अनुभव - 12
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jul 24, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय!
* तो वारकरी की देवदूत ? *
गजानन विजय ग्रंथाचा रोज एक अध्याय वाचण्याचा माझा नेम. त्या दिवशी पहिला अध्याय होता , वाचनास प्रारंभ झाला, दासगणूंनी प्रारंभी सर्व देव देवतांना वंदन केलं आहे त्यात मी वाचू लागली.
हे दुर्गे तुळजे भवानी/हे अपर्णे अंबे मृडानी वी तुझा वरद पाणी/ दासगणू च्या शिरावर.
या ओव्या वाचता वाचता डोळे भरून आले आणि मी अंथरुणावर पडल्या पडल्या ढस- ढसा रडू लागले.
हो. गेले दोन महिने मी अंथरुणावरच होती. जानेवारी 2012 ची घटना,अगदी सकाळी मी मुलांना सूर्यनमस्कार शिकविण्यासाठी म्हणून शाळेत गेली आणि गाडी स्टॅंडवर लावताना माझा अंदाज चुकला,दुर्लक्ष झालं आणि माझीच गाडी माझ्या अंगावर पडली. अपघात विचित्र झाला पण फारच गंभीर झाला. माझ्या डाव्या हीपजाॅईंटला प्रॉब्लेम येऊन जांघेतील बाॅल मांडीच्या हाडापासून वेगळा झाला असह्य वेदना होत होत्या,मला डाॅ. नावंदर यांच्या हाॅस्पिटल मधे अॅडमिट करण्यात आलं. डॉक्टरांनी मला तपासलं आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला ते म्हणाले ऑपरेशन करावं लागेल पण जरा काॅम्पलिकेशन्स वाटताहेत. मी अशी बरीच ऑपरेशन्स केली आहेत,पण या केस मध्ये फिफ्टी फिफ्टी चांन्सेस आहेत. आपण प्रयत्न करू पण शक्य आहे जन्म भराकरीता कुबडी अथवा काडीचा आधार घ्यावा लागू शकेल. मी प्रयत्न करतो पण यश भगवंताचे हाती आहे. शस्त्रक्रिया नीट होणं आणि नंतर नीट चालता येणं असे दोन टप्पे आहेत. तुम्ही देवाला प्रार्थना करा !
माझी श्रद्धा गजानन महाराजांवर आहे हे घरचे सगळेच जाणून होते. माझे भाऊजी घरून गजानन विजय पोथी आणि महाराजांचा अंगारा घेऊन आले. मी सद्गुरू श्री गजानन महाराजांना हात जोडून म्हटलं ' महाराज मी अज्ञानी भक्त यातील काही जाणत नाही. आई तुळजा भवानी कुलस्वामिनी आणि तुम्ही सद्गुरू!आता तुम्हीच माझे मार्गदर्शक आणि हितचिंतक! आणि मला ऑपरेशन थिएटर मधे हालविण्यात आलं.
ऑपरेशन नंतर डाॅक्टर म्हणाले आता दोन अडीच महिने अंथरुणावर पडून रहायचं तेही पाठीवर. पाय हलू नये म्हणून घोट्यापासून वर पर्यंत लोखंडी स्टॅंड राहील,नंतर एक्सरे काढू,चांगले झाले तर ठीक नाहीतर परत बाॅल बदलवावा लागेल तीन मोठ्या स्क्रुं च्या सहाय्याने आपण बाॅल जोडला आहे. बाकी त्याची इच्छा! एवढं बोलून डाॅक्टर तर निघून गेले पण माझ्या साठी सुरू झाला प्रचंड मानसिक दडपणाचा काळ,शरीराने अंथरुणावर बंदिस्त,आंघोळ बंद,आता सबकुछ ' अंथरुण' आणि मनात एकच विचार 'दोन अडीच महिन्या नंतर काय होईल?'..
