top of page

अनुभव - 20

"श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव 20🌺 )

* जादूई स्पर्श *


जय गजानन! गजानन महाराज हा माझ्यासाठी अगदी लहानपणापासून जिव्हाळ्याचा विषय .माहेरी असणारंच वातावरणात माझ्या सुयोगामुळे मला सासरीही प्राप्त झालं. अर्थात तिथेही सर्वांनाच गजानन महाराज हा अत्यंत प्रिय विषय. मी मुळची महाराष्ट्रातील,मात्र लग्नानंतर माझं वास्तव्य मध्य प्रदेशात इंदौर इथे आहे. आज आमच्या लग्नाला बरीच वर्षे झालीत. माझा मोठा मुलगा कौस्तुभ आणि लहान मुलगी गीता त्यावेळी दहा आणि आठ वर्षाचे असतील,तेव्हाची गोष्ट. दसरा होता तेव्हाची गोष्ट,नेमकं सांगायचं तर दसर्याच्या नंतरचा तो दिवस होता. आपल्या देशात दसरा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने मनविण्यात येतो. इंदौर कडील भागात दसर्याच्या दिवशी रावण दहनाला महत्त्वआहे आणि दुसर्या दिवशी आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी जाण्याची प्रथा आहे. काही लोक याला बासी दसरा असं म्हणतात.

आमच्या परिचयात एक अध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती होत्या त्यांना आम्ही आदरानी अण्णा महाराज असं म्हणत असू. त्या दिवशी मी माझ्या मोपेडवर कौस्तुभ आणि गीता ला घेऊन अण्णांना भेटून शुभेच्छा देणे आणि नमस्कार करून आशीर्वाद घेणे या उद्देशाने निघाले. छावणी बाजारपेठेच्या भागातून मी समोर जात होते,रस्त्यावर गर्दी होती,सभोवताली वाहनांची गर्दी झाली म्हणून मी रस्त्यावर गाडीच्या दोन्ही बाजूला पाय सोडून सावकाश समोर सरकत होते आणि अचानक कसं काय कोण जाणे,एकेठिकाणी अॅक्सिलरेटर दिल्या जाऊन गाडी वेगात समोर सरकली पण माझा उजवा पाय रस्त्यावरच राहून चपलेसकट उलट दिशेने दबल्या गेला,मी जोरात ओरडले,लोकांना कळेना की अपघात झालेला दिसत नाही आणि ही बाई ओरडते का आहे?मी कळवळून गाडी वरून उतरण्याचा प्रयत्न केला. दोन जणांनी माझी गाडी धरली आणि मला बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर बसतं केलं,गाडी बाजूला घेतली,मुलं भेदरल्या सारखी बाजूला उभी होती माझा पाय चांगलाच सुजला होता,एक पाऊलही समोर टाकणं मला शक्य होत नव्हतं. मी डोकं हातात धरून कळवळत होते 'आई गं,गजानन महाराजा. आई गं गजानन महाराजा. ' तशातच आता आजुबाजुचे बघे गायब झाले होते. आम्ही तिघेच तिथे होतो.आईला रडताना पाहून मुलं बिचारी अजूनच केविलवाणी झाली. तशातच विचार आला,चालणं शक्य नाही,सभोवताल कुणी नाही,कुणाची मदत नाही,गाडी कशी नेऊ,घरी कशी जाऊ?तशातच पायात जोरात कळ आली आणि पुन्हा ओरडले 'आई आई गं!देवा गजानन महाराजा!' डोळ्यासमोर अंधेरी आली आणि अचानक एक माणूस समोर आला. शुभ्र स्वच्छ कपडे अंगावर असलेला साधारण साठी च्या घरातला,तो समोर बसला त्याच्या हातात एक कसलीशी डबी होती त्यातून तो माझ्या पायाला मलम लावू लागला. मी एकदम चमकली म्हटलं अहो बाबा हे काय करताय? तसं म्हणाला बेटी शांत हो जाओ सब ठीक होगा. त्यावर मी म्हणाले मला द्या मी लावते,तर म्हणाले 'देखो बेटी मेरे हाथोसे मलहम लगेगा तो ठीक हो जाएगा! ' आपल्या वडिलांच्या वयाचा माणूस पायाला मलम लावतो आहे. मला कसतरीच झालं. पण एवढं मात्र नक्की की जसा त्यांचा हात पाऊलावरून फिरू लागला तसं दुःख चमत्कारीकरित्या कमी झालं . त्यांनी अगदी पायात असलेल्या पैंजणापासून बोटापर्यंत औषध लावलं,वेदना कमी झाल्यावर मी त्यांना विचारलं बाबा आपण कोण? त्यावर म्हणाले लक्ष्मी नारायण मिठाईवाला दुकान आहे तिथे नोकरी करतो. आता माझ्या लक्षात आलं,त्यांचे कपडेच केवळ स्वच्छ शुभ्र नव्हते तर वाणीत गोडवा होता,एकूण व्यक्तीमत्व प्रभावी व अतिशय प्रसन्न होतं आणि स्पर्श तर जादूचा होता!

