अनुभव - 130
- Jayant Velankar
- Jul 16, 2020
- 4 min read
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव १३०🌺)
*माझी गजानन माऊली, काय सांगू तिची थोरवी*
जय गजानन! अहमदनगर. धरमपुरी. निंबलक गाव, गजानन महाराज मंदिर, सहजासनात बसलेली गजानन महाराजांची प्रसन्नचित्त मूर्ती. त्या मूर्तीसमोर मी शांतपणे श्रीगजानन विजयचा एकवीसावाअध्याय वाचते आहे आणि त्याचवेळी माझा मोठा मुलगा ॠषीकेश तिकडे एका विदेशी कंपनीत ऑनलाईन इंटरव्हयू देतो आहे. किंबहुना असं म्हणायला हवं की तो तिकडे ऑनलाईन असताना मी अध्याय वाचन करीत होत कारण ऋषिकेशनी मला म्हटलं होतं, आई या विशिष्ट वेळात महाराजांना माझ्यासाठी आशिर्वाद माग. महाराज प्रार्थनेला पावले. आज माझा मोठा मुलगा कॅलिफोर्नियाला आहे. महाराजांचा आधार असावा म्हणून मी दिलेला महाराजांचा फोटो त्याने जवळ बाळगून ठेवला आहे.
मोठ्या मुलाच्या बाबतीत घडलेली घटना लहान शुभमनी अनुभवल्या मुळे त्याच्यासाठी त्याने आईला म्हटलं नसतं तरच नवल!शुभमच्या मनाने देश सेवेचा निर्धार करून N D A ( नॅशनल डिफेन्स अकॅडमी) जाॅईन केलं. भारतीय सैन्यात भरती होण्याचं स्वप्न तो ह्रदयात बाळगून होता. सैन्यातील शिस्त आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेच. अर्थातच तिथे निवड प्रक्रिया पण कठीणच असते. शुभमने लेखी परीक्षा दिली आणि तो पुढील पाच दिवसीय इंटरव्हयू साठी अलाहाबादला रवाना झाला. शुभम महाराजांचा आशिर्वाद घेऊन गेलाच होता. चार दिवस पार पडलेत, पाचव्या दिवशी त्याचा फोन आला आणि खास तरूण मुलं बोलतात तसं तो मला म्हणाला ' आई गजानन महाराजांकडून काही सेटींग लाव ना माझ्यासाठी! ' मग काय, आईच्या भूमिकेतून मी आपलं धरमपुरीचं गजानन महाराजांचं मंदिर गाठलं. तिकडे परीक्षा सुरू होती आणि इकडे महाराजांसमोर नामस्मरण! आज माझा मुलगा कॅप्टन आहे!
विदेशी कंपनी असू दे किंवा देशसेवा असू दे ' माझी गजानन माऊली, काय सांगू तिची थोरवी ' असं आहे! तुम्ही गजानन विजय पारायण करा, माऊलीचं नाव घ्या, तिचं स्मरण करा, तिच्या अनुसंधानात रहा. गजानन माऊली कृपासिंधू आहे आणि या कृपेची प्रचिती अगदी नियुक्ती पासून निवृत्ती पर्यंत आहे. निवृत्ती म्हणजे, अगदी थेट या जगातून निवृत्त होतानाही माऊलीचा कृपाप्रसाद ज्याला लाभला तो येथून सहज मुक्त झाला.
कधी कधी आपण पहातो की एखाद्याचा अगदी प्राणांताचा समय येतो पण प्राण काही निघत नाही. वाट पहावी लागते. देहाचे हाल होतात. पण त्याही क्षणी महाराजांचा आधार फार मोलाचा ठरतो. माझ्या मावशीच्या बाबतीत असंच काहीसं झालं.
आपल्या मराठीत एक म्हण आहे ' माय मरो पण मावशी जगो ' अर्थात मावशी अगदी आई सारखंच प्रेम करते. माझ्या मावशीनं माझ्यावर आई सारखंच प्रेम केलं.
मी माहेरची संगीता बोत्रे. श्रीरामपूर हे माझं माहेर. लग्नानंतर मी झाले संगीता भागवत. माझी आई आणि मावशी या सख्या बहिणी त्यांच्या लग्नानंतर चुलत जावा झाल्यात. मी लहानपणापासून मावशीच्या अंगावर होते. पुढे मावशीला मुलबाळ न झाल्याने तिने मला एक प्रकारे दत्तक घेतले आणि मावशीच माझी आई झाली.
कालांतराने मावशीचं वय झालं. वयपरत्वे माणसाला काही ना काही त्रास होतो तसा मावशीलाही झाला. तब्येतीच्या तक्रारीत एकदा तिची तब्येत बरीच बिघडली. ती जून महिन्याची २१ तारीख होती. तिला आम्ही नगरला एका दवाखान्यात अॅडमिट केलं. पण तिची तब्येत अधिकाधिक बिघडतच गेली. जूनची २४ तारीख आली. आता मावशीचं वाचणं आम्हाला कठीण वाटू लागलं.
