top of page

अनुभव - 13

Updated: Jun 11, 2020

" श्री "

गजानन महाराज की जय

* भक्त वत्सल गजानन महाराज *


आपण जेव्हा शेगांव दर्शनाला जातो तेव्हा श्रींच्या दर्शनासाठी उजव्या हाताला असलेल्या दारातून आत शिरताना हिंदी भाषेत लिहीलेली एक माहिती आपण वाचू शकतो, मंदिर नवीन स्वरूपात साकारण्यापूर्वी हीच माहिती समाधी दर्शनाकरीता उतरण्यासाठी जे दार होतं त्याच्या बाजूला वर टांगलेल्या पाटीवर होती. ती माहिती थोडक्यात अशी की ' श्री गजानन महाराज 8 सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमी च्या दिवशी समाधीस्त झाले,महाराजांनी आधीच याची कल्पना देऊन ही जागा निश्चित झाली होती. महाराज संजीवन स्वरूपात इथे आहेत आणि ते सत्य संकल्पाचे दाता आहेत. याची प्रचिती महाराजांची भक्ती,श्रध्दा आणि निष्ठेने करणारे भक्त घेऊ शकतात. हे सत्य आहे!'

मी जेव्हा जेव्हा ही पाटी वाचतो तेव्हा तेव्हा मनात विचार येतो की श्रद्धायुक्त अंतःकरणानी महाराजांचं स्मरण केल्यावर महाराज आपल्या लहान लहान इच्छा पूर्ण करतात तोच प्रत्येक भक्तासाठी त्याच्या पातळीवर अनुभवच नाही का ?अर्थात कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट महाराजांचं नाव घेऊन केली तरी आपल्या मनासारखी होत नाही पण थोडा धीर धरला तर पुढे जाऊन लक्षात येतं की अरे ही तर महाराजांचीच योजना होती! आणि मग आपलं मन अधिकच आनंदीत होतं आणि आपली निष्ठा अधिक दृढ होते.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. मला आठवतं माझं 'गजानन विजय ' पारायण पूर्ण झालं,प्रसादासाठी काही मंडळींना आमंत्रित केलं होतं,आमचं घर तेव्हा गावाबाहेर होतं वस्ती तुरळक होती मी पुजेची पूर्ण तयारी केली महाराजांसाठी निशीगंधाचा हार आणावा असं मनात आलं. मी आणि माझ्याही पेक्षा माझ्या भावानी जवळ पास ची हाराची दुकानं पालथी घातली पण निशीगंधाचा हार काही मिळाला नाही. मग महाराजांची इच्छा!असं म्हणून पुढील तयारीला लागलो. वेळ पुढे सरकत होता एक एक भक्त येत होता. माझा एक मित्र आणि 'गजानन बाबा 'हा विषय ज्याच्या साठी विशेष आस्थेचा आहे तो महेश कुलकर्णी देखील माझ्या कडे अपेक्षित होता. काही वेळात तो आला,त्यानी पाॅलीथीन च्या पिशवीत एक मोठा हार आणला होता. तो मला म्हणाला विनय महाराजांनी मला प्रेरणा दिली की मी तुझ्याकडे हार घेऊन जावा,आणि मला येताना मनासारखा हार मिळालाही असं म्हणून त्याने पिशवी माझ्यासमोर धरली,मी पिशवीत डोकावलो. आत सुंदर निशीगंधाचा हार होता.

