top of page

अनुभव - 97

Updated: Jun 1, 2020

श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव97🌺)

*गजानन माया अघटित, कोण जाणे तिजप्रत*


जय गजानन! मी सरोजा सुधीर अभ्यंकर, पूर्वाश्रमीची सरोजा अरविंद महाजनी. सध्या राहणार मुंबई! १९५२ चा माझा जन्म. माझ्या जन्माच्या वेळी एकूण स्थिती कठीण होऊन मी जाता जाता वाचले, असं आईकडून ऐकलं होतं. माझा जन्म अमरावतीच्या अंबापेठेतला. श्री दादासाहेब चिमोटे माझे आजोबा. ते माझं आजोळ! आजोबांना गजानन महाराजांची भक्ती, त्यामुळे स्वाभाविकच अडचणीच्या वेळी गजानन महाराजांचा धावा होणार हे ओघानेच आले.

माझ्या जन्माच्या वेळी डाॅक्टरांच्या मदतीला एक जर्मन कुटुंबातील नर्स मदतनीस म्हणून होती. पुढे मी मोठी झाले. एम एससी झाले. तेव्हा आजोळी जाणं झालं. त्यावेळी मी आवर्जून त्या नर्स बाईंची भेट घेतली. अर्थात तेव्हा त्या निवृत्तहोऊन वयानं बर्याच मोठ्या होत्या. त्यांना मी माझी ओळख दिल्यावर त्यांना आनंद झाला. त्या म्हणाल्या, ' तुझा जन्म म्हणजे तुझ्यावर गजानन महाराजांची कृपाच म्हणावी लागेल. जन्माच्या वेळी तुझी पल्स लागत नव्हती. तू रडत नव्हती. हालचाल नव्हती. प्रथमतः आम्ही तुला मृत बालकच समजलो. तेव्हा मी तुला उलटं धरलं आणि तुझी पाठ चोळू लागले. बाजूचे लोक चिंतीत होते. त्यांची प्रार्थना सुरू होती आणि खरोखरच चमत्कार झाला. तू रडली. तू रडली आणि आम्ही सगळे हासलो! '

आज वयाच्या ६८ व्या वर्षी पूर्वायुष्याचा विचार केला तर गजानन महाराजांनी जन्मापासून केलेली कृपेची उजळणी आयुष्यात अनेकदा मी अनुभवली, असं मला वाटतं! मी सहाव्या सातव्या वर्गात असतानाची गोष्ट. तेव्हा आम्ही सागरला डाॅ हरिसिंग गौर विश्वविद्यालयाच्या कॅम्पसमधे रहात असू. आमचे बाबा डाॅ अ.वि.महाजनी तिथे प्राध्यापक होते व पुढे डीन म्हणून निवृत्त झाले. एकदा बाबांना पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त केले. डाॅक्टर झाले, घरगुती उपचार झाले, मिल्ट्रीचं हाॅस्पिटल होतं तिथेही दाखवून झालं. पण तब्येतीत फरक पडला नाही.

आपण गजानन विजयच्या विसाव्या अध्यायात वाचतो तशी स्थिती उद्भभवली.

वाताचा झाला विकार/ जानकाबाईस साचार / पोट दुखे वरच्यावर/ काही उपाय चालेना.

तेव्हा बाबांची काकू पुण्याला राहत होती. ती गजानन महाराजांची भक्त! तिने पुण्याहून पोस्टाने महाराजांचा अंगारा पाठविला. बाबांनी तो प्रार्थनापूर्वक श्रध्देने घेतला आणि बाबांची पोटदुखी गेली.

पुढे महाराजांच्या कृपेने १९७९ साली माझं शिक्षण पूर्ण झालं. मी एम एससी. पीएच डी झाले. डाॅक्टरेट मिळविल्या नंतर लोकांनी चिंता व्यक्त केली की एवढी शिकली, लग्नासाठी मुलगा मिळेल का? पण महाराजांच्या कृपेने जोडीस जोड शिक्षित जोडीदारही मिळाला.

लग्नानंतर आम्हाला नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याचा योग आला. आम्हाला कन्यारत्न प्राप्त झालं. मला आठवतं इ.स.१९९३ ची ही घटना आहे. तेव्हा आम्ही नागपूरला होतो. ते उन्हाळ्याचे दिवस होते. एक दिवस दुपारी मी घरी आंब्याचा रस काढीत होते.दारावरची बेल वाजली, ह्यांनी दार उघडलं. एक किमान सहा फूट उंच माणूस, शुभ वस्त्र परिधान केलेला, दाढी मिशी वाढवलेला, डोळ्यात तेज दिसत होतं असा दारात उभा होता. मला आवाज आला, ताई आहेत का? शेगांवहून अंगारा आला आहे. मी घाईने हात धुवून सामोरे गेले. त्यांना आत या म्हटलं. तो माणूस आत येता झाला.

