top of page

अनुभव - 91

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव91🌺)

*गुरूतत्व एक आहे*

( श्री गोंदवलेकर महाराज, श्री गजानन महाराज)


जय गजानन! पुण्यामधे 'श्री गजानन महाराज शेगांव परिवार केन्द्र पुणे ' या नावाने पब्लिक ट्रस्ट आहे. आम्ही सर्व ट्रस्टी अर्थातच श्री गजानन महाराजांचे भक्त! पूर्वी शेगांव-आळंदी पायी वारी सुरू असताना, श्री गजानन महाराजांची पालखी पुणे येथे 'रमण बागेत ' मुक्कामी असायची. त्यावेळी संपूर्ण पालखी सेवा ' श्री गजानन महाराज शेगांव केन्द्र पुणे 'यांच्याकडे तीन दिवस असायची. अंदाजे जवळपास बावीस वर्षे ही सेवा करण्याची संधी श्री गजानन महाराजांच्या कृपेने आम्हाला मिळाली.

हे तीन दिवस सर्व सेवेकर्यांसोबत एकत्र सहवास म्हणजे जणू सत्संगच असायचा. यात मग वेळोवेळी वेगवेगळ्या अध्यात्मिक विषयांवर चर्चा रंगायची, मग त्यात शेगांवचे श्रीराम मंदिर, शिवशंकराचा प्रिय श्रीराम, श्रीरामाचे आराध्य श्री शंकर, या विषयांपासून तर आपले सद्गुरू श्री गजानन महाराज, सद्गुरूंची भक्ती, सद्गुरूंची कृपादृष्टी, प्रत्येकाचे सद्गुरू, गुरूतत्व एक आहे, सद्गुरूच भक्ताला योग्य मार्गावर नेतात अशा विविध मुद्यांवर छान चिंतन व्हायचं!समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या प्रेरणेने पालखीचे ते तीन दिवस आनंदात पूर्ण करून आम्ही सर्व ट्रस्टी तृप्त व्हायचो, त्यांच्या पैकीच मी एक ट्रस्टी ' नरेश लाटे '

अंदाजे तीस एक वर्षांपूर्वी आम्ही सर्व ट्रस्टी मंडळींनी श्री गजानन महाराजांच्या आशीर्वादाने दक्षिण भारतातील काही स्थळांना भेट देण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. अंदाजे सतरा अठरा मंडळी होती आम्ही एक मेटॅडोर त्यासाठी ठरविली आणि आम्ही प्रवासाला निघालो. सर्व समविचारी आणि सात्विक वृत्तीचे लोक असल्यामुळे ' गुरूतत्व एक आहे 'या अनुषंगाने आम्ही बोलत होतो. साधारण सातारा गावाजवळ एका ठिकाणी आम्हाला पाटी दिसली. ' गोंदवले 63 किलोमिटर ' स्वाभाविकपणेच ' श्री गोंदवलेकर महाराज ' गोंदवल्याचे सात्विक वातावरण तेथील 'जागृत श्रीराम मंदिर ' असा सर्व विषय निघून गोंदवल्याला जाऊन प्रसाद घ्यावा, असा विषय आला, त्यावर आमचे श्री वैद्य मला म्हणाले ' नरेश ' आपण दक्षिण यात्रा करून येऊ आणि येताना याच रस्त्याने येणार आहोत तेव्हा 'गोंदवल्याचा' विचार करू. आम्ही सर्वांनीच त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आम्ही पुढे निघालो. ठरलेल्या दिवसात आमची दक्षिण यात्रा व्यवस्थित पार पडली.

