अनुभव - 90
- Jayant Velankar
- May 31, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव90🌺)
*गुरूतत्व एक आहे*
( श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराज)
जय गजानन! आज त्या गोष्टीला एक तप, म्हणजे बारा वर्षे पूर्ण झालीत.पण आम्हा सर्व लोकांच्या मनात, ती आठवण आजही ताजी आहे. एक प्रकारचा अध्यात्मिक आनंद प्राप्त करून देणारी ती गोष्ट. सद्गुरूंची कृपा या दृष्टीने, आम्ही ती गोष्ट आजही मनात जपून ठेवली आहे. गुरूतत्व एक आहे असा संदेश देणारा तो अनुभव, आम्ही मनाच्या कोपर्यात जपून ठेवला आहे.
इ.स.2006 फेब्रुवारी महिन्यातील ही गोष्ट, अहमदाबाद येथील 'त्रागड' येथे आम्ही जेव्हा, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचं मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मंदिरात श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा अशा सर्व देवतांच्या मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून सर्व भक्तांची सोय होऊ शकेल.
मंदिरासाठी जागा घेताना आलेले अडथळे, भूमी पूजनाच्या वेळी उद्भवलेल्या कठीण प्रसंगातून मार्ग निघणे, ऑक्ट्रायसाठी असलेल्या प्रचंड गर्दीतून सहजपणे गाडी बाहेर निघणे वगैरे प्रसंगात श्री गजानन महाराजांच्या कृपेची अनुभूती आम्ही घेतली होतीच. गजानन महाराजांच्या कृपेने मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन, मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेचा दिवस निश्चित झाला.
अहमदाबादच्या सौ.विनीता गोडबोले यांनी मंदिराच्या बांधकामात आम्हाला प्रोत्साहन देऊन आर्थिक मदतही केली होती. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की महाराजांच्या मूर्ती समोर चांदीच्या पादुका असाव्यात. स्थापनेचा दिवस जवळ येत होता. सौ. गोडबोले यांनी आम्हा विश्वस्तांना बोलवून म्हटलं की मला मनापासून असं वाटतंय की, आपण सद्गुरूंसाठी तीन वेगळ्या पादुका घडवून घ्याव्यात, तीन मूर्तींसमोर तीन वर्तुळाकार मांडणीतील पादुका चांदीच्या पत्र्यात घडवून घ्या!
त्यांच्या इच्छेनुसार मग आम्ही अशा पादुका कुठून मिळतील याचा शोध घेणं सुरू केलं. अहमदाबाद सारख्या मोठ्या शहरात ही गोष्ट सहज शक्य होती. पण प्रश्न होता तो 'वेळेचा' उपलब्ध वेळ कमी होता. आम्ही सर्वांनी त्या दृष्टीने बराच प्रयत्न केला, बर्याच सोनारांकडे,दुकानातून फिरलो. पण कुणीही त्या ठरलेल्या वेळात पादुका देण्यास तयार झाला नाही. शेवटी जेव्हा लक्षात आलं की आता पादुका मिळणं शक्य नाही, तेव्हा सर्वानुमते प्रतिष्ठापना झाल्यावर पुढे पादुकांचा विचार करावा इथपर्यंत सर्वांनी मनाची तयारी केली. केवळ पैसा गाठीशी असून चालत नाही, सद्गुरूंची इच्छा, त्यांचा आशिर्वाद महत्वाचा असतो
पादुका पुढे होतील असं एकीकडे ठरलं तरी सगळ्यांचच मन मात्र खट्टू झालंच होतं. अशाच विचारात फिरत असताना, एका ठिकाणी, एका दुकानावरील पाटीकडे काही लोकांचं लक्ष गेलं.. ' साई ज्वेलर्स ' तसंही कार्यक्रमाशी संबंधित अन्य काम होतंच, मनात विचार आला 'साई ज्वेलर्स ' आहे बघूया साई बाबांची कृपा झाली तर. कुणी सांगावं? ह्या विचारानं साई बाबांचं स्मरण करून दुकानदाराजवळ पादुकांचा विषय काढला. दुकानदार म्हणाला, हे काम नं? एक दिवसाचं आहे, सहज व्हायला हवं! त्याला विचारलं तुम्ही कराल? म्हणाला, का नाही करणार? मला द्या, साई बाबांचं काम आहे, यात आनंद आहे. त्याने खरोखरच एका दिवसात तीनही पादुका मनाप्रमाणे तयार करून दिल्यात. आम्ही म्हटलं, चला साई बाबा पावले! पादुकांचा प्रसाद पावला, आम्ही सर्व प्रफुल्लित मनानं प्रतिष्ठापना करण्यासाठी तयार झालो. प्रतिष्ठापनेचा दिवस उगवला. तीन दिवस शास्त्रोक्त पूजा करण्यात आली. ते तीन दिवस, आम्ही सर्व कार्यकर्ते कधीही विसरू शकणार नाही. आम्हा सर्वांना तो मूर्ती स्थापनेचा दिवस आठवतो. आम्ही सर्व लोक अगदी सकाळीच मंदिरात एकत्र जमलो. नामस्मरणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. जयजयकारात आणि नामगजरात सर्वप्रथम श्री दत्तगुरूंची मूर्ती आसनस्थ करण्यात आली. आता क्रमशः तीन मूर्ती आसनस्थ होणार होत्या. श्री गजानन महाराजांच्या त्या मंदिरात, श्री स्वामी समर्थ आणि श्री साईबाबाही विराजमान होणार हे ठरलं होतं.
