अनुभव - 88
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय
(अनुभव 88🌺)
*सद्गुरूंचा कृपाप्रकाश*
जय गजानन! आज आम्ही दोघीजणी आपापला अनुभव आपल्याला सांगणार आहोत. प्रथम सौ.इंदूताई अण्णाजी राजनकर त्यांचा अनुभव सांगणार आणि नंतर मी म्हणजे सौ.स्मिता दिलीप वंडलकर आपला अनुभव सांगणार!अर्थात असं करण्यामागे कारण असं आहे की आम्हा दोघींचा अनुभव साधारण सारख्याच काळातील, म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा आहे आणि दोन्ही अनुभव शेगांव जवळील नागझरी या क्षेत्राशी संबंधित आहेत. याशिवाय अजून एक साम्य आहे पण ते सांगण्याच्या ओघात पुढे स्पष्ट होईलच!
तर मी सौ.इंदू राजनकर आज मी आयुष्याची सत्तरी पूर्ण केली आणि मिस्टरांनी वयाची पाऊणशे वर्षे पूर्ण केलीत. आमच्या अनेक वर्षांच्या संसारात 'गजानन महाराजांविषयीचे वेड 'हा आमच्यासाठी केन्द्रबिंदू ! आमच्या कडून श्री गजानन विजय ग्रंथाची कितीतरी एकासनी पारायणं गजानन महाराजांनी पूर्ण करून घेतलीत. अर्थातच आमच्यासाठी जीवनात 'श्री गजानन महाराज 'हा एक फार मोठा आधार राहिला.
मला आठवतं पस्तीस चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नेहमी प्रमाणे आम्ही उभयता शेगांव दर्शनाला गेलो होतो, तेव्हा तशीहीआजच्या इतकी गर्दी शेगांवला नसायची. श्रीरामाचं दर्शन तेव्हा प्रथम व्हायचं. लाईन असलीच तर काही न बोलता सेवेकरी मधे दोन कठड्यांवर एक काठी ठेवायचा की रांग पुढे सरकणं बंद. सारंच कसं शांतपणे पार पडायचं, आम्ही शांतपणे दर्शन घेतलं. पारायण मंडपात गजानन विजय पारायण झालं.बंकट सदनादी ठिकाणांना भेट झाली आणि आम्ही नागझरीला जाण्याचा निर्णय घेतला. श्रीक्षेत्र नागझरी येथे गोमाजी महाराजांचं दर्शन झालं. संध्याकाळ होत आली होती, शेगांवला परतण्यासाठी थोडा वेळ होता. मिस्टरांना पोहोण्याचा छंद होता, म्हणून ते पोहोण्यासाठी तेथील कुंडात उतरले आणि त्यांनी पोहोण्याचा यथेच्छ आनंद लुटला, कुंडातील पाण्यात त्यांनी कोलांट उडी घेऊन ते पुन्हा सरळ झाले. मात्र त्या उलट-सरळ प्रकारात त्यांच्या गळ्यात असलेला सोन्याचा गोफ गळ्यातून पाण्यात पडला. मिस्टर बाहेर आले आणि माझ्या लक्षात आलं की गळ्यात गोफ नाही. मी त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून दिली, आम्ही दोघेही चिंतित झालो. गोफ चांगला वजनी आणि अर्थातच किंमती होता.
पहिले घाबरलो, नंतर थोडे सावरलो. दोघांनी शेगांवच्या दिशेने तोंड करून, श्री गजानन महाराजांना हात जोडले, म्हटलं, महाराज आजच तुमचं दर्शन झालं, पारायण झालं, तुमच्या चरणावर माथा टेकवून प्रफुल्लित झालेल्या मनावर हा आघात का व्हावा?कृपा करून प्रसन्न व्हा आणि आम्हा लेकरांना गोफ सापडण्यासाठी सहाय्य करा.
