अनुभव - 89
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय
(अनुभव 89🌺)
*गंडांतर निवारण, करिती बाबा गजानन!*
जय गजानन! मी भानुदास पंढरीनाथ गायकवाड! अमरावती जिल्ह्यातील 'म्हैसपूर' या अगदी लहान खेडेगावी सप्टेंबर 1939 मधे माझा जन्म झाला. आमचे वडील पांडुरंगाचे परमभक्त! पांडुरंगाशिवाय दुसरा देव जणू त्यांना ठाऊक नव्हता. मग आम्हा लेकरांना गजानन महाराज कसे माहिती असणार?पण म्हणतात नं की ज्याचा त्याचा देव ठरला आहे. तसंच माझं दैवत गजानन महाराज असणार हे ठरलेलं होतं.
आमचं लहानपण कधी अगदी श्रीमंतीत गेलं, तर कधी आम्हाला नियतीनं गरिबीचाही चांगलाच परिचय करून दिला. मी पाचव्या वर्गात असताना, शिक्षण सुरळीत व्हावं या उद्देशाने वडिलांनी मला अमरावती येथे पाठविले, मी अमरावतीला राहू लागलो. स्वकष्टार्जित पैसा कमावित असताना, माणसाने कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नये अशी वडिलांची शिकवण होती. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत पंधरा रुपये मासिक पगारावर कधी हाॅटेलमधे काम केलं तर कधी बारा आणे रोजावर वाढ्यासोबत लाकडावर रंधाही ओढला.
माझी आई 'पार्वती' खेड्यावर रहात होती .वास्तविक खेडं आणि अमरावती हे अंतर तसं फार नव्हतं. पण तेव्हा वाहतुकीची साधनं नव्हती, दळण वळणाची माध्यमं नव्हती, त्यामुळे माझंच खेड्यावर जाणं झालं तर तिची भेट होणार. अन्यथा बिचारी कदाचित कुणी खेड्यावर आलाच तर त्याच्या कडून मुलाचं कुशल जाणून घेणार. मला आठवतं मी सहाव्या वर्गात असेन, म्हणजे साधारण 1952-53 चा तो काळ. मला विषमज्वर झाला. तापानं, आजारपणानं मला चांगलच पछाडलं. मी तीन महिने आजारी होतो. अंथरूणाला खिळलो आणि माझ्यावर जगाचा निरोप घेण्याची वेळ आली. आपण गजानन विजय ग्रंथात जानराव देशमुखांच्या बाबतीत वर्णन नेहमी वाचतो.
असो त्या शेगांवात/जानराव देशमुख विख्यात/होता त्याचा प्राणान्त /व्हावयाचा समय आला /व्याधी शरीरी बळावली/ शक्ती पार निघून गेली/प्रयत्नांची कमाल केली/वैद्यांनी ती आपुल्या/नाडी पाहून अखेर/आप्ता कळविला समाचार/प्रसंग आहे कठीण फार/नसे आशा वाचण्याची/आम्ही प्रयत्न केला अती/परी यश न आले तिळरती / यांना आता घोंगड्यावरती/काढोन ठेवा हेच बरे. जानराव वयाने मोठे तरी होते. माझ्या आजारपणात माझं वय होतं 'वय वर्षे चौदा!' तो दसरा होता. माझे डोळे थिजलेले, मी कुणाला ओळखत नाही, औषधाला प्रतिसाद देत नाही. आता मी जाणार, अशा अवस्थेत मला खाली टाकलं.
तिकडे आई पांडुरंगाला विनवणी करीत होती. अशात आमचे एक नातेवाईक 'श्रीरंग टाले 'म्हणून खेड्यावर गेले. आईनं त्यांना विचारलं 'भानुदास ला खाली टाकलं?'तो जाणार? मी काय करू शकते?त्यांनी म्हटलं 'मामी 'तू गजानन महाराजांना काही कबूल कर. शेगांवचा गजानन बाबा हाकेला धावतो असं ऐकलं आहे. तेव्हा घरी फोटो नव्हताच, आईनं महाराजांना म्हटलं, 'हे गजानन बाबा लेकराकडे लक्ष दे, त्याला तुझ्या दर्शनासाठी आणीन. तुला एक गाईचं वासरू अर्पण करीन. तुझ्या पोथीचं पारायण करीन. '
त्या विजयादशमीला गजानन बाबानी माझ्या जीवनात प्रवेश केला तो कायमचाच. सगळ्यांना आश्चर्य वाटले पण माझे प्राण पाखरू वाचले!
पुढे यथावकाश शालेय शिक्षण पूर्ण झालं. अनेक ठिकाणी लहान सहान नोकरी आणि कष्टाची कामं करता करता 1960 ला रेल्वे पोलीस भर्तीचा योग आला. पोलिसची नोकरी नको अशी भावना मनात होती पण महाराजांनी माझं अन्नपाणी तिथेच लिहिलं होतं त्यामुळे मी रेल्वे पोलीस मधे शिपाई म्हणून कामावर रूजू झालो. गजानन बाबा नुसती माझी भरती करून थांबले नाहीत तर त्यांनी मला शिपाई, जमादार, उपनिरीक्षक, पोलीस निरीक्षक अशी क्रमशः आयुष्यात तरक्की करून दिली.
