top of page

अनुभव - 96

Updated: Jun 1, 2020

" श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव 96 🌺)

*गजानन महाराजांची वात्सल्य दृष्टी*

जय गजानन! मी कुठेतरी वाचलं आहे, कधी तरी ऐकलं आहे की, भक्तीमार्गात भक्तांनी संतांना, सद्गुरूंना मनापासून हाक मारली की सद्गुरू हाकेला धावतात. भक्त योग्य दिशेने दोन पाऊले समोर झाला की सद्गुरू त्याच्या दिशेने दहा पाऊले सामोरे येतात.

आपण गजानन महाराजांचे भक्त जमेल तशी शेगांवची वारी करीत असतो. शक्य होईल तेव्हा गजानन विजयचं पारायण करीत असतो. आज आपण शेगांवला भक्तांची खूप गर्दी झाल्याचं बघतो पण फार पूर्वी तिथे एवढी गर्दी नव्हती. फार काय शेगांव फारसं माहिती नव्हतं. गजानन विजय ग्रंथाचाही तेवढ्या मोठ्या प्रमाणावर परिचय नव्हता. अशा वेळी महाराजांनी स्वतः वेगवेगळ्या रुपात भक्तांना अनुभव देऊन, तर कधी शेगांव संस्थानला योग्य कार्यपद्धतीत बांधून, त्या माध्यमातून भक्तांना मार्गदर्शन केल्याचं जाणवतं! याच अर्थाच्या तीन वेगवेगळ्या गोष्टी मला आज तुम्हाला सांगायच्या आहेत.

सौ. मीना आजी दाते तेव्हा नागपूरला महाल भागात राहत असत. त्यांचे यजमान श्री देवीदास दाते हे नागपूर सुधार प्रन्यास मधे अभियंता म्हणून कार्यरत होते. हा त्यांचा अनुभव इ.स.१९७१ मधील आहे. दाते आजोबांची गजानन महाराजांवर खूप श्रध्दा, ते नियमानं रोज एक अध्याय गजानन विजयचा वाचीत असत आणि दरमहा एकदा तरी त्यांची शेगांव वारी ठरली होती. त्या काळात शेगांवला हार पेढ्यांची दुकानं फारशी नव्हती त्यामुळे ते नागपूरहून निघतानाच हार पेढे घेऊन जात असत. त्याकाळी रात्रीच्या गाडीनं नागपूरहून निघायचं अन् शेगांवला सकाळी पोहोचायचं. वेळेवर तिकिट काढलं की प्रवास सुरु! एके दिवशी सकाळी दाते आजोबांनी घरी सांगितलं की 'मी आज रात्री शेगांवला जाणार !' असं सांगून दाते आजोबा ऑफिसला गेले, इकडे आजींनी घरी हार पेढे आणून ठेवले. पण त्या दिवशी ऑफिसमध्ये महत्वाची मिटींग आणि अन्य कामाचा व्याप, यामुळे दाते आजोबा घरी वेळेवर परतू शकले नाहीत. गाडीची वेळ निघून गेली, घरी येण्यास त्यांना बराच उशीर झाला. मग दुसरे दिवशी दाते आजींनी घरच्या फोटोला हार घालून नैवेद्य दाखविला.

दुसरे दिवशी दुपारी दाते आजी आणि त्यांच्या सासूबाई दोघी घरी होत्या. दुपारी बारा वाजताची वेळ. त्या जेवणाची तयारी करीतच होत्या, तितक्यात त्यांच्या दारात एक लहान बटू अंगात अर्धी चड्डी, उघडा,कपाळावर कुंकवाचा टिळा,चेहर्यावर तेज, उभा राहिला. त्यानं आवाज दिला! भिक्षां देही! इतक्या वर्षांत त्यांनी कधी माधुकरी मागणारा कुणी पाहिला नव्हता. आजींनी त्याला आत बोलावलं. आदरानं जेवायला वाढलं, दक्षिणा दिली. तो तृप्त मनानं जायला निघाला. निरोप घेताना म्हणाला,

