अनुभव - 23
- Jayant Velankar
- Jun 1, 2020
- 4 min read
" श्री "
गजानन महाराज की जय (अनुभव 23 🌺 )
* सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा *
जय गजानन! मी शर्मिला भाटे. माझे माहेर श्रीपूर,ता. माळशीरस जि. सोलापूर. लहानपणापासून घरातील वातावरणामुळे गजानन महाराजांची भक्ती होतीच.त्यात माझं लग्न ठरण्यासाठी पंढरपूर येथील गजानन महाराज मंदिराची जागा निमित्त ठरल्यामुळे ही भक्ती अजून बहरली.माझ्या आते बहिणीच्या लग्नाला मी पंढरपूरला गेले असताना माझ्या बहिणींनी माझ्या नकळत मला दाखविण्याचा उद्योग तेथील गजानन महाराज मंदिरात पार पाडला आणि मी सासरच्या लोकांना पसंत पडून माझे लग्न ठरले आणि जणू महाराजांच्या योजनेचाच भाग म्हणून मी लग्नानंतर पंढरपूरला आले. तिथून पुढे 1998 साली मिस्टरांनी व्यवसायाच्या उद्देशाने मडगाव गोवा येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आणि आमचं कुटुंब मडगावला स्थायिक झालं. सुरुवातीला तिथे गजानन महाराजांचं मंदिर नव्हतं पण महाराजांच्या कृपेने लवकरच तिथे मंदिराची उभारणी झाली आणि एक श्रध्दास्थान प्राप्त झालं .महाराजांच्या आशीर्वादाने दिवस समोर सरकत गेले आणि माझ्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं.
26 एप्रिल 2013 रोजी सांगली येथील खरे मंगल कार्यालयात लग्न म्हणजे मडगाव पासून तीन चारशे किलोमीटर दूर! त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की 24 एप्रिल ला सकाळी आपण खाजगी गाड्यांनी मडगाव येथून निघायचे. ठरल्याप्रमाणे 24 तारखेला पहाटेच घर जागे झाले आणि तयारीची एकच धांदल सुरू झाली. बॅगा भरणे,फराळ करणे,आंघोळी उरकणे,हास्य विनोद आणि एकच तारांबळ .लग्न घरच ते! अशात सकाळचे साधारण सात साडेसात वाजले असतील,मिस्टर म्हणाले मी आंघोळीला जातो आहे आणि त्यांनी आंघोळीला नंबर लावला.
इकडे आमच्या गप्पा सुरू होत्या,पाच मिनिटे झाली असतील आणि खूप जोरात कसलासा आवाज आला.आम्ही एकदम स्तब्ध झालो. सर्वांचेच डोळे विस्फारले,कान टवकारले,आणि आम्ही बाथरूमच्या दिशेने धाव घेतली. बाथरूम मधूनच तो आवाज होता. आम्ही दार वाजवून आवाज दिला पण आतून काहीच प्रतिसाद नव्हता. पुन्हा सगळ्यांनीच जोरात हाक मारली पण प्रतिसाद शून्य. 'दरवाजा तोडावाच लागणार 'कुणी तरी ओरडलं कुठलाही वेळ न दवडता दरवाजा तोडण्यात आला. आत हे निपचित पडले होते पूर्ण बेशुद्धावस्थेत. यांना चार जणांनी उचलून बाहेर आणलं,आमचे फॅमिली डॉक्टर, डाॅ.रायपूरकर यांना फोन लावण्यात आला सोबतच अँब्युलन्सही मागविण्यात आली.
माझ्या काळजाचा ठोका चुकला,माझ्या सकट सर्वांचाच चेहरा खर्रकन उतरला. प्रत्येकालाच प्रत्येकाच्या मनातलं वादळ समजत होतं .या सगळ्या धावपळीत मी आत देवघराकडे धाव घेतली,गजानन महाराजांच्या फोटोकडे शून्यात हरवलेल्या नजरेने पाहू लागली महाराजांसमोर दिवा लावला आणि तोंडून एकच वाक्य बोलली 'मुलीच्या लग्नाला यांचं येणं होऊ दे '
दरम्यान डाॅक्टर,अँब्युलन्स आले यांना हाॅस्पिटल मधे अॅडमिट करण्यात आलं. त्या दिवसाचा कार्यक्रम पुढे ढकलून आम्ही सर्व हाॅस्पिटल मधे दाखल झालो. तपासण्या झाल्या,निदान झाले आणि निदान ऐकून सर्वांनाच जबरदस्त धक्का बसला. 'मानेतील उभ्या मणक्याला हेअर क्रॅक आणि कमरेच्या खाली संवेदनाहीन'
ऐकून मी तर मटकन खाली बेंचवर बसले. कुणीतरी खांद्यावर हात ठेवला,पाहिलं तर वर्षा,माझ्या वहिनी, त्या म्हणाल्या काळजी करू नकोस. महाराज घेतील काळजी,
तुझ्या देवघरात महाराजांची पंचधातूंची जी मूर्ती आहे,जिला तू रोज अभिषेक करतेस,ती मी ताम्हणात पाण्यात ठेवून आले आहे. त्यांना सांगितलं आहे काळजी घ्यायला. होईल सर्व ठीक. इतक्यात डाॅक्टर बाहेर आले,म्हणाले, परिस्थिती नाजुक आहे. पुढे काय होईल काही सांगता येत नाही. एवढ्या लांबच्या प्रवासासाठी आम्ही परवानगी देऊ शकत नाही.मग डाॅक्टरांना सर्व परिस्थिती सांगितली. आमचे फॅमिली डॉक्टर बोलले,तेव्हा ते म्हणाले ठीक आहे जर उद्या पायांना संवेदना आल्या तर यांना परवानगी देता येईल. इतक्या कमी वेळात पायांमध्ये संवेदना येणं किती कठीण आहे हे डाॅक्टर मनातून जाणून होते.
