अनुभव - 15
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 15, 2020
" श्री "
गजानन महाराज की जय
* पडत्या मजुरा झेलीयले बघती जन आश्चर्य भले *
जय गजानन! गजानन महाराजांच्या संपर्कात एखादी व्यक्ती आली की पर्यायानी त्या व्यक्तीचा संबंध गजानन विजय ग्रंथाशी येतोच. माझा अगदी लहानपणी म्हणजे मी पाचव्या वर्गात असतानाच गजानन विजय ग्रंथाशी संबंध आला. मी पाचव्या वर्गात असतानाच माझे वडील देवाघरी गेले. आई निरक्षर होती,कधी शाळेत गेली नाही. तिला मी त्या वेळेपासून रोज गजानन महाराजांच्या पोथीतील एक अध्याय वाचून दाखवित होते. गजानन विजय च्या सातव्या अध्यायात दासगणू महाराज एका ठिकाणी म्हणतात ' जे मुळात असती शहाणे/ त्यांना शाळा नको की/ ' ही ओळ माझ्या आईला तंतोतंत लागू होत होती. वडील गेल्यावर मानसिक शांती साठी तिनी गजानन विजय ग्रंथाचा आधार घेतला आणि त्याच वेळी मला त्या पवित्र ग्रंथाच्या संपर्कात आणून गजानन महाराजांचा परिचय करून दिला. माझी गजानन महाराजांशी त्या काळात जी ओळख झाली ती पुढे आयुष्यभर कायम टिकली, नव्हे पदोपदी गजानन महाराजांनी माझ्यासाठी धाव घेतली.
पुढे लग्नानंतर माझं पारायण तेवढं नियमित पणे होत नव्हतं पण गुरूवारचा उपास आणि गजानन महाराजांची नित्य भक्ती नियमानी सुरू होती. माझे मिस्टर मात्र उपवास,जप,तप,अर्चना,या पासून दूर होते,ते मला म्हणायचे ' तू करते आहेस नं? आहेत नं तुझे गजानन महाराज मग झालं तर! तुझं पुण्य मला कामात येईलच.
माझं पुण्य कामात आलं की अन्य काही ते मला माहिती नाही पण त्या दिवशी भक्तांचे कनवाळू गजानन महाराज माझ्या सौभाग्याच्या रक्षणासाठी धावून आले हा माझा दृढ विश्वास आहे. ती एक ह्रदयाचा थरकाप उडविणारीच घटना होती. साधारण 1984-85 सालची गोष्ट,माझे पती श्री. विजय कुलकर्णी हे एन. आर. सी. कंपनीत अंबिवली येथे इलेक्ट्रीशियन म्हणून काम करीत होते. मुंबईच्या लोकांना लोकलची धावपळ हा नित्याचाच भाग. सकाळी 7.05 ची लोकल कामावर जायला आणि परत यायला संध्याकाळी 4.48 ची टिटवाला लोकल हा यांचा नित्यक्रमच होता. एकदा कामावरून परत येत असताना संध्याकाळची लोकल त्यांनी पकडली,पण काही कळायच्या आत त्यांचा हात दारात असलेल्या दांड्यावरून घसरला, पडता पडता त्यांच्या हातात दारात जी पट्टी असते ती आली एक आधार म्हणून त्यांनी ती घट्ट पकडली आणि त्याच वेळी गाडी सुरू झाली,एकीकडे गाडी वेग पकडू लागली, आता हे फलाटावर आडवे झाले होते,हे घसरत समोर जाऊ लागले आणि त्यांचे दोन्ही पाय लोकल व फलाट यांच्या मधे जाऊ लागले, जीवाच्या आकांतानी ते पाय वाचविण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा फलाटावर काही बांधकामासाठी आणलेली थोडीफार खडी होती आणि बाजूला एक बर्यापैकी मोठा दगड पडला होता. काही क्षणांचच ते दृश्य, बघणार्यांच्या लक्षात आलं की हा माणूस आता गेला. वाचणं अशक्य आहे. त्या काही क्षणातच यांच्या डोक्यात विचार चमकून गेला की आता हे पाय वाचणं अशक्य आहे आणि दोन्ही पायाशिवाय जीवन म्हणजे सर्वांवर भार या शिवाय अन्य काय? त्या पेक्षा नको ते जीवन. जे व्हायचं ते होऊ द्या या विचारानी त्यांनी गाडीला धरलेले दोन्ही हात काढून घेतले,आणि निमिषार्धात काय चमत्कार झाला माहिती नाही जो दगड होता त्या दगडावर ते आपटले व ऊठून ऊभे राहिले आणि तिकडे गाडीने स्टेशन सोडले. फलाटावर दोन मित्र होते, त्यांनी यांना धरले व बाकावर बसविले. कॅन्टीनवाल्यानी चहा दिला. तो वार होता गुरूवार!
