अनुभव - 21
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
"श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 21 🌺 )
* तुझी चिंता त्यासी सर्व आहे *
जय गजानन ! माझ्या आजोबांनी गजानन महाराजांना प्रत्यक्ष पाहिले होते. त्यामुळे आमच्या घरात गजानन महाराजांचं गुणगान हा माझ्या जन्माच्या पूर्वीपासून असलेला भाग. मी केव्हा त्यात सामील झालो हे तर मला आठवतही नाही. 1972 साली जेव्हा मी मॅट्रीक झालो,(तेव्हा अकरावी मॅट्रीक होतं) मला स्वाभाविकच वाटलं,आपण शेगांवला जायला हवं,दर्शन घ्यायला हवं. म्हणून मग मी आणि माझा एक मित्र,आम्ही घरून परवानगी घेऊन मनमाड स्टेशनवरून शेगांव साठी प्रवासास प्रारंभ केला. आमचं शेगांव दर्शन छान पार पडलं आणि आम्ही परतीच्या प्रवासासाठी शेगांव स्टेशन गाठलं. तेव्हा वारंवार गाड्या नसल्यामुळे गाडी येण्याच्या थोडावेळ आधी तिकीटाची खिडकी उघडायची. आम्ही स्टेशनवर पोहोचलो तेव्हा तिकीट खिडकी बंद असल्यामुळे आणि बाहेर बसायला जागा नसल्यामुळे,आम्ही विचार केला आत प्लॅटफॉर्म वर जाऊ खिडकी उघडली की येऊन तिकीट घेऊ कारण गाडीला वेळ होता. आम्ही आत एका बेंचवर बसलो,थोड्या वेळाने दुसर्या प्लॅटफॉर्मवर कुठलीशी एक पॅसेंजर येऊन गेली. काही लोक उतरले,गाडी निघून गेली. पाच मिनिटांनी आम्ही बसलो होतो तिथे टि. सी. आला आणि आम्हाला तिकीट विचारू लागला अर्थातच आमच्या जवळ तिकीट नव्हतच. टि. सी. चा समज झाला की आम्ही आताच गेलेल्या गाडीतून उतरलो आणि डब्लु. टी. अर्थात विदाऊट तिकीट आहे आणि त्याचं लहान मुलं पाहून,दंड,शिक्षा,वगैरे धमक्या देणं सुरू झालं. आम्ही घाबरुन गयावया करू लागलो. मनात महाराजांची प्रार्थना सुरू झाली. त्याला सांगितलं आम्ही दर्शन घेऊन आलो आहे आणि येणार्या गाडीने मनमाडला जायचं आहे. प्रथम तो ऐकेना आणि माझा इकडे गजानन महाराजांचा धावा सुरू,तोच काय झालं कुणास ठाऊक. टि. सी. म्हणाला,तुम्ही दर्शन घेऊन आलात नं?पाहू तुमची पिशवी ?मी गजानन विजय पोथी विकत घेतली होती. त्याची नजर विजय ग्रंथावर जाताच त्यानी ग्रंथ अत्यंत आदरानी डोक्याला लावला आणि सांभाळून जा मुलांनो असं म्हणून आपल्या कामाला निघून गेला. इकडे आम्ही दोघांनी गजानन महाराज की जय!म्हणून सुटकेचा श्वास सोडला.
