अनुभव - 17
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
."श्री "
गजानन महाराज की जय ( अनुभव 17 🌺 )
* हा ग्रंथ केवळ चिंतामणी/ चिंतिले फळ देईल जाणी. *
जय गजानन! आज एक्कावन्न वर्ष होतील मी गजानन विजय ग्रंथाचे नियमीत पारायण करतो आहे,पण मला आजही मी केलेलं पहिलं पारायण,जे जवळ जवळ पूर्ण दिवस चाललं होतं ते आठवतय. मला लहानपणापासून परमेश्वर कृपेने एका अध्यात्मिक वातावरणात वावरण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. श्री क्षेत्र कौंडिण्यपूर पासून केवळ एक कि.मी. अंतरावर असलेल्या,वर्धा जिल्ह्यातील आर्वी तहसिलीत राजापूर या गावी माझा जन्म झाला .घराच्या आवारातच एक चारशे वर्षांपूर्वीचे नारायणाचे प्राचीन मंदिरआहे. तिथे सकाळ संध्याकाळ गजानन महाराजांची आरती होत असे. आई वडिलांसह आम्ही सर्व भावंड तिथे हजर असायचो. एके दिवशी वडिल तिथे बराच वेळ पोथी वाचत बसलेले पाहून मी त्यांना हे काय?असं विचारलं त्यावर ते म्हणाले बेटा आज गुरूपुष्यामृत योग आहे म्हणून मी गजानन विजय पोथी वाचत होतो. ते ऐकून माझ्या बाल मनाने वडिलांजवळ हट्ट केला की मी देखील पोथी वाचणार. मला पुढील गुरुवारी पोथी वाचण्याची अनुमती मिळाली. तेव्हा मी फक्त अकरा वर्षांचा होतो. त्या गुरूवारी मी सकाळीच स्नान पूजा करून पोथी वाचण्यास प्रारंभ केला. रात्रीचे नऊ वाजले तेव्हा माझा एकोणीसावा अध्याय सुरु होता. वडील म्हणाले आण बेटा मी आता पुढील अध्याय वाचून घेतो,पण मी निग्रहाने पारायण पूर्ण करण्याचे ठरविले, रात्री अकरा वाजता माझे पारायण पूर्ण झाले. त्या दिवशी मी फक्त दोनदा दूध घेतलं होतं. पुढे लहानाचा मोठा झालो आणि नोकरीच्या निमित्ताने नागपूरात स्थायिक झालो. गजानन महाराजांच्या कृपेने मला सहकारनगर भागात गजानन महाराज मंदिराच्या बाजूला एक प्लाॅट विकत घेता आला. अर्थातच मंदिराचं सान्निध्य इथेही प्राप्त झालं. पुढे कुटुंबाचा विस्तार होत गेला,नाते संबंध वाढत गेले. महाराजांच्या कृपेने बरीच सात्विक प्रवृत्तीची माणसं जोडल्या गेली त्यापैकी एक बावनवीर नामक खेडेगावात राहणारे गृहस्थ होते ते भविष्याविषयी बोलायचे. त्यांनी एकदा मला म्हटलं 'तुमच्यावर सद्गुरूंची कृपा आहे. तुम्ही शक्यतो शनिवारी मारुतीला थोडं तेल अर्पण करा , अर्थात सद्गुरू हे पूर्णत्वास नेतील, त्यांच्याच कृपेने मारूती रायाही प्रसन्न राहील. त्या प्रमाणे मी काही शनिवार हे केलं आणि नंतर काही कारणानी राहून गेलं. नित्याप्रमाणे माझं पारायण आणि महाराजांचं दर्शन हा क्रम सुरू राहीला. मला आठवतं 1987 ची ही गोष्ट आहे. मी दुसर्यांदा बाप होणार होतो, आधी मुलगी होती आणि आता काय होणार?याची वेळ जवळ आली होती. नेमकं सांगायचं तर 14.4.1987 ही ती तारीख. तेव्हा फोनची संख्या अगदीच अल्प होती. प्रत्यक्ष भेटून एखादी गोष्ट कळवण्याचा तो काळ होता.
