अनुभव - 16
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
Updated: Jun 18, 2020
"श्री "
गजानन महाराज की जय
* जेथे जातो तेथे तू माझा सांगाती *
जय गजानन! चांगल्या गोष्टीचा संकल्प करून, संकल्परत राहणारी माणसं, त्यांच्या संपर्कात येणार्या व्यक्तीचं काही ना काही भलं करतात,असा माझा अनुभव आहे. कारण सद्विचारांच्या लहरी आजूबाजूचं वातावरण चांगलं करण्यात निश्चित पणे हातभार लावतात. फार पूर्वी आमच्या शेजारी श्रीमती काणे रहायच्या,त्या नर्स होत्या,आम्ही त्यांना नर्स काकू म्हणत असू. त्यांचा एक संकल्प होता. आगळा वेगळा संकल्प! एक डिलिव्हरी झाली की एक गजानन विजय ग्रंथ दान करायचा. त्यांच्या या उपक्रमात एकदा माझा नंबर लागला आणि त्यांनी मला
गजानन महाराजांची पोथी देऊन सांगितलं की रोज या पोथीतील एक अध्याय वाचत जा आणि नाहीच जमलं तर निदान एक पान तरी वाचण्याचं ठरव,मग बघ गजानन महाराज तुझ्याकडे लक्ष ठेवतील. ते ऐकून मी पोथी स्वीकारली आणि ठेवून दिली. असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीचा योग यावा लागतो. माझा पोथी वाचण्याचा योग तेव्हा आला जेव्हा माझ्या दोन्ही मुली,एक अडीच वर्षाची आणि दुसरी सात वर्षाची,एकाच वेळी आजारी पडल्या.डाॅक्टरी उपाय चालू होते,पण दोघींचा एकत्र आजार पाहून मनाला जाणीव झाली की अरे आपल्याकडे
' गजानन विजय पोथी' आहे आणि योग पहा कसा असतो? एकीकडे पोथी आठवली आणि दुसरीकडे माझे वडील शेगांवला गेले होते ते ध्यानीमनी नसताना माझ्या साठी महाराजांचा फोटो घेऊन आले आणि मग त्या फोटोच्या साक्षीने बाजूला पडलेल्या त्या पोथीची 108 पारायणं होऊनच पुढील नोंदी थांबल्या पण पारायणं मात्र
पुढेही सुरूच राहिलीत.
आता माझं वाचन नियमानी सुरू झालं होतं आणि एक दिवस वेळआली नर्स काकूंनी दिलेल्या शब्दांच्या कसोटीची! त्या दिवशी माझे मिस्टर ऑफिसातून घरी आले आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागलं,सारखं म्हणायला लागले, 'कसतरीच होतंय' आणि थोड्याच वेळात त्यांना भडभडून रक्ताची उलटी झाली आणि क्षणभर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे असा मोठा प्रश्न समोर उभा. घरात दोन लहान मुली आणि वृध्द सासरे. आता आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे? 'मन चिंती ते वैरी न चिंती 'नाही नाही ते विचार सर्रकन डोक्यात चमकून गेले आणि नजर गेली महाराजांच्या फोटोवर आणि माझ्या न कळत माझ्या तोंडून वाक्य बाहेर पडलं
'हे गजानन महाराजा हे या परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडले तर आम्ही शेगांवला तुमच्या दर्शनाला येऊ' !