आम्ही पाणी साफ करणार्या सेवकाला भेटलो, त्याला झालेला प्रकार सांगितला. तो म्हणाला, प्रथमदर्शनी तरी तुम्ही भाग्यवान दिसताय, कारण आज सोमवार आहे आणि आज मी पाणी काढणार आहे. पण पाणी काढलं तरी पाण्याचा प्रवाह नियमित येत राहिल्यामुळे कुंड कितीही साफ केलं तरीही वीतभर पाणी राहतंच. शिवाय अनुभव असा आहे की पाण्यात पडलेली वस्तू एकतर वाहून जाते अथवा तळाशी दिसत नाही. बाकी आता गजानन बाबांची इच्छा!
संध्याकाळ झाली, आता रात्र होणार. तसंही अंधाराची चाहूल लागत होतीच. आम्ही चिंतायुक्त अंतःकरणाने महाराजांचा धावा सुरू केला. आमचा धीर सुटत चालला आणि तितक्यात कुठूनसा एक माणूस अचानक तिथे आला. सेवेकर्याचा पांढरा वेष असतो तसा वेष परिधान केलेला एक उंच माणूस हातात टाॅर्च घेऊन आमच्या समोर उभा ठाकला. आम्हाला म्हणाला तुम्ही चिंतित दिसता आहात पण काळजी करू नका, हा टाॅर्च घ्या आणि टाॅर्चचा प्रकाश जिथे टाकाल तिथे तुमची वस्तू मिळेल. आम्ही पायर्या उतरून कुंडामधे शिरलो वीतभर पाण्यात दोन पाऊले समोर जाऊन 'श्री गजानन महाराज की जय 'असा जयघोष करीत टाॅर्चचा प्रकाश झोत पाण्यावर सोडला, थोडं काळजीपूर्वक पाहिल्यावर आम्हाला आमचा गोफ तिथे सापडला, पुन्हा गजानन महाराज की जय म्हणून पाण्यात हात घालून मी तो उचलला. आम्ही बाहेर येऊन त्या गृहस्थांना टाॅर्च देऊ केला, आम्हाला फारसं काही बोलण्याची संधी न देता वेगानं ते निघून गेलेत. गजानन महाराजांचे आभार मानीत आमचा प्रवास शेगांवच्या दिशेने सुरू झाला....
मी सौ.स्मिता वंडलकर 1970-71 ची ही गोष्ट, त्यावेळी मी पाचवीत होते. आई वडील, मी आणि माझा लहान भाऊ आम्ही शेगांवला गेलो होतो. दुपारी शेगांव दर्शन आटोपल्यावर नागझरीला जाऊन गोमाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यावं असं ठरलं. नागझरीला जाणार्या शेवटच्या एस.टी.नं आम्ही निघालो. तेव्हा एस.टी बस थोडावेळ तिथं थांबून परत फिरायची. आजच्या इतकी वाहतुकीची साधनं नव्हती. नागझरी, तेथील स्टेशन, सर्वच आजच्या पेक्षा अगदीच भिन्न होतं. आमचं दर्शन आटोपलं, लवकर या, लवकर या, असं सुरवातीपासून कंडक्टर ओरडत होता, पण त्या दिवशी काय योग होता माहिती नाही ,कदाचित आमच्याकडून थोडा उशीर आणि कदाचित कंडक्टरची अरेरावी. आम्हाला न घेताच संध्याकाळच्या त्या अंधारात एस.टी. दिसेनाशी झाली. आम्ही चौघे तिथे उरलो, शिवाय एक आजी आजोबा त्यांच्या लहान नातवासह तिथे राहिले.
आम्ही सर्व घाबरलो, पर्याय नसल्याने कसंबसं नागझरी स्टेशन पर्यंत पोहोचलो. तिथे स्टेशन मास्तरांनी सांगितलं की रात्री थांबवण्यासाठी ही जागा योग्य नाही. इथे रात्री हिंस्त्र पशूंचा संचार असतो. येथील रात्र भयावह आहे, असुरक्षित आहे,त्यामुळे रेल्वे लाईनच्या कडेने शेगांव स्टेशन गाठणंच योग्य ठरेल, असं सर्वानुमते ठरलं.