श्री दत्त महाराज विराजमान झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला आता विराजमान करावे या विचाराने मूर्ती उचलण्यासाठी काही भक्त खाली झुकले, श्री स्वामी समर्थ महाराज की जय म्हणून मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती जागची हालली नाही.
योग्य पध्दतीने मूर्ती उचलायला हवी असं कुणीसं बोललं. पण या आधी तर त्याच मूर्तीची मिरवणूक निघून, शोभायात्रेच्या स्वरूपात सर्वच मूर्ती आजूबाजूच्या वस्तीतून मिरविण्यात आल्या होत्या, म्हणजे मूर्ती उचलण्याचा अनुभव पाठीस होताच. तरीही पुन्हा प्रयत्नपूर्वक मूर्ती हलविण्याचा प्रयास झाला पण आश्चर्य म्हणजे मूर्ती थोडीही जागची हालली नाही. यज्ञ मंडपातून गाभार्यात मूर्ती तर न्यायला हवी ,मग काहींना वाटलं पूजेत काही चूक तर नाही झाली? या विचारानं मग स्वामींना माफी मागून त्यांना भक्तांनी साष्टांग नमस्कार घातला. तरीही मूर्ती जागची हालली नाही.
आम्ही लोक जे, गजानन विजयचं रोज पारायण करणारे तिथे होतो, त्यांच्या मनात हरी पाटलाने प्रयत्न करूनही गजानन महाराज जागचे हालले नाहीत तो पोथीतील प्रसंग उभा राहिला आणि त्या प्रसंगाचं, श्री दासगणू महाराजांनी केलेलं वर्णन, त्या ओव्या सगळ्यांना स्मरू लागल्यात.
हरी पाटील उठवावया/ लागला यत्न करावया/परी ते अवघे गेले वाया/ हलेनात समर्थ मुळी..
स्वामी समर्थांची मूर्ती जागेवरून का हालत नसावी याचा विचार सर्व करू लागले. तिथे एक वयोवृद्ध सेवेकरी होते. ते सगळ्यांना सांगू लागले, आपण गजानन महाराजांचं मंदिर मनात योजून कार्य करतो आहे!प्रथम गजानन महाराजांची मूर्ती आसनस्थ करा नंतर स्वामींना विनंती करा! त्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वानुमते मग प्रथम श्री गजानन महाराजांची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली आणि नंतर स्वामींच्या मूर्तीला प्रार्थनापूर्वक तिथून हालविण्यात आलं, आश्चर्य म्हणजे आता ती मूर्ती विनासायास, सहजपणे उचलल्या गेली. सर्वांनी गजानन महाराजांसह,स्वामी समर्थ, साई महाराज, दत्तगुरू सर्वांचाच उंच स्वरात जयघोष केला.
त्या दिवशीच्या त्या अनुभवानंतर प्रत्येकच भक्त मनातून आनंदित झाला होता. नंतर त्या सर्व मूर्तींसमोर जो तो प्रार्थनापूर्वक हात जोडून उभा राहिला तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येकालाच मनातून एक गोष्ट पटली होती. ती म्हणजे 'गुरूतत्व एक आहे!' आपल्या सद्गुरूंना मनापासून साद घाला ते तुमच्या हाकेला धावून येतील. मग भलेही सद्गुरूंसमोर उभं झाल्यानंतर कुणी ' ओम साईराम ' म्हणेल, कुणी ' श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ' म्हणेल तर कुणी म्हणेल श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव-- श्री महेश नेवरीकर अहमदाबाद
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे
🌸अवश्य वाचा!!श्रीगजानन अनुभव!!
पृष्ठ संख्या 190
सहयोग राशी रुपये पन्नास फक्त
Comments