असाच एक प्रसंग,मागे एकदा नरसोबाची वाडी आणि औदुंबर असा यात्रेचा योग आला आणि अचानक थोड्या काळाकरीता मला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. एकदम मोठा प्रवास एकत्र शक्य नव्हता म्हणून मग पुण्याला थांबून नंतर पुढे जा असा सल्ला डाॅक्टरांनी दिला त्याप्रमाणे आम्ही पुण्याला पोहोचलो.बरेच दिवसांपासून दगडू शेठ गणपतीचं दर्शन घ्यावं असं मनात होतं. पुण्याला थांबल्यामुळे महाराजांनी सहाजिकच तो योग जुळवून आणला.मी देवदर्शनाला जातो तेव्हा तिथे जर खूप गर्दी असेल तर मी हार फुलं विकत घेत नाही कारण ते व्यवस्थित अर्पण होत नाही असा माझा अनुभव आहे. आम्ही गणपती दर्शनाला गेलो तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती,बाजुला विकायला सुंदर ताजी लाल फुलं आणि दुर्वा होत्या,प्रथम मला त्या विषयी काही वाटलं नाही,आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे झालो रांग पुढे सरकू लागली आणि माझ्या मनात हुरहुर सुरू झाली की आपण रिक्त हस्तेच जाणार का?मी अस्वस्थ झालो माझा मुलगा आणि बायको दोघांनीही ते टिपलं,आणि फुलं दुर्वा घ्याव्या की न घ्याव्या विषयी आम्ही बोलू लागलो. त्यातच रांग बरीच समोर सरकली अर्ध्याहून जास्त समोर आल्यावर रांग सोडून देणही उचित नव्हतंआणि दुसरीकडे मन मात्र कमालीचं बेचैन होतं. शेवटी गजानन महाराजांना हात जोडून म्हटलं आज मी मंदिरात फुलं अर्पण करण्याचा योग आहे की नाही तुम्हास ठाऊक आणि 'ओम श्री गजानन महाराज की जय!'असा मनात उच्चार करून समोर चालू लागलो. पाचच मिनिटं झाली असतील दोन लहान मुलं कठड्याच्या बाजूने घाईघाईने त्या दोन चारशेच्या गर्दीत नेमकी माझ्याकडे आलीत,त्यांच्या हातात सुंदर लाल फूल आणि दुर्वा होत्या,माझ्यापुढे हात करून मला म्हणे आम्हाला ऊशीर होतो आहे तुम्ही हे फूल देवाला अर्पण कराल का? मी यंत्रवत हात समोर केला माझ्या हातावर फूल आणि दुर्वा ठेवून दोन्ही मुलं निघूनही गेली. देवळात ती फुलं माझ्याकडून व्यवस्थित स्वीकारल्याही गेलीत ही गोष्ट 21 जून 2017 ची आहे. माझ्या पाठदुखीमुळे पुण्याला थांबण्याचा आणि गणपती दर्शनाचा योग आला हे तर मला कळलं पण शेकडो लोक तिथे असताना ती मुलं नेमकी माझ्याकडेच का यावी याचं उत्तर मला अजूनही कळलेलं नाही. मात्र या सर्व संदर्भात विचार करताना वाटतं आपण महाराजांना किती वारंवार त्रास देत असतो आणि महाराजही वारंवार भक्तांसाठी कृपासिंधू-भक्त वत्सल ठरत असतात. पण असं वाटलं तरी मन पुन्हा पुन्हा महाराजांशी हितगूज करायचं काही सोडत नाही.

मागे एकदा मी सलग 21 दिवसात गजानन विजय ग्रंथाचे 21 पारायणं करण्याचं ठरविलं. माझी सोळा सतरा पारायणं पूर्ण झाली असतील आणि एक दिवस पारायणात भाऊ कवरांचा अध्याय वाचित असताना,महाराजांच्या आवडीचे पदार्थ त्यांना द्यावे अशा ओळी आल्या आणि माझं मन भरकटलं,मी महाराजांना म्हटलं 'महाराज गेले पंधरा सोळा दिवस मी तुम्हाला वरण भाताचा नैवेद्य दाखवितो आहे. तुम्हाला कंटाळा नाही नं आला?मला खिचडी खूप आवडते. तुम्हाला आवडते का?मी तुम्हाला खिचडीचा नैवेद्य दाखविला तर चालेल का? काही क्षण हा विचार मनात घुटमळला आणि पुढील वाचन सुरू झालं मग क्रमशः एकवीस अध्याय पूर्ण झालेत,आता नैवेद्य,आरती आणि मग सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा. नमस्कार करून पोथी समोर ठेवली आणि आईला म्हटलं आई नैवेद्य वाढून आण. आई समोर आली,पाहतो तर आईचा चेहरा उतरलेला. ती म्हणे 'अरे विनय चूक झाली रे बाबा आज माझ्याकडून,खरं म्हणजे असं कधी होत नाही पण तुला काय सांगू अरे आज कुकर लावताना डाळ धुवत होती तर कसं काय कोण जाणे,पण माझ्याच हातून भांडं निसटलं आणि सर्व डाळ तांदळाच्या पातेल्यात सांडली मग काय करणार आज मी डाळ तांदूळ एकत्रच शिजविले.

त्यामुळे आज खिचडीचाच नैवेद्य दाखवावा लागणार किंवा तुला चालणार नसेल तर मी पुन्हा कुकर लावते. असं म्हणून आई थांबली,हे सर्व ऐकून माझे डोळे पाणावले,आईला म्हटलं नाही आई तुझं काहीच चुकलं नाही, आण आज महाराजांना खिचडीच हवी होती. असं म्हणता म्हणता कितीही आवरलं तरी मला येणारा हुंदका काही मी रोखू शकलो नाही. आई म्हणाली अरे चूक माझी आहे! तू का रडतोस? गालावर आलेले अश्रू पुसत तिला म्हटलं..अगं चूक तुझी नाहीच आहे,असलीच तर माझी असू शकेल पण त्याही पेक्षा ही गजानन महाराजांचीच लीला आहे असच मला मनातून वाटतं आहे. जा लवकर खिचडी घेऊन ये आजचा प्रसाद विशेष महत्त्वाचाआहे!आईला यातलं काही कळलं नाही ,ती पटकन स्वयंपाक घराकडे वळली .मात्र मुलाला राग आला नाही याचा तिला आनंद झाला आणि गजानन महाराजांचे त्यासाठी आभार मानतच ती आत गेली,कारण मला स्पष्ट ऐकू आलं तिचं पुटपुटणं, श्री गजानन!जय गजानन!..श्री गजानन!जय गजानन!.

🌺 अनुभव-- विनय लोहे. नागपूर.

शब्दांकन-- जयंत वेलणकर. 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page