अनुभव - 128
- Jayant Velankar
- May 28, 2020
- 3 min read
Updated: Jun 8, 2020
"श्री"
गजानन महाराज की जय
संत गंडांतरा टाळिती अगांतुक असल्यास ते
जय गजानन! आपण गजानन महाराजांचे भक्त ! सहसा आपण घरातून कामासाठी बाहेर पडतो तेव्हा महाराजांचं स्मरण करून घराबाहेर पडतो. त्यातही प्रवासासाठी निघायचे झाले तर महाराजांचं स्मरण होणारच. प्रवासाला निघताना घरात जेष्ठ व्यक्ती असतील तर ते म्हणणार ' सांभाळून जा रे! महाराजांना नमस्कार कर. महाराज काळजी घेतीलच. ' या उलट घरातील जेष्ठच बाहेर प्रवासाला निघालेत तर म्हणतील ' जाऊन येतो. मुलांनो सांभाळून रहा. गजानन महाराज आहेतच पाठीशी. '
वरील दोन्ही प्रकारचा उल्लेख मी यासाठी केला की योगायोगाने अशा दोन्ही बाबतीत गजानन महाराजांनी माझी पाठराखण केल्याचा अनुभव मी घेतला. एकदा मी घरी असताना आणि एकदा मी प्रवासात असताना.
परभणी जिल्ह्यातील ' जिंतूर ' गावचा मी कृष्णा बजरंगलाल साबू. शेगांवच्या इंजिनियरींग कॉलेजातून मी इंजिनियर झालो आणि मागील दहा वर्षांपासून पुणे येथे कामानिमित्त स्थायिक झालो. आमच्या घरी, आजी, आई, बाबा, काका, काकू, मावशी, मामा सर्व कुटुंबच ' गजानन महाराजांचे आम्ही भक्त आहोत ' असं म्हणण्यात आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान प्राप्त करतात. अशा वातावरणात मी लहानाचा मोठा झालो. त्या भक्तीचाच परिणाम की काय, शेगांवला अभियांत्रिकी महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला आणि सर्व गजाननमय होऊन गेलं.
इ.स.२००९ चा तो उन्हाळा मला आठवतो. आमच्या जिंतूर मधे नुकतंच गजानन महाराजांचं भव्य मंदिर बांधून पूर्ण झालं होतं, त्यामुळे गावात महाराजांच्या भक्तीचं वातावरण ओसंडून वाहत होतं. दुसरीकडे तेव्हा आय. पी एल. नवीन होतं. त्याचा उत्साह तरूणांमधे संचारला होता. एक दिवस आई बाबा महाराजांच्या आशिर्वादाने शेगांवला दर्शनासाठी गेलेत. त्या रात्री मी कुठलीशी आय. पी. एल. ची मॅच पहात होतो. घरातील बाकी लोक झोपी गेले होते. आजी जागी होती. ती मलाही निजण्याचा आग्रह करीत होती. पण त्या दिवशी का कोण जाणे मला आतून वाटायला लागलं की मॅच पूर्ण झाली की मगच टीव्ही बंद करावा. त्याप्रमाणे मॅच संपली, मी टीव्ही बंद केला. झोपण्यापूर्वी बाथरूमला जायचं म्हणून मी तिकडे गेलो, तो आमच्या किचनच्या खिडकीतून मला आत खूप प्रकाश जाणवला म्हणून मी दार उघडून पाहिलं तर आत मोठा जाळ झालेला दिसला. सिलिंडर लिक होऊन तो गॅस आणि जवळ सुरू असलेला नंदादीप, यामुळे तो जाळ झाला होता. नशिबाने आग नुकतीच लागली होती. मी मोठ्याने आवाज देऊन सगळ्यांना हाक मारली. माझा लहान भाऊ नरेश. त्याने एक पाण्याची बादली झपकन तिकडे भिरकावली आणि आग विझली. पण गॅस लिक होत असल्याचा आवाज अजूनही येत होता. मग आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक तो गॅस बंद केला. महाराजांच्या कृपेने एक मोठी दुर्घटना टळली होती. बाजूला किचनला आवश्यक कपाटादी फर्निचर होते तिथे महाराजांचा एक फोटो किंबहुना एक स्टिकर लावलं होतं आश्चर्य म्हणजे त्या खालचा भाग जळला भिंतं थोडी काळी झाली पण त्या स्टिकरला काहीच झालं नाही जसंच्या तसं!
