अनुभव - 14
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 3 min read
Updated: Jun 15, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
* व्याधी वारून केले मजला संपन्न *
जय गजानन! आज मी सत्तरीच्या घरात पोहोचलो आहे. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगात गजानन महाराजांनी माझी पाठराखण केली आहे , पण अगदी लहानपणी म्हणजे नवव्या वर्गात असताना माझ्या जीवनात आलेले दोन अनुभव अजुनही माझ्या स्मरणात आहेत. एका अनुभवातून महाराजांनी मला शिकविले की,तू माझं दर्शन केलेलं असू दे वा नसू दे. माझा फोटो तू पाहिला अथवा नाही यानी काही फरक पडत नाही. तू मला आर्तपणे साद घाल मी भक्ताच्या हाकेला प्रतिसाद देईन आणि दुसर्या अनुभवातून त्यांनी मला शिकविलं, 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी ' हे चालायचं नाही तू मेहनत घेतली तर तुझ्या यशाला अधिक उजाळा मिळेल.
मला आठवतं 1963 मधील ती घटना असावी मला टाईफाॅईड झाला,नुसता झालाच नाही तर तो पुन्हा पलटून दुबार झाला,रिलॅप्स झाला. रिलॅप्सड् टाईफाॅईड काय भयंकर प्रकार आहे हे कदाचित नवीन लोकांना कळणार नाही, कारण अलिकडे नवीन शोध,अद्ययावत दवाखाने,तज्ञ डाॅक्टर,यामुळे टाईफाॅईड शब्द तेवढा भितीदायक वाटत नाही. पण पुर्वी बरेच लोक या रोगात दगावले आहेत. त्या काळी टेरॅमाईसिन च्या गोळ्या टाईफाॅईड साठी दिल्या जात. मला त्या गोळ्या फार उष्ण पडत होत्या,पण इलाज नव्हता, टाईफाॅईड मधे ताप नाॅर्मल येणं म्हणजे रोगाला उतार,पण नाॅर्मल तर जाऊ द्या,मला सतत तीन दिवस तीन रात्र 103 ते 104 असा ताप होता. सर्व प्रयत्न केल्यावर डाॅक्टरांनी वडिलांना सांगितलं वैद्यकीय इलाज आता संपले, तुम्हाला काही पारमार्थिक उपाय करायचे असतील तर करू शकता. ते ऐकून मुलगा हातचा जाणार असं समजून वडील हताश झाले, पारमार्थिक उपाय म्हणजे काय ? हा प्रश्न त्यांच्या समोर उभा झाला. आम्ही तेव्हा भुसावळला रहात होतो. वडिलांनी आसपास चौकशी केली तेव्हा कळले की शेगांवला गजानन महाराज होऊन गेलेत त्यांच्या आशीर्वादाने गावातील श्री बाबू गुरूजी जोशी हे असे काही उपाय सुचवितात, वडील त्यांना भेटले आणि माझी सर्व परिस्थिती कथन केली. त्यांनी काही नाम जप करून एक काळा गंडा आणि अंगारा दिला. गंडा माझ्या उशी खाली ठेवायचा आणि मला अंगारा लावत रहायचा सल्ला दिला, तसेच तब्येत बरी झाल्यावर शेगांवला जाऊन समाधी दर्शन घेऊन या असे सांगितले. वडिलांनी त्यांना दक्षिणा विचारली तेव्हा ,मला काही पैसा नको, जेव्हा शेगांवला जाल तेव्हा सव्वा रूपया अभिषेकासाठी द्या असं सांगितलं. तो उपाय सुरू झाला आणि डाॅक्टरही आश्चर्य करू लागले, क्रमशः ताप उतरत गेला, नाॅर्मल झाला आणि कुणाचा विश्वास बसणार नाही पण मी पंधराव्या दिवशी शेगांवला समाधीपुढे उभा होतो. दर्शन घेऊन गजानन महाराज की जय! गजानन महाराज की जय! म्हणतच समाधीच्या पायर्या चढून वर आलो तेव्हा पूर्ण भारावून गेलो होतो. ते माझे पहिले शेगांव दर्शन होते. त्या काळी शेगांव फारसं कुणाला माहिती नव्हतं, स्टेशनवर शुकशुकाट,दर्शनासाठी फारशी गर्दी नाही,अशी स्थिती होती. वडिलांना गजानन महाराजांनी मुलाचा जीव वाचवून अतिशय आनंद दिला होता. त्यामुळे त्यांनी एक अनोखा संकल्प केला की 'गजानन विजय ग्रंथ 'शेगांव येथून घ्यायचा आणि परिचितांकडे जाऊन त्यांच्या घरी त्याचं पारायण करायचं आणि तो ग्रंथ त्यांना भेट द्यायचा. त्यांनी दादर,कल्याण,डोंबिवली या भागात बर्याच पोथ्या वाटल्या आणि अनेकांना तोंड भरून गजानन महाराजांची महती सांगितली आणि गजानन महाराजांना प्रत्येक वेळी प्रार्थना केली की महाराज तुमची किमया यांना कळू द्या,अनेकांना कळू द्या आणि या सर्वांवर तुमची कृपादृष्टी असू द्या. वडिलांच्या या प्रार्थनेकडे पाहून मला नेहमी वाटायचं की अशा सर्व भक्तांनीच त्यांच्या दैवताची महती सर्वत्र पसरविण्यात दैवताच्या आशीर्वादानेच मुंगीचा वाटा उचलला आहे.