आमचे फॅमिली डॉक्टर आले,त्यांनी यांना पूर्ण तपासलं, काही औषधं देऊन सोबत एक चिठ्ठी देऊन त्यांनी सांगितलं या काही तपासण्या आहेत त्या करून घ्या, बाकी रिपोर्ट पाहून नंतर सांगतो ! तपासण्या झाल्या पुढील दोन दिवस प्रचंड मानसिक दडपणात गेले. काय निघतय अन् काय नाही? त्या दिवशी सहज पणे निघालेलं शेगांव दर्शनाचं आता या काळात मात्र जाणीवपूर्वक,तळमळीने प्रार्थना करून महाराजांना म्हणत होते आणि तिसर्या दिवशी रिपोर्ट्स आलेत. पूर्ण नाॅर्मल!डाॅक्टरांनी एकच शक्यता व्यक्त केली,सदोष आहारातून झालेली अॅसिडीटी. असं लक्षात आलं की हे गुळांबा खाऊन त्यावर ताक प्यायले होते आणि गुळ आणि ताक एकत्र तब्येतीला घातक ठरू शकतं. डाॅक्टरांनी पुढे दक्षता घ्यायला सांगितलं आणि आमच्यावर आलेलं एक संकट टळलं.
शेगांवला दर्शनासाठी जाण्याची जबाबदारी आता आमची होती. आम्ही दुसर्याच दिवशी निघण्याचा निर्णय घेतला. तो काळ वेगळा होता. आम्ही दोन कपडे पिशवीत भरले,गरजे पुरते पैसे घेतले आणि आमची प्रवासाची तयारी पूर्ण झाली. गाडी व्ही. टी. स्टेशन वरून सुटणार होती व्ही. टी. च्या दिशेने जाणार्या लोकल साठी घरातून बाहेर पडलो. हे दारात पूर्ण तयार आणि मी महाराजांच्या फोटो समोर हात जोडून उभी. ह्यांनी विचारलं अगं चल लौकर काय सांगतेय आता महाराजांना? मी हासून म्हटलं 'आम्ही शेगांवला येतो आहोत,आमच्यावर लक्ष असू द्या आणि प्रवासात आमची काळजीघ्या. '
लोकल नेहमी प्रमाणे लेट झाल्यामुळे व्ही. टी. ला पोहोचताना आमची बरीच तारांबळ उडाली. धावत पळत पोहोचलो तर तिकीटा साठी ही मोठी लाईन. गाडी सुटायची वेळ जवळ येत होती. आम्ही बरेच मागे लाईनीत उभे झालो. तिथे थोडी स्थिरावल्यावर मी गजानन महाराजांना डोळे मिटून प्रार्थनापूर्वक विचारलं,आम्हाला तिकीट मिळेल नं? दर्शनाचा योग आहे नं?आणि अचानक समोरून एक माणूस आमच्या दिशेने चालत आला. त्यानी मला विचारलं 'ताई कुठे जायचं आहे?' मी म्हटलं शेगांवला. अहो मी पण शेगांवलाच निघालो आहे आणि माझा नंबर आलाच आहे द्या पैसे मी तिकीट आणून देतो. मी पैसे दिल्यावर काहीच मिनीटात शेगांवचे तिकीट आमच्या हातात होते.
आता आमचा मोर्चा घाई घाईने गाडीकडे वळला,कसा बसा गाडीत प्रवेश झाला. एका गुजराथी कुटुंबाने पूर्ण कम्पार्टमेन्ट व्यापून टाकलं होतं कसतरी जेमतेम बूड टेकवायला जागा मिळाली. काही वेळ झाला आणि माझ्या मनात विचार आला पूर्ण शेगांव पर्यंत असा प्रवास?मग लगेच स्वतःला सावरलं,असो जे होईल ते होऊ द्या महाराजांची इच्छा. दोनच मिनिटे मधे गेलीत आणि गप्पांच्या ओघात एकानी मला प्रश्न केला कुठे जाणार?मी म्हटलं शेगांव. त्यावर तो पुटपुटला 'अरे तुम्हाला बरेच अंतर जायचं आहे 'असं करा भाऊ इथे बसतील तुम्ही समोर बसा! त्यानंतर त्या प्रवासात ना शरीर थकलं ना मन. शेगांव कसं आलं कळलच नाही .
