अनुभव - 19
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय ( अनुभव 19🌺 )
* इथे मशी त्राता कोण, गजानना तुज वाचून. *
जय गजानन! अध्यात्मिक वाटचाल करताना,आपल्या उपास्य दैवताची उपासना करताना,वाटेत कुणा जाणकाराची,सत्शील प्रवृत्तीच्या,अधिकारी व्यक्तीची साथ मिळाली तर आपल्या मनातील विश्वास वाढून साधना करण्यात अधिकच समाधान प्राप्त होते. माझ्या नशीबाने मला एका महादेव मंदिरात असाच एक साधु भेटला.तेव्हा मी गजानन महाराजांची गजानन विजय पोथी वाचणे ,त्यांचं स्मरण करणे अशी साधना करीतच होतो,साधुने सुचविल्यानंतर मी श्रावण महिन्यात दर गुरुवारी शेगांवची वारीही करू लागलो. श्रावणात कधी चार तर कधी पाच गुरूवार येणार पण मी मात्र सलग पाच गुरूवारी वारी करण्याचा क्रम ठरवून ठेवला आणि सातत्याने तो क्रम पाळत आलो आणि गजानन महाराजांना माझी विनम्र विनंती आहे की त्यांनी माझ्याकडून हा नियम शेवट पर्यंत पूर्णत्वास न्यावा. एवढे मात्र खरे की अनुसंधानातील सातत्य टिकवून ठेवले तर महाराजांपर्यंत आपली प्रार्थना पोहोचते आणि तसा वारंवार अनुभव आपल्याला ते देतात.
इ.स.1990-91 ची एक घटना मला आठवते,आमचं शिवणखुर्द गाव मुख्य रस्त्यापासून बरच आत आहे. आम्हा खेड्यातील लोकांना रस्त्याअभावी,वाहतुकीच्या साधनां अभावी प्रवासात काय त्रास होतो याची कल्पना सिमेंटच्या जंगलात असणार्या लोकांना येणं जरा कठीणच आहे. तो काळ तर अधिकच बिकट होता. पाउल वाटे सारख्या रस्त्याने जंगलवजा भागातून,नाला ओलांडून प्रथम दोन कि. मी. अंतर चालत जाऊन,नंतर छोट्या रस्त्यावर एस.टी. बसची वाट पाहून किनखेड फाट्यापासून मुर्तिजापूर स्टेशन पर्यंत,मग तिथून पॅसेंजर मिळाली की जवळपासच्या गावात जायचं आणि तिथेही पुन्हा तोच प्रकार करायचा.तर झालं असं की माझ्या एका मुलानी तलाठी या पदासाठी जिल्हा निवड मंडळाकडे अर्ज केला,कारंजा या गावी एका रविवारी लेखी परीक्षा होणार होती, मुलानी माझ्या जवळ इच्छा व्यक्त केली की मालखेड या गावी एक अधिकारी राहतात त्यांना मी भेटून यावं जेणेकरून पुढील मार्ग कदाचित सोपा होऊ शकेल,परीक्षेची कल्पना पण येऊ शकेल. त्यानुसार मी शुक्रवारी जाऊन शनिवारी परत यावं अशी योजना ठरली आणि मी बाहेर पडलो. माझ्या कडून सर्वतोपरी प्रयत्न करून मी शनिवारी परतीच्या प्रवासाला निघालो. दगडधानोरा या गावापासून पायी पाच किलोमीटर अंतरआलो तिथे वरफळी गाव आहे तिथून एस. टी. बसने बडनेरा गाठलं तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते तिथून मुर्तिजापूर स्टेशनला रात्री साडेदहाच्या सुमारास उतरलो. दरम्यानच्या काळात त्या परिसरात जोरदार पाऊस येऊन गेला. तिथून किनखेड फाट्यापर्यंत पोहोचलो तो साडेअकरा बाराचा सुमार झाला होता. एस टी बस मला सोडून पुढे निघाली,आता तिथे मी एकटा होतो. किरर्र अंधार,आजुबाजुला बर्यापैकी जंगल,दोन कि. मी. एकटं पायी जायचं. वाटेत वस्ती नाही,रस्त्यावर लाईट नाही,अन्य काही पर्याय नव्हताच मी वाट चालण्यास प्रारंभ केला,सोबतीला रात किड्यांची किरकिर,पानांची सळसळ,बाजूला काही सरपटल्याचा आवाज ,मधेच कुठेतरी पक्षाची फडफड. मनात विचार आला तिकडे नाल्याला पूर आलेला असणार,मिनिटा मिनिटाला कुठे विचित्र आवाज आला की अंगावर सर्रकन काटा. प्रचंड भितीदायक वातावरण.मी गजानन महाराजांचा धावा सुरू केला,एकटाच होतो,जोरजोरात' गजानन महाराज की जय'घोष सुरू केला. हे गजानन महाराजा 'इथे मशी त्राता कोण/गजानना तुजवाचुन.?देवा मला सुखरुप घरी पोहोचवा. मी नाला कसा पार करीन?गजानन महाराज की जय!गजानन महाराज की जय!करीत समोर सरकू लागलो. एकेक पाऊल जपून टाकावं लागत होतं आणि अचानक मागे कुणीतरी चालतो आहे असा भास झाला. एक उंच पुरा तरणाबांड पुरूष मागे उभा होता. म्हणला घाबरु नकोस मी पुढच्याच गावात राहतो,नाल्याला पूर आला असेल नं?चल एकमेकांच्या सोबतीने अंतर सहज पार करू. नंतर पुढील प्रवास त्याच्या सोबतीने कसा संपला कळलंच नाही. मी घरी पोहोचलो तर रात्रीचा एक वाजत होता.मी कपडे बदलून अंथरुणावर पडलो तेव्हा लक्षात आलं,त्याला आपण नाव विचारलं नाही. त्या मार्गावर वारंवार बस येत नाही. रात्रीच्या शांततेत दूरवरून वाहनाचा आवाज येतो तो आलाच नाही,बसचे दिवेही दिसले नाहीत,मग हा माणूस आपल्याजवळ आला कसा?पण त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याजवळ नव्हतं. मी गजानन महाराज की जय!म्हणून झोपी गेलो.
