अनुभव - 94
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 5 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 94🌺)
*भक्त वत्सल करूणाघन, समर्थ सद्गुरू संत गजानन*
जय गजानन! आयुष्यात संकटाची चाहूल लागणे, प्रत्यक्ष संकट येणे आणि संकट येऊन गेल्यानंतर त्या परिस्थितीतून बाहेर येऊन समर्थपणे उभे राहणे, अशा सर्व प्रसंगात जर सद्गुरूंचा कृपाशिर्वाद आपल्या पाठीशी असेल तर त्या प्रसंगाला आपण धैर्याने सामोरे जाऊ शकतो .
मी सौ नर्मदा संजय ढवळे. माझ्या आयुष्यात समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या भक्तीचा उदय झाला तो क्षण मी खूप भाग्याचा समजते. आयुष्यात कुठलीही गोष्ट घडून यायला काहीतरी निमित्त होत असतं. इ.स. 1998 ची गोष्ट असेल, तेव्हा आमच्याकडे चोरी झाली. अशा प्रसंगात माणसाचं मन स्वाभाविकपणे अस्वस्थ होतं. तसं ते माझंही झालं. आमच्या शेजारच्या बाईंनी त्याप्रसंगी मला सुचविलं की रेशीमबाग येथील गजानन महाराज मंदिरात आपण श्री चंद्रशेखर वर्हाडपांडे (कमलासुत) यांना भेटू .त्याप्रमाणे आम्ही त्यांना भेटलो, तेव्हा त्यांच्याशी झालेल्या बोलण्यातून मनाला समाधान झालं आणि मी गजानन महाराजांची भक्ती करू लागले. कमलासुतांचं म्हणणं असं की, चोरी झाली तर ती महाराजांची इच्छा!महाराजांची इच्छा असेल तर आहे त्यापेक्षा दुप्पट देतील!त्यांच्या या वाक्याने मला खूप धीर आला. तिथून मी रेशीमबाग गजानन महाराज मंदिरातील नियमित उपासक झाले. आमच्या घरापासून मंदिर बारा पंधरा किलोमीटर आहे. पण तरीही गुरुवार, प्रकटदिन, ऋषीपंचमीला माझी नियमित हजेरी लागू लागली आणि माझं गजानन विजयचं पारायणही सुरू झालं.
काही वर्षांपूर्वी मी सकाळी सात वाजता गुरुवारचा अभिषेक करावा म्हणून मंदिरात पोहोचले. अभिषेक झाला. दर्शन घेऊन तिथे काहीवेळ थांबून साधारण साडेदहा पाऊणेअकराच्या सुमारास मी माझ्या स्कुटीवरून घरी येत होते. वाडी पोलीसस्टेशन पर्यंत मी पोहोचले होते. माझ्या गाडीची स्पीड फार नव्हती. गाडी माझ्या नियंत्रणात होती पण अचानक एक बाईकस्वार डबलसीट समोरून मला आडवा आला आणि मी पडले. भर रहदारीच्या रस्त्यावर गाडीला ब्रेक लावण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे जोरात ठोस होऊन मी खाली रस्त्यावर पडले. हेल्मेट तुटलं माझी स्कुटी बाजुला रस्त्याच्या कडेला सरकली पण स्कुटीचं म्हणावं असं काहीच नुकसान झालं नाही. पण त्याच क्षणी समोरून एक भरधाव ट्रक मला माझ्या दिशेनं येताना दिसला. मी नकळत रस्त्यावर झोपले. त्या काही क्षणात मला वाटून गेलं की, माझ्या शरीराचा चेंदामेंदा होणार, माझा मेंदू बाहेर येणार, काही क्षणात तो ट्रक पुढे निघून गेला. मला काहीही झालं नाही. मी उठून उभी राहिले, आजूबाजूचे लोक आश्चर्याने माझ्याकडे पहात राहिले. मी उभी राहिले तेव्हा असं जाणवलं की कुणी उंचापुरा माणूस माझ्या डोक्यावर हात ठेवून मला धीर देत म्हणत होता, सांभाळ स्वतःला. सतत स्मरण करीत रहा! ते ऐकून मी मनात महाराजांचे आभार मानले आणि घराकडे निघाले. घरी आल्यावर ती घटना, तो अपघात आठवून मला थंडी वाजून ताप भरला पण दोन चार दिवसात सद्गुरूंच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक झाले.