मित्र यांना घरी घेऊन आले म्हणाले वहिनी 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती ' ते सर्व ऐकून मी हबकलेच, गजानन महाराजांना मनोमन नमस्कार केला आणि माझ्या माहितीप्रमाणे तेव्हा कल्याणात महाराजांचं मंदिर नव्हतं म्हणून मग मी घरीच फोटो समोर पाच पेढ्यांचा नैवेद्य दाखविला आणि आमचे फॅमिली डॉक्टर श्री. अरूण जोशी यांना थोडक्यात हकीकत सांगून संध्याकाळची भेट निश्चित केली.
ह्यांना दवाखान्यात घेऊन गेली, डाॅक्टरांच्या पुढ्यात एक अनोळखी माणूस बसला होता. आम्हाला बघताच डाॅक्टरांनी आत बोलावले व म्हणाले ऐका काय सांगतोय ते,त्या माणसाने प्रत्यक्ष अपघात पाहिला होता आणि त्याचच वृत्तकथन करीत होता. शेवटी एवढेच म्हणाला 'बिचार्याचं हाड सुध्दा मिळालं की नाही माहीत नाही?घरी मुलं बाळं किती? कसं होईल त्यांचं?काय आपत्ती आहे बघा ' असं म्हणून तो रडायला लागला. मी त्यांना विचारलं दादा हा अपघात कधी?कुठे व केव्हा झाला? त्यावर तो म्हणाला 'आजच! 4.48 ची टिटवाला लोकल होती. अंबिवली स्टेशन वर!' माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. त्यांना शांत करून म्हटलं काही काळजी करू नका,अपघात झालेली व्यक्ती त्याच्या पत्नी बरोबर तुमच्या समोर उभी आहे. तो माणूस अवाक् होऊन पहात राहीला.
दुसर्या दिवशी मी जिथे बालवाडी शिक्षिका म्हणून काम करीत होते त्या छत्रपती शिक्षण मंडळात सुटीचा अर्ज देण्यासाठी गेले. तिथे आमचे मा. चिटणीस श्री. टोकेकर सर बसले होते. त्यांचं रहाणं अंबिवली इथेच होतं आणि ते 4.48 च्या लोकलनेच कल्याणला येत असत. त्यांनीही आदल्या दिवशीचा अपघात पाहिला होता आणि ते अपघाताचं वर्णन करीत होते,त्यांचं सांगणं पूर्ण होताच मी म्हटलं सर ' ते माझे मिस्टर होते ' हे ऐकताच ते ताडकन उभे झाले.
एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा फारशी इजा न होता हे वाचले कसे ही सर्वांनाच अचंबित करणारी गोष्ट होती. अजून आश्चर्य म्हणजे 2/3 दिवसानंतर एका अनोळखी माणसाने यांचा पेन,रुमाल,पैशाचं पाकीट,किल्ली व बिल्ला,बॅग,डबा,चष्मा. सर्व सामान घरी आणून दिलं.
दोन दिवसांनी शांतपणे यांना विचारलं 'हे कसं झालं?' ते म्हणाले एका दगडावर आपटलो पण कसा उभा राहिलो कळलच नाही. पण खरं सांगू?माझा विश्वास आहे,मी म्हणायचो न तुला, तुझं पुण्य माझ्या कामात येईल. बस तुझ्या गुरूवार मुळे आणि गजानन महाराजांमुळे मी वाचलो.
त्यांच्या त्या वाक्यानी मला थोडं भूतकाळात नेलं.मी लहानपणी पोथीतील ओव्या वाचायची..
बांधीत असता मंदीर/काम करीत शिखरावर/एक होता मजूर/हाताखाली गवंड्याच्या/तो धोंडा देता मिस्तरीला/एका एकी झोक गेला/तीस फुटांवरुन पडला/खाली घडीव दगडावर/तो पडता लोकांनी पाहीला/जन म्हणती मेला मेला/उंचावरून खाली पडला/आता कशाचा वाचे तो/ परी घडले अघटित/ कोठेही न लागले त्या प्रत/ ..
हे सर्व वाचून मी आईला म्हणायची आई किती विलक्षण आहे नं हे सर्व? त्यावर आई माझ्या डोक्यावरून हात फिरवून म्हणायची ' बाळा अगं गजानन महाराजांची सर्व लीलाच विलक्षण आहे. त्यांची भक्ती कर तुझं भलं होईल!
आज आईचा तो आशीर्वाद माझ्या मदतीला धावून आला होता. आणि अंतर्मनातून एक नाद उमटत होता.
श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव-- सौ. विद्या विजय कुलकर्णी, कल्याण.
शब्दांकन-- जयंत वेलणकर. 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजां विषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Yorumlar