अनुभव - 98
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 4 min read
Updated: Jun 1, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव ९८ 🌺)
*भाविकांचा देव असतो*
जय गजानन! आयुष्यात संतकृपा लाभायला आणि सद्गुरूंचे आशिर्वाद मिळायला नशिबात योग असावा लागतो. आई वडीलांची पुण्याई पाठीशी असावी लागते. माझे वडील एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांनी गावात सिंचनाची सोय व्हावी म्हणून तिथे एक धरण असावं यासाठी अलोट प्रयत्न केलेत, त्यात त्यांना यशही आलं! वडिलांच्या कामामुळे आईला तीर्थयात्रा घडली नाही. ती म्हणायची तीर्थक्षेत्र, सद्गुरू कृपा हे भाग्यानंच घ्यावं लागतं. माझ्या नशिबात आई-वडिलांच्या आशिर्वादाने हा योग होता असं दिसतं!
एक वर्षापुर्वी मला गजानन महाराजांची ओळखही नव्हती. मी शेगांवचं नाव ऐकलं नव्हतं. मला गजानन विजय ग्रंथ माहित नव्हता आणि आज मी गजानन महाराजांविषयी अनुभव लिहायला घेतलाय हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
मी धर्मराज गोपाळ मोरे, तसं माझं मूळगाव 'नाशिक' पण सध्या रायगड जिल्ह्यातील 'नागोठणे 'येथे रिलायन्स कंपनीत कामाला असतो. स्मार्ट फोनच्या आजच्या युगात आपण सर्व व्हाट्सअॅप वर व्यस्त असतो. मागील साधारण दीड पावणेदोन वर्षांपासून किंवा थोडं नेमकं बोलायचं तर मागील नव्वद गुरुवार पासून दर गुरुवारी श्री गजानन महाराजांविषयी भक्तांना आलेल्या अनुभवांचं संकलन करून ते शब्दांकित करून प्रकाशित करण्याचं काम श्री जयंत वेलणकर करीत आहेत. मागील वर्षी अंदाजे एप्रिल महिन्यात सदतीस क्रमांक असलेला, श्री सीताराम स्वामी बडोदा, यांचा ' गुरूतत्वाचे आकर्षण 'या शीर्षकाचा अनुभव कुणीतरी मला व्हाट्सअॅप केला. त्यात आन्ध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील 'स्वामी ' यांना शेगांवच्या गजानन महाराजांचे आकर्षण निर्माण झाल्याचा अनुभव वाचून, माझ्या मनात श्री गजानन महाराजांविषयी कुतूहल निर्माण झाले. मी श्री जयंत वेलणकरांना फोन करून त्यांनी मला गजानन महाराजांविषयी अनुभव नियमित पाठवावे अशी विनंती केली. त्यातून वेगवेगळे अनुभव वाचून ' गजानन महाराज ' गजानन विजय ग्रंथ 'याविषयी मनात एक उत्कट आकर्षण निर्माण होऊन मी गजानन महाराजांना प्रार्थना केली की, 'महाराज मलाही तुमचा आशिर्वाद लाभू द्या!'
मला आता गजानन विजय ग्रंथ हवा होता. मी ना कधी शेगांव पाहिले ना कधी विजय ग्रंथ! पण मनात वाटत होतं की हा ग्रंथ महाराजांच्या चरणाला स्पर्श होऊन माझ्याकडे यावा. मी महाराजांना तशी प्रार्थना करून, माझे व्हाट्सअॅप ग्रुपवर परिचित झालेले मात्र ज्यांना कधी पाहिले नाही असे अॅड. गिरीश दुबे, चिखली येथे असतात. त्यांना मी फोन करून विजय ग्रंथ हवा आहे असं सांगितलं. त्यावर ते बोलले, कधी कधी माझ्याजवळही ग्रंथ असतात पण सध्या नाहीत. चिखली- शेगांव अंतर तसं बरंच आहे त्यामुळे सध्या ग्रंथ पाठविता येणार नाही पण जसं शक्य होईल तशी मी काही तरी व्यवस्था करीन! एवढं बोलून त्यांनी फोन बंद केला. मी महाराजांना नमस्कार करून माझ्या कामाला लागलो.
