top of page

अनुभव - 18

Updated: Jun 24, 2020

"श्री "

गजानन महाराज की जय ( अनुभव 18🌺 )

* तो साधू नव्हता वेषधारी *


जय गजानन! माणसाच्या आयुष्यात परिवर्तनाचा योग असला की अशा काही घटना घडतात की ज्या आपले आयुष्य एका वेगळ्या मार्गावर आणून सोडतात,आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाला हे तेव्हा लक्षात येत नाही पण पुढे जाऊन थोडा मागील गोष्टींचा विचार केला की घटनाक्रम उलगडीत जाऊन थोडाफार बोध होतो. माझ्याही आयुष्यात असच काहीसं झालं. मी रामभाऊ थाटे. इ.स.1965 च्या सुमारास पंचायत समिती मुर्तिजापूर अंतर्गत शिवणखुर्द या गावी शिक्षक म्हणून लागलो. इ.स.67-68 मधे मला ट्रेनिंगच्या निमित्ताने बुलडाना इथे जावं लागलं,आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर 1969-70 मधे एक वर्षासाठी पं. स.रिसोड मधील मोठेगाव येथील शाळेत सहशिक्षक म्हणून कार्य करावं लागलं.

त्या काळात मी नित्यनियमाने रोज गजानन विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचीत असे आणि दर एकवीस दिवसानी पारायण पूर्ण झालं की देवासमोर एक नारळ फोडीत असे. गजानन महाराज माझं दैवत आणि जे काही होतं ते त्यांच्याच इच्छेने,त्यांच्या योजने नुसार!ही माझी प्रामाणिक भावना.

आज मी तुम्हाला जो अनुभव सांगू इच्छितो,तो म्हणजे गजानन महाराजांनी एका साधुच्या रुपाने किंवा त्याच्या माध्यमातून माझ्यावर केलेली कृपा. त्याची ही कथा आहे.

गजानन विजय मधे दासगणू महाराजांनी साधूचं वर्णन करताना म्हटलं आहे,....परी तो साधु पाहिजे/साधु असल्या वेषधारी/ऐसी न होय गोष्ट खरी/माती न होय कस्तुरी/हे ध्यानी असू द्या/षड्विकार धुतल्याविना/अंगी साधुत्व येईना/आणि साधुविण होईना/अघटित कृत्य केव्हाही/... पोथीचे वाचक हे वर्णन नेहमीच वाचतात,मी ही वाचायचो पण असा साधु आपल्या संपर्कात कधी येईल हे स्वप्नातही वाटलं नव्हतं.

जेव्हा मला मोठेगाव इथे जावं लागलं तेव्हा मी फारसा उत्सुक नव्हतो पण मी मनाला समजावलं की हे सगळं महाराजांच्या इच्छेने घडत आहे. मी रुजू झालो. गाव आणि शाळा यात एक ते दीड कि.मी. अंतर होतं आणि वाटेत मधोमध एक महादेवाचं अति पुरातन हेमाडपंथी मंदिर होतं. आम्ही पाच सहा शिक्षक त्याच रस्त्याने शाळेत जाणं येणं करायचो. एक दिवस अचानक आम्हाला त्या मंदिरात एक साधु महाराज बसलेले दिसले. साधारण साठीच्या आसपास वय,भगवे कपडे,केस वाढलेले,दाढी वाढलेली,बाजूला कोपर्यात एक चटई,पाण्यासाठी मातीचं मडकं,एक कंदील आणि पाटी पेन्सिल. असं लक्षात आलं की ते मौनात आहेत. काहीही बोलत नाही,कुणी विचारलंच तर आपलं म्हणणं पाटी पेन्सिल च्या सहाय्याने व्यक्त करतात.

आम्ही त्यांची आस्थेनी चौकशी केली,मी त्यांना जेवणा विषयी विचारलं. पुढे शाळेत जाता येता मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन हा आमचा रोजचा क्रम झाला,बहुतेक वेळा त्यांच्या साठी जेवण नेण्याचं काम मी करु लागलो. माझ्या बाबतीत योग असा झाला की साधारण त्याच सुमारास अध्याय पाचवा येऊन पिंपळगावच्या शंकराच्या मंदिराचा संदर्भ आला होता त्यामुळे माझी त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी जरा आदराची होती आणि आम्हा सर्व मित्रांमधे माझ्याकडे ते विषेश कृपादृष्टीने पाहत होते.

ते नेहमी मंदिरातच बसून आपल्या साधनेत निमग्न रहात,भिक्षा मागण्यासाठी कधी बाहेर पडले नाहीत. कुणी दिलं तर उदरभरण. अन्यथा आपल्या जागी स्वस्थ!गरजा कमी,ते एक तपस्वी जीवन होतं.