पूर्वीच्या काळी वयोवृद्ध रोग्यात असं लक्षण असेल तर त्याला घोंगड्यावरती काढून ठेवण्याचा प्रकार होता आणि व्यक्तीची सुटका त्यातून होते असा अनेकांचा अनुभव होता. आपण 'गजानन विजय ' मधे जानराव देशमुखाला घोंगड्यावर काढून ठेवा असं वाचत आलो आहे. हल्ली मात्र बरेचदा व्हेंटीलेटरच्या माध्यमातून तारीख पुढे ढकलण्याचा प्रकार होतो.
मावशीला घरघर लागली. तिला व्हेंटीलेटर लावलं. आम्ही गजानन महाराजांना हात जोडले आणि योग्य ते होऊ द्या अशी प्रार्थना केली. महाराजांनी प्रेरणा दिल्याप्रमाणे आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला मागितला. ते सिनीयर होते. अनुभवी होते. त्यांनी सांगितलं यांना घरी घेऊन जा. विनाकारण बिल वाढविण्यात आणि त्यांचे हाल होण्यात काही अर्थ नाही.
२५ जूनला संध्याकाळी तिला श्रीरामपूरला माझ्या भावाकडे घेऊन आलो. तिच्या वेदना, घरघर वाढतच गेली
रात्रीचे अकरा वाजले पण प्राण अडकून होता. मग मी तिच्या बाजूला बसून महाराजांना प्रार्थना केली. म्हटलं, महाराज एकतर हिला यातून वाचवा, हिच्या वेदना बघवत नाही. किंवा हिला शांत करा, तिची सुटका करा. मी डोळे मिटले आणि जप सुरू केला. गण गण गणांत बोते! गण गण गणांत बोते! दहा मिनिटे झाली असतील. मला जाणवलं की घरघरीचा आवाज शांत झाला आहे. मी जप तसाच सुरू ठेवला. पुढील पंधरा ते वीस मिनिटात लक्षात आलं की मावशी शांत झाली आहे.
ज्या मावशीनं मला माझ्या वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी, गजानन महाराजांची ओळख गजानन विजयच्या माध्यमातून करून दिली होती त्याच मावशीला आज मी नामजपाच्या सहाय्याने गजानन महाराजांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली होती.
मावशीच्या त्या शांत झालेल्या चेहर्याकडे मी पाहिलं आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळून मला जोराचा हुंदका आला. मग मी स्वतःला सावरलं. हळुवारपणे माझे डोळे पुसले आणि मावशीचे शब्द मला आठवू लागले. ती म्हणायची ' संगीता, महाराज कृपासिंधू आहेत. त्या कृपा सागरातील एक थेंबही आपल्या वाट्याला आला तर स्वतःला धन्य समजायचं. पण ती कृपा मिळविण्यासाठी आपण स्वतःला सज्ज करायला हवं. त्यासाठी महाराजांची नित्योपासना करायलाच हवी! '
खरं होतं मावशीचं म्हणणं. मी तिथून उठले. महाराजांसमोर उभी झाले आणि मावशीचा पुढील प्रवास योग्य दिशेने व्हावा अशी महाराजांना प्रार्थना करून त्यांचं स्मरण केलं..श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!
🌺अनुभव-- सौ संगीता भागवत, अहमदनगर
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
❄आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे
🌸अवश्य वाचा!श्रीगजानन अनुभव! *भाग एक* यात एकूण बावन्न अनुभव आहेत फक्त रुपये पन्नास *भाग दोन* यात एकूण बावन्न अनुभव आहेत(५३ते १०४) फक्त रुपये पन्नास.
〰️🔶〰️🔺〰️🔷〰️🔻〰️🔸〰️🔶〰️🔺〰️🔷〰️🔻〰️🔸〰️🔶〰️🔺〰️🔷〰️🔻〰️🔸
*श्री गजानन महाराज सामूहिक उपासना* --एक स्वर्गीय आनंद
सामुहिक उपासना करावी त्याचं एक वेगळं महत्त्व आहे.
या अनुषंगाने आपण एकत्र येऊन गजानन महाराजांची थोडावेळ सामुहिक उपासना करावी अशी उपासना तयार करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ही उपासना सुरूझाली आहे.
आजच्या परिस्थितीत एकत्र येणं शक्य नसेल तरीआपापल्या घरी पण साधारण संध्याकाळी सातच्या आगेमागे ही उपासना केली तर सर्वच उपासकांना महाराजांच्याआशिर्वादाने आत्मिक आनंद अवश्य प्राप्त होउ शकेल.*
ऐकताना सोबत आपणही म्हणायचं आहे*.
*उपासनेसाठी लिंक...* https://youtu.be/WxKZ91xsve8
उपासनेचा आनंद घेऊन भक्तीरसात चिंब व्हा आणि अन्य भक्तांनाही हा आनंद प्राप्त करून द्या!
➖🔸➖🔹➖🔸➖🔹➖➖🔸➖🔹➖🔸➖🔹➖➖🔸➖🔹➖🔸➖🔹➖➖🔸➖🔹➖
Yorumlar