top of page

अनुभव - 99

Updated: Jun 1, 2020

"श्री"

गजानन महाराज की जय (अनुभव 99 🌺)

*भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट तो राहतसे!*


जय गजानन! अमरावती जवळील ' लाखणवाडी ' हे माझं माहेर, माहेरची मी भाग्यश्री देशमुख! लग्नानंतरचं माझं नाव सौ भाग्यश्री जयंत नायक! माझ्या माहेरी आई-वडील, माझे भाऊ, मी आम्हा सर्वांसाठी गजानन महाराज श्रध्देचा विषय! आमच्या घरी श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण हा नित्याचाच भाग होता.

गजानन विजय ग्रंथात दुसरे अध्यायात गोविंद बुवांच्या किर्तनाच्या आधी बंकटलालला महाराज सुपारी मागतात तेव्हा बंकटलाल महाराजांच्या हातावर दोन चलनी नाणी ठेवतात, त्यावेळी महाराज त्याला म्हणतात ' भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे !' तुझ्या जवळ ती भाव भक्ती आहे म्हणून मी तुला पुन्हा भेटलो!

महाराजांनी सांगितलेल्या या भाव भक्तीचा अनुभव महाराजांनी मला दोन प्रसंगातून दिला ते प्रसंग मी तुम्हाला थोडक्यात सांगते.

इ.स.१९९७ ला माझं लग्न झालं. लग्नापूर्वी शेगांव वारी वारंवार व्हायची पुढे स्वाभाविकपणेच वातावरण थोडं बदललं. पुढे माहेरी गेले की माझे दोन भाऊ, बालूदादा आणि प्रमोद दादा, दोन्ही वहिनी, आई आणि माझी मुलगी श्रेया असे आम्ही सर्व मिळून शेगांवला जायचो.

आज त्या शेगांव वारीला बरीच वर्षे झालीत, असेच आम्ही सर्व शेगांवला गेलो होतो. वातावरण प्रसन्न होतं छान दर्शन झालं. आम्ही सर्व मंदिर परिसरात उभे होतो. ज्या ठिकाणी देणगी स्वीकारतात व प्रसाद देतात त्या ठिकाणी कुणाच्या तरी हातात मला चांदीच्या लहान पादुका दिसल्या व मला आतून तीव्रतेने वाटलं की आपल्याही जवळ अशा पादुका असाव्यात, म्हणून मग मी हळूच एकटीच त्या ठिकाणी चौकशी करण्याकरिता गेले. मला तिथे कळलं की दोन हजार रुपये दिल्यास अशा पादुका मिळू शकतात. ते ऐकून मन उदास झालं कारण माझ्या जवळ तेव्हा तेवढे पैसे नव्हते. भावाला मागितले असते तर कदाचित त्याच्याजवळ मिळालेही असते पण पुढे त्यानं ते माझ्याकडून स्वीकारले नसते. त्यामुळे तसं करणं प्रशस्त वाटलं नाही. तेव्हा माझी ती इच्छा मी मनातच जिरवली. मात्र महाराजांना मनोमन म्हटलं ' या अशा पादुकांचं पूजन कदाचित माझ्या भाग्यात नसावं!' मनातून थोडं वाईट वाटून रडवेल्या चेहर्यानं महाराजांना नमस्कार केला. वाटलं, कधी पुढे मिस्टरांसोबत येणं होईल तेव्हा बघू. ती इच्छा तशीच मनात ठेवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि शेगांवहून लाखणवाडीला पोहोचलो.

गावात माझा एक चुलत भाऊ असायचा. दुसरे दिवशी सकाळी माझ्या चुलत वहिनी सौ कल्पना देशमुख यांचा मला फोन आला. त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण दिलं. वहिनींकडे जेवण झालं, गप्पा झाल्या आणि मी त्यांचा निरोप घेतला. त्या म्हणाल्या थांब कुंकू लावते. वहिनींनी मला कुंकू लावलं आणि माझ्या हातात एक सुंदर लाल रंगाची डबी ठेवली. ज्यावर लिहिलं होतं ' श्री गजानन महाराज संस्थान शेगांव ' आत होत्या सुंदर चांदीच्या पादुका. त्या पाहून आदल्याच दिवशी शेगांवला मनात निर्माण झालेल्या भावना आठवून, महाराजांचं वाक्य आठवलं ' भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे! ' माझे डोळे भरून आले. वहिनींनी विचारलं का गं काय झालं? मी म्हटलं काही नाही, लाख मोलाची गोष्ट माझ्या हातात ठेवली म्हणून ऊर भरून आला!

लग्नानंतर मी नागपूरला आले. तिथे एका टप्पर वेअर च्या कंपनीत मॅनेजर म्हणून कामाला लागले .काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे .तिथे अर्चना चंदेल नावाची एक मुलगी कामाला होती. तिला वडील नव्हते. घरी आई आणि भाऊ अशी तिच्यावर जबाबदारी होती. सहाजिकच आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अशात तिचं लग्नाचं वय होऊन गेलेलं. चौतीस वर्षाचं तिचं वय, त्यामुळे लग्नाचा प्रश्न भेडसावत होता. बरेच ठिकाणी असं झालं की लग्न ठरता ठरता राहिलं. ती माझ्याशी बरेचदा मनमोकळं बोलायची, आपलं मन मोकळं करायची. तिला माझं शेगांव प्रेम माहिती होतं. तिनं बरेचदा माझ्या तोंडून गजानन महाराजांची महती ऐकली होती.