त्यानं माझ्या हातावर अंगार्याची पुडी ठेवली व म्हणाला अकरा रुपये द्या! मी म्हटलं मी एकवीस रुपये देते. त्यावर बोलला मी फक्त अकराच घेणार. नंतर माझ्याकडे पाहून भविष्य सांगावं अशा आवाजात बोलू लागला. ' ताई तुम्ही गजानन विजय पारायण करता आनंद आहे. तुम्ही ७, ८,९ अध्याय वाचत चला. फारच अडचण झाली तर १० व११ अध्याय वाचा. तुमच्या वयाच्या पंचावन्न वर्षे पर्यंत चांगले दिवस आहेत. पुढे गंडांतर आहे, संकट आहे. जे होईल त्यात त्रागा करीत बसू नका, संबंधित व्यक्तींना क्षमा करा ! तुमची मुलगी छान शिकणार आहे. ती नाव काढील. तुमचा उदय इथून पश्चिम दिशेला आहे! ठीक आहे, येतो मी!'

एवढं बोलून तो निघून गेला. आजूबाजूला तो कुठे दिसला नाही.

कालांतरानी त्या दिवशी सांगितलेल्या सर्व गोष्टी सत्यात उतरल्या. आम्ही मुंबईला आलो, म्हणजे पश्चिमेला आलो. मुलगी इंजिनियर झाली. मी सांगितल्याप्रमाणे अध्याय वाचू लागले. वयाच्या पंचावन्न वर्षे पर्यंत सर्व व्यवस्थित, सुरळीत पार पडलं. नंतर थोडा अडचणीचा काळ उद्भभवला. मिस्टरांना थोडा गंभीर स्वरूपाचा आजार झाला. मात्र त्या परिस्थितीत कुठलाही त्रागा न करता, त्रास करून न घेता 'त्यानं ' सांगितल्याप्रमाणे परिस्थितीला विचारपूर्वक सामोरं जाणं आवश्यक होतं. त्यासाठी महाराजांनी योग्य ती प्रेरणा दिली.

मुलीचं शिक्षण झालं होतं दिसायला सुस्वरुप होती पण लग्न ठरत नव्हतं. मिस्टरांची तब्येत ठीक नव्हती ते अंथरुणावर होते अशा सर्व स्थितीत मी काही काळ डिप्रेशन मधे गेले, जगणं नकोसं वाटू लागलं. मनाच्या विषण्ण अवस्थेत एकदा माटुंग्याला रेल्वे ब्रिजवर मी रात्रीच्या वेळी चालत होते, मनात नक्की काय भावना होत्या माहिती नाही पण एकीकडे जीवाचं बरंवाईट करावं असंही असेल कदाचित, अचानक माझ्या समोर तीच व्यक्ती पुढे उभी झाली. हाताने वाट अडवून मला म्हणाली

' ताई घरी परत जा मुलीला तुझी गरज आहे. 'मी भानावर आले आणि आयुष्यातील ती वेळ टळली.

पुढे मिस्टर पूर्ण बरे झाले. मुलीचं लग्न झालं, तिला दिवस गेलेत. साधारण महिना झाला असेल आणि मुलगी अचानक भ्रमिष्टासारखी वागायला लागली. दिवस समोर सरकत होते पण परिस्थिती जास्तच बिकट होत होती. काॅऊन्सिलर, हितचिंतक सगळ्यांशी विचार विमर्श झाला. सगळ्यांनाच वाटलं नाॅर्मल मूल जन्माला येणं कठीण आहे. काहींनी सुचविलं तुम्ही गजानन महाराजांना साकडं घाला. मी महाराजांना प्रार्थना करू लागले. सातव्या महिन्यात गजानन महाराज माझ्या स्वप्नात आले. ते बोलले

'कठीण प्रसंग आहे तुला तुझे काहीतरी दान करावे लागेल ' माझं अन्नदान, गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करणं आदी चालूच होतं. मी विचारात पडले की या शिवाय काय दान करावं? मग महाराजांचं स्मरण करून शेवटच्या काही महिन्यात रोज ठरलेले पाच अध्याय वाचून महाराजांना प्रार्थना करू लागले. ' माझं डोकं व तब्येत उत्तम आहे. बाळाला जो त्रास होणार असेल तो मला होऊ दे व माझे जे उत्तम आहे ते बाळाला दे!'

डिसेंबर २०११ ला अगदी गोड आणि नाॅर्मल मुलगी जन्माला आली. मला गोड नात झाली आणि दुसरीकडे मला ' रुमेटाॅईड-अर्थराॅईटीस '( आमवात) झाल्याचं निदान झालं. माझ्या हालचालींवर मर्यादा आल्यात. वयाच्या साठाव्या वर्षी सहसा हा रोग होत नाही, असं जाणकारांचं म्हणणं. माझी त्यावेळपर्यंतची प्रकृती लक्षात घेताही अशी काही शक्यता नव्हती. पण मला तो आजार झाला हे खरं! कारण काहीही असो बाळ मात्र पूर्ण नाॅर्मल जन्माला आलं ही वस्तुस्थिती जास्त आनंद देणारी होती.

आता हळूहळू माझी प्रकृती सुधारते आहे हे खरं! पण तसही एकदा पैलतीराकडे नजर लागल्यानंतर नवीन पिढीची प्रगती हाच तर खरा आनंद आहे आणि त्यातही त्या प्रगतीला सद्गुरू कृपेचा आधार मिळू शकणार असेल तर मग काय? श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- सौ सरोजा सुधीर अभ्यंकर

सीबीडी बेलापूर नवी मुंबई

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!

(या पुस्तकात पन्नास अनुभव आहेत)

पृष्ठ संख्या 190

रुपये पन्नास फक्त

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page