अनुभव - 10
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Sep 10, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय. ( अनुभव 10 🌻 )
* नर्मदे हर ! जय गजानन! नर्मदे हर ! जय गजानन !*
सर्वांना जय गजानन! मी भास्कर दिक्षित. बरेच वर्षांपूर्वी रेल्वे खात्यातून निवृत्त झालो. रेल्वेत असल्याने सतत गाड्यांशीच संबंध आला आता माझ्या आयुष्याची गाडी ऐंशी च्या पुढे सुरू आहे. आपण सर्व गजानन महाराजांविषयी अनुभव वाचताहात,ऐकता आहात ही आनंदाची गोष्ट आहे कारण त्यामुळे आपली श्रद्धा बळकट होते आणि भक्ती प्रखर होते.
आज मी तुम्हाला गजानन महाराजांविषयी मला आलेला जो अनुभव सांगणार आहे तोही रेल्वे गाडीतच आलेला आहे. मी तरुण असतानाची ही गोष्ट आहे. मध्य प्रदेशातील सातफाटा नावाच्या एका छोट्या गावात असिस्टंट स्टेशन मास्तर म्हणून माझं पोस्टिंग झालं होतं. तेव्हा त्याला केबिन इनचार्ज असही म्हणायचे. माझी मोठी बहीण शांताताई तेलंग तेव्हा इंदौर ला राहत होती. मला आठवतं काही कारणाने मला तिच्याकडे जाणं आवश्यक होतं. तेव्हा खांडवा इंदौर पॅसेंजर होती. रात्रीचाच पूर्ण प्रवास होता. त्या वेळच्या रेल्वे गाड्यांविषयी आजच्या पिढीला कदाचित कल्पनाही करता येणार नाही. गाडीतील दिवे कमी प्रकाशाचे,बसायला लाकडी पाट्यांचा बेंच,कोळशाचं इंजिन,कधी गज नसलेल्या खिडक्या,म्हणजे एकूण स्वरूप आणि दृश्य आजच्या सारखं नव्हतं आणि बाहेरचं दृश्यही आजच्या सारखा झगमगाट नसल्यामुळे दूर कुठे मिणमिणता दिवा दिसला तर दिसणार,तसही रात्रीचा प्रवास अशा वातावरणात अधिकच अस्वस्थ करणारा असतो,अशा सर्व स्थितीत रात्री एक दीडच्या सुमारास खांडवा स्टेशनवर मी गाडीत प्रवेश केला तेव्हा पूर्ण बोगीत आम्ही फक्त चार लोक होतो. दोघांनी वरच्या बर्थवरती चादर टाकून ते आडवे झाले. एक एका कोपर्यात बसला आणि मी आत एका खिडकीशी जाऊन बसलो. आमचा प्रवास सुरू झाला ती पॅसेंजर असल्यामुळे प्रत्येकच स्टेशन वर थांबणार होती. पुढच्याच स्टेशनवर गाडी थांबली आणि सुरू झालं एक थरार नाट्य.!
काही क्षणातच सगळं दृश्य बदलून गेलं!साठ सत्तर लोक एकदम डब्यात चढले आणि पूर्ण बोगी एका विचित्र ऊग्र वासानी भरून गेली. ती एक लग्नाची पार्टी होती,काही स्त्रिया आणि काही पुरूष ! प्रत्येक पुरूष आडदांड आणि काळाकभिन्न. जवळ पास प्रत्येकाने मस्त दारू झोकलेली. प्रत्येकाचे भटारडे डोळे. ती कुठलीशी विशिष्ट जमात होती, त्यांचा एक मुखिया होता. हिंदी सिनेमातील डाकू शोभावा असा प्रत्येक गडी होता. डोक्यावर घुंघट असलेल्या स्त्रिया. मुखिया म्हणेल ती पूर्व दिशा,डब्यात शिरल्यावर बर्थवरती झोपलेल्या माणसाकडे मुखियाची नजर गेली,उंच पुरा रांगडा गडी तो,त्यानी अक्षरशः एखादी वळकटी खाली टाकावी तसं बर्थ वरील माणसाला खाली टाकलं. तोंडानी 'तुम्हारे बाप की गाडी समज रखी है क्या?' म्हणत घाणेरडी शिवी हासडली,दुसर्याचीही तीच गत केली. भानावर आले तेव्हा दोघेही चळचळ कापत होते. 'भागो साले यहांसे!' मुखिया ओरडला कसबसं सामान घेऊन ते दोघे आणि खाली असलेला तिसरा, तिघही खाली उतरले आणि गाडी सुरू झाली माझ्या आजुबाजुला असलेल्या स्त्रियांनी घुंघटा आडून माझ्या कडे पाहिले आणि तोंडावर बोट ठेवून मला चूप बसून रहा अशी खूण केली. मी भानावर यायच्या आत गाडीनी गती पकडली होती आणि माझ्या ह्रदयाच्या ठोक्यांनीही. काही वेळातच मुखियाचा मोर्चा आतील कम्पार्टमेन्ट कडे वळला आणि त्याची नजर माझ्यावर पडली. तो जोरात ओरडला 'ये साला कौन बैठा है यहां पर ?' मुखिया चं पुढील वाक्य माझ्या ह्रदयाचा थरकाप करीत माझ्या कानावर आदळलं, ' ठीक है एक काम करते है शादी तो बहोत बढीया हो गयी लेकीन नर्मदा मैया को बली चढाना बाकी रह गया, आगे नर्मदा है इसका बली चढा देते है! मला ते ऐकून दरदरून घाम फुटला .