एक दिवस त्यांनी मला समोर बसण्याची खूण केली,आणि पाटीवर माझ्यासाठी लिहिलं 'राम तुझ्यावर संतकृपेचा योग आहे. आता माझा मुक्काम इथून हलणार,तुला काही मागायचं असेल तर या पाटीवर लिहून दे.' मी पाटीवर लिहीलं,गजानन महाराजांच्या कृपेने सर्व आहे. मला काही नको! एक दिवस मधे गेला,त्यांनी पुन्हा लिहीलं बेटा माग तुला काही देण्याची इच्छा आहे. मी पुन्हा तेच लिहिलं. गजानन महाराजांच्या कृपेने सर्व आहे. मग दोन दिवसांनी त्यांनी मला पुन्हा समोर बसायला सांगितलं काही मिनिटं ते डोळे मिटून स्वस्थ बसून होते. त्यांनी करूणायुक्त नजरेनी माझ्याकडे पाहिलं आणि पाटीवर लिहीलं 'बेटा आता मी इथून मुक्काम हलविण्याची वेळ आली आहे. हे सर्व गजानन महाराजांच्या इच्छेने होत आहे हे समजून,गजानन महाराजांचीच ती इच्छा असं समजून तुला जे हवं ते तू मागून घे पुन्हा अशी वेळ येणार नाही. मग मात्र मी महाराजांचं स्मरण करून पाटीवर लिहीलं..मला पहिला मुलगा व्हावा. त्यांनी लिहीलं तुझी इच्छा पूर्ण होईल,त्या मुलाचं नाव गजानन ठेवशील. मला ते ऐकून आनंद झाला त्यानंतर त्यांनी पुन्हा लिहीलं अजून काही माग. मग मी लिहिलं पं.स.मुर्तिजापूर इथे मी नोकरीला लागलो त्याच पंचायत समिती मधे माझी शेवट पर्यंत सेवा व्हावी. त्यावर त्यांनी लिहिलं 'तथास्तु 'पुढे लिहिलं श्रावण महिन्यातील गुरूवारी शेगांवच्या वार्या करीत जा आणि दर पौर्णिमेला घरी सत्यनारायणाची पूजा करीत जा. गजानन महाराज तुझी मनोकामना पूर्ण करतील. आमचा संवाद पूर्ण झाला मी त्यादिवशी शिव मंदिरातून बाहेर पडलो तो एक प्रचंड उर्जा घेऊन!आयुष्यभर साथ करील अशी एक आठवण माझ्या सोबत होती. काहीच दिवसांनी एक दिवस शाळेला सुट्टी होती पण मी खास त्यांना भेटण्यासाठी म्हणून मंदिरात गेलो,तर मला दिसलं एका कोपर्यात,चटई,मडकं,कंदील,आणि पाटी सुध्दा ठेवली आहे. पण त्यांचा मात्र कुठेच पत्ता नाही. फक्त वातावरणात त्यांच्या अस्तित्वाचा भास होत होता. ते कुठेच दिसले नाही. त्यानंतर आयुष्यात ते कधीच आढळले नाही,कुणाकडून तसं काही कळलंही नाही.

त्यांची एक भविष्यवाणी तर लगेच खरी ठरली होती. मला तीन मुलं एक मुलगी आहे,माझ्या मोठ्या मुलाचं नाव

' गजानन' आहे. दुसरी भविष्यवाणी खरी ठरण्यासाठी मला बरीच वर्षे वाट पहावी लागली. कारण तेव्हा माझ्या नोकरीची खूप वर्षे बाकी होती. अनेक वर्ष सेवा झाल्यानंतर एकाच पंचायत समितीत सेवा देऊन मी निवृत्त झालो. निवृत्तीच्या दिवशी मला त्यांची प्रकर्षाने आठवण झाली आणि मनानी आधीच मान्य केलेल्या गोष्टीचा मी पुनरुच्चार केला ' तो साधु नव्हता वेषधारी 'तो वृत्तीनेही साधु होता आणि अगदी माझ्याच पुरतं बोलायचं तर माझं अंतर्मन सांगतं की गजानन महाराजांनीच त्याच्या माध्यमातून मला मार्गदर्शन केलं.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आयुष्यभर वागलो .आजही वयाची बहात्तर वर्ष पूर्ण झालीत पण श्रावण महिन्यातील गुरूवारी शेगांवच्या वार्या आनंद देताहेत. त्यातही महाराजांनी छान अनुभव गाठीशी बांधून दिले आहेत, पण ते पुढील भागात सांगीन म्हणतो .तोपर्यंत.....श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!

🌺 अनुभव-- रामभाऊ थाटे. शिवणखुर्द.

शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comments


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page