त्या दिवशी मी जेव्हा महाराजांसमोर हात जोडून उभी झाले, तेव्हा मला पूर्वी मंदिरात झालेलं बोलणं आठवलं. सोबतच मला हेही आठवलं की तेव्हा मी एकवीस दिवस मंत्रजप केला होता. आज मला लक्षात येत होतं की मंत्रजपाचा संबंध चोरी सापडणे वगैरे क्षुल्लक कारणाशी जोडणे योग्य नव्हे. त्याच नामस्मरणाने मला आज संकटात उभे राहण्याची शक्ती प्राप्त झाली होती.
या शिवाय त्या दिवशी मंदिरात एक विषय असाही आला होता, कमलासुत बोलले होते. ' तुमच्याकडे बाळकृष्ण जन्माला येईल!'तुम्हाला मोठी मुलगी आहेच तिला भाऊ होईल. '
२० जुलै २००० ला मला मुलगा झाला, त्याचं नाव मी राजराजेश्वर ठेवलं. राजराजेश्वर विषयीही एक विलक्षण अनुभव गजानन महाराजांनी माझ्या स्मरणात नित्याकरीता नोंदवून ठेवला आहे.
आमचा राजेश्वर दिसायला गोंडस, अंगात भरलेला. कुणीही लोभानं उचलून घ्यावा असा होता. पण तीन वर्षांचा झाला तरी बोलत नव्हता. वरून त्याची तब्येत सारखी बिघडू लागली. माझ्या असं लक्षात आलं की दर महिन्यात अमावस्येच्या आसपास त्याची तब्येत बिघडते आहे. उलट्या जुलाब वगैरे त्रास त्याला हमखास होतोय. मग खूप प्रकारचे उपाय झालेत. अगदी दोरे, धुपारे, तावीज पासून वेगवेगळे उपाय झाले पण तब्येतीला आराम नव्हता. त्याच्या या तब्येतीमुळे आम्ही चिंताग्रस्त झालो. मग एक दिवस डोक्यात विचार आला, आता हे सर्व गजानन बाबांवर सोपवावं. गजानन विजय ग्रंथात मी वाचलं होतं.. दशमी एकादशी द्वादशीला/हा ग्रंथ जो वाची भला/अनुपम येईल भाग्य त्याला/श्री गजानन कृपेने/ गुरूपुष्य योगावरी/जो याचे पारायण करी/ बसून एक्या आसनावरी/ राहुनिया शुचिर्भूत/त्याच्या अवघ्या मनकामना/खचित होतील पूर्ण जाणा/ ... मग आम्हा दोघा नवरा बायकोनी ठरविलं की, महाराजांजवळ बसून
'गजानन विजय ' पारायण करावं.
आता मला नेमका महिना आठवत नाही, २००४ चा तो
' गुरूपुष्यामृत' योग होता. गुरूपुष्यामृताला सकाळी पारायणाला बसावं या हेतूने आम्ही बुधवारी रात्रीच शेगांवला पोहोचलो. मंदिराच्या पश्चिम दरवाज्याजवळ यांची मावशी 'दिंडोकार 'म्हणून राहते ,पोथीत दिंडोकार म्हणून जो उल्लेख आहे त्याच कुटुंबातील हे!माझे मावस सासरे महाराजांच्या मंदिरात फार पुर्वीपासून सेवेत होते, तेव्हाच त्यांची चाळीस वर्षांहून जास्त सेवा झाली होती. त्यांचा मुलगा गणेश दिंडोकार जो आज महाराजांच्या मूर्तीजवळ सेवेत आहे, तो त्यावेळी लहान होता. आम्ही त्यांच्याकडेच उतरलो.