पुढला प्रवास,मोरटक्का ,नर्मदेवरील पूल,मला पुढे दिसू लागलं आणि दिसू लागलं माझं मरणआणि आठवण झाली माझ्या दैवताची 'गजानन महाराजांची ' नित्य नियमाने गजानन विजय वाचणारा मी,मला आठवला चौदावा अध्याय आणि आठवली नर्मदा नदी. आता मी थोडा शांत झालो आणि महाराजांचे शब्द स्मरू लागले.
जय जय नर्मदे निरंतर/ ऐसेच रक्षण अंबे करी.
मग काय डोळे शांत मिटले आता एवी तेवी मृत्यू अटळ आहे यातून वाचण्याची शक्यता एकच 'गजानन महाराज ' आणि 'नर्मदा मैया ' महाराजांना जीवाच्या आकांतानी साद घातली,म्हटलं महाराज तुम्हीच आता रक्षण कर्ते. मला कथा कथन वगैरे माहिती नाही पण माझ्यावर कृपा करा आणि आज माझ्या मुखातून नर्मदा स्तुतीचा झरा वाहू द्या. मला एक प्रकारची वाचा सिध्दी प्रदान करा! नंतर नर्मदेला हात जोडले. आई महाराजांनी तुझी स्तुती केलेली आम्ही वाचतो.
नर्मदे मंगले देवी / रेवे अशुभ नाशिनी
मंतू क्षमा करी यांचा / दयाळू होऊनी मनी
'या महाराजांच्या भक्ताला सहाय्य कर'आणि मग मी अंगातील बळ एकवटून मुखियाला नमस्कार करून म्हटलं
' मुखिया जी मेरी एक ख्वाॅईश है. मै आपको नर्मदा मैया की एक कहानी सुनाना चाहता हूँ. जो हमारे महाराज शेगांव के संत गजानन महाराज से भी जुडी हुई है.आश्चर्य म्हणजे काही क्षण विचार करून त्यानी लगेच अनुमती दिली. मनात महाराजांचे आभार मानले एक टप्पा तर ओलांडला मला नर्मदेचा पुल पार पडेपर्यंत कहाणी सांगण्याचं दिव्य कर्म आता करायचं होतं. गाडी पुलावरून जाताना काहितरी वेगळाच आवाज येतो हे आपल्याला माहिती आहेच. आता माझी कहाणी सुरू झाली. चौदाव्या अध्यायातील वर्णन मला करायचं होतं, मला आठवून आजही रडायला येतं महाराजांनी त्या दिवशी मला खरंच वाचा सिध्दी दिली की काय कोण जाणे सांगता सांगता पुलाचा आवाज सुरू झाला,संपत आला पण कुणाचंही तिकडे लक्ष गेलं नाही. पूल संपला कहाणी संपली मी जोरात घोष केला. नर्मदे हर/ नर्मदे हर/ नर्मदे हर. काहीच क्षण शांततेत गेले आणि कुणीतरी आवाज दिला. 'नर्मदा मैया की' सगळे ओरडले 'जय 'तीनदा जयघोष झाला. सगळेच कसे संमोहित झाले होते,महाराज पावले नर्मदा धावून आली आणि 'बडवा' स्टेशन आलं ,गाडी थांबली मुखियानी प्रश्नार्थक नजरेनी सगळ्यांना विचारलं ' पुलिया निकल गया?' पण आता दृश्य बदललं होतं नर्मदा मैया त्यांचं दैवत होतीच तिचं गुणगान करणारा मी त्यांचा 'मेहमान ' झालो .त्यांनी खाली उतरून चहा पिण्यासाठी आग्रह धरला,मी बॅग घेऊन खाली उतरलो माझा पुनर्जन्म झाला होता क्षणात सगळं बदललं होतं,पण पुढचा क्षण कुणाला माहिती असतो? त्या स्टेशनवरच मी महाराजांना विनंती केली की,महाराज एका रेल्वे स्टेशनवर तुम्ही 'भास्कराचा ' डोळा चुकवून भलत्याच डब्यात शिरण्याची किमया केली होती आज या 'भास्कराला ' एका वेगळ्याच डब्यात बसविण्याची किमया करून दाखवा ! आणि महाराजांनी किमया केली स्टेशन वरील गर्दीत काय आणि कसा देव जाणे मी दूरवरच्या एका वेगळ्याच डब्यात जाऊन बसलो.
. गाडी सुरू होईपर्यंत धाक धुक होत होती पण एकदाची इंजिन नी शिटी दिली आणि इंदौर च्या दिशेने माझा सुखरुप प्रवास सुरू झाला. मात्र त्या रात्री मी प्रवास संपेपर्यंत दोन्ही जप एकसाथ करत होतो...
'नर्मदे हर ' 'जय गजानन'!
' नर्मदे हर ' 'जय गजानन ' !
🌻 अनुभव-- श्री भास्कर दिक्षीत , नागपूर.
शब्दांकन-- जयंत वेलणकर. 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
दीक्षित साहेब, आपला अनुभव तर्क करण्या पलीकडचा आहे. आपण थोर आहात माउलींनी प्रत्यक्ष नर्मदा मातेला आपल्या रक्षणासाठी पाठवलं. थोर आहात.