आज हे सांगायला सोपे आहे पण अशी वेळ कधी कुणावर येऊ नये. जो भोगतो त्यालाच कळतं.माझ्यासमोर दोन प्रश्न होते. एक ऑपरेशन यशस्वी झाले का?आणि दोन मी पुढील आयुष्यात कशी चालीन?आणि या दोन्ही प्रश्नांसाठी माझ्या जवळ आधार होता एकच. 'समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज' ! माझ्या खोलीत गजानन महाराजांचा फोटो होता निजल्या निजल्या जे शक्य होतं ते म्हणजे,जमेल तसा एक अध्याय.' गण गण गणात बोते ' नाम जप. कधी मोबाईलवर रामरक्षा. हे सर्व मी करीत होते. आमची कुलस्वामिनी 'तुळजापूर भवानी 'तिचं स्मरण करून मी म्हणायचे आई सद्गुरूंना मी प्रार्थना करते आहे. गजानन महाराजांना म्हणायचे सद्गुरूच मार्गदर्शक असं मी ऐकत आली आहे. तुम्ही हे सर्व योग्य मार्गावर आणाल नं?
मला रडायला येणं हा माझ्या मनातील भावनांचा उद्रेक होता मानसिक परीक्षेच्या या काळात,मी अनेकदा रडली,कधी खिन्न झाली तर कधी अतीशय आर्तपणे महाराजांना कबूल केलं,म्हटलं मी या परिस्थितीतून सुखरुप बाहेर पडली तर तुमच्या मंदिरात प्रगट दिनाचा महाप्रसाद करीन,मला बरं करा मी अकोला ते शेगांव पायी वारी करीन आणि आता निकालाची घडी जवळ आली होती. ऑपरेशन जमलं का? या प्रश्नाचं उत्तर मिळणार होतं आणि अडीच महिन्यानी एक दिवस एक्सरे काढला. महाराजांच्या कृपेने ऑपरेशन यशस्वी झाले होते. पूर्ण हाड जुळले होते. लोखंडी स्टॅंड मधून माझा पाय निघाला होता पण पाय बारीक आणि लाकडा सारखा कडक झाला होता तो आपले काम विसरला होता पण येवढे निश्चित की गेला अडीच महिनाभर मी ज्या राक्षसी शंकेने ग्रस्त होती त्या माझ्या मानसिक अवस्थेतून महाराजांनी मला सुखरुप बाहेर काढलं होतं.
आता दुसरा प्रश्न बाकी होता, मला नीट चालता येइल का? कुबडी सुटेल की नाही?आणि याही प्रश्नाचं उत्तर मला महाराजांनी दिलं,मात्र उत्तर देण्यासाठी महाराजांनी निवडलेली पद्धत मला तरी लाखात एक वाटली,ती पद्धत आयुष्यभर विसरता येणार नाही अशी होती.
एक्सरे रिपोर्ट ठीक आल्यानंतर डॉक्टरांनी मला प्रथम वाॅकरच्या सहाय्याने हळू हळू चालून पहा,पायाला योग्य पद्धतीने माॅलीश करा,तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली पायाची हाल चाल करा असा सल्ला दिला. वाॅकर घेऊन पहिल्यांदा उभी राहिली तेव्हा पायासह संपूर्ण अंग थरथर कापत होतं. माझी बहीण नियमित पायाला माॅलीश करून देत होती. आमच्या परभणीतील डाॅ. गिरीश वेलणकर यांचा योगाचा भरपूर अभ्यास आहे त्यांच्या मार्गदर्शना खाली पद्धतशीर पायाची हालचाल होत होती. जवळपास दीड महिन्यानंतर डॉक्टरांनी कुबड्यांच्या सहाय्याने चालण्याचा सल्ला दिला.