आता काय?महाराजांचं स्मरण ....आता हाच उपाय/आठवावे सद्गुरू पाय/याविणे दुसरी सोय/काही नसे राहिली/.... धावपळीत तो दिवस केव्हा संपला कळलेच नाही. आता उरली होती फक्त एक रात्र. त्या रात्री झोप येतही होती आणि नव्हतीही. अर्धवट ग्लानीत एक ओळ
सारखी आठवत होती. 'गण गण गणात बोते म्हणूनी लावा अंगारा सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा 'आणि त्याच पार्श्वभूमीवर गण गण गणात बोते चा जप कळत न कळत होत होता. ती रात्र एकदाची सरली. सूर्याची किरणं अंगावर आली आणि डाॅक्टरांच्या बोलण्याचा आवाज कानावर आला.
'अनबिलीव्हेबल! त्यांच्या पायात संवेदना आल्या आहेत. अर्थात बाकी परिस्थिती नाजुकच आहे. अत्यंत सांभाळून,सावकाश,धक्का न लागू देता त्यांना नेता आलं तरच,तेही मानेत पट्टा अडकवून ठेवावा लागेल. बरं व्हायला बरेच दिवस लागणार आहेत. प्रवासात सांभाळून नेण्याच्या जबाबदारीवर तुम्ही त्यांना नेऊ शकता.
डाॅक्टरांच्या त्या सांगण्यानंतर संमिश्र प्रमाणात का होईना,वातावरण पुन्हा बदललं. आम्ही सर्वांनी आधी निघायचं आणि माझी लहान मुलगी आणि माझा लहान भाऊ हे मिस्टरांना घेऊन एस एक्स फोर गाडीनी मागवून सावकाश येतील असं ठरलं. थोडा जरी धक्का बसला तरी त्यांना खूप वेदना व्हायच्या आणि थांबून मलम लावावं लागायचं. अशा रितीने ते तिघं रात्रीपर्यंत सांगलीला येऊन पोहोचले. तिथे पोहोचल्यानंतर मुलीनी सांगितलं 'आई,बाबा म्हणत होते,मध्य रात्री कुणीतरी आलं,त्यांनी पाठीला आणि मानेला खूप शेक देऊन मसाज केला म्हणून मला बरं वाटलं!'
लग्नाचा दिवस उजाडला,हे मधेच विस्मृतीत जात होते,लग्नाचे सर्व विधी माझे दीर आणि जाऊ यांनी करावेत आणि कन्या दानाचा विधी ह्यांच्या हातून व्हावा असे ठरले. हे कन्या दानासाठी उभे झाले. 'मुलीच्या लग्नाला यांचं येणं होऊ दे 'हे माझं मागणं महाराजांनी पूर्ण केलं होतं. दोनच दिवसांपूर्वी जो माणूस पूर्ण बेशुद्धावस्थेत होता,मधला बराच वेळ जो आय सी यू मधे होता,ज्याची कमरे खालच्या भागातील संवेदना गेली होती आणि ज्याला पूर्ण बरं व्हायला पुढे सहा महिने लागले अशा माणसानी एवढा प्रवास सहन करून कन्या दानासाठी उभं राहणं ही माझ्या साठी महाराजांचीच कृपा होती.
आदल्या दिवशी डाॅक्टरांनी मिस्टरांना लग्नाला घेऊन जाण्याची परवानगी दिली तेव्हा घरी जाऊन मी माझी पंचधातूंची गजानन महाराजांची मूर्ती आभार मानून स्वच्छ पुसली होती आणि प्रवास आणि लग्न सुरळीत पार पडू दे म्हणून जागेवर ठेवली होती.
आता मी कल्पनेनेच ती मूर्ती हातात धरून हृदयाशी कवटाळली आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आजूबाजूला उभे असणारे माझे नातेवाईक ते दृश्य न्याहाळत होते आणि कदाचित आतल्या आत म्हणत होते.श्री गजानन!जय गजानन!श्री गजानन!जय गजानन!
🌺 अनुभव--सौ.शर्मिला भाटे. मडगाव गोवा
शब्दांकन--जयंत वेलणकर 9422108069
आपल्या जवळ गजानन महाराजां विषयी काही अनुभव असल्यास स्वागत आहे.
Comments