अनुभव - 92
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 5 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 92🌺)
*द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये*
जय गजानन! श्री गजानन विजय ग्रंथ! श्री गजानन महाराज भक्तांसाठी फार मोठा आधार! त्यातही तो वाचायला सांगणार्या भक्ताची साधना, त्या साधनेचं अधिष्ठान, त्या मागे असेल तर मग काय? जय हो!गजाननमय हो!
साधारण तीस चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ, तेव्हा आम्ही कल्याणला, अहिल्याबाई चौकात सुकेणकर वाड्यात राहत होतो. त्याच वाड्यात एक 'देशमुख 'कुटुंब वास्तव्यास होतं. त्यांच्या मुलीला ' सरल ' जिचं नाव, त्या सरला ला गजानन महाराजांचं कमालीचं वेड होतं. तिला सकाळी नोकरीच्या निमित्ताने लवकर घराबाहेर जाणं भाग होतं. नोकरीच्या निमित्ताने दिवसभर घराबाहेर रहायचं आणि अशात गजानन विजय ग्रंथाचं पारायण शक्य व्हावे म्हणून बरेचदा ती रात्री दोन अडीच वाजता उठून पारायण करीत असे आणि पारायण पूर्ण करूनच बाहेर पाऊल ठेवित असे.
आमचा तो वाडा फार जुना झाला होता, छताला असणारे लाकडी वासे केव्हाही पडतील अशी स्थिती होती मालकांना घर दुरूस्तीत रुची नव्हती. उलटपक्षी आम्ही सर्व भाडेकरूंनी घर सोडावं असंच त्यांना वाटत होतं.
आमचं डोंबिवली येथे वडिलोपार्जित घर होतं. तेव्हा स्वतःच्या घरात रहायला जाणं उत्तम!या विचारानं आम्ही त्या जागेसाठी घराचा नकाशा तयार करून, मान्यतेसाठी म्युनसिपालिटी कडे अर्ज केला. वाटलं मंजुरी मिळाली की लगेच काम सुरू करता येईल, पण कार्यालयीन दिरंगाईचा चांगलाच अनुभव आम्हाला प्राप्त झाला. माझे मोठे बंधू, श्री भास्कर रत्नपारखी सातत्याने कार्यालयात खेट्या मारीत होते पण अर्जाला मंजूरी काही मिळत नव्हती.आम्ही सर्व त्रस्त झालो होतो. अनेक वर्ष 'अर्ज' जसाच्या तसा, जिथल्या तिथेच होता.
आमची अडचण, आमचा त्रास 'सरला ' जवळून पाहत होती. तिनं माझ्या पत्नीला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला. म्हणाली, संकल्पपूर्वक पारायण कर आणि पहा काय होतं ते? मी स्वतः नास्तिक होतो पण माझ्या पत्नीचा या गोष्टीवर विश्वास होता. अनेकदा सरलानं आग्रहपूर्वक म्हटल्यावर एकदा आमच्या बायकोनं गजानन विजय पारायणाला आरंभ केला. तुम्हाला सांगतो, काय योग होता पहा? ज्या दिवशी पारायण पूर्ण झालं त्याच दिवशी आमचा मोठा भाऊ माझ्यासाठी एक निरोप घेऊन आला. म्हणाला, अरे विनायक तुझा बालमित्र, वर्गमित्र कुणी अशोक उंदीरवाडकर म्हणून आहे. ते डोंबिवली नगरपालिकेत प्लॅन पास करणारे इंजिनियर आहेत त्यांनी तुला ताबडतोब भेटायला बोलाविले आहे.
मग काय? गजानन महाराजांचीच योजना ती! अशोक उर्फ अशक्या आमचा लंगोटीयार निघाला. शिवाय तो बांधकाम तज्ञ. तिथून अक्षरशः काही महिन्यात आमच्या घराचं बांधकाम पूर्ण झालं. इतकंच नाही तर त्या काळात त्यानं माझे जवळपास पंधरा हजार रुपये वाचवून दिलेत. हे सगळं काही इतक्या झटपट झालं की माझ्यासाठी त्या गोष्टीचं वर्णन 'गजानन महाराज की जय 'असंच होतं. तिथून मी थोडा आस्तिक झालो.
