अनुभव - 95
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 5 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 95🌺)
*ईश्वरी सत्ता अगाध सत्य*
जय गजानन! दवाखान्यात मला मृत समजण्यात आलं. गजानन महाराजांनी मला जिवंत ठेवलं! मी तीन दिवस बेशुद्ध होतो. मला महाराजांनी शुद्धीवर आणलं! मी दीड पावणेदोन वर्ष अंथरुणावर होतो. गजानन महाराजांच्या कृपेने मी हिंडता फिरता झालो. माझ्यावर आठ दहा शस्त्रक्रिया झाल्यात, त्यातील पाच सहा चुकीच्या झाल्यात. महाराजांनी योग्य डाॅक्टरांकडून त्या नीट करवून घेतल्या! माझ्या मिळकतीचा मार्ग फारसा ठीक नव्हता. मला महाराजांनी योग्य मार्गावर आणून सन्नितीचा पैसा गाठीशी बांधून दिला! अशा त्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांना मी मनापासून वंदन करतो!
आयुष्यातील गेली कित्येक वर्षं मी अगदी नियमाने गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय रोज वाचीत आलो आहे. त्यात कुठल्याही कारणाने खंड पडणे मला मंजूर नाही. खंड पडत असेल तर तो दिवस माझा नाही. असे माझे नसलेले काही दिवस माझ्या आयुष्यात उगवले खरे पण तो माझ्या कर्माचा भोग होता. त्याही काळात त्या माऊलीनं माझं रक्षण केलं!कदाचित ती कथा गजानन भक्तांना सांगण्यासाठी मला जिवंत ठेवलं. तीच ही कथा!
मला आठवतं तेव्हा नागपूर -उमरेड रोडवर पुढे कोंडाकोसरा नावाचं गाव आहे. तिथे मला तेव्हा नोकरीच्या निमित्ताने रोज जावं लागत होतं. वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करणार्या आम्ही काही लोकांनी जाण्या येण्या साठी एक गाडी ठरविली होती. सगळे मिळून त्या गाडीनं येणं जाणं करीत होतो. इ.स. २००४ च्या जून महिन्यातील ती ९ तारीख होती. आम्ही सात आठ लोक 1245 नंबरच्या टाटा सुमो गाडीनं तिकडे निघालो. वाटेत पाचगांव फाट्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्या एका ट्रकने आमच्या सुमोला उजव्या बाजूने जबरदस्त धडक दिली. गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. अपघात फार भीषण होता. गाडी कापून आम्हाला बाहेर काढावं लागलं. पाच सहा लोक ऑन दी स्पाॅट गेले. गाडीतील सर्वांना ' नागपूर मेडीकल ' मधे आणण्यात आले. कुणी मदत करणे तर दूर पण समाज कंटकांनी अंगावरील गोफ, साखळी ,पैशाचं पाकीट सगळं चोरून नेलं. माझा उजवा खांदा निखळून हातावर खूप सूज आली त्यामुळे त्या हातातील अंगठी काढता आली नाही. अपघाताची बातमी ज्याच्या त्याच्या घरी पोहोचली आणि थोड्याच वेळात अॅम्ब्युलन्स मेडीकल हाॅस्पिटलमधे ! डाॅक्टरांनी पाच सहा प्रेतं सरळ बाजूला काढून ठेवली. त्यात माझंही प्रेत होतं! हो माझं प्रेत! त्या दिवशी मी थोडा वेळ 'प्रेताचं आयुष्य ' जगलो. मला मृत समजण्यात आलं
अपघाताची बातमी घरी घरी समजली तेव्हा माझ्या वडिलांनी माझे मित्र नगरसेवक गजानन तांबोळी आणि माझे लहान साडू नरेंद्र भांडारकर यांना फोन केल्यावर दोघंही हाॅस्पिटलला पोहोचले. गजानन तांबोळी गजानन महाराजांचे परम भक्त!महाराजांच्या कृपाशिर्वादाने त्यांचा जन्म. म्हणून त्यांचं नाव 'गजानन 'त्या दिवशी शब्दशः गजानन माऊली लेकरासाठी धावली 'गजाननाला ' हाॅस्पिटल मधे अंगठी मुळे माझा हात ओळखता आला. त्याला हातात थोडी हालचाल जाणवली, त्यानं तडफेनं डाॅक्टरांना ते लक्षात आणून दिलं. थोडी वादावादी झाली पण तातडीनं माझं प्रेत स्ट्रेचरवर घेण्यात आलं. तिथेच सलाईन लावून धावपळ सुरू झाली. आता ते प्रेत नव्हतं. तो मी होतो! पण संपूर्ण बेशुद्धावस्थेत!
