अनुभव - 93
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 5 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव93🌺)
*हे परम मंगला श्रीहरी, तुझी कृपा झालियावरी अशुभ अवघे जाते दुरी!*
जय गजानन! मी विनायक रत्नपारखी, मुंबईला असतो, भारतीय रेल खात्यात तब्बल चाळीस वर्षांहून अधिक सेवा दिली, वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालविल्या आणि निवृत्त झालो. माझ्या जीवनाला गजानन महाराजांचा स्पर्श झाला ही माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. गजानन महाराजांविषयी मला आलेले काही अनुभव मागील भागात कथन केले. आज प्रत्यक्ष रेल्वे ट्रॅकवर आलेले एक दोन अनुभव सांगतो.
चाळीस वर्षे रेल्वे ड्राइव्हर म्हणून काम केले, तेही कुठलाही अपघात न होता ही महाराजांचीच कृपा आहे अशी माझी धारणा आहे. या काळात मला काही भयावह, काही दारूण, काही करूण, तर काही विस्मयचकित करणारे अनुभव आलेत. आपण गजानन विजय ग्रंथात, विसाव्या अध्यायात लक्ष्मण हरी जांजळाला रेल्वे धक्क्यावर महाराज भेटल्याचा प्रसंग वाचतो.
असो बोरीबंदरावरी/ लक्ष्मण आला जाया घरी/ तो आगगाडीच्या धक्क्यावरी/ एक भेटला परमहंस.. असाच काहीसा अनुभव देखील माझ्या गाठीशी आहे.
मला मनातून पूर्ण विश्वास आहे की महाराजांनीच माझा सांभाळ केला. तसं पाहता अनुभव तर अनेक आलेत पण सर्वच तर काही इथे सांगता येणार नाही. एक दोन मोजके अनुभव थोडक्यात सांगतो.
नेमका दिवस मला स्मरणात नाही , एकदा सकाळी अकरा वाजता मी हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस पुणे स्टेशनवरून मुंबई साठी राईट टाईम सुरू केली. लोणावळा सोडल्या नंतर गाडी कर्जतकडे घाट उतरू लागते. गाडीचे घाटातील थांबे आहेत खंडाळा ,मंकीहील, ठाकूरवाडी माझी गाडी पन्नास किलोमीटर वेगाने पुढे चालली होती वाटेत 'जामसंग ' कॅबीन गाडीनं पास केलं आणि अचानक एक रेल्वे कामगार मला लाल बावटा दाखवित असलेला दिसला. मी लगेचच त्याच्या जवळ गाडी थांबवली. सकाळची वेळ असल्याने दूरववर ट्रॅक नजरेसमोर होता. कुठे काम सुरू नव्हतं .कामगार दिसत नव्हते, त्यामुळे मी त्याला गाडी का थांबविली?या विषयी विचारणा केली. त्यानं नुसता माझ्याकडे कटाक्ष टाकला. लाल बावटा बाजूला केला आणि मला पुढे जाण्यास अनुमती दिली. तिथे मी दोन चार मिनिटे थांबलो असेन.
गाडी कर्जत स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर दोनला लागली. एक पोलिस कमिशनर रॅकच्या ड्रेसमधील प्रवासी इंजीन जवळ आला व मला म्हणाला साहेब मागे एसी डब्याखाली खूप जोरात आवाज येत होता, आम्हाला वाटलं गाडी रुळावरून खाली पडेल की काय? आम्ही सर्व घाबरून गेलो होतो. ते ऐकून मी लगेच एसी डब्याजवळ जाऊन बघितलं. एसी डब्याखाली पाण्याच्या तीन टाक्या असतात त्यातील एक पडून गेली होती व दुसरी नट बोल्ट ढिले होऊन पडण्याच्या बेतात होती. मी लगेच स्टेशन मास्तरला वाॅकी टाॅकीवरून सर्व सांगून दुरूस्तीची सोय करविली आणि दुरूस्तीनंतर गाडी नेहमीच्या वेगाने मुंबईच्या दिशेने निघाली.
नंतर विचारांच्या ओघात लक्षात आलं की जर चालत्या गाडीत ती टाकी पडली असती तर?तर गाडी रुळावरून घसरून फार मोठा अनर्थ होऊ शकला असता. त्या जंगलात सुनसान भागात आजूबाजूला कुणीही नसताना एकच कुणीतरी आला त्यानं गाडी थांबविली एक टाकी तिथे पडली दुसरी कर्जत स्टेशनला दुरूस्त झाली! लाख मोलाचं काम करणारा कोण होता तो?