आम्ही शेगांवला उतरलो तर एक सायकल रिक्षावाला समोर दत्त म्हणून उभा झाला. तो म्हणाला 'हे बघा इथे फुकट बस सेवा आहे,पण तुम्हाला मात्र माझ्याच सायकल रिक्षातून यायचे जायचे आहे .' एखाद्या जेष्ठाने सल्ला द्यावा तसा त्याचा सूर होता. आम्ही मुकाट पणे त्याच्या मागून चालू लागलो. त्यानी आम्हाला सांगितलं 'हे बघा परतीचा रिझर्वेशनचा फाॅर्म भरून ठेवा जाताना उपयोगी पडेल. आम्ही ठीक आहे म्हणून फाॅर्म भरला, मात्र सोबत एकही पैसा न देता केवळ फाॅर्म देऊन आम्ही मंदिराकडे निघालो. एका हाॅटेलपाशी त्यानी रिक्षा थांबवली,म्हणाला मी संध्याकाळी येतो, त्याला पैसे विचारले तर म्हणाला संध्याकाळी पाहू.
आमचं दर्शन खूपच छानपणे पार पडलं,अगदी पोथी वाचन,प्रसाद ग्रहण सर्व काही सुरळीत,माझा नवस पूर्ण झाला होता आणि मनात आनंदाच्या उर्मी दाटून येत होत्या. या आधी कधीही न मिळालेला आनंद अनुभवास येत होता.
संध्याकाळी तो रिक्षावाला वेळेत पुन्हा हजर झाला त्यानी स्टेशनवर सोडलं,पैसे विचारल्यावर म्हणाला तुम्हाला जे द्यायचे ते द्या. तो तृप्त होता,समाधानी होता!तो निघून गेला. आम्ही दोन साधी तिकिटं घेऊन स्टेशनवर प्रवेश केला आणि जनरल बोगीच्या जागेवर उभे झालो. गाडीची वेळ झालीच होती,इतक्यात परचुरे कुठे आहेत?असा आवाज आला. तो टि. सी चा आवाज होता. मी पुढे होऊन म्हटले मी आहे रजनी परचुरे,टि सी म्हणाला हे घ्या तुमचं रिझर्वेशन .म्हटलं अहो आम्ही साधी तिकिटं काढली आहेत, त्यावर म्हणे ती मला द्या आणि मधला फरक जो आहे तेवढे पैसे द्या. मी बघीन काय करायचं ते. असं
म्हणत तो दूर निघून गेला आणि गाडीनी स्टेशनात प्रवेश केला. माझ्या मनात जन्मभर सोबत करणारे काही प्रश्न निर्माण झाले, तो तिकीट काढून देणारा कोण?गाडीतील सहप्रवाश्यांना आम्हाला जागा देण्याची बुद्धी देणारा कोण? तो रिक्षावाला कोण? पैसे दिलेले नसतानाही आम्हाला शोधत तिकीट देण्यासाठी टि सी कसा आला? आणि या प्रश्नांच्या सोबतीनेच आमच्या परतीचा प्रवास सुरु झाला. अनपेक्षितरित्या अगदी आरामात.
आम्ही घरी पोहोचलो, मी सर्वप्रथम महाराजांच्या फोटो समोर उभी झाले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. महाराजांना विनंती केल्या प्रमाणे त्यांनी प्रवासात खरंच आमची काळजी घेतली होती. निघताना मी एकटीच फोटोसमोर होते आता मात्र मिस्टरही माझ्या मागे येऊन उभे झाले होते. त्यांनी मला हातानी हलवून म्हटलं अगं तुझी प्रार्थना त्यांनी ऐकली त्यांना म्हण,
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरूनिया....मग आम्ही दोघांनी मिळून ती ओळ पुन्हा म्हटली. मग मी यांना म्हटले आता येवढे तुम्ही नमस्कारा साठी आलाच आहात,तर मी उदबत्ती लावते आणि आपण थोडावेळ जप करूनच घेऊ, मी उदबत्ती लावली आणि आमचा एका सुरात जप सुरू झाला. श्री गजानन!जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव-- सौ. रजनी श्रीकांत परचुरे. .
शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Comments