ.स.2004 च्या सुमारास घडलेली एक घटना आठवते, तेव्हा आम्ही पुण्यात राहत होतो. तो लक्ष्मी पूजनाचा दिवस होता. तेव्हा दिवाळी एकत्र साजरी करावी म्हणून आमच्याकडे आई, माझे दोन भाऊ सहकुटुंब आले होते. बोलता बोलता गप्पांच्या ओघात सर्वांचा सिंहगडला जाण्याचा बेत ठरला.

आम्ही तितक्यातच नवीन गाडी घेतली होती. हल्ली गाड्यांमधे नवनवीन तंत्रज्ञान विकसित होतंय. पाॅवर स्टिअरिंग, पाॅवर विंडो,पाॅवर ब्रेक, एअर बॅग्ज, अत्याधुनिक डॅशबोर्ड डिसप्ले, इंजिनमधे नवनवीन तंत्रज्ञान वगैरे वगैरे. पाॅवर स्टिअरिंग तंत्रज्ञानात, तुम्ही गाडीला पाॅवर दिली अर्थात इंजिन सुरू केलं की स्टिअरिंग अतिशय हलकाईने सोपं होऊन काम करतं, अर्थात पाॅवर बंद तर इंजिनचं काम बंद. पाॅवर ब्रेकचही तसंच ,इंजीन सुरू तर ब्रेक काम करणार, इंजीन बंद तर ब्रेक जवळपास बंदच. पाॅवर विंडोचही तसंच. पूर्वीच्या जुन्या गाड्यांमधे, जुन्या तंत्रज्ञानात इंजीन बंद असलं तरी ब्रेक काम करायचे पण आज नवीन तंत्रज्ञानात सगळी रचना बदलली आहे. असो. तर सिंहगडला जाण्याचं आमचं ठरलं, पण एका गाडीतून आम्ही सर्व जाणं शक्य होणार नव्हतं. त्यामुळे माझा धाकटा भाऊ आणि वहिनी यांनी टू व्हिलरने यावं व आम्ही सर्वांनी गाडीनं जावं असं ठरलं व त्याप्रमाणे आम्ही निघालो पण झालं असं की आम्ही सर्व गडावर पोहोचलो पण बराच वेळ झाला तरी भाऊ आणि वहिनी काही आले नाहीत. उशीर का होतोय म्हणून फोन केला तेव्हा कळलं की त्यांची गाडी बंद पडली आहे. म्हणून मग असं ठरलं की माझे मिस्टर 'मनोज'यांनी जाऊन त्यांना घेऊन यावं, त्याप्रमाणे मनोज गाडी घेऊन त्यांना आणायला निघाले तर आमची दोघं मुलं सुमेघ आणि ऋत्वी म्हणाले बाबा आम्ही तुमच्या सोबत येतो. दोन मुलांना घेऊन मिस्टर गडावरून खाली निघाले. गाडी उतारावर आली, मिस्टरांना वाटलं गाडी सहजपणे खाली उतरते आहे, इंजिन बंद करायला काय हरकत आहे आणि या विचाराने त्यांनी किल्ली फिरवून इंजिन बंद केलं. इंजिन बंद झालं अन् दुसरेच क्षणी यांच्या लक्षात आलं की ब्रेक लागत नाही आहे अन् स्टिअरिंग जाम झालं आहे. आता गाडी उतारावर वेगाने पुढे जाऊ लागली. आजूबाजूचे लोक डोळे विस्फारून गाडीकडे पाहू लागले, मिस्टरांना क्षणात देव आठवले, काही काळात होत्याचं नव्हतं होणार हे मिस्टरांना समजून चुकलं. मिस्टरांच्या घरी त्यांच्या लहानपणापासून गजानन महाराजांची पूजा होत आलेली, मला देखील लग्नानंतरच गजानन महाराजांचं वेड लागलेलं.

गाडी उतारावर, एकीकडे डोंगरझाडी आणि दुसरीकडे खाई. मिस्टरांना दोन मुलांसह त्यांचं मरण खाईत दिसू लागलं, ब्रेकवर पूर्ण भार देऊनहीब्रेक लागेनात अन् स्टिअरिंग वळेना ते पाहून मात्र मिस्टरांना जाणीव झाली की आता एकच उपाय आहे आणि तो म्हणजे श्री गजानन महाराज, इकडे मुलही बिचारी भांबावून गेलीत. मग ज्याप्रमाणे गणू जवर्याने विहीरीतून महाराजांना हाक मारली, की समर्थां आता तुजविण कोण रक्षण करील?तशी हाक मिस्टरांनी गाडीतून महाराजांना घातली, जोरात त्यांच्या तोंडून निघालं, 'धावा गजानन महाराज धावा ' ती आर्त हाक महाराजांच्या कानावर गेली असावी, क्षणात कुणीतरी एका अनामिक शक्तीने स्टिअरिंग वळवावं असं होऊन गाडी झकपन वळली आणि डोंगरावर धाडकन आदळून मोठा आवाज झाला आणि गाडी थांबली, गाडीचं बरंच नुकसान झालं, पण मिस्टरांना आणि दोन्ही मुलांना साधं खरचटलंही नाही. मिस्टर हळुवारपणे गाडीतून खाली उतरले, मुलांना काळजीपूर्वक खाली घेतले आणि पुढील व्यवस्थेसाठी अग्रेसर झाले.

आज या घटनेला पंधरा वर्षे पूर्ण होतील, पण मिस्टरांच्या मनात ती आजही ताजी आहे. माझ्या दृष्टीनं बोलायचं तर, त्या घटनेनंतर जेव्हा जेव्हा मी गजानन विजय ग्रंथ वाचायला घेते तेव्हा मनात विचार येतो, गोविंद बुवांचं वाहन होतं 'घोडा 'त्याच्यासाठी गोविंदबुवांनी महाराजांना प्रार्थना केली. गाडीवानाच्या मागून बैलगाडी सुरळीत चालली नदीतून नाव महाराजांच्या कृपेने पैलतीराला लागली आणि आज बदललेल्या काळात नवीन तंत्रज्ञान असलेल्या गाडीतून भक्त श्री गजानन महाराजांना साद घालताहेत.

काळ बदलला,वाहने बदललीत पण वाहन चालकांची श्री गजानन महाराजांना प्रार्थना करीत असताना भावना मात्र एकच आहे आणि ती आहे.. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- सौ. स्वाती मनोज मुळे

बडोदा

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page