तो कोण होता हे कधीच आपल्याला कळू शकत नाही केवळ त्याच्यापुढे नतमस्तक होणं एवढंच आपण करू शकतो. अशीच एक घटना मला आठवते, तो जुलै महिना होता. रात्री कुर्ला टर्मिनस कडून इगतपुरीकडे जाणारी गाडी घेऊन मी निघालो. रात्री साडेबारा एकचा सुमार, कल्याणच्या समोर धोधो पाऊस पडत होता. आमची गाडी खर्डी स्टेशन पास करीत होती. भर पावसात स्टेशन मास्तर दारातून आम्हाला हिरवा सिग्नल दाखवित होता. खर्डी स्टेशन सोडल्यावर पुढे उतार आहे. मी उतारावर इंजिन आयडल केलं. उतार संपता संपता एक सिग्नल आहे. त्याचं नाव आय. बी. सिग्नल आहे (इंटरमिजीएट ब्लाॅक सिग्नल) तो सिग्नल कायम हिरवाच असतो कारण पुढे लगेच चढाव सुरू होतो. माझ्या अनेक वर्षांच्या सेवाकाळात मी तो कधीच लाल पाहिला नव्हता. पण तो त्या दिवशी लाल होता म्हणून मला तिथे गाडी थांबवावी लागली .त्या सिग्नलचं कंट्रोलिंग खर्डी स्टेशन मास्तरकडे असतं, त्या बाॅक्स मधून खर्डी स्टेशनला बोलण्याची सोय असते, म्हणून मी माझ्या असिस्टंटला भरपावसात उतरून फोन करायला सांगितलं पण काही केल्या संपर्क होऊ शकला नाही. म्हणून मग मी नियमाप्रमाणे तिथे पाच मिनिटं थांबून पुढे असलेल्या उंबरमाळी कॅबीन पर्यंत पंधरा किलोमीटर वेगाने गाडी नेत आहे अशी सूचना वाॅकी टाॅकीवरून मागे गार्डला देऊन त्याच्या कडून ऑल राईट ऐकून गाडी सुरू केली.
संथ गतीने गाडी उंबरमाळी कॅबीन पर्यंत पोहोचली. तेथील सिग्नल हिरवा होता, परंतु मागील सिग्नल लाल स्वरूपात क्राॅस केला असल्याने मी तशी माहिती देण्यास असिस्टंटला कॅबीनवर पाठविले आणि इकडे समोरील सिग्नल लाल झाला.
पुढे कॅबीन इनचार्जने जे सांगितले ते ऐकून मी नखशिखांत हादरलो. गॅगमनने नुकतीच माहिती आणली होती की पुढे मुसळधार पावसामुळे दोन तीनशे मीटर ट्रॅक वाहून गेला आहे व दोन्ही रूळ वाकडे तिकडे झाले आहेत. ते ऐकून मी मनातल्यामनात गजानन महाराजांचे आभार मानले. कधीही लाल न राहणारा तो आय बी सिग्नल लाल होता. मी नियमाचं पालन केलं आणि महाराजांची कृपा की तो उंबरमाळी कॅबीन जवळील लाल झालेला सिग्नल आमच्या पुढील जीवनासाठी 'हिरवा ' ठरला !
आता वरील दोन अनुभवांच्या तुलनेत जुना पण आठवणीत आजही एकदम ताजा असा एक अनुभव सांगतो. इ.स.1993 च्या नोव्हेंबर महिन्यातील ही घटना आहे .आमची सौ तेव्हा बाबांची पोथी वाचीत होती, सेवा करीत होती. माझी सेवा मात्र शेगांवची वार्षिक वारी आणि घरातून निघताना व गाडी सुरू करताना महाराजांचं हमखास स्मरण, अशा स्वरूपाची होती.
एका रात्री मी मुंबई-टिटवाळा लोकल घेऊन टिटवाळा येथे पोहोचलो. तेव्हा रात्रीचे साडे बारा वाजले होते. फलाट नंबर दोनवर गाडी घेतली होती. ती शेवटची लोकल असल्याने सर्व प्रवासी उतरून गेल्यावर गाडीत मी व गार्ड असे दोघंच होतो. ती गाडी तेथून लगेच मुंबईकडे न्यायची होती. त्या फलाटावर मुंबईच्या दिशेने थोडा उतार असल्याने गाडी आपोआप रोलडाऊन होते,म्हणून तिथे मागे पुढे दोन्ही कॅबमधे हॅन्ड ब्रेक लावावा लागतो. त्या प्रमाणे ब्रेक लावून मी आणि गार्ड आम्ही आमच्या दिशा बदलल्या. मी पुढे व गार्ड मागील बाजूस येण्यासाठी निघालो. मधे मला गार्ड म्हणाले ' साहेब वाटेत आंबिवलीला चहा पिऊ '. त्याप्रमाणे मी टिटवाळा स्टेशन मास्तरला आंबिवलीला फोन करून आमच्यासाठी चहा तयार ठेवण्यास सांगितले.
आता स्टेशनवर सामसूम झाले होते. कुणीही नव्हते.