मला म्हणाले बेटा पांच मिनिटोमे आप चल सकोगी और धीरे धीरे ठीक होगा. मी म्हटलं मला हे मलम द्याल का?म्हणाले मै नयी डबी लाकर देता हूं.ते बाजूला दोन मिनिटं चालत जाऊन डावीकडे वळले आणि पाच मिनिटांनी परत आले. त्यांनी एक डबी मला दिली,किती पैसे द्यायचे विचारलं तर राहू द्या म्हणाले,मी खूपच आग्रह केला तेव्हा पाच रुपये घेतले आणि ते त्याच दिशेनी निघून गेले. हे सगळं दहा मिनिटात आटोपलं,मुलं जेव्हा म्हणाली आई आपण त्यांना थँक्यूही म्हटलं नाही. तेव्हा मी भानावर आले,मला लंगडत पण चालता येत होतं.

मी तिथून थोडी कष्टाने का होईना पण अण्णा महाराजांकडे पोहोचली त्यांनी सगळं ऐकलं म्हणाले आज तुझ्यावर महाराजांनी कृपा केली. तिथून परत येताना मुलं म्हणाली आई चल आपण लक्ष्मी नारायण मिठाईवाला कडे जाऊ ते आजोबा असतील त्यांना थॅन्क्स तर देऊ. आता माझ्याही मनात त्यांना पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती,मी गाडी दुकानाकडे नेली. दुकानदाराला सगळं सांगितलं,तो म्हणाला तुम्ही सांगता तसा कुणीही इथे नाही. मी फारच आग्रह केला तेव्हा त्यानी चक्क दुकानात असणार्या सर्व लोकांना माझ्या समोर अगदी ओळख परेड साठी उभं करावं तसं सर्वांची रांग लावली पण त्यात माझे 'डाॅक्टर 'कुठेच नव्हते. आता माझी उत्सुकता शिगेला पोहोचली,त्याच मनस्थितीत आम्ही घरी पोहोचलो. मी पहिले महाराजांच्या फोटो समोर हात जोडून उभी राहिली,तर मुलांनी घरात सर्व वृत्त कथन केलं. मला फोटोत महाराजांच्या चेहर्याऐवजी तोच चेहरा दिसू लागला. दोन चेहरे आलटून पालटून दिसू लागले. घरात सगळ्यांनी महाराजांचे आभार मानले,आईंनी महाराजांसमोर दिवा लावला. त्या रात्री मी मिस्टरांजवळ खूप रडले. महाराजांनी त्यांच्या रुपाने मदत धाडली आणि आपण नमस्कारही करू शकलो नाही. मिस्टरांनी आश्वासन दिलं ' उद्या आपण त्या औषधांच्या दुकानाला भेट देऊ '

दुसरे दिवशी सकाळी आम्ही मी जिथे बसले होते तिथे पोहोचलो. मी मिस्टरांना,ती दिशा,ते अंतर आणि डावीकडे ते वळले होते हे सांगितलं. मिस्टर तेवढं अंतर बरोबर त्या दिशेने गेले पण उजवीकडे तर रस्ताच नव्हता आणि डावीकडे होता एक कचर्याचा ढीग. जवळपास कुठलही दुकान नव्हतच. ते सर्व कळल्यावर आम्ही फक्त आश्चर्याने एकमेकांकडे पाहत राहिलो,बाकी आम्ही करणार तरी काय होतो?

पुढे आम्ही ते औषध वापरलं पण काहीच परिणाम जाणवला नाही आणि ' देखो बेटी मेरे हातोसे मलहम लगेगा तो ठीक हो जाएगा 'या वाक्याचं महत्त्व कळलं.

आज त्या गोष्टीला इतकी वर्षं लोटलीत पण ते सर्व आठवलं की आजही अंग शहारून येतं आणि नकळत माझा हात माझ्या उजव्या पाऊलावरून फिरतो,त्या जादुई स्पर्शाची आठवण एकदम ताजी होते आणि आपोआप स्मरण होतं..श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--सौ. शुभांगी पुराणिक देशपांडे. इंदौर

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

コメント


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page