आजच्या घटकेला शेगांव जगप्रसिद्ध आहे. पण अगदी वडिलांच्या पद्धतीने जरी नाही तरी विजय ग्रंथ वाटण्याचे कार्य त्यांची सून आजही करते आहे. आम्ही वर्षातून किमान दोनदा शेगांव दर्शनाला जातो तेव्हा गजानन विजय ग्रंथाच्या काही प्रति आणायला चुकत नाही. असो मी बरा झालो,मरणाच्या दारातून परत आलो. अशक्तपणा आला होता आणि वार्षिक परीक्षेची वेळ आली. मी शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जायचो,नेहमी वरच्या नंबरनी पास व्हायचो, माझी प्रकृती पाहून काही शिक्षक म्हणाले याला आपण परीक्षे शिवाय वरच्या वर्गात जाऊ देऊ कारण वार्षिक परीक्षा तशीही झाली आहे. तसं सहामाही परीक्षेत मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो पण आता शाळेत माझ्या विषयी चर्चा सुरू झाली आणि माझी मानसिक स्थिती विचित्र होऊन गेली. पण आता मला गजानन महाराज माहिती झाले होते मी त्यांना प्रार्थना केली की तुम्ही मला गंभीर आजारातून बाहेर काढले आता परीक्षे विषयी मुख्याध्यापकांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. नंतर शाळेनी वडिलांना सांगितलं की आम्ही स्वतंत्रपणे त्याची एकट्याची पूर्ण विषयाची परीक्षा घेऊ. त्याला अभ्यास करायला सांगा, त्याची तयारी करून घ्या. मग मला परीक्षेची पूर्ण तयारी करावी लागली,माझी एकट्याची नव्याने परीक्षा झाली आणि रिझल्ट जाहीर झाला .मी शाळेतील चारही वर्गांमधून सर्वाधिक गुण घेऊन पहिला आलो होतो. गजानन महाराजांनी माझ्या कडून थोडी जास्त मेहनत करून घेतली पण त्याचं फळही पदरात घातलं आणि माझ्या यशाला अधिक ऊजाळा दिला.
आज या गोष्टीला पन्नास वर्षे होऊन गेली, त्या बाबु गुरुजींच्या माध्यमातून मी गजानन महाराजांकडे ओढल्या गेलो. आजही नियमानी गजानन विजय ग्रंथ पारायण करीत असतो. एकोणीसाव्या अध्यायात महाराज म्हणतात
कैवल्याच्या मार्गावर भाविकांना आणण्याचं काम ईश्वरी योजनेतून होत असतं आणि महाराज असही म्हणतात ,
ज्याची निष्ठा बसेल/वा जो माझा असेल/त्याचच कार्य होईल/इतरांची ना जरूर मला. / हे वाचलं की महाराजांना एकच प्रार्थना करावीशी वाटते की त्यांनी मला आपलं समजावं,भक्तीच्या या मार्गावर मला सतत मार्गदर्शन करीत रहावं,आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालता चालता मुखातून एकच जप होत रहावा..श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!...
🌺 अनुभव-- सुधाकर नरगुंदकर नाशिक.
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Hozzászólások