आमची पदयात्रा रेल्वे लाईनच्या कडेने शेगांवच्या दिशेने सुरू झाली. गिट्टीचा (खडी) खडकाळ मार्ग, एकीकडे खोल खाई, पुढे गर्द झाडी. आता अंधार चांगलाच झाला होता. रात किड्यांची किरकिर वातावरण भयावह करीत होती. ठेचकळत पुढे चाललो होतो. आई वडीलही मनातून घाबरले असतील पण आम्हा सर्वांना धीर देण्यासाठी गजानन महाराजांचं नाव घेण्याचा सल्ला देत होते. आम्ही गजानन महाराज की जय म्हणत हळूहळू पुढे सरकत होतो.
अचानक आमच्या मागून, पांढरा पायजमा व पांढरा शर्ट परिधान केलेला एक पंचवीस तीस वर्षांचा युवक सायकलसह पुढे येऊन उभा राहिला. त्याच्या हातात एक मोठी बॅटरी होती. त्यानं धीर दिला, म्हणाला, काळजी करू नका माझ्या सोबत चला. त्यांनं सामान आणि लहान मुलाला सायकलवर घेतलं, म्हणाला मी दाखवितो त्या प्रकाशात पुढे चला.
आईने कुतुहलाने त्याला विचारलं, तू इथे कसा? त्यावर तो म्हणाला मी गाई बकर्यांना चारायचं काम इकडेच करतो सकाळ संध्याकाळ माझी नागझरीलाच आंघोळ असते. त्याच्या बरोबर गप्पात,सहवासात आणि त्यानं दाखविलेल्या प्रकाशात शेगांव स्टेशन केव्हा आलं कळलंच नाही. शेगांव स्टेशनला बाबा म्हणाले, आम्ही आता इथे थांबतो, तर त्यावर म्हणाला, अहो एवढी कठीण वाटचाल महाराजांच्या कृपेने सोपी झाली, तेव्हा एकदा मंदिरात महाराजांचं दर्शन घ्या .चला मलाही तिकडेच जायचं आहे. आम्ही मंदिराजवळ पोहोचलो, त्यानं सायकलवरून सामान आणि लहान मुलाला खाली ठेवलं. माझ्या बाल सुलभ मनात आलं आपण काही कृतज्ञता व्यक्त करावी, म्हणून मी बाबांना तसं म्हटलं, बाबांनी खिशात हात घातला, काही पैसे हातात घेतले, पण देणार कोणाला?तो तर केव्हाच दिसेनासा झाला होता. मंदिरात जाऊन पुन्हा दर्शन घेणं या शिवाय आमच्या जवळ दुसरा मार्ग नव्हता.
सुरवातीला म्हटलं त्या प्रमाणे चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ, नागझरी क्षेत्र, हे आमच्या अनुभवातील साम्य होतं. तिसरं साम्य होतं त्या बॅटरीचा प्रकाश!
लाक्षणिक अर्थानं या गोष्टीकडे पाहिलं तर मनात विचार येतो, महाराजांनी दाखविलेल्या प्रकाशात आपण चालतोय ही किती छान कल्पना आहे नं?आपण महाराजांचे भक्त! त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल व्हावी याशिवाय अन्य आनंद तो कुठला? म्हणूनच आता त्यांना एकच मागणं आहे, तुम्ही दाखविलेल्या मार्गावर आम्ही चालावं आणि प्रत्येक पाऊलागणिक म्हणावं.. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--सौ.इंदू अण्णाजी राजनकर
सौ. स्मिता दिलीप वंडलकर
नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे
🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
ความคิดเห็น