मी आस्तिक झालो खरा पण थोडाच .माझ्या स्वभावात मुलतःच असलेली अरेरावी काही कमी झाली नव्हती. ती कमी करून माझ्या स्वभावाला मी थोडी मुरड घालावी अशी शिकवण एका प्रसंगातून श्री गजानन महाराजांनी मला दिली आणि माझ्यातील भक्तीभाव वाढीस लावला, असा माझा समज आहे. तो प्रसंग मी तुम्हाला सांगतो.
माझं नाव विनायक रत्नपारखी हे तुमच्या लक्षात आलंच असेल, भारतीय रेल खात्यात एकूण 40 वर्ष 11महिने 9 दिवसांची सेवा देऊन मी निवृत्त झालो तेव्हा मेल/एक्सप्रेस ड्राइव्हर 'अ' वर्ग या श्रेणीत होतो. या काळात मी विविध प्रकारच्या गाड्या चालविल्या. मात्र माझ्या हातून या काळात अपघात झाला नाही ही केवळ गजानन महाराजांचीच कृपा!
1977 सालापासून मला फर्स्ट क्लासचा पास सुरू झाला तेव्हा पहिला पास मी शेगांव दर्शनासाठी वापरला व पुढे दरवर्षी इयर एंडींग चा पास एप्रिल महिन्यात शेगांवसाठी वापरण्याचा जणू नियम होऊन बसला. 1978 ला एप्रिल महिन्यात मी व सौ आमच्या 'परेश ' व ' शैलेश 'या दोन मुलांना घेऊन शेगांवला गेलो. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सकाळी दहाच्या सुमारास मंदिरासमोर एका दुकानात प्रसाद घेऊन, चपला व बूट तिथेच काढून आम्ही दर्शन घेतलं. बारा साडेबाराच्या सुमारास एप्रिलच्या त्या उन्हात पायाला चटके बसताहेत अशा स्थितीत आम्ही त्या दुकानाजवळ आलो तेव्हा मी त्या दुकानदाराला विचारलं की ' पादत्राणे 'ठेवण्याची सोय मंदिराजवळ केलेली असताना तू आम्हाला का सांगितलं नाहीस? मला दोन्ही मुलांना खांद्यावर घेऊन फिरावं लागलं. या माझ्या म्हणण्यावर माझं आणि दुकानदारांचं चांगलंच भांडण झालं. तो म्हणाला नाही सांगितलं काय करणार आहे तुम्ही? या वरून गोष्ट जेव्हा विकोपाला जाऊ लागली तेव्हा लोकांनी मध्यस्थीने भांडण सोडविले. सौ वैतागली, म्हणाली, जाऊ दे ही कटकटच नको ,आता पुढे इथे येणे नको की दर्शन नको. येथेच मी बाबांना सांगते की आता आम्ही परत येणार नाही. असं म्हणून तिनं मंदिराकडे पाहून हात जोडले. मी पण रागातच होतो म्हटलं तुला काय?माझे पाय पोळले. नाही येणार दर्शनाला. त्याच भावनेत आम्ही स्टेशन गाठलं आणि दुसरे दिवशी डोंबिवली!
त्याच रात्री गजानन महाराज सौ च्या स्वप्नात आले. तिला सांगितलं, असं चालायचं नाही. तुला दर्शनाला यावं लागेल, होईल सगळं ठीक. पुढे हे सर्व आमच्या विस्मरणात गेलं.
1979 चा एप्रिल महिना. मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्या दिवशी मी संध्याकाळी घरी आलो. दुसरे दिवशी 'ऑफ' होता .पास तयार होता मी सौ ला विचारलं शेगांवला जायचं का? गाडीला वेळ फार कमी होता, आम्ही घाईने एका पिशवीत कपडे भरले. मोठा परेश नाही म्हणाला. म्हणून आम्ही तिघं घाईने निघालो. घाई घाईत बूट न घालता मी स्लीपर पायात सरकवल्या आणि आम्ही बाहेर पडलो.