दहाच मिनिटात दुबेंचा फोन आला, म्हणाले 'मोरे 'तुम्ही भाग्यवान आहात. आपलं बोलणं झाल्यावर मला आमच्या एका मित्राचा अचानक शेगांवहून फोन आला. त्यानं विचारलं मी शेगांवहून तुझ्याकडे येतो आहे, काही आणायचं आहे का? माझ्याकडे ग्रंथ पोहोचताच मी पोस्टाने ग्रंथ व प्रसाद तुमच्या पत्यावर पोस्ट करतो. अक्षरशः मनात तीव्रतेने वाटल्यानंतर एका आठवड्याच्या आत माझ्या इच्छेप्रमाणे गजानन विजय ग्रंथ व शेगांवहून आलेला प्रसाद माझ्या हाती होता. जे अनुभव मी वाचीत होतो, त्याची थोडी प्रचिती मलाही आली होती.
विजय ग्रंथ हाती आला तेव्हा घरात मोठ्या मुलाच्या अॅडमिशन विषयी आमची चर्चा सुरू होती. त्याला पुण्याला एका विशिष्ट काॅलेजात प्रवेश हवा होता. मी मुलाला म्हटलं तुझ्या मनाप्रमाणे प्रवेश झाला तर आमच्या सोबत शेगांवला चलशील का? मी आता पारायणाला सुरुवात करतोय, बघू या काय होतं ते? माझं पहिलं पारायण पूर्ण झालं आणि मुलाला त्याच्या मनाप्रमाणे पुण्यात अॅडमिशन मिळून आम्हा सर्वांच्या मनात गजानन महाराजांविषयी श्रध्दा दृढ झाली.
दरम्यानच्या काळात मला नाशिकला जाण्याचा योग आला. नाशिकच्या दोन व्यक्तींचे अनुभव मी वाचले होते. एक अॅड.शामा भुसे व दुसरा अनुभव शीतल करंदीकर यांचा! ते दोन्ही फोन नंबर मिळवून मी नाशिकला त्यांची भेट घेतली. दोघीही महाराजांविषयी खूप बोलल्या.
शीतल करंदीकरांकडे श्री गजानन महाराज उपासना होते असं मला कळलं होतं. योगायोगाने माझ्या वाढदिवसाला मला उपासना करण्याचा योग आला. ( उपासने विषयी विस्तृत माहिती 'श्रीगजानन अनुभव 'पुस्तकात आली आहे) उपासना करून मन शांत झालं. शिवाय करंदीकरांकडून श्री गोंदवलेकर महाराजांचं प्रवचनाचं पुस्तकही मिळालं. असो हे सर्व मी यासाठी सांगितलं की गजानन महाराजांच्या अनुभवांच्या माध्यमातून आणि गजानन महाराजांमुळे या काळात महाराजांनी खूप छान छान माणसं सोबत जोडून दिलीत.
सीताराम स्वामींना मी त्यांचा अनुभव वाचून फोन केला, तेव्हा ते महाराजांविषयी भरभरुन बोलले आणि नुकतंच प्रसिद्ध झालेलं महाराजांवरील पुस्तक ' ओशन ऑफ मर्सी ' ग्रंथाचे लेखक श्री नितीन गोकर्ण यांच्या करवी मला पाठविण्याची सोय केली.
एकंदरीत मागील एक वर्षात ' गजानन महाराज ' या विषयाशी जोडल्या गेलो तेव्हापासून माझं मन असं भारावल्या सारखं होऊन गेलं. या काळात अनेक प्रसंगातून त्यांनी मनात भक्तीभाव जागृत करून मला भाव विभोर करून टाकलं. डोळे अनेकदा पाणावले आणि परवा म्हणजे अगदी या मे महिन्याच्या सत्तावीस तारखेला तर जणू त्यांनी मला धन्य धन्य करून सोडलं!