पुढे महाराजांच्या आशीर्वादाने शिक्षण पूर्ण झालं आणि मला युनायटेड वेस्टर्न बँकेत नोकरी लागली (जिचं नाव पुढे आय.डी.बी.आय.झालं)जसं जमेल तसं गजानन विजय ग्रंथाचं पारायण होत होतं. 1992 सालची गुरूपौर्णिमा होती त्या दिवशी माझ्या मनात असं आलं की,प्रगट दिन आणि ॠषी पंचमी आपण महत्त्वाचे दिवस मानतो. पण गजानन महाराज आपले गुरू,मग गुरूपौर्णिमेला आपण काही करायला नको का?आणि मी एकवीस रूपयांची मनीऑर्डर शेगांवला पाठवली.नंतर दरवर्षी गुरूपौर्णिमेला न चुकता कधी एकवीस,एक्कावन्न,शक्य झालच तर एकशे एक अशी काही राशी पाठविण्याचा क्रम सुरू झाला,ही आपली गुरूदक्षिणा, या भावनेतून मी हा क्रम न चुकता सुरू ठेवला. सतत अठरा वर्ष हा क्रम अखंडपणे सुरू राहिला आणि मला वाटतं साधारण 2010 ची वगैरे ती गोष्ट असावी मी नोकरीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथे बॅन्केत कार्यरत होतो. तो गुरूपौर्णिमेचा दिवस होता,मला पोस्टात जाऊन नित्याप्रमाणे मनिऑर्डर करायची होती आणि इकडे आपली जागाही सोडता येत नव्हती,पोस्टात रोखीच्या व्यवहाराची विशिष्ट वेळ ठरली असते. आता निघतो नंतर निघतो करीत मला थोडा उशीरच झाला आणि मी घाईघाईने पोस्टात पोहोचलो.पण माझ्या समोरच तिथल्या लेडीजनी खिडकी बंद केली. मी म्हटलं मॅडम काही सेकंदच झाले आहेत,एवढे माझे फक्त एकवीस रुपये घ्या,शेगांवला मनिऑर्डर करायची आहे. माझ्यावर कृपा करा नाही म्हणू नका. एक ना दोन त्या बाईंनी माझ्या विनंती कडे साफ दुर्लक्ष करून त्या आत निघून गेल्या. बरं पूर्ण दोष त्या बाईंचाही नव्हता,माझ्या कडूनच हलगर्जीपणा झालं होता. इतक्या वर्षांचा गुरूदक्षिणेचा क्रम आज खंडित होणार होता. माझा चेहरा काळवंडला मी स्वतःला दूषणं देत माघारी फिरलो. घरी परतलो तर चेहर्यावरचं औदासिन्य लपत नव्हतं. सौ. ला सगळा प्रकार सांगितला,आता मी करू काहीच शकत नव्हतो,सौ. नी सुचवलं,आता देवासमोर स्वस्थ बसा,महाराज सगळं जाणतातच तरीही त्यांना सर्व कथन करून क्षमा याचना करा. गजानन महाराज कृपाळू आहेत तेच काही मार्ग सुचवतील. मग बराच वेळ तिथे बसून मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला,अशा वेळी आपणच आपली समजूत घालण्याचाही प्रयत्न करतो. मला ओव्या आठवू लागल्या.... पैशाप्रती पाहून/महाराज बोलले हांसोन/काय व्यापारी समजून/मजला तू हे अर्पिसी?/ हे नाणे तुमचे व्यवहारी/मला न त्याची जरूरी/भावभक्ती नाण्यावरी/संतुष्ट मी रहातसे/ ... .. महाराजांना म्हटलं महाराज हे तर त्रिवार सत्य आहे,पण आज तुमचा हा भक्त ' गुरूदक्षिणा 'न दिल्या कारणानी उदास झाला आहे. आता सर्व तुमच्या हाती. ती संध्याकाळ,ती रात्र,अस्वस्थतेत संपली आणि दुसरा दिवस निघाला. मी बॅन्केत पोहोचलो आणि स्वतःला कामात गुंतविण्याचा प्रयत्न करू लागलो.
दुपारी तीन वाजण्याचा सुमार असेल चपराशी बोलावण्यासाठी आला. 'साहेब तुमचा फोन आहे,कुणी भानगावकर आहे 'ते ऐकून मी बुचकळ्यात पडलो. मग स्मरण शक्तीला ताण दिल्यावर मला आठवलं,सहा सात वर्षांपूर्वी याच ब्रॅन्चला माझ्या सोबत काम केलेला हा मित्र होता. मधल्या काळात त्याच्याशी फारसा संबंध आला नव्हता. आज अचानक त्याचा फोन ऐकून मी चकित झालो. पण पुढे तो जे काही बोलला ते ऐकून तर माझी अवस्था चकित होण्याच्याही पलीकडची झाली. तो सांगत होता 'अरे प्रदीप काल गुरूपौर्णिमा झाली. मी तुला न विचारता आपल्याच मनानी एक उद्योग केला यार. काल मी शेगांवला होतो. मला अचानक अशी प्रेरणा झाली की तुझ्या नावानी शेगांवला पैसे द्यावे आणि मी पंचवीस रूपये देऊन तुझ्या नावे पावती घेतली. मला तुझा पोस्टल अॅड्रेस सांग मी प्रसाद पाठविण्याची सोय करतो.' आमचं बोलणं संपलं मी फोन ठेवून केबिनच्या बाहेर आलो तेव्हा चेहर्यावरील औदासिन्य पार नाहीसं झालं होतं. माझ्या मित्रांच्याही ते लक्षात आलं,पण अर्थात त्यांच्या हे नाही लक्षात आलं की तो क्षण मला कुणी प्राप्त करून दिला आहे आणि त्या क्षणी माझं मन गजानन महाराजांच्या भक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे इतकंच नाही तर मी आनंदानी आतल्या आत जप करतो आहे..श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव-- प्रदीप कारेकर ,मालेगाव
शब्दांकन --जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे..
Comments