कल्याण स्टेशनवर पोहोचलो तो मुंबई-कलकत्ता मेल सुटण्याच्या तयारीत होती. वेळ नव्हता म्हणून समोरच असलेल्या सेकंड क्लास थ्री टायर मधे आम्ही चढलो, म्हटलं पुढील स्टेशनवर फर्स्ट क्लासमधे जाता येईल. माझ्या सोबतच एक अन्य रेल्वेचाच कर्मचारी, जो माझ्या परिचयाचा होता, आत शिरला. त्याला जळगावला जायचं होतं आणि गाडीत जागा मिळण्यासाठी माझी मदत होणार होती. गाडी जेमतेम सुरू झाली आणि टीसी माझ्या जवळ आला. फर्स्ट क्लासचा पास आणि तुम्ही सेकंड क्लासमधे कसे? म्हणून मला शिव्या घालू लागला. त्यानं मला खूप चिडवलं मग त्याच्या लक्षात आलं की यानं आपल्याला ओळखलं नाही. त्यानं चष्मा बाजूला केला, तो माझा जुना मित्र होता ' मधू 'मग आम्ही अगदी एकमेकांना मिठी मारली. खूप दिवसांच्या आमच्या गप्पा बाकी होत्या. तो म्हणाला माझ्याजवळ दोन बर्थ आहेत, वहिनींना व शैलेशला तिथे जाऊ दे आपण तिघं इथेच खाली बसून गप्पा करु. मग काय आमच्या गप्पा सुरू!
गप्पांच्या ओघात कसारा घाटात गाडी पोहोचली .आमच्या सोबत जो रेल्वे कर्मचारी होता त्याने मोजे पायात ठेवून बूट काढून ठेवले होते, त्याला बाथरूमला जायचं होतं, तो मला म्हणाला रत्नपारखी जरा स्लीपर देता का? स्लीपर घालून तो गेला. टाॅयलेट मधून बाहेर पडला तेव्हा मला म्हणाला ' साॅरी 'गाडीच्या धक्कयाने स्लीपर संडासातून खाली पडली .त्याला म्हटलं दुसरीही सोडून दे. हा माझा रोजचा सेक्शन आहे. मी इगतपुरीला स्टेशन समोर दुकान आहे तिथून चप्पल घेईन तू काळजी करू नकोस.
थोड्याच वेळात इगतपुरी स्टेशन आलं, स्टेशनवर मला माझा असिस्टंट ड्राइव्हर भेटला, तो तिथेच राहत होता. त्याला म्हटलं तू घरून किंवा आपल्या रनिंग रूम मधून माझ्यासाठी चप्पल घेऊन ये. मी स्वतः बाहेर पडून दुकानात गेलो, पण त्या दिवशी काय योग होता देव जाणे, दुकानदाराने मला चप्पल देण्यास चक्क नकार दिला. मी तसाच पळत गाडीत शिरलो, गाडीने लगेच वेग पकडला, मला दारातून असिस्टंट ड्राइव्हर हातात चप्पल घेऊन आलेला दिसला,पण आता काही उपाय नव्हता. त्या चपला त्याच्या हातातच राहिल्या. पुढे क्रमशः आम्हा तिघांपैकी एक जळगावला ,एक भुसावळला उतरल्यानंतर "आम्ही ' तसेच अनवाणी शेगांवला उतरलो. स्टेशनवर लगेच संस्थानची बस मंदिरासाठी निघतच होती. त्या ड्राइव्हरला म्हटलं ' दादा ' वाटेत चप्पल दुकानासमोर बस जरा हळू करा मी चप्पल घेऊन मागाहून येईन, त्यावर त्यानं स्पष्ट सांगितलं, आता बस थेट मंदिरात थांबणार!
त्या दिवशी दर्शनाला दुपारी बारा वाजून गेले, एप्रिलच्या त्या उन्हात अनवाणी, पायाला चटके जाणवत मला फिरवून मगच महाराजांनी दर्शन दिलं.
दुपारी एक वाजता आम्ही स्टेशनसाठी निघालो तेव्हा गंमत म्हणजे तीच बस तोच ड्राइव्हर होता. त्याला काकूळतीनी म्हटलं बाबारे माझे पाय पोळलेत!कृपया बस दुकानाशी थांबव मला उतरू दे! यावेळी त्यानं ऐकलं.
मी स्टेशनवर वेटींग रुमला पोहोचलो. सौ कडे पाहिलं, दोघांच्याही मनात एकच भाव प्रकटला. मागील वर्षी याच महिन्यात ज्या कारणासाठी मी विनाकारण अहंपणानी भांडलो, आजच्या प्रसंगातून महाराजांनी मला जणू अनुभव दिला ' बाबारे परमार्थात अहंकाराला काही जागा नाही. सद्गुरूंना शरण जायचं तर मनापासून आणि मनात विनम्रपणे एकच भाव ठेवायचा, तो म्हणजे. श्री गजानन!, जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- विनायक रत्नपारखी
डोंबिवली
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!! श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comentários