त्याच संध्याकाळी तिकडे शेगांवला आई बाबांनी सगळ्यांसाठी महाराजांना हात जोडले होते. आम्ही इकडे महाराजांच्या त्या फोटो समोर नतमस्तक झालो. एक मोठं संकट दूर गेलं म्हणून सर्वांनी महाराजांचे आभार मानले. आम्ही सर्वांनी तेवढ्या रात्री मोठ्याने जयघोष केला ' बोलो गजानन महाराज की जय!'
तो जयघोष माझ्या कानात घुमतच होता आणि पूर्वी मला महाराजांनी एकदा एका प्रवासात कसं वाचविलं होतं तो प्रसंग आठवू लागला.
२००८ च्या जून महिन्यातील गोष्ट. शेगांवला इंजीनियरिंगची दोन वर्षे पूर्ण होऊन मी तिसरे वर्षाची अॅडमिशन आणि होस्टेल अॅलाॅटमेन्टसाठी गेलो होतो. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून, आठ दहा दिवसांची सुटी मनवून काॅलेजला परतावं अशी मनात योजना होती. त्याप्रमाणे मी प्रथम औरंगाबादला जाऊन पुढे जिंतूरला जाणार होतो. पण खामगाव एस टी स्टॅन्ड वरून घरी काकांशी फोनवर बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले, आता पाऊस झाला आहे. तेव्हा आपल्या बी बियाण्यांच्या दुकानात तुझ्या मदतीची गरज आहे तर तू जिंतूरला लगेच निघून ये. ते ऐकून मी प्रथम अकोला-- जिंतूर बस साठी अकोला स्टेशन गाठलं पण २.३० ती बस निघून गेली होती. आता मला हिंगोलीहून जिंतूर बस पकडणं भाग होतं. म्हणून मी अकोल्याहून तशी बस पकडण्याचं ठरविलं .मला बसमधे नेहमी ड्राइव्हरच्या मागे तिसरी चौथी रांग आवडते. त्या प्रमाणे मी एक सीट पकडली. पुढे वाशिमला बस बरीच रिकामी झाली. माझं मनातल्या मनात महाराजांचं स्मरण सुरू होतंच. मला अचानक आतून प्रेरणा झाली की सीट बदलून मागे जाऊन बस. त्या प्रमाणे मी कंडक्टरच्या मागील सीटवर जाऊन बसलो.
गाडीनं वाशिम सोडलं. गाडी कन्हेरगावच्या दिशेने धावू लागली. समोरून एक ट्रक भरधाव येत होता. त्या ट्रक ड्रायव्हरचा ट्रक वरील ताबा अचानक सुटला ती ट्रक आमच्या बसच्या उजव्या बाजूने, म्हणजेच बस ड्रायव्हरच्या बाजूने बस कापत अक्षरशः बसमधे घुसली.
मोठा आवाज, घर्षण, किंचाळ्या याने सगळ्यांचा थरकाप उडाला. समोरून खिडकीची एक कांच तुटून टवका उडाला तो माझ्या चेहर्यावर डोळ्याखाली लागला. महाराजांच्या कृपेने डोळा अगदी थोडक्यात बचावला. मी समोरील दृश्य पाहून हादरून गेलो. दहा मिनिटांपूर्वी ज्या खिडकी जवळ मी होतो ती कापून ट्रकचा काही भाग बसमधे होता. आता बस थांबली होती. अनेक लोकांना गंभीर दुखापत झाली होती.
मी विषण्णपणे त्या खिडकीकडे पहात होतो. गजानन विजय मधील, संत संकटाते वारिती, किंवा ,गंडांतर टाळिती अगांतुक असल्यास ते!. याचा प्रत्यय मला आला होता. आता नवीन बसची प्रतिक्षा करणं क्रमप्राप्त होतं. प्राणावरचं संकट जाऊन अगदी लहान जखमेवर निभावलं होतं. डोळ्यात पाणी आलं आणि ओठावर स्वाभाविकपणेच गजानन महाराजांचं नाव आलं. श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव--कृष्णा बजरंगलाल साबू
जिंतूर / पुणे
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
🌸अवश्य वाचा-!!श्रीगजानन अनुभव!!
भाग एक यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास
भाग दोन यात एकूण बावन्न अनुभव आहेत (५३ते१०४)
फक्त रुपये पन्नास.
Comments