अनुभव - 11
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 11, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय
* वारसा हक्काने मिळाली गजानन महाराजांची भक्ती *
माझे आई वडील दोघेही अत्यंत भाविक,गजानन महाराज त्यांचं दैवत! पोथी वाचन आणि महाराजांचं दर्शन हा त्यांचा ध्यास,आणि मी मात्र अगदी वेगळा. अगदी लहानपणी आपल्या मताला तशी काहीच किंमत नसते,त्यामुळे मी केवळ सर्व न्याहाळत होतो.पण वाढत्या वया बरोबर मला असं वाटू लागलं की आपल्या कर्तृत्वावर आपला विश्वास असावा. देव आणि महाराज करण्या पेक्षा लाथ मारीन तिथे पाणी काढीन अशी धमक असावी आणि हे मी वडिलांना बोलूनही दाखवायचो ते म्हणायचे तुझं म्हणणं योग्य आहे फक्त त्या कर्तुत्वाला भगवंताचं अधिष्ठान असावं,आणि पुढे ते असही म्हणायचे की उद्या तुझी मतं बदलतील आणि गजानन महाराजच हे परिवर्तन घडवून आणतील.
आम्ही तेव्हा चंद्रपुर ला रहात असु आणि माझी आई मात्र नोकरीच्या निमित्ताने माझ्या एका भावासह बल्लारशा येथे रहात होती ती गव्हर्नमेन्ट हाॅस्पिटल ला नर्स होती. आईची अचानक जवळच्याच सास्ती नावाच्या गावाला बदली झाली. मधे असणारी नदी ओलांडून त्या गावी जावं लागायचं,नदीवर तेव्हा धड पुलही नव्हता. शिवाय ते गावही फारच लहान होतं. एकंदरीत तिथे आईने रहाणं गैरसोयीचं होतं. त्यामुळे आईने तिथे न जाण्याचा निर्णय घेतला आणि ती एक सुटीचा अर्ज देऊन चंद्रपुर ला आमच्या जवळ आली. त्या नंतर आईनं काय करावं? तिने गजानन विजय ग्रंथाचे रोज एक प्रमाणे लगातार 121 पारायणं पूर्ण केलीत. मला मनात वाटायचं की वडिलांनी बदली साठी काही प्रयत्न करावेत. त्या काळात अनायसेच आई घरी असल्याने वडिलांनी आमचं स्वतःचं घर बांधण्याचा निर्णय घेऊन ते काम सुरू झालं. एकीकडे बांधकाम पूर्ण होत आलं. आईची पारायणं पूर्ण झालीत तेव्हा वडील म्हणाले मी सहज संबधित ऑफिस मध्ये चौकशी करून येतो आणि ते मुंबईला जाऊन आले,त्यांना तिथून सांगण्यात आलं नर्सची संख्या सध्या कमी आहे आणि सध्या चंद्रपुरलाच तशी गरज आहे त्या मुळे आईची बदली चंद्रपुरलाच करण्यात येत आहे. म्हणजे काय?एकीकडे स्वतःचं घरही बांधून तयार आणि दुसरीकडे आईची बदली हवी तिथे झाली. हे सर्व पाहून माझं मन थोडं बदललं आणि गजानन महाराजांनी हळूच मनात प्रवेश केला.
दरम्यानच्या काळात मला नोकरी लागली,माझं लग्न झालं,आणि अति अल्प अंतरानी मला दोन अपत्य झालीत. दोन्ही मुली! दुसरे अपत्याच्या वेळी दोघांमधील कमी अंतर,माझा तुटपुंजा पगार,भविष्यातील जबाबदारी यामुळे आम्हा उभयतांना वाटलं की दुसरी जबाबदारी आता नको,पण वडिलांचं मत मात्र उलट होतं त्यांनी एकीकडे आर्थिक आधार देण्याचंआश्वासन देऊन म्हटलं बघूया काय होईल ते. गजानन महाराज समर्थ आहेत. ते काळजी घेतील. त्या नंतर अशा काही घटना घडून आल्या की आमच्या मताला काही अर्थच उरला नाही आणि नियतीच्या चक्रात दुसरं कन्या रत्न जन्मालाआलं आणि लगेचच माझं प्रमोशन होऊन भरघोस पगार वाढ मिळाली आणि गजानन महाराजांनी मनात नकळत थोडं स्थान मिळवलं.