परतीच्या प्रवासात आम्ही सर्व गजानन महाराज भक्त , गोंदवल्याला थांबून तिथे महाप्रसाद घेणार, ही खूणगाठ मनात पक्की होती. परत येत असताना, साधारण त्या ठिकाणापर्यंत पोहोचता पोहोचता आम्हाला रात्र होऊन गेली. रात्रीचे साडेआठ होत आले होते. आम्हा सर्वांना भूक लागली होती. सोबत असलेल्या सर्वच मंडळींच्या जेवणाची सोय करणं क्रमप्राप्त होतं. ते एक अगदीच लहान गाव असावं, आम्ही काही सोय होईल का पाहण्यासाठी ड्राइव्हरला गाडी बाजूला उभी करण्यास सांगितलं. सर्वत्र सामसूम झालं होतं. चौकशी करण्यासाठी मी खाली उतरलो. समोर एक लहान उडपी हाॅटेल होतं, तिथे विचारलं, तेथील माणूस हाॅटेल बंद करीत होता, म्हणाला, या गावात या वेळी तुमची खाण्यापिण्याची सोय होणं कठीणच आहे. बाजूला एक पानपट्टी (पानाची टपरी, पान ठेला) होती, तोही माणूस घरी परतण्याच्या तयारीतच होता. तिथे चौकशी करता त्यानही असमर्थता दर्शविली. इतक्यात मागील बाजूने एक सद्गृहस्थ समोर आले .अंगात खाली चाॅकलेटी रंगाची पॅन्ट, वर पांढरा बुशशर्ट ,मध्यम उंची, डोक्यावर खुरटे केस, हातात एक लहान पर्स वजा बॅग, ते मला म्हणाले, तुम्ही मेटॅडोर मधे सतरा अठरा लोक आहात, एवढ्या लोकांची सोय होईल अशी एक खानावळ गावात आहे. सरळ गावात जा, समोर पोस्ट ऑफिस आहे, तेथून उजव्या हाताला जा, तिथे मारूती मंदिर लागेल, तिथून उजव्या बाजूने समोर गेल्यावर एक चौक येईल. तिथून पुढे...

इतकं ऐकल्यावर मी लक्ष देणं सोडून दिलं, त्यांच्या हे लक्षात आलं. ते मला म्हणाले, बाळ मला मेटॅडोर मधून पुढील चौकात सोडशील का?मी हो म्हणालो.

ते पुढे बसले, चौक लगेच आला, तेव्हा ते म्हणाले, तुमच्या बरोबर लहान मुले आहेत, यावेळी सर्व बंद झाले आहे. तुम्ही असं करा, सर्व जण माझ्या घरी चला, तिथे सर्व जेवण करा, मला आनंद होईल. आता आमच्या समोर प्रश्न होता, एकदम नवखा माणूस, नवीन गाव, काहीच कल्पना नाही, विश्वास ठेवावा कसा?पण आता अन्यत्र सोय होणार नाही हेही खरंच होतं अन्य पर्याय नव्हताच. आम्ही सर्वांनी गजानन महाराजांचं स्मरण केलं, जे होईल ते गजानन महाराजांच्या आशीर्वादाने होऊ दे, असं म्हणून आम्ही जेवणास होकार दिला.

गाडी समोर निघाली, ते सांगतील त्या दिशेने गाडी समोर जात होती, अनेक वळणं आणि चढाव उतार पूर्ण करीत काही वेळात गाडी एका घरासमोर थांबली.

तो एक नवीन कोरा, अगदी नुकताच बांधून पूर्ण झालेला बंगला होता. आम्ही सर्वांनी गेट मधून आत प्रवेश केला. समोर दोन पत्र्याची होमकुंडं होती, आत ज्वाला अजूनही प्रज्वलित होत्या. इतक्यात एकदम सात आठ कुत्री, चांगली मोठी आमच्या दिशेने समोर आलीत, त्यांच्याकडे पाहून ते गृहस्थ बोलले, अरे हे काय?असं बरं आहे होय? आपल्याकडे प्रसाद घेण्यासाठी पाहुणे आलेत जा बघू सगळे येथून! ते असं बोलताच आज्ञा पालन केल्यासारखी सर्व कुत्री बंगल्यामागे निघून गेलीत. आम्ही बंगल्यात प्रवेश केला, समोर भिंतीला टेकवून दोन चटया ठेवल्या होत्या. एक ताई आणि एक लहान मुलगा असे दोघं तिथे होते. त्यांना त्या सद्गृहस्थांनी म्हटलं आपल्याकडे ही अठरा माणसं प्रसाद घेण्यासाठी आली आहेत, यांना लगेच पुढे निघायचं आहे, चला तयारीला लागा!

आमच्याकडे पाहून ते म्हणाले, या दिशेला बाथरूम आहे, सर्व सोय आहे. छान हातपाय धुवून या जेवायला. मी जेव्हा बाथरूममधे प्रवेश केला तेव्हा मी ती बाथरूम पाहून थक्क झालो. मी महाराजांच्या कृपेने देश विदेशात फिरलो आहे. अगदी पंच तारांकित, सप्त तारांकित हाॅटेल्स पाहिलेली आहेत पण इतकं दर्जेदार सामान आणि बांधकाम असलेली बाथरूम मी पाहिली नव्हती .