आता मी कुबड्या घेउन चालू लागली होती. विचारपूस करायला हितचिंतक घरी यायचे,जो तो आपापल्यापरीने सल्ला द्यायचा,अपवाद वगळता प्रत्येक जण कुबड्यांची प्रॅक्टीस चालू ठेवा,एकदम त्या सोडू नका,पहा बरं घसराल!सांभाळून चाला,कुबड्या सहजासहजी सुटत नाही बरं मॅडम. अशा सारखं बोलायचा. एखाद्या गोष्टीला वारंवार मनावर बिंबविलं की मन ती गोष्ट स्वीकारायला नकळत तयार होतं . मला मनात वाटायला लागलं की या कुबड्या दीर्घ कालीन आपली सोबत करणार. घरी तेच. रस्त्यावर थोडं बाहेर पडलं तरी तेच. आमच्या घराजवळ सद्गुरू नगर ला असलेल्या गजानन महाराज मंदिरा पर्यंत मी कुबड्या घेऊन जाऊ लागली होती. आणि त्या दिवशी सकाळी काही वेगळच घडलं. मला आठवतं ती जूनची सात तारीख होती. गुरुवार महाराजांचा वार!सकाळी पाच साडेपाच ची वेळअसेल ,मी मंदिराच्या जवळ पास होती. रस्त्यावर अन्य कुणीही नव्हतं तशात समोरून अचानक एक माणूस माझ्या दिशेने चालत आला,अंगावर पांढरे शुभ्र कपडे. अगदी शेगांव पंढरपूर वारीत वारकरी घालतात तसे.तो थेट माझ्या समोर येउन उभा झाला. माझ्या कडे पाहून मला म्हणाला. 'अगं बाई ती कुबडी सोड आता '. त्यावर मी त्याला ऑपरेशनचं आणि डाॅक्टरांनी कुबडी दिल्याचं सांगितलं तसं तो म्हणाला 'हो हो मला सगळं माहिती आहे. ' मी वारकरी मी तुळजापुरलाही जाणार मी पंढरपूरलाही जाणार आणि सर्व जाणणार. त्यानी त्याचा उजवा हात त्याच्या छातीवर ठेवला आणि विश्वासात घेत एखाद्याला सांगावं तसं मला म्हणाला 'तू आता बरी आहेस
मी सांगतोय नं तुला, कुबडी सोड. चालून बघ. असं म्हणत म्हणत तो दूर निघून गेला. ज्याला या आधी मी कधीच पाहिलं नव्हतं आणि नंतरही तो माणूस कधीच दिसला नाही तो माझ्या मनात विश्वास निर्माण करून निघूनही गेला. मी घरी जाऊन मिस्टरांना हे सांगितलं. ते म्हणाले कुबड्या भिंतीला टेकवून ठेव आणि चालून बघ ! अहो आश्चर्यम!मला नीट चालता येत होतं.
महाराजांनी माझं ऐकलं होतं. आता नवस पूर्ण करण्याची जबाबदारी माझी होती. मी आमच्या त्रिमुर्ति नगर येथील गजानन महाराज मंदिरात 2013 च्या प्रगट दिनाला पाच ते सहा हजार भक्तांसाठी महाप्रसाद केला. मात्र काही कारणाने पदयात्रेचं राहून गेलं, यंदा दिवाळीच्या सुमारास आम्ही अकोला-शेगांव पदयात्रेसाठी दिवसही निश्चित केला पण माझ्या उजव्या पायाला पुन्हा थोडा अपघात झाल्यामुळे ती वारी राहिली पण माझा मुलगा शशांक मला म्हणाला आई तुझ्या साठी मी ही पदयात्रा करून येतो आणि त्याने ती यात्रा केली. यावर आमचे एक स्नेही मला म्हणाले अहो तुमच्या मुलानी मातृ ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असतानाच तुम्हाला गुरू ऋणातून थोडी मोकळीक मिळवून दिली आहे. त्यांचं म्हणणं मला थोडं पटलंय,पण आता गजानन महाराज माझ्या कडून वारीचं सत्कर्म केव्हा पूर्ण करून घेतील याकडे मी लक्ष ठेवून आहे. बाकी मनातल्या मनात जप चालू आहे. श्री गजानन!जय गजानन!.श्री गजानन!जय गजानन!..
🌺 अनुभव--सौ. शामा हेलसकर. परभणी
शब्दांकन--जयंत वेलणकर. 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Comentarios