पूर्ण गाडीत मागे गार्ड अन् ड्राइव्हर मी! मी मोटरमन कॅबमधे जाऊन माझं रेल्वेचं काम सुरू केलं. हॅन्ड ब्रेक खोलणे, डेस्टीनेशन बोर्ड बघणे, हेड लाईट पहाणे वगैरे. इतक्यात तिथे अंदाजे साडे पाच फूट उंचीची एक व्यक्ती, अंगात पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट परिधान केलेली , येऊन मला विचारू लागली ' आम्ही आत येऊ का?' मी म्हटलं इधर आनेकी परमिशन नही है, पुरी गाडी खाली है आप पिछे जाइए. ' असं म्हणून मी सीट वर बसून सिग्नल मिळण्याची वाट पाहू लागलो .तोच पुन्हा माझ्या कानावर आवाज आला, 'आम्ही आत येऊ का?' यावेळी मात्र मी त्यांना ' या ' म्हटलं. ते माझ्या बाजूला येऊन उभे राहिले. गाडी चालू करते वेळी मी समोर असलेल्या महाराजांच्या फोटोला हात लावून स्मरण करतो. त्यानी मला विचारलं आपण बाबांचे भक्त का? मी हो म्हटलं. पुढे म्हणाले , पुढील स्टेशनवर उतरून आम्ही देखील शेगांवलाच जाणार! ते ऐकून मी त्यांना म्हटलं, शेगांवला श्रीराम सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. खाली तळघरात श्री बाबांचे समाधी मंदिर आहे. तिथे माझे सव्वापाच रूपये द्या. असं म्हणून मी पैशाचं पाकीट उघडलं तर पाकिटात बरोब्बर पाच रुपये चार आणेच होते. मला आश्चर्य वाटलं ,मी पुटपुटलो आज ' ही 'पैसे ठेवायला विसरली वाटतं ?
मी गाडी चालू करण्याकरिता गार्डला दोन बीट (घंटा) दिल्या. गार्डकडून गाडी सुरू करण्याची सूचना आल्यावर गाडी चालू केली. मी त्यांना म्हटलं पुढील स्टेशनवर आपण चहा घेऊ!त्यावर म्हणाले पण तुमच्याकडे तर पैसे नाहीत. मी म्हटलं नेहमीचा माणूस आहे, पैसे पुढे देता येतील. त्यावर म्हणाले असं का?चहा घ्यायचा का? बघू! आंबिवलीला मी लोकल थांब्याजवळ मी गाडी उभी केली.
समोरच कॅन्टीन होतं. मी चहाचं विचारलं त्यावर कॅन्टीनवाला म्हणाला आज दूध नाही, त्यामुळे चहा मिळणार नाही. त्यामुळे मी गार्डला पुढे न येण्याची सूचना करून, मोटरमन ड्राईव्हिंग सीटचे फोल्डींग उचलून त्यांना खाली उतरण्याची सोय करून दिली व सव्वापाच रुपये महाराजांसमोर ठेवून, बाबांचा आशिर्वाद माझ्यासाठी मागा, माझं नाव रत्नपारखी असं सांगितलं.
सवयी प्रमाणे मी समोर बघितलं व गाडी चालू केली पाच एक फूट पुढे जात नाही तोवर मी परत प्लॅटफॉर्मकडे पाहिलं तर ती व्यक्ती क्षणार्धात गायब झाली. मी ताबडतोब ब्रेक लावून गाडी उभी केली व खाली उतरून मागील दोन डबे पाहिले, चहावाल्याला विचारलं, दुसरीकडचा प्लॅटफॉर्म बघितला. रात्री दीडचा सुमार होता. स्टेशनवर अन्य कुणी नव्हतच, मला ते कुठेही दिसले नाहीत. डोक्यात अनेक प्रश्न ठेवून मी गाडी चालू केली. दुसरे दिवशी माझी बान्द्रा लोकलवर ड्यूटी होती. मी सकाळी नाश्ता केला तेव्हा पैसे देण्यासाठी पाकिट उघडलं तर ते पूर्ण भरलेलं होतं. मला आश्चर्य वाटलं.
पण त्याहीपेक्षा आश्चर्याचा धक्का मला पंधरा दिवसांनी बसला!माझ्या पत्त्यावर शेगांवहून प्रसादाचं पाकीट आलं. सव्वा पाच रुपयांची अभिषेकाची पावती आणि मला भक्त क्रमांक देणारं पत्र ( क्रमांक 132041) मला प्राप्त झालं . पण मी तर माझा पत्ता त्यांना सांगितलाच नव्हता!
सारच कसं गूढ होतं. माझ्या कल्पनेच्या बाहेरचं होतं. मी अत्यानंदाने ती अभिषेकाची पावती कपाळाला लावली आणि महाराजांचं स्मरण केलं. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- विनायक रत्नपारखी, डोंबिवली शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comentarios