त्यादिवशी सकाळीच आम्ही गादीच्या तिथे मागे, महाराजांचा अभिषेक पाहिला अन् सकाळीच महाराजांसमोर पारायणाला बसलो. लहान राजराजेश्वर कडे लक्ष देण्यासाठी त्याची मोठी बहीण, ती तेव्हा दहा अकरा वर्षांची होती आणि मावस दीर 'गणेश 'या दोघांना सांगितलं. बाहेर वर्हांडा आहे तिथे ते तिघं खेळत होते आणि आमचं पारायण सुरू झालं. आमचे पाच सहा अध्याय झाले असतील, मुलगी आणि गणेश सांगत आले
' राजेश्वर कुठे दिसत नाही . ' आम्ही ते ऐकून किंचित अस्वस्थ झालो. असं म्हणतात पारायणात शक्यतो मधे बोलू नये. मी काहीच बोलले नाही. यांनी त्यांना म्हटलं "शोधा त्याला पुन्हा, असेल तो इथेच !' आमचं वाचन पुढे सुरू झालं, मात्र नवव्या अध्यायात ते पुन्हा येऊन सांगू लागले' राजेश्वर कुठेच दिसत नाही 'ते ऐकून हे उठू लागले. मी त्यांना हात धरून उठू नका म्हणून खुणावलं. मात्र यावेळी मी महाराजांकडे पाहून दोन शब्द बोलण्याची अनुमती घेतली, यांना म्हटलं, ' इथे आपण पारायणात प्रत्यक्ष महाराजांसमोर बसलो आहोत. अर्ध्यावर उठू नये, आज गुरूपुष्यामृत!महाराज जर खरंच अजूनही असतील इथे, व ग्रंथात म्हटलेलं सत्य आहे तर ते स्वतः आणून देतील मुलाला. सोडा त्यांच्यावर सर्व व बसा पारायणाला बघू महाराजांचं सत्य!'एवढं म्हणून मी महाराजांना नमस्कार करून स्वतःला पारायणात झोकून दिलं. हे पण चलबिचल करीत कसेतरी वाचायला बसले.
माझा विसावा अध्याय सुरु झाला. मी तल्लीनतेने वाचू लागले. असो समाधिस्त झाल्यावर/ श्री गजानन साधुवर / म्हणू लागले नारीनर/ आता काय या शेगांवी.. त्या ओव्या वाचता वाचता माझे डोळे भरून आले, माझ्या मातृ ह्रदयात भाव दाटून आले. आता मी वाचू लागले... ऐसे कित्येक बोलती/ परी ती असे साच भ्रांती/महाराजांची दिव्य ज्योती/ अदृश्य आहे तेच ठाया/.. मी खाली बघून वाचत होते आणि मला जाणवलं कुणीतरी समोर आहे, मी समोर बघितलं. एक उंच, पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलेला, कपाळावर लालभडक कुंकवाचा टिळा लावलेला, तेजस्वी माणूस समोर उभा होता. मला म्हणाला, ' हा घे बाई तुझा मुलगा, रेल्वे स्टेशनवर दिसला. आता राहील तुझ्या जवळ, सांभाळ!' मुलगा ठेवून तो माणूस मागील दाराकडे, जिथून आपण पारायण गृहात प्रवेश करतो तिकडे गेला आणि दिसेनासा झाला. ह्यांना आणि बाजुच्यांना मुलगा आलेला कळला, दिसला. पण बाकी ते कुणाला पाहू शकले नाही.
आम्ही एकविसावा अध्याय पूर्ण करून आरती केली. पारायणकर्त्यांना जागेवरच प्रसाद मिळायचा तसा प्रसाद आम्हालाही मिळाला. नंतर मावस सासरे हे सर्व ऐकून पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाले, ' मी इतक्या वर्षांपासून इथे ड्युटी करतो आहे पण एकदाही मला दर्शन झालं नाही. ते दुसरा तिसरा कुणी नसून गजानन महाराजच होते . ओळखता नाही आलं बाई तुला. '
तेव्हा पासून दर महिन्यात अजूनही मी शेगांवला पारायण करते व त्याच जागी बसते. जागा रिकामी नसेल तर वाट पाहते. तिथेच पहिल्या रांगेत, विठ्ठल- रखुमाईच्या समोर! बाजूला कलश, दिवा, अगरबत्ती सर्व असतं. पारायण होत असतं. महाराज प्रत्यक्ष दिसले नाहीत तरीही त्यांचं अस्तित्व सभोवताली जाणवत असतं आणि मनात खोलवर कुठेतरी आपोआप स्मरण होत असतं. श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- सौ नर्मदा संजय ढवळे
डिफेन्स गेट, अमरावती रोड वाडी नागपूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा !! श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Opmerkingen