एकदा ती मला म्हणाली, मॅडम, माझ्या लग्नासाठी तुम्ही एकदा गजानन महाराजांजवळ बोला नं! मी तिला म्हटलं अगं तूच बोल. स्तोत्र किंवा पोथी वाचत चल. त्यावर म्हणाली, मॅडम तुम्ही तर बघतच आहात, माझ्या वरील जबाबदारीमुळे पहाटे पासून रात्री पर्यंत मला वेळ नाही. काय करू? तिला धीर देण्यासाठी मी म्हटलं ' हे बघ काळजी करू नकोस नाहीच काही जमलं तर महाराजांना मनापासून नमस्कार करून दिवसातून फक्त पाच वेळा, 'गण गण गणांत बोते ' नियमानं म्हणत रहा 'महाराजांना प्रार्थना करीत रहा!

मी संध्याकाळी महाराजांसमोर दिवा लावला व महाराजांना प्रार्थना केली ' महाराज अर्चनाचं लग्न जुळवून द्या ' अतिशय गरीब, कष्टाळू मुलगी आहे आणि खरोखर महाराजांनी प्रार्थना ऐकली. काही महिन्यातच अर्चनाचं लग्न जुळलं. ती मला अत्यानंदाने म्हणाली मॅडम शेगांवला जाल तेव्हा माझे अकरा रुपये तिथे ठेवाल. मग हळूच म्हणाली, सध्या माझ्या जवळ पैसे नाहीत मॅडम पगार झाला की देईन. तिला म्हटलं काही हरकत नाही. माझ्या मनात पुन्हा वाक्याची उजळणी झाली. ' भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे. '!

लग्न आठ दहा दिवसांवर आलं असेल, मला अर्चनाचा फोन आला. ती रडत होती. तिला बोलवेना, म्हणून तिची आई बोलू लागली तर तिलाही रडू आवरेना. मला धस्स् झालं. अशा वेळी नको ते विचार मनात येतात. तसे ते माझ्याही आले. त्यांना म्हटलं प्रथम तुम्ही शांत व्हा अन् सांगा काय झालंय ते.

त्या म्हणाल्या मॅडम अर्चनाचं लग्न आठ दिवसांवर आलं. आम्हाला आमच्या परिचयातील कल्पना माहूरकर मॅडम लग्नासाठी आर्थिक मदत करणार होत्या. परंतु त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हाॅस्पिटल मधे आय सी यू मधे ठेवलं आहे. डाॅक्टर म्हणतात किती दिवस लागतील सांगता येत नाही. त्याच आमचा आधार आहेत. त्यांच्या शिवाय लग्न होऊ शकणार नाही.

मी त्यांना धीर दिला, म्हटलं सगळं उत्तम होणार आहे. तुम्ही एक काम करा. मी जाणते तुमची आर्थिक परिस्थिती ठीक नाही, पण त्याही शिवाय खूप काही करता येण्यासारखं असतं. तुम्ही त्यांना हाॅस्पिटल मधे बाकी मदत करा. त्यांच्या जवळ रहा आणि महाराजांना प्रार्थना करीत रहा. महाराजांचं नामस्मरण करा सर्व ठीक होईल.

इकडे मीही लगेच देवाजवळ दिवा लावला. हात जोडून महाराजांना सांगितलं, ' हे गजानना अर्चनाचे लग्न जुळवून आणण्याचा योग तुम्हीच आणला आणि आता लग्नाची वेळ आली तर हा अडथळा? कां बिचारीची परीक्षा बघता? तुम्ही कल्पना माहूरकरांना लवकरात लवकर चांगलं करा. त्याच तिला मदत करणार आहेत. त्यांच्या शिवाय तिचं लग्न होऊ शकत नाही. '

दुसरेच दिवशी अर्चनाचा फोन आला, खूप आनंदात होती. म्हणाली मॅडम, अचानक प्रकृतीत बदल होत कल्पनाताईंची तब्येत ठीक होऊन त्यांना दवाखान्यातून सुटी मिळाली. त्यांची तब्येत चांगली आहे.

अर्चनाचं लग्न थाटात पार पडलं. ना कुठला नवस, ना कुठली कबुली!फक्त भक्ती भाव. महाराजांनी बंकटलालाला दिलेलं वचन ' भाव भक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे !' आजही सत्य आहे याची प्रचिती आली.

मी पाणावलेल्या डोळ्यांनी महाराजांना वंदन करून त्यांचं स्मरण केलं, श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺अनुभव-- सौ भाग्यश्री जयंत नायक

नागपूर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

🌸अवश्य वाचा !!श्रीगजानन अनुभव!!

पृष्ठ संख्या १९०

( यात एकूण ५२ अनुभव आहेत)

फक्त ५० रुपये

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page