पुढे 2004 मधे मला वडिलांनी आग्रहानी आर्थिक मदत करून ऑल्टो कार घेऊन दिली आर्थिक सहाय्य करताना ते म्हणाले बालू ( मला वडील बालू म्हणायचे) हा पैसा तू मला परत करायचा आहेस आणि समजा मी मधेच जगाचा निरोप घेतला तर देवाची इच्छा, हा पैसा तुझा! ईश्वरेच्छा बलीयसी! फेब्रुवारी 2005 मधेच वडिलांनी जगाचा निरोप घेतला. जाताना मला म्हणाले , तुझ्यात होणारा बदल मी अनुभवतो आहे तू गजानन विजय वाचत जा तुझं भलं होईल आणि वडील गेले, त्यांचे पैसे देण्याचं ओझं माझ्या मनावर होतं. इ.स. 2007 मधे मला माझ्या आर्थिक परिस्थितीने पैसे देण्याची अनुमती दिली आणि माझ्या मनाने कौल दिला की हे पैसे शेगांव येथे ' आनंद विहार 'ला खोली साठी वडिलांच्या नावाने द्यावे, या आधी मी आई वडीलांबरोबर कधी शेगांवला गेलो होतो पण तटस्थ बुद्धीने.आता मात्र मी शेगांवला गेलो तो भावनिक नात्याने. देणगी देण्याच्या निमित्ताने तेथील सर्व गोष्टी जवळून पाहता आल्या आणि शेगांवनी माझ्या मनात एक भावनिक ओलावा निर्माण केला.
काही वर्ष मधे गेलीत आणि एक दिवस कंपनीत एका पठारवजा जागेवर काही आवश्यक काम करीत असताना एका एकी माझा तोल गेला आणि वरून घसरत,धडपडत,ठेचकाळत,तीस फूट खाली येऊन पडलो नाकाला थोडी जखम झाली आणि मी बेशुद्ध झालो. भानावर आलो तो मला हाॅस्पिटल मधे अॅडमिट केलं होतं मी वाचलो कसा याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मला दवाखान्यातून सुटी मिळाली मी घरी आलो. आमच्या क्वारटरच्या परिसरात एक उषा मधुसूदन मारूवडा नावाच्या दाक्षिणात्य बाई रहायच्या त्या अध्यात्मिक वृत्तीच्या,सत् प्रवृत्ती च्या होत्या, त्या भेटायला आल्या. माझ्या कडे बघताच त्या म्हणाल्या तुम्ही तुमच्या आई वडीलांच्या पुण्याईने वाचलात,मी तुम्हाला प्रामाणिक पणे सांगते तुम्ही शेगांवच्या संत गजानन महाराजांची पोथी ' गजानन विजय'वाचा आणि एकदा आभार मानायला शेगांव ला जाऊन या! तुम्ही सध्या सुटीवर आहात,पोथी देवासमोर बसून वाचायला हवी असही नाही जिथे आणि जशी शक्य होईल तशी वाचा. त्यांचं हे वाक्य कुठेतरी खोल जाऊन माझ्या मनात शिरलं आणि मग मी असं आहे तरी काय ह्या पोथीत ह्याचा शोध घेण्यासाठी म्हणून घरी भावाला निरोप पाठविला घरी असलेल्या पोथ्यांपैकी एक पाठव योग असा की नेमकी वडिलांची पोथी माझ्या हाती आली. मग मी इकडे तिकडे बसत जसं शक्य होईल तसा गजानन विजय ग्रंथ वाचून काढला.
मग काय दासगणू महाराजांची ती रसाळ वाणी आणि गजानन महाराजांनी जिवंत केलेले कल्पनेहूनही सुंदर प्रसंग यांनी माझ्या मनावर ताबा मिळविला नसता तरच नवल. एक प्रकारे वडिलांकडून वारसा हक्काने गजानन महाराजांची भक्ती माझ्या कडे चालून आली .पुढे इ.स.2012 मधे मी आनंद विहार ला पुन्हा माझ्या करिता म्हणून देणगी दिली आणि तेव्हा पासून जवळ पास दर महिन्याला मी शेगांव वारी करतो आहे आणि शक्य तेव्हा गादीसमोर पारायणही. आता मी कंपनीत 'डेप्युटी जनरल मॅनेजर सिव्हील ' असं छान पद भुषवितो आहे,स्वकर्तुत्वावर कामाची छाप पाडतो आहे पण आज माझ्या कतृत्वाला गजानन महाराजांचं अधिष्ठान वडिलांच्या आशीर्वादाने प्राप्त झाले आहे. आज हा क्षण पाहण्यासाठी आई वडील जीवंत नाहीत याची खंत आहे पण त्यांच्याच आशीर्वादाने समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज मला लाभले याचे समाधान आहे. आज आई असती तर हे सर्व पाहून आनंदाने म्हणाली असती...'श्री गजानन जय गजानन !'श्री गजानन जय गजानन!'..
🌺 अनुभव--शशिकांत बोरडकर. गडचांदूर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजां विषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Comments