' आई तुझे यजमान शेगांवला आले नाहीत. महाराज वाट पाहत होते!' ते ऐकून आजींचे डोळे टचकन पाणावले. आजींनी पदर डोळ्याकडे नेला, डोळे पुसेपर्यंत

'तो ' निघून गेला होता. रात्री घरी आल्यावर हे सर्व कळताच, त्याच रात्री दाते आजोबा शेगांव दर्शनासाठी निघाले. त्या शेगांव वारीचा त्यांचा आनंद जणू महाराजांनी आपल्याला बोलाविले आहे या कल्पनेने द्विगुणित झाला होता.

दुसरी गोष्ट आहे औरंगाबाद जिल्ह्यातील वरूड या एका अगदी लहान गावात श्री लक्ष्मीकांत बेन्द्रे यांना १९७६ ला आलेल्या अनुभवाची. तेव्हा ते दहावी वर्गात ' मॅट्रीक ' परीक्षा देणार होते .श्री बेन्द्रे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची म्हणावी अशीच होती. त्यांना आप्त स्वकीयांकडून ऐकल्यामुळे गजानन महाराजांविषयी थोडीफार माहिती होती. त्यांच्या मनात तीव्र इच्छा झाली की आपण गजानन विजय ग्रंथ वाचावा. पण घरात महाराजांचा एक जुना फोटो होता या शिवाय अन्य काही साहित्य नव्हतं. कसं असणार? एकतर गाव लहान, शिवाय त्यावेळी या सर्व गोष्टींचा एवढा प्रसार झाला नव्हता. स्वाभाविकपणेच त्यांना गजानन विजय वाचनाची इच्छा मनातच जिरवून टाकावी लागली. ते त्या फोटोसमोर महाराजांना प्रार्थना करू लागले. डोळ्यात पाणी आणून विनविते झाले. महाराज माझं मन तुम्ही जाणता. परीक्षेतील यश हा सुप्त हेतू असला तरी प्रामाणिकपणे मी पारायण करावं असं वाटत होतं ,शेगांवला समाधी दर्शन व्हावं अशीही इच्छा होती. ते शक्य दिसत नाही, तेव्हा आता मी एका वहीत ' गण गण गणांत बोते ' असं लिहून तुमचं नामस्मरण करतो. नंतर त्यांनी खरोखरच एका वहीत नामस्मरण लिहून ती वही पोस्टाने शेगांव संस्थानला पाठविली. गजानन महाराजांच्या नामाने पूर्ण भरलेली ती वही संस्थानला प्राप्त झाली आणि त्यानंतर काहीच दिवसात बेन्द्रे यांना संस्थान कडून प्रसाद रुपात श्री गजानन विजय ग्रंथ पोस्टाने घरपोच प्राप्त झाला. भक्ताची तळमळ सद्गुरूंना कळल्यानंतर गजानन माऊली भक्ताच्या दिशेने चार पाऊले समोर न आली तरच नवल! लक्ष्मीकांत यांनी त्याच ग्रंथावरून लगेच पारायण सुरू केलं. त्यावर्षी योगायोगाने गावातील शाळेतून दहावीच्या परीक्षेत ते एकटेच उत्तीर्ण झाले. नंतर घरातील सर्वच लोक गजानन विजयचं पारायण करु लागले. लक्ष्मीकांत यांची शेगांव वारीही सुरू झाली आणि इ.स.१९८४ ला कायम स्वरूपाची सरकारी नोकरी मिळून, एकूणच जीवन जय हो! गजाननमय हो! होऊन गेलं.

आता तिसरी गोष्ट इ.स.२०१६ ला जबलपूर येथे नर्मदेच्या काठी आलेल्या माझ्या अनुभवाची! खरं तर हा अनुभव माझ्याहीपेक्षा माझी मुलगी शर्वरी श्रीकांत देशपांडे हिचा आहे असं म्हणता येईल.

