top of page

अनुभव - 22

"श्री "

गजानन महाराज की जय (अनुभव 22 🌺 )

* दीनांचा दयाळू, भक्तांचा सोयरा. *


जय गजानन! गजानन महाराजांची भक्ती,त्यातून येणारी प्रचिती,आणि त्यातून वाढीस लागणारी भक्ती. असा अनुभव एखाद्या गजानन महाराज भक्ताला मिळत असेल तर त्याला त्यापेक्षा अधिक काय हवं? आम्ही जेव्हा नाशिक येथे आमच्या घराची वास्तूशांत केली तेव्हा आम्ही उभयतांनी महाराजांच्या मंदिरात जाऊन महाराजांना अतिशय आग्रहाने निमंत्रण दिले आणि गजानन महाराजांनी आमच्यावर कृपा केली. महाराजांनी आमंत्रण तर स्वीकारलच पण मी पेशाने वकील म्हणून की काय महाराज घरात एक खूण मागे ठेवून गेले. 'गजानन महाराज संस्थान शेगांव,भोजन कक्ष ताट क्र. 301 'ही ती खूण. जी अनेक भक्तांनी आवर्जुन घरी येऊन पाहिली आणि अजूनही भक्त येत असतात.

आपण गजानन महाराजांना आपल्यासाठी काही प्रार्थना करतो आणि महाराज जेव्हा आपली प्रार्थना ऐकतात,तेव्हा आपलं मन आनंदित होतंच पण आपण जेव्हा दुसर्यासाठी प्रार्थना करतो किंवा ज्याला गजानन महाराज माहिती नाही अशा कुणाला आपण महाराजांना प्रार्थना करण्याचे सुचवितो आणि त्याची प्रार्थना जेव्हा फलदायी होते तेव्हा आपल्याला विशेष आनंद होतो. मला महाराजांनी नुकताच असा आनंद प्राप्त करून दिला,ती गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे.

त्याचं असं झालं की आम्ही ज्या सोसायटीत राहतो तिथे वाॅचमन म्हणून साधारण साठीच्या घरात वय असणारे एक रामराव नावाचे गृहस्थ कामाला आहेत,स्वभावाने गरीब,मवाळ,शांत. 'नेमून दिलेलं काम व्यवस्थित करणारे 'म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. आधीच पदरात गरीबी त्यातून तीन मुली एक मुलगा असं मोठं कुटुंब,एका मुलीचं कसंबसं लग्न झालं,जावयाच्या ओळखीने ही नोकरी मिळाली आणि रामराव बायको मुलाला गावीच ठेवून दोन मुलींसह कामाच्या ठिकाणी आले आणि मिळालेल्या छोट्या जागेत आसरा मिळविला. आता आयुष्याची घडी सुरळीत होईल असं वाटून ईमानदारीने काम करीत असतानाच मध्यंतरी एक दिवस सोसायटीने विनाकारण,किंवा कदाचित अत्यंत क्षुल्लक कारणाने,किंवा कदाचित कुणाचा अहंकार दुखावल्याने तडकाफडकी रामरावला कामावरून काढून टाकलंआणि सामान घेऊन बाहेर कुठे निघून जाण्याचा आदेश दिला,रामरावचा संसार अचानक उघड्यावर आला. सोसायटीने नवीन कुणाचीतरी नेमणूक रामरावच्या जागेवर करून टाकली. आता एकीकडे रात्रीचा काळोख दुसरीकडे भविष्यातील अंधार. दोन मुलींसह जाणार कुठे?कारण जावयाचं घर अगदीच लहान,कसंबसं मुलींना बहिणीच्या घरी रात्रीचा सहारा देऊन रामरावनी सोसायटीच्या कंपाॅउन्ड वाॅलशी आपली वळकटी पसरली. मी माझी कामं उरकून घरी आले तेव्हा चौकशी केल्यावर मला सर्व हकीकत समजली. त्या रात्री बरीच थंडी होती. रामरावला बाहेर झोपू देणं मला आणि मिस्टरांना तर अमानवी वाटलं. आम्ही त्यांना आग्रहानी घरात निजायला सांगितलं,प्रथम ऐकायला तयार नव्हते पण खूप समजूत घातली तेव्हा रात्री हाॅलमधे निजावे आणि सकाळी कामाच्या शोधात बाहेर जावे हे त्यांनी मान्य केलं.