दोन दिवस मी बेशुद्धावस्थेतच होतो. पत्नी 'रुचिरा' महाराजांना एक सारखी प्रार्थना करीत होती. तिला कुणीतरी सुचविलं, झालं ते फारच भयंकर झालं आहे. हे सर्व वातावरण, ही सर्व घटना आणि सद्य परिस्थिती पाहून असं वाटतंय की ' यांच्यावरून दही भात उतरवून, तो अपघात झाला त्या ठिकाणी टाकून दे ' हिनं ते ऐकलं, योगायोग की काय कोण जाणे? दुसरे दिवशी सकाळी घटनेच्या ठिकाणी तो दहीभात टाकला. इतक्यात एक काळं कुत्रं तिथे आलं त्यानं तो भात खाल्ला. काही मिनिटातच एक भरधाव मेटॅडोर समोरून येत होती, तिनं त्या कुत्र्याला उडवलं. झाल्या घटने विषयी सर्वांनाच वाईट वाटलं. योगायोगाने त्याच दुपारी मी शुद्धीवर आलो. या विश्वात सभोवताली घडणार्या घटनांचं विश्लेषण करण्याची ताकद आपल्याजवळ नाही हेच खरं! शुद्धीवर येता येता कुणीतरी माझ्या कानात स्पष्ट पणे बोललं ' तुला परत यायचं आहे, तुला काही करायचं आहे! '
मी शुद्धीवर आल्यानंतर सर्व संबंधितांनी मला एका खाजगी रुग्णालयात हालविण्याचा निर्णय घेतला. त्या दवाखान्यात पुढील तपासणी सुरू झाली. त्यातून निदान झालं की, माझा उजवा खांदा गेलाय. दोन्ही हात दोन्ही पाय तुटले आहेत. शरीरात छोटे मोठे सहाशे फ्रॅक्चर्स आहेत. निदान आठ दहा ऑपरेशन्स करावे लागणार आहेत. ते सर्व ऐकून रुचिरानं गजानन महाराजांना तिथेच नवस केला. ' हे गजानन बाबा, जोपर्यंत मिस्टर स्वतःच्या पायावर चालून तुझ्या दर्शनाला शेगांव इथे उभे राहू शकत नाही तोपर्यंत कोणत्याही नातेवाईकांकडे जाणार नाही अन् नोकरी अथवा अपरिहार्य कारणाशिवाय घराबाहेर पडणार नाही!'
त्या नंतर माझ्यावर आठदहा शस्त्रक्रिया झाल्यात शरीरात आठ राॅड टाकण्यात आलेत. दवाखान्यातून सुटी झाली तेव्हा मी आग्रहानी म्हटलं की अॅम्ब्युलन्स प्रथम भक्तीकुंज आश्रम चिखली लेआऊट येथील गजानन महाराज मंदिरात जाईल, तिथे मी मान वर करून महाराजांचं दर्शन घेईन नंतरच घरी जाईन. त्याप्रमाणे खरोखरच प्रथम मंदिराच्या दारात व नंतर मी घरी पोहोचलो. पण माझ्या हालचाली बंद होत्या. मी गादीवरच नियमानं पारायण करीत होतो. महाराजांजवळ रडत होतो. एक दिवस माझे मित्र विनायक जोशी यांनी सुचविलं नागपूरातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डाॅ सतीश काळे यांना दाखव!