शाळेला सुट्या लागल्या आणि आम्ही नागपूरहून जबलपूरला माझा मावसभाऊ असतो त्याच्याकडे पोहोचलो. मला आठवतं, आमची शर्वरी तेव्हा नुकतीच पोहणं शिकू लागली होती. जबलपूरला आमचा जो काही मुक्काम झाला त्यात सकाळी नर्मदेच्या घाटावर जाऊन आंघोळ करणे हा आमचा कार्यक्रम होता. त्या प्रमाणे त्याही दिवशी आम्ही तिथे गेलो होतो. शर्वरी तिथेच जास्त खोली नसलेल्या भागात पोहण्याचा सराव करीत होती. माझ्या जवळ लहान मुलगा सार्थक होता. त्याचं वय होतं जेमतेम अडीच वर्षांचं. बाजूला थोड्या अंतरावर काही मुलं खेळत होती. अचानक माझ्या हातून शर्वरीचा हात निसटला. काही क्षणात ती दूर जातेय असं वाटू लागलं. माझ्या जवळ सार्थक असल्याने त्याला मी कुठे ठेवू शकत नव्हतो, शर्वरी ' बाबा ' म्हणून ओरडली. मला क्षणात गजानन महाराजांची आठवण झाली. तिथे खेळत असलेल्या मुलांचं शर्वरीकडे लक्ष गेलं नसावं, कदाचित त्यांना काही ऐकूही आलं नसावं कारण त्यांच्यापैकी कुणीही पुढे आला नाही. पण दुसर्याच क्षणी एक भिल्लासारखा दिसणारा काळा तरूण कुठूनसा तिथे आला, त्यानं काही कळायच्या आत पाण्यात शिरून शर्वरीला खडकावर आणून ठेवलं. माझ्या डोळ्यादेखत मुलगी जाता जाता वाचली. एका खांद्यावर मुलगा दुसरे हातानी शर्वरीला जवळ घेतलं, मग धन्यवाद देण्यासाठी भानावर आलो. आता ती खेळणारी मुलं थोडी जवळ आली, त्यांना म्हटलं तो तरूण मुलगा कुठे आहे?त्यावर ते सर्व म्हणाले ' हमे नही मालूम ',इससे पहले हमने कभी उसे यहां देखा नही, कोई बहारसे आया होगा. मी आजूबाजूला पाहिलं पण जवळपास कुणीच नव्हतं. आम्ही भांबावलेल्या मनस्थितीत घरी पोहोचलो .घरी सर्व घटना सांगितली तेव्हा मावशी मला म्हणाली, ' श्रीकांत, नर्मदा मैया आणि गजानन महाराज दोघांच्या आशिर्वादानेच असं घडू शकतं!' आपण गजानन विजयच्या चौदाव्या अध्यायात नेहमी वाचतो की नाही? नर्मदे मंगले देवी/रेवे अशुभ नाशिनी/मंतु क्षमा करी यांचा/ दयाळू होऊनी मनी/ महाराजांचा अधिकार फार मोठा आहे!

मावशी जेव्हा हे बोलली तेव्हा प्रसंगातील गांभीर्य मनाला स्पर्श करुन गेलं आणि मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो. माझं मन महाराजांच्या चरणी लीन झालं!

वरील तीनही गोष्टींचे संदर्भ वेगळे आहेत, घटना स्थळ वेगळं आहे, पात्रं वेगळी आहेत .पण गजानन महाराजांची वात्सल्य दृष्टी तीच आहे. गजानन माऊलींची कृपादृष्टी तशीच आहे.

ही कृपादृष्टी आम्हा सर्व भक्तांवर सातत्याने रहावी अशी प्रार्थना आपण या निमित्ताने महाराजांना करू या आणि त्या कृपादृष्टीसाठी संतांनी सांगितलेला नामस्मरणाचा मार्ग अंगिकारु या! जेणेकरून स्वाभाविकपणेच आपल्या मुखी येत राहील. श्री गजानन!जय गजानन ! श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- श्रीकांत देशपांडे.

रामेश्वरी, नागपूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या 190

सहयोग राशी रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page