माझ्या श्रावण वार्या सुरू झाल्या पासून मी आतुरतेने श्रावणाची वाट पाहत असतो. एका श्रावणात माझ्या चार वार्या पूर्ण झाल्या आणि पाचवा गुरूवार आला. तेव्हा मी शाळेत मुख्याध्यापक होतो. मी गुरूवारी अर्ध दिवसीय रजेचा अर्ज देऊन दुपारी 2.30 च्या पॅसेंजरनी मुर्तिजापूर येथून शेगांव साठी जात असे,मी पाचव्या वारीच्या तयारीत अर्ज देऊन बाहेर पडणार तोच शाळेत उपशिक्षणाधिकार्याची गाडी आत शिरली,गाडी पाहून माझं मन उदास झालं,कारण आता माझी पाचवी वारी चुकणार हे निश्चित झालंआणि माझी तगमग सुरू झाली. चेहरा चिंताग्रस्त दिसू लागला. अधिकारी म्हणाले थाटे सर शाळेचा रेकाॅर्ड घेऊन या तपासणी करायची आहे. रेकाॅर्ड तर मी आणला पण तोंडानी माझी पुटपुट सुरू झाली. हे गजानन बाबा,महाराजा,अधिकार्यांच्या समोर मी काही बोलू शकत नाही,गजानन विजय मधे मी वाचतो की संस्थानला झालेला दंड माफ करण्याची बुद्धी तुम्ही त्या अधिकार्याला दिली आता या अधिकार्याचं काय करायचं ते मी तुमच्यावर सोडतो. माझी अस्वस्थता त्या शिक्षणाधिकार्याच्या नजरेतून कशी सुटणार?त्यांनी विचारलं थाटे सर तुमची तब्येत बरी नाही का?कशाची चिंता करताय?त्यावर माझ्या सहकारी शिक्षकांनी मोकळेपणानी सांगितलं 'आज त्यांची पाचवी शेगांव वारी आहे. ती सुटू नये म्हणून त्यांची ही चिंता आहे 'त्यावर आश्चर्य म्हणजे अधिकार्यांनी सरळ फाईल बंद केली आणि म्हणाले अहो एवढंच ना?मग सांगा न मोकळेपणानी,शेगांवला जाता आहे नं?हे घ्या माझे एकवीस रुपये तिथे द्या आणि निघा आधी तुम्ही. आधीच ऊशीर झाला आहे. मी पलीकडच्या शाळेत जातो उद्या आपण भेटू. मी घाईघाईने पळत सुटलो मला बराच ऊशीर झाला होता,आता धोका गाडी सुटून जाण्याचा होता. शरीराने वेग पकडला होता,मनात महाराजांचा धावा सुरू होता. आणि एकीकडे वारी पूर्ण होऊ द्या ही प्रार्थना सुरू होती. धावत पळत मुर्तिजापूर स्टेशन गाठलं ,पाहिलं तर प्लॅटफॉर्म रिकामा,धस्स् झालं. बहुधा गाडी निघून गेली होती. धापा टाकत समोर असलेल्या टि सी ला विचारलं..2.30 ची पॅसेंजर? त्यानी माझं वाक्य पूर्ण केलं 'आज लेट आहे. पाच दहा मिनिटात येईल. ते ऐकून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराजांनी सगळं काही सांभाळलं होतं. मी गाडीत बसलो तेव्हा पूर्ण अस्वस्थता संपली होती आणि मी कमालीचा शांत झालो होतो आणि मनात घोष होत होता..श्री गजानन !जय गजानन! श्री गजानन! जय गजानन !
🌺 अनुभव--रामभाऊ थाटे , शिवणखुर्द
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Comments