डाॅ. सतीश काळे यांनी नव्यानं एक्सरे काढले. त्यांच्या मते पाच राॅड चुकीचे टाकले होते. त्यांनी पुन्हा पाच शस्त्रक्रिया केल्या, राॅड बदलले .डाॅ अभिजीत देव यांच्या दवाखान्यात या शस्त्रक्रिया झाल्यात. जवळपास दोन वर्षे मी बेडवर होतो. पण पुढे महाराजांच्या कृपेने खरोखरच आश्चर्य घडलं. डाॅ. काळेंच्या प्रयत्नांना यश आलं. मी उभा झालो. मी चालू लागलो. या काळात मला मानसिक आधार देण्यात गजानन महाराजांच्या प्रेरणेने माझे स्नेही बबनराव भुयारकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अडीच वर्षांनंतर खाजगी गाडी करून नवसपूर्तीसाठी आम्ही सहकुटुंब शेगांव मंदिराच्या परिसरात पोहोचलो.
मी जेमतेम चालू लागलो होतो. त्या दिवशी मंदिरात दर्शनासाठी मोठी लाईन होती. त्यामुळे घरच्या मंडळींना म्हटलं, तुम्ही दर्शन घ्या मी कार्यालयात एका खुर्चीवर बसून राहतो. मी बराच वेळ खुर्चीवर बसून होतो. साधारण तास सव्वातास झाला असेल. कुणीतरी माझ्या जवळ येऊन माझी चौकशी केली, मला विचारलं तुम्ही इथे का बसलात? मी त्यांना माझी हकीकत कथन केली. तेव्हा त्यांनी बाकी सेवेकरी बोलवून माझी दर्शनाची सोय केली. मला सरळ महाराजांसमोर उभं करण्यात आलं. त्या दिवशी महाराजांची योजना पाहून मी थक्क झालो. माझं पूर्ण कुटुंब आणि मी एकाच वेळी आम्ही महाराजांच्या समोर होतो.
त्यावेळी मी महाराजांसमोर खूप रडलो. सतत एकच प्रश्न विचारत राहिलो. माझं काय चुकलं? माझं काय चुकलं? मागील काही महिन्यांपासून माझ्या मनात एक विचार डोकावत होता की आमच्या अयोध्यानगर येथील साई मंदिरात एका जागेला आम्ही 'द्वारकामाई ' नाव दिलं आहे तिथे गजानन महाराजांची मूर्ती असावी. त्यावेळी मी महाराजांना मूर्तीरुपात तिथे येण्याचं आमंत्रण दिलं!
माझं काय चुकलं? या प्रश्नाच्या उत्तरात माझंच सुप्त मन मला म्हणू लागलं ' तुझ्या या पुर्वीच्या आयुष्यात तू अशी बरीच कमाई केली आहे की जिला नैतिक पाठबळ असू शकतनाही! '
माझ्या सुप्त मनातील ही भावना खरी असावी, कारण आयुष्यातील या घटनेनं माझी मिळकत बरीच कमी झाली पण तेव्हा दोन पैसे जास्त कमावूनही जे समाधान दूर होतं, आज पैसा तुलनेत कमी पण त्यामागे नैतिक पाठबळ असल्याने समाधान फार जास्त आहे. आज मला उजवा खांदा नाही पण मला माझा हात पूर्ण वर उचलता येतो. डाॅ काळेंनी तेव्हा मला सल्ला दिला होता. ज्या देवावर तुझी श्रध्दा आहे त्याच्या मंदिरात घंटी वाजविण्याचा प्रयत्न कर! तो सल्ला कामी आला.
आज अयोध्यानगरातील त्या द्वारकामाईत गजानन महाराजांची मूर्ती आहे. त्या दिवशी शेगांवला महाराजांनी आमंत्रण स्वीकारल्याची ती साक्षआहे.
माझ्या शरीरात आज आठ राॅड आहेत. माझं नाव आहे राजेन्द्र दहीकर. अपघातापूर्वीचा राजेन्द्र आणि आजचा राजेन्द्र या दोघांमधे खूप अंतर आहे. आज शरीर कमजोर जरूर आहे, पण या पुनर्जन्मात महाराजांच्या कृपेमुळे कदाचित मन पूर्वी पेक्षा निर्मळ झालं आहे .त्यामुळे या सर्व अनुभवांचा स्पर्श मनाला जेव्हा केव्हा होतो तेव्हा लगेच तिथे तरंग उठतात. श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- राजेन्द्र दहीकर, नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comments