त्या दिवशी सकाळीच सौ ला अंकुर मॅटर्निटी होम इथे अॅडमिट केलं,डाॅक्टर म्हणाल्या वाट पाहू आवश्यक वाटलं तर सिझेरियन करावं लागेल. पाहू या काय करायचं ते आणि मी घरी आलो. तेव्हा वडील घरी होते,सकाळी साडे अकरा पावणे बाराची वेळअसेल वडील जेवायला बसत होते ,त्यांनी घास हातात घेतला आणि दाराशी कुणी तरी आवाज दिला. मी डोकावून पाहिलं तर एक साठीचा माणूस,पांढरा बंगाली शर्ट,धोतर,थोडी वाढलेली पांढरी दाढी,असा दाराशी उभा दिसला. वडील म्हणाले जा त्याला पोळी भाजी नेऊन दे. त्या प्रमाणे मी दाराशी गेलो तेव्हा म्हणाला मला पोळी भाजी नको,मी आत आलो,वडील म्हणाले अरे त्याला धान्य पैसा हवा असेल,मग मी एका भांड्यात तांदूळ आणि काही पैसे घेऊन गेलो, तेव्हा म्हणाला मला हे नको. मी पुन्हा आत आलो,वडील म्हणाले अरे त्यांना विचार तरी नेमकं काय हवं आहे. बाहेर येऊन विचारलं तर म्हणाला 'बेटा माझ्या भांड्यात थोडं तेल दे!' मी छोट्या वाटीभर तेल त्याच्या भांड्यात टाकलं आणि आत आलो पाहतो तो वडील घास तसाच धरून महाराजांच्या फोटो समोर उभे होते,त्यांचे डोळे भरून आले होते. मी ताबडतोब बाहेर आलो आमच्या घरासमोर तीन बाजूला तीन सरळ रस्ते जातात,बराच मोठा भाग एक दृष्टिक्षेपात नजरेत येतो तो माणूस कुठेच नव्हता. मग माझेही डोळे भरून आले,मी आत आलो आणि माझ्या डोक्यात एकदम जाणीव झाली की अरे आज तर हनुमान जयंती. मग मी तडक दवाखाना गाठला,डाॅक्टरांनी हासून स्वागत केलं म्हणाले अभिनंदन!थोडे काॅम्पलिकेशन्स झाले होते,मूल नाजूक स्थितीत होतं पण आता नाॅर्मल आहे. तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालंआहे!मला क्षणात आठवण झाली त्या वाक्याची ' कार्य सद्गुरू पूर्णत्वास नेतील. मारुती राया कृपा करील ' माझ्या समजुती प्रमाणे ती सद्गुरूंची कृपा आणि मुहूर्त देखील हनुमान जयंतीचा! व्वा! मी मनातल्या मनात हनुमंताचे आभार मानले आणि गजानन महाराजांना एकवीस पारायणं कबूल केलीत.
त्यानंतर महाराजांच्या कृपेने मी अनेक वेळा अशी पारायणं केलीत. पण मला आजही आठवतंय ती 1998-99 ची घटना. मी रोज एक अध्याय अशी एकवीस पारायणं केलीत आणि प्रत्येक वेळी नात्यातील एक कुटुंब प्रसादा साठी बोलवत गेलो ,जेव्हा पारायणं पूर्ण झाली तेव्हा एक विचार मनात आला की आपण या लोकांना शेगांव दर्शनाला नेलं तर?पण तो विचार मला सोडून द्यावा लागला कारण माझ्या आर्थिक परिस्थिती मुळे मला ते शक्य नव्हतं. मग काय महाराजांना रोज म्हणायचं आणि स्वस्थ बसायचं. एकदा रात्री खूप रडायला आलं पोथीत नेहमीच वाचत आलो....हा ग्रंथ केवळ चिंतामणी/चिंतिले फळ देईल जाणी/दृढतर विश्वास असल्या मनी/हे मात्र विसरू नका/ ...म्हटलं महाराज माझा दृढ विश्वास आहेच,तुम्ही समर्थ आहात. तुमची लीला अगाध आहे. जशी तुमची इच्छा तसं होऊ द्या. अशात इ.स.2000 उजाडलं आणि एक दिवस आर्वीहून मोठ्या भावाचा फोन आला ' विजय तुझ्या पुतणीचं लग्न ठरलं आहे,मुलगा जळगाव चा आहे. लग्न सतरा फेब्रुवारी ला आहे. पण त्या लोकांचा आग्रह आहे की लग्न खामगावला व्हावं. सर्व नातेवाईकांना आमंत्रण करतोच आहे. 'फोन ठेवला आणि मनात विचार आला. एक पार्टी आर्वी. दुसरी जळगाव आणि लग्न खामगाव? शेगांवच्या जवळ? वारे महाराजांची लीला!आणि त्यात भर म्हणजे जे नातेवाईक मला अपेक्षित होते त्यांनीच प्रस्ताव ठेवला. आपण तीन गाड्या करून खामगावला जाऊ आणि अनायसेच प्रगट दिन आहे तेव्हा शेगांवला दर्शनासाठी जाऊ. महाराजांची अगाध लीला आणि माझी इच्छा पूर्ण!
ठरल्याप्रमाणे खामगाव इथे लग्न उरकून आम्ही शेगांवला पोहोचलो. प्रगट दिनामुळे तिथे प्रचंड गर्दी होती,तरीही आमचं दर्शन मात्र व्यवस्थित झालं आणि आम्ही बाहेर महाद्वाराशी आलो. प्रवेश द्वाराशी आम्ही एकत्र होतो तशात पालखी निघाली ,हत्ती,घोडे,भक्त गणांची मांदियाळी,आणि त्या गर्दीत आमचा एक ड्राईव्हर आणि गाडी सहजासहजी दिसेना ,म्हणून थोडं उंच व्हावं या उद्देशानी तिथे जवळच असलेल्या झाडाच्या बुंध्याशी जाऊन,टाचा उंचावून मी पाहू लागलो आणि मला जाणवलं की कुणीतरी स्पर्श करून मला खुणावतय,पहिले डोक्याला नंतर पाठीला स्पर्श जाणवला आणि कानावर आवाज आला 'आला सर्वांना घेऊन शेगांवला?झाली तुझी इच्छा पूर्ण?'मी चमकून मागे पाहिलं,मागे कुणीच नव्हतं. मला दिसला ऐक तांबडा केशरी प्रकाश,त्या प्रकाशात मला बाकी काहीच दिसलं नाही. माझ्याही नकळत माझे हात नमस्कारासाठी जुळले आणि मुखातून शब्द बाहेर पडले...श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन!जय गजानन!
🌺अनुभव--विजय देशमुख, नागपूर
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Comments