२६ मे (२०१९)रोजी आयुष्यात प्रथमच शेगांवला जाण्याचा योग आला आणि आम्ही चौघं म्हणजे मी, पत्नी ललिता, मुलं अतुल आणि तन्मय शेगांवसाठी निघालो. महाराजांनी योगही असा आणला की २७ तारखेला लग्नाच्या तेवीसाव्या वाढदिवसाला प्रथमच श्रीक्षेत्र शेगांवला आम्ही उतरलो. तेथील शिस्त, स्वच्छता, भक्तीमय वातावरण या सर्वामुळे मन भारावून गेलं. भक्त निवासात आम्हाला जागा मिळाली. सकाळी लवकरच आम्ही दर्शनासाठी मंदिरात पोहोचलो. लोकांच्या अनुभवातून जे वाचलं होतं त्या सर्व जागा पाणावलेल्या डोळ्यांनीच पाहिल्या. समाधी मंदिर, श्रीराम मंदिर, पारायण मंडप सर्व होऊन प्रांगणात आलो. कळसाकडे पहात मनात विचार उमटला, माऊली काय ही लीला? तुमच्या कृपेने मी धन्य झालो! तोच माझ्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला, मी वळून बघितलं, एक सेवेकरी मला विचारत होते ' माऊली आज गुप्त दानातील पेट्यांमधील दान मोजायचं आहे. या कामात तुम्ही मदत करू शकाल काय? मी त्यांच्याकडे आश्चर्य चकित होवून पाहतच होतो तो बाजूची एक व्यक्ती बोलली. माऊली अहो तुम्ही भाग्यवान आहात. इथे झाडू मारायची सेवा मिळायला महिनोंमहिने वाट पहावी लागते, तुम्हाला तर प्रत्यक्ष लक्ष्मी मोजायची आहे. नाही म्हणू नका. शिवाय नंतर तुमचं आदरातिथ्य करून विशेष प्रसादासाठीही सोय करण्यात येते.
मी भानावर आलो, म्हटलं बाकी गोष्टी काय त्या असू देत पण ही सेवा महत्वाची आहे! चला माऊली!
त्या दिवशी सकाळी साडे आठ ते अकराच्या सुमारापर्यंत शंभर सेवेकरी, काही ट्रस्टी , मी आणि माझ्या सोबत मूर्तीजापूर येथील माझ्यासारखेच एक भक्त ' अमर कोले ' आम्ही हे दान मोजण्याचं कार्य केलं. शेवटी सर्व हिशेबावर आम्हा दोघांची स्वाक्षरी घेण्यात आली. नंतर दोन्ही कुटुंबांचा सत्कार वजा आदर करून, महाप्रसादाची सोयही करण्यात आली.
धन्य ती गजानन माऊली. एका वर्षाच्या काळात अनेक सत्प्रवृत्त लोकांना गाठीशी बांधून, गजानन विजय ग्रंथासह, गजानन महाराज संबंधित साहित्याशी संबंध जोडून दिला. माझ्या वाढदिवसाला उत्तम ग्रंथ मिळवून, गजानन उपासनेतून नामजपाशी जोडून दिलं आणि लग्नाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पहिला शेगांव दर्शन योग घडवून या जीवाकडून मंदिरात सेवा करवून घेतली. माऊली मी धन्य झालो!
आता माऊलीला एकच विनवणी आहे की आम्हा सर्व भक्तांवर असाच कृपेचा वर्षाव होऊ द्या आणि त्या योग्यतेचे होण्यासाठी आमच्याकडून नाम जप होऊ द्या..
श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- धर्मराज गोपाळ मोरे
नागोठणे जिल्हा- रायगड
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-!! श्रीगजानन अनुभव!!
(यात एकूण बावन्न अनुभव आहेत) पृष्ठ संख्या 190 फक्त पन्नास रुपये.
Comments