आमच्या हाॅलमधे महाराजांसाठी एक खास बैठक तयार करून त्यावर शेगांवला प्रसाद रुपाने मिळणारी मुर्ती व त्यामागे समाधीचा फोटो लावला आहे. माझ्या दिवसाची सुरुवात महाराजांना नमस्कार करून होते आणि रोज रात्री महाराजांसमोर उभं राहून त्यांचे आभार मानून माझा दिवस संपतो. दोन रात्री रामराव त्याच हाॅलमधे निजले आणि दिवसभर कामाच्या शोधात वणवण फिरले,पण काम काही मिळाले नाही. त्यांच्या मनात गावाकडे परत जाण्याचा विचार घर करू लागला. तिसर्या दिवसाच्या शेवटी रात्री,मी जेव्हा महाराजांसमोर उभी राहिली तेव्हा अचानक माझ्या मनातील भावनांचा उद्रेक झाला. रामराव तिथेच होते. मी त्यांना सांगू लागले 'रामराव हा माझा देव आहे नं याच्याजवळ सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे. हा फारच प्रेमळ आहे,हा भाव भक्तीचा भुकेला आहे. याला तुम्ही तुमचं म्हणणं सांगा. बघुया आपण काय होतं ते.' रामराव म्हणाले, मॅडम या दोन दिवसातच मी यांना इथे पाहिलं,बाकी मला काही माहिती नाही. त्यावर मी म्हटलं,तुम्हाला जरी काही माहिती नसलं तरी माझा देव सर्व जाणतो,असं म्हणून मी निजण्यासाठी निघून गेले.

दुसरे दिवशी सुटी असल्यामुळे आम्ही जरा आरामात उठलो तर रामराव अंथरुण पांघरूणाची व्यवस्थित घडी कोपर्यात ठेवून बाहेर निघून गेले होते. त्यांनी महाराजांना प्रार्थना केली किंवा नाही, हे मला कळायला काही मार्ग नव्हता.

इतक्यात दारावरची बेल वाजली,दारात एक नेपाळी बाई उभी होती. ती सांगू लागली की..आम्ही इथले नवीन चौकीदार. पण आम्ही काम सोडून जातो आहे. इथे साप आहेत,किडे खूप आहेत. मला काल रात्री खूप किडे चावलेत. आम्ही हे काम नाही करू शकणार. मी म्हटलं बाई हे मला कशाला सांगतेस?ज्यांनी कामावर ठेवलं त्यांना सांग. ते कुटुंब संबंधित माणसांना सांगून,तडकाफडकी रिक्षात सामान कोंबून निघून गेलं. आता अडचण झाली सोसायटीची. कारण सगळीच कामं आ वासून उभी होती. आता अन्य काही पर्यायच नव्हता

रामरावांचा शोध घेणे आवश्यकच होते.

रामराव घाईघाईने आवारात शिरले ,तो थेट प्रथम माझ्यासमोर उभे झाले. नमस्कारासाठी जुळलेले हात,डोळ्यातून घळघळ पाणी आणि रामराव बोलू लागले. मॅडम दोन दिवसांपुर्वी मला वाटलं होतं, इथे आपलं कुणीही नाही पण मॅडम तुम्ही तर आपलेपणा दाखवलाच पण ते तुमचे 'गजानन महाराज 'तेही माझे झालेत,काल रात्री निजण्यापुर्वी त्यांना खूप कळवळून प्रार्थना केली आणि तुम्हाला काय सांगू मॅडम. अहो ते काल रात्री माझ्या स्वप्नात आले. त्यांनी विचारलं काय रे इथे गावापासून दूर का आलास?मी म्हटलं 'देवा माझ्यावर फार कर्ज आहे. माझं दुकान बसलं. शेती पिकत नाही म्हणून पोट भरण्यासाठी इथे आलो .'त्यावर ठीक आहे म्हणून अदृश्य झाले आणि आज हे सगळं असं घडून आलं. मी कसे ऋण फेडणार त्यांचे?मी त्यांना म्हटलं अहो माझा देव चतकोर भाकरी आणि पिठल्यावर संतुष्ट राहतो. जेव्हा तुम्हाला जमेल तसं त्यांना दोन घास खाऊ घाला की झाले तुम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त!हां पण त्यांचं नाव मात्र कधीच सोडू नका .

पुढे मार्गशीर्षातील शेवटच्या गुरूवारी रामरावांच्या मुलीनी उपवास केला आणि पोळी,भाजी,चमचाभर साखर आणि कुरडई. असं सगळं महाराजांसमोर ठेवून उदबत्ती लावली. ते सगळं दृश्य पाहून माझे डोळे भरून आले आणि मीही मनातल्या मनात प्रार्थना केली, महाराज आम्हा सर्व भक्तांवर अशीच कृपादृष्टी असू द्या आणि तुमच्या प्रेरणेनी सतत आमच्या मुखी तुमचं नाव असू द्या,

श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!

🌺 अनुभव--सौ.शामा शरद भुसे .नाशिक

शब्दांकन-- जयंत वेलणकर 9422108069

आपल्या जवळ गजानन महाराजांविषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.

Recent Posts

See All
🌺अनुभव १५०

"श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १५०) नांदतो देव हा आपुल्या अंतरी जय गजानन! समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन...

 
 
 
🌺अनुभव १४९

................. "श्री " गजानन महाराज की जय (🌺अनुभव १४९) तू सर्वव्यापी सर्वेश्वर! जय गजानन! गजानन महाराज समाधिस्त झालेत त्या गोष्टीला...

 
 
 

Comentários


9892909088

©2020 by Vijaya Mahavir Bhattad. Proudly created with Wix.com

bottom of page