इ.स.1981 ला मला इन्स्पेक्टर करून 1982 ला लगेच मला इतवारी रेल्वे स्टेशनवर ठाणेदार म्हणून दिलेली बढती पाहून तर मी गजानन बाबांसमोर नतमस्तक झालो. पण खरं सांगायचं तर माझ्यावर खूप दडपण आलं. हाताखालील स्टाफपैकी पंधरा कर्मचारी व्यवस्थित तर चाळीस कर्मचारी सर्वच बाबतीत एकदम वेगळे, त्यांना हाताळणं अतिशय कठीण. बढती स्वीकारावी की नाकारावी या संभ्रमात असताना, एक दिवस महाराजांनी प्रेरणा देऊन धीर दिला. मी ठाणेदार म्हणून जबाबदारी स्वीकारली.
त्या गोष्टीला साधारण दीड वर्ष झालं असेल, एकदा चार पाच कर्मचारी माझ्या अनुपस्थितीत घरी आले आणि माझ्या पत्नीला विचारू लागले,आम्ही साहेबांचं वाईट करू इच्छितो, त्यांची खोटी तक्रार करू पाहतो, पण आम्ही करु शकत नाही आमचं मन ते करायला धजत नाही, साहेबांजवळ अस काय आहे?माझ्या पत्नीने त्यांना म्हटलं त्यांच्याजवळ काय आहे ते मला माहित नाही पण नित्य नियमानं गजानन बाबांची पूजा आणि पोथीचं वाचन मात्र ते करीत असतात! घरी आल्यावर मला ही गोष्ट समजली तेव्हा मनोमन गजानन बाबाचे आभार मानले.
आता आयुष्याला ऐंशी वर्षे पूर्ण होतील. जीवन म्हटलं की त्यात सुख दुःखं येणारच, त्याविषयी खंत नाही, आनंद याचा आहे की जीवनात गजानन बाबाचा आधार आहे. माझा मुलगा पोलीस मधे आहे, त्यालाही गजानन महाराजांचं वेड आहे. पोलिसी जीवनात केव्हा कशी ड्युटी लागेल सांगता येत नाही. पण शक्यतो अध्याय वाचल्याशिवाय बाहेर पडायचं नाही असा त्याचा नियम आहे. त्याला आलेला गजानन महाराजांविषयीचा एक अनुभव मला इथे सांगायलाच हवा,,कारण पर्यायाने तो माझाही अनुभव आहे.
इ.स.2001 ची ही घटना. तेव्हा 'जगदीश' नागपूरला पोलीस उपनिरीक्षक म्हणून कामाला होता. त्या दिवशी शहराच्या बाहेर, कन्हान गावाच्या बाजूला, 'टेकाडी 'नावाच्या गावाजवळ अवैध वाहतूक नियंत्रणासाठी, मुख्य रस्त्यावर, येणार्या जाणार्या वाहनांवर लक्ष ठेवून पोलीस उभे होते. जगदीशही युनिफॉर्ममधे उभा होता. इतक्यात नागपूरहून बाहेरच्या दिशेने जाणारी एक मार्शल जीप आली. त्या जीपमधे जवळपास पंधरा लोक बसविले होते.
पोलिसांनी शिटी वाजवून त्या जीपला थांबण्याविषयी सूचना केली, पण काय होतय कळायच्या आत जीप भरधाव समोर निघाली, जाताना जीपने जगदीशला जोरदार धडक दिली, ती ठोस इतकी जोरात होती की जगदीश चक्क आठ दहा फूट उंच उडाला, त्याला जाणवलं की आता आपण मरणार, तो जोरात ओरडला 'गजानन बाबा 'तो उंच उडाला तेव्हा त्यालाआकाशात त्या क्षणात चिलीम पिणारे गजानन महाराज दिसले, तो धाडकन खाली कोसळला, पण आश्चर्य म्हणजे तेवढ्या मोठ्या धक्यानेही तो बेशुद्ध झाला नाही. त्याला लगेच दवाखान्यात हलविण्यात आले, पुढे त्याच्यावर पाच सहा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, पण महाराजांनी त्याचं रक्षण केलं, नोकरी करू शकेल अशा अवस्थेत त्याला सांभाळलं त्याच्यावर आलेलं गंडांतर महाराजांनी दूर केलं.
दुसरीकडे, ठोस मारून पळून जाणार्या त्या मार्शल जीपच्या ड्राइव्हरला बरेच दूरपर्यंत पाठलाग करून पकडण्यात आलं. त्याच्यावर 'अटेम्ट् टू मर्डर 'कलमाखाली गुन्हा दाखल होऊन त्याला शिक्षाही झाली.
आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मी प्रवेश केला आहे. त्या विजयादशमीला गजानन महाराजांनी माझ्यावर आलेलं गंडांतर टाळलं!पुढे मुलावर आलेल्या गंडांतरातून त्याला सुखरूप पार केलं, या घटनांचा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा गजानन महाराजांना मनापासून एकच विनंती कराविशी वाटते..
हे गजानन महाराजा, आम्हा भक्तगणांवर कधी काळी गंडांतर आलंच तर आम्हाला तुमचा आधार असू द्या आणि जेव्हा अध्यात्मिक मृत्यूला सामोरे जाण्याचा प्रसंग आम्हा भक्तांवर येईल तेव्हा भक्तीपूर्ण अंतःकरणाने त्या प्रसंगाला सामोरे जाण्याचे धैर्य आम्हाला द्या आणि देहत्याग करतानाही मुखात तुमचंच नाव येऊ द्या श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--भानुदास पंढरीनाथ गायकवाड
नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !! श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comments