नंतर आम्ही सर्वांनी त्यांच्याकडील महाप्रसादाचा आस्वाद घेतला. अन्नपूर्णेच्या आशिर्वादानं सज्ज झालेली पाकक्रिया जणू आम्ही अनुभवत होतो. बोलण्याच्या ओघात ते म्हणाले, ' सासू-सून ' , ' वडील-मुलगा ' 'नवरा- बायको ', वा इतर कुणाचीही भांडणे असोत, त्यांना माझ्याकडे पाठवा. मी सर्व भांडणे मिटवितो व सर्वांना आनंदानं परत पाठवितो.' पुढे त्यांनी विचारलं आता तुमचा काय विचार आहे? आम्ही म्हटलं , गोंदवल्याला जाण्याचा विचार आहे. त्यावर म्हणाले, हे बघा, महाप्रसाद सर्वत्र सारखाच! तो सर्व ठिकाणी एकच असतो! त्या बुवाची आज पुण्यतिथी असून तिथे हजारोंची गर्दी असणार, तेव्हा आता तुम्ही सरळ पुणे प्रवासाला निघा!

आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार करून, त्यांचा निरोप घेतला. निघताना वैद्य वहिनी त्यांना म्हणाल्या ' दादा आम्ही पुन्हा नक्की येऊ!' तर ते म्हणाले ' पुन्हा तुम्ही येथे कशाला याल?'

त्यांचा निरोप घेऊन आमचा परतीचा प्रवास सुरु झाला, आम्ही ड्राइव्हरला गोंदवल्याला जाण्याची सूचना केली आणि प्रवासात काही मिनिटातच आम्हा सर्वांना गाढ झोप लागली. जेव्हा जाग आली तेव्हा दूरवर पुणं दिसतंय अशी खूण नजरेला पटू लागली होती. आम्ही खडबडून जागे झालो, ड्राइव्हरला त्याविषयी विचारलं तेव्हा तो म्हणाला तुम्ही जेवायला आत गेलात तेव्हाच आम्ही बाहेरून मालकांना फोन लावला होता,ते म्हणाले सकाळी अर्जंट गाडी हवी आहे तेव्हा तुम्ही पुण्यात या. त्या लोकांना पुढे केव्हा गोंदवल्याला घेऊन जाऊ. त्या गृहस्थांनी ' पुणे प्रवासाला निघा ' असं म्हटलं होतंच, जशी महाराजांची इच्छा! असं म्हणून आम्ही मनाची समजूत घातली.

दुसरे दिवशी सकाळीच मी मनात विचार केला की नाही जाणं झालं गोंदवल्याला तर निदान गोंदवलेकर महाराजांचं काही साहित्य तरी वाचायला हवं!या विचारानं मी अप्पा बळवंत चौकातील नेरलेकर बुकडेपो या दुकानात, असं काही पुस्तक मिळेल का म्हणून चौकशी केली त्यांनी 'श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने '

हे पुस्तक माझ्या हाती दिलं. त्या पुस्तकावरील फोटो पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला, तो तोच फोटो होता की ज्यांच्या सहवासात आम्ही काल रात्री होतो. आम्हाला महाप्रसाद देऊन 'अहो महाप्रसाद सर्वत्र सारखाच ' असं सांगणारे आणि पुस्तकावर दिसत असणारे ते तेच होते.

गुरूतत्व एक आहे, सद्गुरू कुठल्याही रुपाने तुमची काळजी घेतात, याचं जिवंत उदाहरण जणू मी अनुभवलं होतं. आमची ती दक्षिण यात्रा आम्हाला प्राप्त झालेला जेवण प्रसाद आणि श्री गोंदवलेकर महाराजांची तीनशे पासष्ट प्रवचने, या सर्वामुळे चांगलीच संस्मरणीय झाली. माझ्या आयुष्याला तर जणू सात्विकतेचा स्पर्श झाला!

आता त्याच सात्विकतेला स्मरून असं वाटतं की महाराजांचं स्मरण करून प्रवासाला निघालो तर कृपाप्रसाद प्राप्त झाला, मग जीवन प्रवासात जर सतत महाराजांचं स्मरण करीत राहिलो तर सद्गुरूंच्या कृपाशिर्वादाने मोक्ष प्रसादही प्राप्त होऊ शकेल. अर्थात ते स्मरण मात्र सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आमच्या कडून करून घ्यावं आणि मुखी सतत नाम यावं , श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव--नरेश लाटे, कर्वे रोड पुणे

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page